नवीन लेखन...

मौज टांग्याची

अनेक वयस्कर लोकांच्या लहानपणच्या आठवणीत टांगा नक्कीच असणार. आॅटो रिक्षा सुरु होण्याआधी गावातल्या गावात, बाहेरगावाहून ट्रेनने प्रवास करून आल्यावर स्टेशनपासून, बसस्टँडपासून घरी जाण्याचा तोच एक मार्ग ,पर्याय होता. आणि लहानपणी तर टांग्यात बसणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असे. त्यात चढणं तितकं सोपं नसायचं..थोडं जिकिरीचंच असायचं , अगदी लहान असताना बाबा, काका उचलूनच ठेवायचे…पुढे स्वतः चढणं सुरु केलं ..केवढा आनंद असायचा तो.

…१९५७/ ५८ साली आम्ही धुळे येथे होतो. सोलापूरहून वडिलांची बदली धुळे येथे झाली होती. त्यावेळी रहायला रामवाडी जवळ होतो. तेथील ” कमलाबाई शंकरलाल कन्याशाळा ” येथे प्रवेश मिळाला. तसं घर खूप जवळ नव्हतं , सुरवातीला चालत जात असू, कधी वडिल कारमधून सोडायचे..पण त्यांनाही रोज सोडणं शक्य नव्हतं म्हणून वडिलांनी आम्हा दोघी बहिणींसाठी टांगा ठरवला. आमच्या शेजारच्या दांडेकर तिघी बहिणीही आमच्याच शाळेत होत्या, त्याही टांग्यातून जायच्या. आम्ही दोघीच असल्यामुळे जवळच रहाणारी एक मैत्रीण आशा कटारिया आम्हाला सामील झाली. आमच्या टांग्याचा घोडा इतर घोड्यांच्या मानाने जास्त उंच होता. आणि बराच हट्टी आणि मूडीही. कधीकधी रस्त्यातच थांबून राही.,पुढे जात नसे.अनेक वेळा असे झाले ..टांगा चालवणारा पोरगेला मन्नू खूप चांगला होता पण कधीकधी त्याला तो घोडा आवरत नसे..एकदा शाळेतून परत येताना आमच्या बिल्डिंगच्या प्रवेश द्वारातच तो सुटला आणि टांग्यापासून मोकळा झाला..,आम्ही दोघी खाली कोसळलो.,तसं फारसं लागलं वगैरे नाही..मन्नूला मात्र त्याला आवरणं कठिणच झालं.,घोडा टांग्याजवळ येईना आणि बांधूही देईना..बर्‍याच वेळानंतर तयार झाला तेव्हां कुठे ते दोघं घरी गेले.

…पूर्वी आजच्याप्रमाणे लोक आम्ही येतोय वगैरे कळवत नसत..कळवण्याची साधनेही नव्हती. अचानकच कोणाही नातेवाईकांकडे हजर होत. दारात टांग्याचा आवाज आला,घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज आला की ..”अगंबाई, वन्सं, भावोजी आले वाटतं..” असे शब्द कानावर पडत. येणारी व्यक्ती आवडीची असली तर आनंद व्यक्त होई ..अन्यथा..कपाळावर आठ्या पडत आणि मग स्वागत करताना तिरकस बोलणं ऐकावं लागे.

