नवीन लेखन...

‘हम’ कितने (?) ‘एकाकी’

एकाकीपणाकडे आजवर कायम “व्यक्तिगत” समस्या या नजरेतून  बघितलं गेलं आहे पण तीच व्यक्ती जेव्हा एखाद्या संस्थेत काम करीत असते तेव्हा कामाच्या ठिकाणीही ती वेगळ्या कारणासाठी एकाकी असू शकते याकडेही आता लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. मूळ गाभ्यातून व्यक्ती तीच आहे, फक्त पार्श्वभूमी बदलते- व्यक्तिगत आणि व्यावसायिक ! दोन्हीकडच्या एकाकीपणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असल्याने त्याकडे युद्धपातळीवर कुमक पोहोचविणे आवश्यक बनले आहे.

विशेषतः अमेरिकन नागरिक अधिक एकाकी असतात असेही आढळून आलेले आहे. २०१८ साली २०,००० अमेरिकन नागरिकांचा अभ्यास केला असता सुमारे ५४% एकाकी आहेत असे चित्र समोर आले. वर्षभराने हा आकडा ६१ टक्क्यांवर पोहोचला. वैशिष्ट्य म्हणजे १८-२२ वयोगटातील ( जनरेशन “झेड “) मंडळी इतरांपेक्षाही अधिक एकाकी असतात असे धक्कादायक अनुमान या अभ्यासातून पुढे आले. गंमत म्हणजे याच पिढीकडे सर्वात जास्त तंत्रज्ञानयुक्त उपकरणे असतात आणि ते सतत एकमेकांशी /इतरांशी आभासी मार्गाने जोडलेले असतात. किंवा उलट असेल कां -एकाकी असतात म्हणूनच ते सतत आभासी विश्वात असतात कां ?

साहाजिकच जगभर एकाकी अवस्था आणि त्याचे स्वास्थ्यावर होऊ शकणारे संभाव्य परिणाम यांवर संशोधन सुरु झाले आहे. जास्त कालावधीसाठी एकाकी असलेल्या व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर जास्त परिणाम झालेले आढळतात, अगदी सिगारेटच्या व्यसनाइतके अथवा लठ्ठपणाच्या दुष्परिणामां इतके !

एकाकीपण म्हणजे  मित्रपरिवार,कुटुंब सदस्य, परिचित, सहकारी यांच्यापासून (सुरुवातीला तरी) शारीरिक दृष्ट्या दुरावणे ! यालाच सोप्या भाषेत आपण ” होम सिकनेस ” म्हणायचो. शिक्षण, नोकरी निमित्ताने घरापासून दूर जाणे, परगावी अथवा परदेशी जाणे यामुळे स्वाभाविकपणे शारीरिक अंतर वाढतेच. मग “एकटे “पण वाटू लागते. एकटेपण आणि एकाकी पण यात फरक आहे. एकटेपण आसपास परिचित चेहेरे नसण्यामुळे वाटते आणि ते तात्कालिक असते. नवीन गांवी, नवीन शाळेत, नव्या नोकरीत सुरुवातीला परिस्थितीशी जुळवून घेईपर्यंत अपरिहार्य एकटेपण जाणवते. कोणाशी ओळख नाही, संवाद संभवत नाही, कोणी आपल्याला समजून घेत नाही अशा परिस्थितीत एकटेपण भेटायला येते आणि काही काळ वस्तीला असते. काहीवेळा आपण त्याची निवड करतो, तर काही वेळा ते आपल्यावर लादलेले असते उदा – परदेशात शिक्षण अथवा नोकरी निमित्ताने काही वर्षे राहावे लागले तर ते भविष्यातील स्वप्नांच्या मदतीने सुसह्य करता येते.

याची सोपी तुलना करायची तर सोसायटीत राहणे आणि स्वतंत्र बंगल्यात राहणे याच्याशी करता येईल. पूर्वी “चाळ” संस्कृती होती, तिची जागा अपार्टमेंटने घेतली. पण तरीही तेथे सामायिक असे काहीतरी असते. मात्र बंगल्यातील स्वतंत्रपणे म्हणजे सगळं स्वतःचं स्वतः करणे ! एखाद्या गटाचा औपचारिक भाग असणे जितके सुखद असते, तितकेच नसणे हेही ताण निर्माण करणारे असू शकते. तेथे वेळ पडल्यास कुमक नसल्याने मेंदू आणि पर्यायाने शरीरालाही सतत जागरूक राहावे लागते आणि त्याचा त्रास होतो. शरीराची झीज होण्यास आमंत्रण देण्यासारखे ते आहे.

