
मला आनंद झाला तो हिंदुस्थानी क्रिकेटचा विजय साजरा झाला म्हणून. मुंबई रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही याच दुःखही तेवढंच आहे. विदर्भाने तिसऱ्यांदा रणजी करंडक जिंकताना आपण पहिल्या दोन्ही वेळेला रणजी करंडक जिंकला तो विजय आपल्या कर्तुत्वावर जिंकला होता. तसेच यंदाही आपलं कर्तृत्व त्यापेक्षाही जास्त सरस होतं यात शंकाच नाही आणि हेच त्यांनी हिंदुस्तानी क्रिकेट जगताला दाखवून दिले.
हरियाणाने १९९० साली मुंबईला हरवत रणजी करंडक जिंकला तेव्हा कपिल देव पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, मुंबई व्यतिरिक्त इतर संघांनाही रणजी करंडक जिंकता येतो हे आम्हाला दाखवता आलं यातच आमचा आनंद आहे. १९८३ साली एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा विश्वचषक भारताने उंचावला त्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल होऊ लागले. हिंदुस्तानी क्रिकेटच्या प्रमुख स्पर्धेत अर्थात रणजी करंडक स्पर्धेमध्ये मुंबई व्यतिरिक्त हळूहळू इतर संघही आपले बस्तान बसवू लागले आणि पश्चिम विभागातला कोणताही संघ रणजी करंडकात पहिल्या आठ संघात पोहोचत रणजी करंडक जिंकू लागला. त्याबरोबरच भारतातल्या इतर संघांमध्येही राजस्थान, पंजाब, रेल्वे, उत्तर प्रदेश आणि आता आता तर जम्मू-काश्मीर हा ही एक प्रबळ संघ म्हणून पुढे आला. कोणी एकेकाळी जम्मू-काश्मीर संघाने केवळ इतर संघाकडून मात करून घेण्याकरताच आपला संघ उतरवला आहे असे वाटत असे. त्या जम्मू कश्मीर संघाने गेल्या काही वर्षात मुंबईवर दोन वेळा आणि यंदा तर निर्णायक विजय नोंदवला हा भारतीय क्रिकेटचा विजय ठरावा.
आज भारतीय क्रिकेट हे सर्व दूर पसरले गेले आहे अगदी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत कोणताही संघ अंतिम फेरीत पोहोचू शकेल ही परिस्थिती आज भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने अत्यंत सुखावह आहे. त्यासाठी तितकाच कारणीभूत आहे रणजी करंडकाचा सध्याचा असलेला एक वेगळा ढाचा. याचमुळे कोणत्याही रणजी संघाला बलाढ्य संघाशी सामना करता येतो व त्याला टक्कर देता येते.
विदर्भाचा संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचत होता तर केरळचा संघ प्रथमच अंतिम फेरीत पोहोचत होता. त्यामुळे केरळ संघावरती दबाव सहाजिकच जास्त होता. अर्थात विदर्भ संघावर विजेतेपद राखणे याचाही दबाव असू शकतो पण, विदर्भ संघ अधिक अनुभवी होता. त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा उठवत शांतपणे खेळत केरळ संघावर पहिल्या डावात आघाडी घेत विजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरले. केरळ संघाने जम्मू-काश्मीरचा पराभव करताना केवळ एका धावेची आघाडी ही किती महत्त्वाचे असू शकते हे दाखवून दिले.
जम्मू कश्मीरचा अनुभव थोडासा कमी पडला. पण यापुढे मात्र कोणत्याही संघाला रणजी करंडक जिंकता येऊ शकेल ही परिस्थिती हिंदुस्थानी क्रिकेटला पूरक आहे. रांचीचा धोनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करतो व भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळवून देतो यातच भारताची भारतीय क्रिकेटची पाळंमुळं आता कशी सर्व दूर पसरू लागली आहेत यात शंकाच नाही.
जाता जाता मुंबई संघाला मला चिमटा काढण्याची इच्छा नाही. पण मुंबई संघाला आता आपण कसेही कधीही केव्हाही जिंकू शकतो ही स्वप्नमालिका विसरावी लागेल. आपल्याला प्रत्येक सामना हा जिगरीनं खेळूनच जिंकावा लागेल आणि त्याची त्यासाठी मुंबईची फलंदाजी अधिक बळकट करावी लागेल. यंदा मुंबईची फलंदाजी बहरली नाही यात मुंबई संघाचा दोष की आणखी काही असेल. पण मुंबईच्या कर्णधाराचा यात काहीही वाटा नव्हता हे मात्र नमूद करावा लागेल. मला अनेक धुरीणांचे बोल ऐकावे लागतील पण वस्तुस्थिती मात्र नाकारता येत नाही. कोणी एकेकाळी मुंबईचा कर्णधार म्हटला की कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकण्यासाठी जीवाचं रान करेल याची खात्री असे. ती खात्री यंदा कधीच देता आली नाही आणि उपांत्य फेरीपर्यंत तीन वेळा मुंबई पराभूत झाली हेच मुंबईच्या अपयशाचं खरं कारण आहे. यापुढे जर मुंबईला रणजी करंडक जिंकायचा असेल तर मुंबईकरांना फार मोठी मेहनत करावी लागेल.
मुंबई तामिळनाडू विरुद्ध १९७३ साली जिंकत असताना आमचा एक कौटुंबिक मित्र मला म्हणाला होता; आता यापुढे मुंबईला रणजी करंडक इतका सहजी जिंकता येणार नाही मुंबईला खूप मोठी मेहनत करावी लागेल. आणि तेच खरं झालं. १९७७ पासून मुंबईला रणजी करंडक किती कमी वेळा आणि किती मेहनतीने जिंकता आला; याचा विचार जरी मुंबईच्या निवड समितीने आणि मुंबईच्या क्रिकेटपटूने केला तर मुंबईला अजूनही ते सोनेरी दिवस पाहता येतील.
विजयी विदर्भ संघाचे अभिनंदन आणि केरळ संघाचे ही तितकेच अभिनंदन. यापुढे केरळ संघाला आता गृहीत धरता येणार नाही. तसेच इतर कोणत्याही संघांना पराभूत करताना सोपं जाणार नाही आणि हीच रणजी करंडकाच्या यशाची महती यापुढे चालू राहो हीच सदिच्छा. रणजी करंडक विजयी भव …..
श्रीकांत राजे, ठाणे.
फाल्गुन शुक्ल तृतीया, शके १९४६
Leave a Reply