…फिल्मी जगतातही पूर्वी टांग्याचा वापर द्ृष्टीस पडे. संगीतकार ओ पी नय्यर यांची बरीच गाणी ” टांगा” तालावरच आहेत. ” यूँ तो हमने लाख हँसी देखे हैं,तुमसा नहीं देखा ..” माँगके साथ तुम्हारा मैंने माँग लिया संसार “…वगैरे गाणी केवळ टांगा तालच नाही तर टांग्यात बसूनच आहेत. “भाभी” सिनेमात बेबी नंदा टांग्यात बसून सासरी जाते आणि मागे गाणं चालू होतं ” चल उड जा रे पंछी के अब ये देस हुआ बेगाना ” … अगदी अलिकडे “आलाप” सिनेमात एक हृदयस्पर्शी सीन होता..संगीतप्रेमामुळे वडिलांपासून (ओमप्रकाश) वेगळा झालेला अमिताभ पुढे टांगा चालवण्याचे काम करत असतो. एकदा ओमप्रकाशना न्यायचं काम करायची वेळ येते..ओमप्रकाशला फार नंतर कळतं..आपण ज्या टांग्यात बसलो आहोत तो आपल्या मुलाचाच आहे..हा सीन लिहिण्यापेक्षा पाहूनच त्याची depth, गांभीर्य कळते. फार सुंदर आहे तो पितापुत्रांचा संवाद. ओमप्रकाशचं काम फार वेगळं आहे यात..बापाची वेदना, दुःख फार सुंदर व्यक्त झालं आहे.

…सगळ्यात छान आठवण आहे ..कर्‍हाडची…कर्‍हाड माझं सासर. लग्नाआधी एका दिवाळीला मी आणि माझी मैत्रीण आणि होणार्‍या नवर्‍याची मावसबहिण मिळून कर्‍हाडला घर बघायला जायचं ठरवलं. आम्हाला एस टी स्टँडवर उतरुन घेण्यास सासर्‍यांनी त्यांच्या शाळेतील एका शिपायास पाठवले होते. तसं आम्ही एकमेकांना कधी पाहिलं नसल्यामुळे ओळखत नव्हतो पण तो माझा फोटो पाहून आला होता…मला पाहताच ओळखलं आणि तो कोण हेही सांगितलं..आणि उतरल्यावर आम्हा दोघींना एका टांग्यात बसवलं, तो स्वतः सायकलवर आला होता. टांग्याच्या मागोमाग तो येत राहिला .ही गोष्ट १९६८ ची..मला तेथे रिक्षा नाहीत याचं खरं तर आश्चर्यच वाटलं होतं.कर्‍हाडमध्ये त्यावेळी रिक्षा सुरु झाल्या नव्हत्या. कित्तीतरी वर्षांनी मी परत टांग्यात बसले होते. मजाही वाटत होती. पुण्याला परत येतानाही टांग्यातूनच एस टी स्टँडवर आलो होतो.

…१९६९ मध्ये लग्नानंतर आम्ही काही दिवस कर्‍हाडला होतो. त्यावेळी सुरवातीचे काही दिवस लाडात, कौतुकात चालले होते. लग्न पुण्यात झालं होतं त्यावेळी लग्नाला येऊ न शकलेल्या लोकांसाठी कर्‍हाडला घरातच जेवणाचा बेत केला होता. घर मोठं होतं, घरात जुनी मोठ्ठी अवजड तांब्या पितळेची भांडी होतीच..दीडशे लोकांना बोलवायचा बेत होता आणि प्रत्यक्षात चारशे लोक जेवून गेले. मागच्या अंगणात स्वयंपाक होत होता..ओसरी ,पडवी, माजघर येथे जेवणाच्या पंक्ती दिवसभर चालू होत्या .

…आम्ही घरचे लोक जेवायला बसलो तेव्हा साडेतीन तरी झाले असावेत. त्याआधी पंक्ती चालू असताना नवी वधू, वर यांना मधूनमधून उखाणे घेण्याचे आग्रह चालू होते.त्यावेळी अविनाशने घेतलेला उखाणा एकदम वेगळाच..एकच हशा पिकला होता.,अजूनही जुने लोक तो आठवून मनापासून हसतात..तो टांग्याशीच संबंधित…तो उखाणा होता ..

…..” कर्‍हाडच्या वाटेवर गाडीचं मोडलं कुसू..नको देवकी रुसु आपण टांग्यात बसू “..

-देवकी वळवडे….

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 280 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..