कॉर्टिसॉल आणि नोरेपीनेफ्रीन या तणाव निर्माण करणाऱ्या अंतस्रावांमध्ये वाढ झाल्याने रक्तदाब, निद्रानाश, मेदवृद्धी अशा विकारांना सामोरे जावे लागते. एकटेपण आणि एकाकी अवस्था कधी ना कधी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतेच पण अद्यापही त्याच्या परिणामांचा अभ्यास संपलेला नाही. संशोधनासमोरील एक मूलभूत आव्हान म्हणजे – एकाकीपण कसे मोजायचे? त्याची काही परिमाणे नाहीत आणि ते “वाटणे” व्यक्तिसापेक्ष असते. तुमचे सामाजिक जाळे कितीही अवाढव्य असले तरी-

” सीनेमे जलन, आँखोंमे तूफानसा क्यूँ हैं  

इस शहरमे हर शक्स परेशनसा क्यूँ हैं !!

हे ढळढळीत प्रश्न उरतातच.मग सर्वेक्षण करायचे तरी कसे? सरळ विचारायचे – ” कितीवेळा मी एकाकी आहे असं तुम्ही म्हणता ? ” की अप्रत्यक्षपणे विचारायचे- ” सोबत्याची गरज तुम्हांला कधी वाटते?”

एकाकी पण हे “आत ” असते. जवळ सगळी मायेची माणसे असली तरी माणूस स्वतःला एकाकी मानत असतो. बाह्यतः त्याच्यात फारसा बदल दिसला नाही तरी आतमध्ये सतत काहीतरी सुरु असते आणि ते कालांतराने पृष्ठभागावर येते.

शेवटी माणूस प्रगल्भ होण्यास खूप वेळ घेतो. त्यापूर्वी चेहेऱ्यांनी, आवाजांनी, स्पर्शांनी  ” घेरलेले ” असलो की सुरक्षित वाटते. काही अडचण आलीच तर आधार असल्याची भावना असते. सुखदुःख वाटून घेतले जाण्याची शाश्वती असते. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे सतत कोणाच्यातरी सान्निध्याची मानसिक गरज असते.

” नासा ” ही अमेरिकन अंतराळसंस्था गेली कित्येक वर्षे याच विषयावर संशोधन करीत आहे- अंतराळवीरांवर वर्षानुवर्षे एकाकी राहणे आणि एकप्रकारच्या बंदिवासात राहणे या परिस्थितीचा काय परिणाम होत असेल? विशेषतः वागणुकीतील आणि विचारांमधील बदल नक्कीच अभ्यासण्याजोगे असतील. शारीरिक परिणामांचाही वेध घेणे आवश्यक वाटायला लागले आहे. म्हणजे पुन्हा मेंदूचा अभ्यास आलाच.

शिकागो मध्ये ८२३ वृद्धांचा चार वर्षे अभ्यास करण्यात आला – प्रश्नावलीत एकाकीपणाची तपासणी करण्यासाठी विस्मृती आणि अल्झामायर या अवस्थांच्या संदर्भात सहभागी झालेल्यांची स्मरणशक्ती, अध्ययन क्षमता, आणि विचार करण्याची क्षमता या तीन कसोट्या वापरण्यात आल्या. त्यासाठी १ ते ५ या  मोजपट्टीवर  एकाकीपणाचे गुणांक काढण्यात आले. अल्झामायरचा धोका एकाकी व्यक्तींच्या संदर्भात ५१ टक्क्यांनी वाढू शकतो असा धक्कादायक निष्कर्ष या संशोधनात समोर आला.

या अध्ययनाच्या दरम्यान मृत्यू पावलेल्या वृद्धांच्या शव विच्छेदन अहवालावरून एका संशोधकाने असा दावा केला की एकाकीपणामुळे अशा व्यक्तींच्या मेंदूपेशींवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. एकाकीपण मेंदूच्या कार्यक्षमतेवर वेगाने प्रभाव टाकणारा घटक असतो असे स्टोनी ब्रूक विद्यापीठातील संशोधन मांडते. हेच संशोधन पुढे असेही प्रस्थापित करते की एकाकीपणामुळे व्यक्ती स्वतःकडे दुर्लक्ष्य करण्याची शक्यता वाढते, त्या व्यक्तीचे अन्नग्रहण कमी होऊ शकते, काळजी करण्याची प्रवृत्ती वाढू शकते आणि झोपही कमी होऊ शकते. अशा सवयींचे दूरगामी परिणाम संभवतात.

