नवीन लेखन...

हॉटेलिंग? बाऽपरे…!

आजकाल शहरापासून आणि छोट्याछोट्या गावापर्यंत हॉटेलिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. खरंच आजकाल हॉटेलचे खाणे आनंददायी आहे काय? आपण कुटुंबीयांसह, मित्रांसह हॉटेलमध्ये, बदल म्हणून म्हणा अथवा ठरावीक निमित्ताने म्हणून जेवण्यासाठी जातो. पण, खरंच आपण तेथे प्रशस्तपणे, आनंदाने एन्जॉय करतो काय? सध्या तर कुठेही हॉटेलात गेलो की, आपण खुर्चीवर बसतपण नाही तोपर्यंत तेथील वेटर (कर्मचारी) लगेच प्रश्‍न विचारतो की, मिनरल वॉटर की हॉटेलचे रेग्युलर पाणी देऊ? आपणही मोठेपणात म्हणा अथवा आरोग्यदक्ष म्हणून म्हणा, लगेच मिनरल पाणी बाटलीची ऑर्डर देतो. ते पाणी तरी खरोखरच आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का, हे पण पाहात नाही. त्यानंतर मेनूकार्ड पुढे ठेवले जाते. मग आपण आपसात चर्चा करून हो नाही म्हणत दोन-चार भाज्यांच्या डिशेश व मोठेपणा लपवत दालफ्रायचीही ऑर्डर देतो. बर्‍याच वेळेच्या प्रतीक्षेनंतर वेटर, सांगितलेले सर्व पदार्थ अगदी द्रोणागिरी पर्वत उचलून आणल्याच्या आविर्भावात आणून दोन महिलांच्या अथवा मुलांच्या दोन खुर्चीमधून लांब हात करत एकदाचा टेबलावर ठेवतो. मग एकदाचे आपणच वाढून घेऊन जेवणाची सुरुवात होते. तेव्हा जाणवते की चमचे पुरेसे नाहीत, तर कधी पाण्याचे ग्लास पुरेसे नाहीत, तरी आपण मुकट्याने ऍडजेस्ट करत खाणे सुरू करतो. नंतर पुन्हा रोटी वगैरेसाठी त्या वेटरची प्रतीक्षा सुरू… वेटर महाशय कुठेतरी अज्ञात स्थळी गायब झालेले असतात. नंतर कसेतरी चौकशी करून वेटरला उपस्थित केले जाते. मग जेवण संपत आल्यावर वेटरचा विविध प्रकारच्या भातासाठी दबाव सुरू होतो. इच्छा असो वा नसो, पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे आपण बोलावतो जिराराईस! ठरलेला पदार्थ!! जो घरी साधारणपणे कुणी नियमित खात असेल असे वाटत नाही, त्याची ऑर्डर देऊन मोकळे होतो. तेवढ्यात भरगच्च टेबलावर एखाद्या सडक्या लिंबूच्या फोडीसह कोमट पाण्याची वाटी प्रत्येकासमोर ठेवली जाते. लगेच हात धुणे होईपर्यंत वेटरचा पुढचा दबाव म्हणजे आईस्क्रीम किंवा फ्रुटज्यूसची ऑर्डर. तिथेही इच्छा असो वा नसो, दबावाखाली आईस्क्रीमची ऑर्डर दिली जाते. म्हणजे आपण हॉटेलमध्ये गेलो होतो स्वत:ची हौस म्हणून खाण्यासाठी, पण प्रत्यक्ष खाऊन येतो वेटरच्या इच्छेप्रमाणे- दबावाप्रमाणे! पण, काय करणार? त्या टेबलावर आपल्या अंगात मोठेपणाचे भूत संचारलेले असते. मग येते भरमसाट बिल! एरवी जेवण चालू असताना सतत गायब असणारा वेटर, बिल आणल्यापासून पैसे देईपर्यंत सतत तुमच्या टेबलजवळच सेवेत अदबीने उभा असतो. त्या बिलात आजकाल सर्व्हिस टॅक्स/सर्व्हिस चार्ज नावाखाली बरेच पैसे घेतले जातात. ते कशासाठी? हा प्रश्‍न कुणीही डोक्यात आणू नये किंवा मोठेपणामुळे आपणही आणत नाही. एवढे झाल्यावरही त्या वेटरला १०-२० रुपयांपासून मोठेपणाच्या लेव्हलनुसार ५०-१०० रुपयेदेखील टीप म्हणून द्यायला आपण कमी करत नाही. कारण आता ही प्रथाच पडली आहे. या प्रथेचे मूळ काय, याचा कृपया शोध घेऊच नये! बरं, एखाद्याने टीप नाही दिली तर तो वेटर त्याच्याकडे अशा आविर्भावात पाहतो, जणूकाही आपण काहीतरी गुन्हाच केला आहे, फुकटचे जेवून जात आहोत. नंतर आपण कृतकृत्य झाल्याच्या आविर्भावात तेथून एकदाचे हॉटेलबाहेर पडतो! हुश्शऽऽऽ काय एन्जॉयमेंट… नाही का? असे आपण सजा भोगून आलो की मजा! हा प्रश्‍न फक्त मनातल्या मनात ठेवायचा! खरं तर टाय ड्रेस घातलेल्या, बर्‍याचदा घामट, गचाळ वेटर माणसाकडून हॅरॅश करून घेत कित्येकदा स्वत:ला अवघडून घेत आपण जेवण करतो, त्याचे आपणाला काहीच वाटत नाही! ठोक बाजारातून ७-८ रुपयांत मिळणारी पाण्याची बाटली २५ रुपयांत विकण्याचा हॉटेलमालकांनी एक धंदाच सुरू केला आहे. त्याचे ना गिर्‍हाईकाला सोयरसुतक ना संबंधित शासकीय विभागाला!

