नवीन लेखन...

हालोबाचा माळ…

आमच्या बालपणी कधी आम्ही पिकनीकला गेलो नाही किंवा पर्यटनस्थळाला गेल्याचे फारसे आठवत नाही. अनेक जणांच्या तोंडून पर्यटनस्थळांची वेगवेगळी नावं मात्र ऐकली होती. मेळघाट्,लोणावळा, चिखलदरा,म्हैसमाळ ही नावं ऐकून त्याबद्दल खूप उत्सुकताही वाटायची पण, आमचे फेवरेट पर्यटन स्थळ म्हणजे गावचा हालोबाचा माळ.

शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी मित्रासोबत म्हैस चारण्यासाठी माळावर जायचे.आमच्या सेलू आणि सातेगावच्या शिवेवर असणारा हालोबाचा माळ म्हणजे आमचा म्हैसमाळ.म्हैस हालोबाच्या हिरव्यागार माळावर चरायची.आम्ही माळावर हुंदडत रहायचो.कसे दिवस होते ते जणू मंतरलेले..पावसाळा सुरु झाला की आभाळात ढग दाटून यायचे…वारा सुटायचा..गा-या गा-या भिंगो-या करत आम्ही स्वतःभोवती गोल फिरण्याचा खेळ खेळायचो..डोळे मिटून आनंदाने एवढं गोल फिरायचं की मग धाडकन् खाली पडायचं…खूपंच मजा यायची या खेळात कधी पाऊस चालू असतांनाच लख्खं उन पडायचं अन् मग आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं.कोल्ह्याचं लग्न लागलं..! म्हणून जोरजोरात नाचायचं..म्हशीच्या मागे पळतांना पायात काटे मोडायचे तेंव्हा टचकन् डोळयात पाणी तरळायचे तेंव्हा खूप राग यायचा म्हशीचा.राग शांत होण्यासाठी आपोआपच म्हशीला उद्दैश्यून तोंडात शिवी यायची…हेच आमचं प्रसंगावधान आणि हेच आमचं पाठांतर बाकी काही पाठ असो किंवा नसो.चिखलात वणवण म्हशीमागे फिरतांना आपोआपंच म्हैसमाळ दिसू लागायचा….वेगळा म्हैसमाळ पाहण्याची तशी ऐपत ही नव्हती…किंवा असं कुठं फिरायला जातात ह्याची कल्पनाही नव्हती त्यावेळी.

पालक आपल्या मुलांना पॉकेटमनी देतात तसा कुठला पॉकेटमनी आम्हाला नव्हता आत्ताच्यासारखा ! आमच्यासाठी माळावरच्या काटेरी झाडाचे मन्यासारखे पिवळे–केशरी कारं (खिशात)पॉकेटमध्ये भरून अधून मधून खात रहायचे. तोच आमचा पॉकेटमनी असायचा.उन्हाळ्यात लाल पिवळ्या अस्ताव्यस्त् पसरलेल्या गोटयांचा माळ पहिल्याच पावसाने हिरवागार होऊन जायचा.किती मनोहारी दृश्य असायचे. तेच आमचे पर्यटनस्थळ होते.म्हशीचं वासरू वाचत नसंल तर हालोबाला सोडण्याचा नवस केला जाई,म्हैस व्याली की काही दिवसात तुपाचा दिवा हालोबाला लावायचा म्हणजे वासरू निरोगी आणि धष्टपुष्ट होते असे मानले जायचे.मग असे दिवे लावायला आम्हाला जावे लागायचे…मग तर आनंदी आनंद !

चिखलदरा पहायचा तर पावसाळयात आमच्या पांदणीतून अनवाणी पायाने चालत गेलं की वाटेत दिसणारा डेरा म्हणजे आमच्यासाठी चिखलदरापेक्षा वेगळे काय होते..?गुडघ्याएवढाल्या चिखलातून एक पाय काढत दुसरा फसत गेला की खरोखर चिखलदरात फसल्याचा अनुभव म्हणजे आमचं खरं पर्यटनच होतं…मेळघाटाचं म्हणाल तर कधीच मेळ बसला नाही.ताळमेळ लावता लावता जीवनात नाके नऊ यायचे. नशीब एवढेच चांगले की कधी स्वत:ला घाटावरून ढकलून द्यायची वेळ नाही आली बस एवढंच ! रानोमाळ भटकतांना आपोआपच निरनिराळे प्राणी,पक्षी प्रत्यक्ष दर्शन द्यायचे.पाहिलेल्या प्राण्याच्या कथा सांगतांना सुध्दा गंमत वाटायची.लहानपणी एवढी स्थळे प्रत्यक्ष अनुभवल्यावर लोणावळा तर आमचा नेहमीचाच होता.लोण्यासारख्या मऊ मातीतून चालतांना बुटासारखे पायाला पेंड लागायचे.मातीचं ओझं पायाला घेऊन दूरपर्यंत जड पावलांनी चालल्यावर वळून पाहतांना अन् अंगातून घामाच्या धारा वाहतांना लोणावळा आपसूकच पायाच्या पिंढ-यात गोळा व्हायचा…हा गोळा झालेला लोणावळा कायम ठणकायचा…पायात कधी आजही गोळा येतो..तोच आमचा लोणावळा!तेच आमचं पर्यटनस्थळ !

संतोष सेलूकर,परभणी
7709515110

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..