तीस वर्षांपूर्वी बेनेट नावाच्या शास्त्रज्ञाने एक अभूतपूर्व संशोधन सुरु केले – त्या कार्यात सहभागी झालेल्या मंडळींनी फक्त दरवर्षी शारीरिक आणि मानसशास्त्रीय चाचण्या करून घ्यायला परवानग्या दिल्या नाही तर, मृत्यूनंतर आपले मेंदूही प्रयोगासाठी दान करण्याचे मान्य केले. संशोधकाने त्यांच्या मेंदूच्या भावनात्मक भागाकडे लक्ष केंद्रित केले. आश्चर्य म्हणजे एकाकी व्यक्तींच्या मेंदूंमध्ये कॅन्सर, हृदयविकार, अल्सर,कोलायटिस सारख्या आजारांची जनुके आढळली. या जनुकांमध्ये एक अंतर्गत सूत्र असावे बहुधा ज्यायोगे हे आजार एकाकीपणाशी जोडले गेले असावेत. प्रदीर्घ काळ एकाकी असलेल्या व्यक्तीच्या अंतःस्रावांच्या झिरपण्यामुळे स्वास्थ्याशी जोडलेली जनुके कार्यरत होत असावी असा कयास बांधायला हरकत नाही.

एकाकीपणाचे भविष्य –

जसजशी लोकसंख्या वाढत जाईल, समाजाचे प्रश्न अधिकाधिक वाढत जाणार आहेत. तंत्रज्ञान मोठा कप्पा काबीज करीत जीवनातील वास्तव्यास असलेल्या घटकांना हुसकावून लावीत राहणार. बहुपदरी ,बहुपर्यायी जीवन पद्धती आता वास्तव बनत चालल्या आहेत. त्यामुळे परावलंबित्व ही आपली ओळख होणार आहे भविष्यातील ! ‘ जीवनातील बाह्य बदलांचा वेग हा अंतर्गत बदलांच्या वेगापेक्षा वाढता राहिला ‘ तर जुळवून घेताना दमछाक अपरिहार्य. मग शर्यतीमध्ये मागे राहणे आलेच. बरं ,मागे कितीजण राहिले हे वळून बघायला वेळ कोणाकडे?

थोडक्यात हे एकाकी पुंजके वाढतच राहणार ! भलेही त्याला तुम्ही ‘ वृद्धाश्रम ‘ असे गोंडस नांव द्या. नाहीतर घरातील एक कोपरा अशा ‘ अडगळींसाठी’ राखीव ठेवावा लागणार ! एकाकीपण ही व्यक्तिगत समस्या न उरता हळूहळू सामाजिक होत चालली आहे. पुढचा टप्पा नैराश्याचा आणि परिणीती बहुशः आत्महत्येत !

बऱ्याच आत्महत्यांचे मूळ कारण एकाकीपणात सापडते. हे भयपर्वाचे गडदीकरण नसून भावी वास्तवाचा निखळ आरसा आहे. एकाकीपणाच्या भविष्यावर भाष्य करताना गेले साताठ महिने जगाला व्यापणाऱ्या कोरोना वर लिहिल्यावाचून पुढे जाताच येणार नाही .  या विषाणूमुळे आपणां सर्वाना सक्तीचा क्षेत्रसंन्यास घ्यावा लागला आहे. कोरोनाच्या इतर बऱ्या वाईट परिणामांबरोबर त्यांचे मनो कायिक विश्लेषण होणे गरजेचे आहे.  कोरोना आणि आत्महत्या [मग नैराश्य आणि मूळ एकाकीपण ] या विषयावरील मूलभूत आणि विश्वासार्ह संशोधन सुरु होणे आवश्यक आहे. त्याचे निष्कर्ष यायला आणि ते जगन्मान्य व्हायला किती कालावधी जाईल माहीत नाही. अजून आपण त्याच्या छायेतून बाहेर पडण्यास अवकाश आहे.  लस , तिची परिणामकारकता यावर स्वानुभावानेच बोलणे उचित ठरेल. मात्र जगभरात कोरोना मुळे झालेल्या मृत्यू पैकी काही टक्के मृत्यूंचा संबंध मनोकायिक कारणांशी नक्कीच जोडता येऊ शकेल. सध्या काही वरवरचे आणि तात्कालिक अनुमाने आणि निष्कर्ष जरूर प्रसिद्ध होताहेत पण तशीही  त्यांची व्याप्ती आणि सर्वसमावेशकता मर्यादित आहे. हार्व्हर्ड विद्यापीठातील काही संशोधकांनी एप्रिल २०२० मध्येच दिलेल्या सूचक इशाऱ्यानुसार कदाचित २०२२ पर्यंत सगळ्यांनाच सामाजिक अंतर भान [सोशल डिस्टंसिंग ] पाळावे लागणार आहे. कदाचित संपूर्ण जगाचे लसीकरण पूर्ण होण्यासाठीचा कालावधी तोपर्यंत असेल. तशीही आपल्याकडे दुसऱ्या लाटेची वदंता आहेच. आणि त्यानंतरही किती लाटा असतील,त्यांचा कालावधी काय असेल,भयावह परिणाम काय असतील याबाबत फक्त कयास बांधणे एवढेच आपल्या हाती आहे. ” नासा ” अंतराळवीर – केली, ज्याने अवकाशात ३४० दिवस  एकट्याने व्यतीत केले, आपल्या न्यूयॉर्क टाइम्स मधील सदरात लिहितो – मी स्वानुभवाच्या आधारे एकाकीपणावर मात करण्यासाठी  इतरांना मदत करण्यास तयार आहे. त्याने नोंदी ठेवणे आणि छंद जोपासणे हे मार्ग सुचविले आहेत. ” नेमेक ” ने इतरांशी प्रामाणिकपणे संवाद वाढविणे,एकाकी मंडळींची आवर्जून विचारपूस करणे याची गरज कधी नव्हें ती वाढल्याचे नमूद केले आहे.