आपण हॉटेलिंग करताना कधी विचार केला का की, मेथीची भाजी, पालक भाजी, वांगे, कोबी या भाज्यांची किंमत साधारणत: दीडशे रुपये प्रतिडीश असते. पण, खरंच दहा-वीस रुपयांत मिळणारी ही भाजी इतकी दहापट महाग दराने खाणे योग्य असते काय? त्यात हॉटेलमधील वापरले जाणारे तेल, मसाला याचा दर्जा काय असतो? त्यामुळे विविध रोगाला आमंत्रण, कोलेस्ट्रॉलची वाढ वगैरे आपण सोयिस्करपणे दुर्लक्ष करतो. आपले डॉक्टर नेहमी याबाबत आपणाला सूचना देत असतात, पण चैनीची जीवनशैली म्हणून हे सर्व आरोग्यास घातक प्रकार आपण सर्रासपणे करत आहोत. प्रत्येक गावात हॉटेल्समध्ये गर्दी असते. हा खरं तर चिंतेचा विषय आहे. आपणच आपल्या मुलांना लहानपणापासून अशी भडक, चमचमीत खाण्याची सवय लावतो, हा आपलाच- पालकांचा गुन्हाच म्हणावा लागेल. घरच्या सात्त्विक भाज्या, अन्न, ज्यात आईने प्रेम ओतून कमी प्रमाणात वापरलेले मसाले, चांगले तेल, चांगले पाणी वापरून केलेल्या दर्जेदार अन्नाची सवय लावण्याऐवजी, हॉटेलचे खाणे अगदी लहान मुलेदेखील पसंत करतात, हे योग्य आहे काय? हॉटेलच्या भाज्यांचे दर खरोखर माफक- योग्य आहेत काय? भाज्या, अन्न तयार करणारे कर्मचारी खरोखरच स्वच्छ, हायजेनिक असतात का? हॉटेलचे स्वयंपाकघर स्वच्छ असते काय, याचा आपण कधीही विचार करत नाही. फक्त बाहेरचे डेकोरेशन, शो/देखावा याला भाळून मोठेपणा गाजवत स्वत:चेच आरोग्य खराब करून घेतो, याचे भान राखले पाहिजे. घरच्या भाज्या, फळे स्वच्छ धुवून खायला दिले जातात. ते सात्त्विक अन्न आपण डावलतो. हॉटेलच्या भडक मसाल्याला आपण आकर्षित होतो. केवळ आपण भडक मसालाच खात असतो याची जाणीव ठेवली पाहिजे अन्यथा टरबुजाची लाल फोड ज्या आवडीने आपण खातो त्याच आवडीने चिकन-मटनची लाल फोड आपण खाऊ शकतो काय? केवळ त्याच्यावर लावलेल्या मसाल्यामुळे आपण खातो. पण, शरीरस्वास्थ्याला तो मसाला किती घातक असतो, याची जाणीव ठेवत नाही. म्हणूनच आजकाल वयाच्या २५-३० व्या वर्षीसुद्धा उच्च रक्तदाब, हार्टअटॅकच्या घटना घडत आहेत. लिव्हर, किडनीदोष निर्माण होत आहेत. हीच बाब चायनीज फूडच्या बाबतीत, ज्याचे अतिशय पेव आपल्या देशात आले आहे, ते चायनीज पदार्थ तर आरोग्यास १०० टक्के घातक आहेत. केवळ चवीस चांगले म्हणून आपण खातो. पण, तितकेच आरोग्याला घातक असे ते अन्न आहे. घरच्या फोडणीचा भात, शिळ्या भाकरी, पोळीचा कुस्करा, उपमा, शिरा, थालीपीठ हे सर्व पदार्थ बाहेरच्या पदार्थांपेक्षा लाख पटीने सात्त्विक असतात. घरच्या घरी स्वच्छ स्वयंपाक करण्याची गोडी, व्यायाम, आपलेपणा या सर्व गोष्टींना आपण मुकत आहोत व अगदी लहान मुलापासून असे बाहेरचे खाण्याचे वाईट व्यसन आपण लावून घेत आहोत. हे कुठेतरी थांबले पाहिजे. बाहेरच्या जवळपास सर्व पदार्थांत मैदा/मसाला वापरला जातो, जे आपल्या मानवी आरोग्यास अतिशय घातक सिद्ध झालेले आहे. त्यामुळे सर्वांनी याचा गंभीरपणे विचार करून बाहेर खाणे शक्य तो टाळले पाहिजे. अन्यथा २०-२५ च्या वयातच किडनी, लिव्हर, हृदयविकार सहन करण्याची तयारी करावी!

हीच बाब बाहेरच्या विविध शीतपेयांच्या बाबतीत आहे. घरचे लिंबू सरबत, ताक, पन्हे, लस्सी इत्यादी पदार्थ सोडून रसायनमिश्रित, कित्येक दिवसांपासून साठवलेली शीतपेये आपण भरमसाट पैसे खर्च करून आवडीने पितो, हेदेखील आरोग्यास घातक आहे. याची शिकवण शाळेत व घरी पालकांनी आवर्जून दिली पाहिजे व वडीलधार्‍यांनीदेखील हे आचरणात आणले पाहिजे.

वाचा व विचार करा

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..