नवीन लेखन...

चेहेरा लपवा आणि गपचूप जिवंत राहा

साधारण तीन चार महिन्यांपूर्वी मी माझ्या इमारतीच्या शेजारी असलेल्या दोन झाडांबद्दल एक लेख whatsapp आणि facebookवर लिहिला होता. ३१ मे २०१६ या दिवशी पहाटेच्या वेळेस या दोन झाडांना कोणीतरी विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकले होते. अगदी ६०-७० वर्ष वयाची ही पूर्ण वाढलेली हिरव्यागार पानांच्या भरगच्च पानांची ही दोन्ही झाडे विषारी इंजेक्शनमुळे अगदी एका आठवड्याच्या काळात काळीठिक्कर पडली होती.

इंजेक्शन दिल्याची घटना आमच्या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या ‘अमानुष खुना’ विरुद्ध मी सनदशीर मार्गाने खूप लढलो. महानगरपालिकेकडे सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार दाखल केली. त्यांच्याकडून काहीच हालचाल होत नाही म्हणून शेवटी आमच्या दहिसर पश्चिमेच्या महानगरपालिकेच्या विभाग अधिकाऱ्याला वकिलाची नोटीस पाठवून ह्या झाडांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारीही ठेवली..‘दै. लोकसत्ता’सारख्या प्रतिष्ठित वर्तमानपत्राने या घटनेविरुद्ध आवाज उठवला आणि ‘आयबीएन लोकमत’, ‘आईबीएन 7’ सारख्या मराठी-हिंदी चॅनेलच्या माध्यमातूनही ही बातमी प्राधान्याने आणि सातत्याने दाखवली गेली..पण निर्ढावलेल्या भ्रष्ट शासकीय यंत्रणांवर याचा ढिम्म परिणाम झाला नाही. मी आणि माझे कुटुंबीय यांनी त्या झाडांना जगवण्याचा खूप प्रयत्न अगदी प्रामाणिकपणे केला. माझे साडू अॅड. प्रकाश पवार हे माझ्यासोबत उभे होते. परंतु करोडो रुपये ‘वृक्षारोपणा’च्या दिखावू (आणि खावू) कार्यक्रमावर खर्च करणाऱ्या शासकीय यंत्रणांच्या मनात, कोणत्यातरी अनाकलनीय कारणांमुळे तीन पिढ्यांची साक्षीदार असलेली ती झाडे मरावी अशी इच्छा असल्याने आमच्या लढण्याला आपोआपच काही मर्यादा येत होत्या होत्या.

मी ही इतर सभ्य नागरिकांसारखी ही घटना विसरण्याचा प्रयत्न करू लागलो. रोज त्या झाडांखालून जाणे टाळता यायचे नाही परंतु ती झाडे मला दिसणार नाहीत अशा पद्धतीने मी खाली मान घालून झाडांसामोरून ये-जा करायचो…ती झाडे माझ्याकडे विद्ध नजरेने बघत असतील अशी अपराधीपणाची जाणीव माझ्या मनात असल्यामुळे माझी त्या झाडांना नजर देण्याची हिम्मतच होत नव्हती. विषामुळे काळी ठिक्कर पडलेली आणि पानांचे अवयव गळलेली ती दोन कलेवरे त्याही परिस्थतीत खालच्यांना जमेल तशी सावली देण्याचा प्रयत्न करत होती.

‘मेलेली’ झाडे कापायला अनेक हात पुढे येत होते. परंतु झाडांच्या खुणा विरुद्ध मी न्यायालयात गेलो असून हि झाडे त्याचा पुरावा आहे असे सांगून मी त्या झाडांना कापण्याची मनाई करत होतो. असे चार महिने पार पडले. पाऊस सुरु झाला. खूप छान पाऊस पडला या वर्षी. आणि आता चार दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात त्या झाडांकडे बघताना मला एक नवल जाणवले. त्या झाडांना परत पालवी फुटली होती अगदी थोडी होती, पण त्या झाडांनी जीव धरायला सुरुवात केलेली दिसली. पुन्हा सकाळच्या उजेडात निट निरखून पण चोरून पहिले तर खरंच त्या झाडांना काही ठिकाणी पालवी फुटली होती(सोबत फोटो देतोय)..हे बघून मला झालेला आनंद अवर्णनीय होता..जगात एवढे महत्वाचे प्रश्न असताना ह्याच काय चाललंय म्हणून मला सर्वजण वेड्यात काढतील म्हणून कोणाला सांगायचीही सोय नाही आणि म्हणून तुम्हा (बिन चेहेऱ्याच्या) लोकांशी हा आनंद वाटावा म्हणून हे लिहावास वाटल..

आता मला वेगळी भीती वाटू लागलीय. ती पालवी फुललेली अगदी सहज दिसते आणि झाडांनी जीव धरलेला पाहून काही लोकांचा जीव निश्चितच टांगणीला लागेल..ती कोवळी पालवी खुडून टाकण्यासाठी अनेक हात आता पुढे सरसावतील. पण झाडांना याची पर्वा आहे असे दिसत नाही. त्यांचा माणसांच्या चांगुलपणावर अजुनही विश्वास असावा आणि म्हणून त्या झाडांनी त्यांना फुटलेली पालवी अगदी राजरोसपण आपल्या अंगावर मिरवली आहे. मूक झाडांना खरं खोट जमत नाही. तो गुण खास आम्हा माणसांचा. अनेक खोटे मुखवटे लावून दुसऱ्याचा हक्क कसा छिनून घेता येईल याच्या सदोतीत खटपटीत असलेल्या माणसाच्या जाती समोर झाडांचा त्यांचा पालवीरुपी चेहेरा राजरोस मिरवण्याच्या वृत्तीचे कौतुकही वाटते आणि भीतीही वाटते..

माणसाबरोबर वावरत असताना जगण्याची केवळ दुर्दम्य इच्छा असून नाही चालत, तर असावी लागते दुसऱ्याला संपवून स्वतः जगण्याची पाशवी वृत्ती हे त्या झाडांना कोण आणि कसं समजावणार? आपली कोवळी पालवी लपवून ठेवा आणि गपचूप जिवंत राहा हे झाडांपर्यंत कस पोचवायच हा प्रश्न मला आता पडला आहे.

— गणेश साळुंखे
९३२१८११०९१
salunkesnitin@gmail.com

माझी चार महिन्यांपूर्वीची पोस्ट

https://www.facebook.com/nitin.salunke.1297/posts/1054986807889509

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..