“आपण संपर्क वाढविणे,सातत्याने सहवासात राहणे एवढे तरी निश्चित करू शकतो ” असं त्याचं मत आहे.  ” तुम्ही ठीक आहात नं ” एवढीही चौकशी उबेसाठी पुरेशी असते. आपल्या पिढीने एवढं प्रदीर्घ धास्तावलेपण [कोरोना निर्मित ] उभ्या आयुष्यात प्रथमच अनुभवलं . त्या कालखंडाची देणगी आघातानंतरचे एकाकीपण असू शकेल. पण इतरही आघात आपल्याला दूर लोटायला पुरेसे असतात. सहचराचा मृत्यू मागे उरलेल्या साठी एकाकी पोकळी आणतो. घरातील /जवळच्या व्यक्तीचे अचानक जाणे , नोकरी जाणे अशाप्रसंगी जवळचे कोणी नसेल तर ऊरावर धोंडा येतोच. आपल्याला समजून घेण्याची इतरांची शक्ती सरणे  किंवा कोणालाही आपल्यासाठी वेळ नसणे हेही एकलेपण आणतं .  एकाकीपण ही आत्म्याची निजखूण असते. ते मानवी भाषांमधून व्यक्त न होता प्रतीके,काव्य , चित्रकला ,स्पर्श,डोळ्यांमधील नजर,आणि खोलवर जाणिवांमधून भिडते. म्हणूनच गुलज़ार सारखा भाष्यकार बजावतो – आपल्या एकाकीपणाची तक्रार करू नका. तुम्हीच फक्त  इथे एकटे नाही , सगळेच एकाकी आहेत. ही एकारलेली यात्रा संपता संपत नाही.

सभोवती गर्दी असली तरीही त्यांत गुदमरायला होतं .काहीजणांचे एकाकीपण कमावलेले , श्रमसाध्य आणि म्हणूनच अंतर साधून असतं . तेजाळलेलं ,आकर्षित करणारं एकाकीपण खूप कमीजणांच्या वाट्याला येतं . कलावंतांकडे असं स्वयंभू एकाकीपण असतं . काही व्यक्तीचं एकाकीपण अगत्यशील असतं . ज्याच्या अस्तित्वाचा आधार वाटावा असं ते असतं . आपल्याला आयुष्यात जे जे हवंस वाटत असतं ,ते सारं अशा व्यक्तीकडे आधीच आहे असं जाणवतं . अर्थात सगळ्यांच्या वाट्याला असं देखणं ,समृद्ध ,कृतार्थ एकाकीपण येत नाही.

बहुतांशी मंडळी  रडत- खडत , कण्हत -कुंथत ,गाऱ्हाणी करत  आपलं एकाकीपण जगत असतात. त्यांच्यासाठी काही मार्ग-

सर्वप्रथम एकाकीपणाचा नैसर्गिक आणि सकारात्मक स्वीकार ! त्याची अपरिहार्यता मनोमन मान्य करणे ! हा स्वीकार आधार देतो. मग काही सोप्या आणि वरकरणी सहज शक्य वाटणाऱ्या पायऱ्या-

राहतो ती जागा टापटीप ठेवली की तिथे प्रसन्नता ठिबकते . खाणं  रुचकर,पाचक असावं.  श्वासावर लक्ष ठेवावं. हलकं संगीत अधून -मधून कानी ठेवावं. एखादा दिवा/उदबत्ती लावावी. संधी मिळाली की डुलकी घ्यावी. शक्य झाले तर ” अशाच ” एखाद्याला मदत करावी. ” अनुरोध ” चित्रपटात सुंदर ओळी आहेत-

” तुम बेसहारा हो तो

किसीका सहारा बनो !

तुमको अपने आप ही 

सहारा मिल जाएगा !!

कश्ती कोई डुबती

पहुंचा दो किनारे पे !

तुमको अपने आपही

किनारा मिल जाएगा !!

स्व -मदतीचा हा किती सुंदर मार्ग आहे.

आणि शेवटचा रस्ता- रोजनिशी लिहिणे !

सगळा निचरा करायचा – मनाची स्वच्छता करून कचरा दूर लोटायचा.

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..