नवीन लेखन...

हजार तोंडांचा रावण – एक झलक !

श्री विश्वनाथ शिरढोणकर यांच्या हजार तोंडांचा रावण या पुस्तकाची झलक देणारा हा लेख


‘थांब!’

डायनासोरहून कितीतरी पटीने मोठा भीमकाय भ्रष्टाचार धावताधावता थांबला. तरी तो बराच पुढे आलेला होता. त्याच्या पायांना लाखो अश्वांचा वेग मिळालेला होता, तर अनेक हत्ती सामावतील एवढे मोठे पोट झालेले होते. स्वतःला आवरायला, सावरायला त्याने बराच वेळ घेतला. नंतर जागच्या जागी उभे राहून मोठ्या कष्टाने त्याने मान वळवली. त्याच्या मागून लोकशाही धावत येत होती. भ्रष्टाचाराने बघितले, लोकशाहीच्या मागे अनेक प्रजाजनदेखील होते. लोकशाही भ्रष्टाचाराच्या जवळ येऊन थांबली.

‘अरे, थांब म्हणत्ये नां…?’ लोकशाहीला धापा लागल्या होत्या. ‘काय झालं…?’ भ्रष्टाचार आपल्या शरीराला जराही मागे वळवू शकला नाही. लोकशाहीलाच त्याच्यासमोर येऊन उभे राहावे लागले. आता लोकशाही समोरच येऊन ठेपली म्हणून भ्रष्टाचाराने नाइलाजाने विचारले, ‘तुला एवढ्या धापा लागायला काय झाले?’

‘सांगत्ये.’ लोकशाहीचा श्वास अजूनही वरखाली होत होता, ‘तुला आता जास्त वेळ येथे थांबता येणार नाही.’

‘काय झाले?’

‘आता आम्ही सर्वांनी प्रण केला आहे की तुला येथून हाकलून लावल्याशिवाय आम्ही कोणी स्वस्थ बसणार नाही.’

‘सर्वांनी म्हणजे नक्की कोणी?’

‘मी आणि माझ्या प्रजाजनांनी.’

‘पण गेल्या अनेक वर्षांपासून मी इथे राहत आहे आणि आता कुठे जाऊ? ‘

‘कुठेही जा. हवं तर शेजारच्या देशांमध्ये जा. पण आता इथे राहू नको.’

‘पण मीच का जाऊ?’ भ्रष्टाचार आता काळजीत पडला.

‘होय तूच.’ लोकशाही म्हणाली, ‘तुलाच जावे लागेल. तुझ्याच मुळे आता आम्ही सर्व त्रस्त झालेलो आहोत.’

‘अगं, मी इथे हजारों वर्षांपासून राहत आहे.’ भ्रष्टाचार म्हणाला, ‘अगदी रामराज्याच्या वेळेपासून मी इथे याच देशात राहत आहे. तुझा तर जन्मच माझ्यासमोर झाला. माझ्यासमोरच लहानाची मोठी झाली आणि आता मलाच म्हणते मी जाऊ?’

‘होय. तूच जा. अगोदर म्हणजे फार पूर्वी तू सडपातळ म्हणजे अगदी बारक्या होता. आता जरा स्वतःकडे बघ. काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? सर्वांच्याच वाट्याचे खाऊनखाऊन धिप्पाड झाला आहे. स्वार्थी झाला आहे. माजला आहेस तू.’

‘फार बोलतेस तू.’ भ्रष्टाचार म्हणाला, ‘त्या महागाईबद्दल तुम्ही कोणीच का काही बोलत नाही? गोरगरिबांच्या ताटातून भाकरी, भाजी व इतर धान्य चोरून खाऊन, आणि त्यांच्या पोरांना उपाशी ठेवून महागाई पाहा कशी माजलेली आहे. इतकंच काय तर तिने गोरगरिबांच्या पोरांना उघडंनागडं करून त्यांना हाल सोसण्यासाठी उघड्यावर नेऊन फेकलेले आहे. एकूण महागाईने गोरगरिबांकडून सर्व हिसकावून घेतलेले आहे. शेकडोंनी त्रस्त शेतकरी रोज आपला जीव देत आहेत. हे सर्व तुला आणि तुझ्या राजकारण्यांना दिसत नाही का? शिवाय मी अगोदर सडपातळ होतो. कोणाच्याही नजरेत येत नव्हतो. मी आपला एका कोपऱ्यातच पडून होतो नां? माझ्या अस्तित्वाची कोणाला जाणीवदेखील होती का? पण गेल्या सत्तर वर्षांत तुमच्या लोकांनीच मला त्यांच्या स्वार्थासाठी, बळजबरीने इतके जास्त खाऊ घातले आहे की काही विचारूच नकोस.’

‘म्हणूनच म्हणत्ये की तू जा बाबा एकदाचा. तोंड काळ कर आपलं.

पुष्कळ झालं. माझ्या प्रजाजनांना तूच बिघडविले, त्यांना चुकीच्या मार्गावर नेले. अनेकांचा प्रामाणिकपणाच तू विकत घेतला. काय मिळाले तुला? सर्वांचा विनाशच व्हायचा असेल तर तू तरी कुठे राहणार आहेस?’ लोकशाहीने विचारले. ‘मी आता कुठेच जाणार नाही, पण महागाईवर आवर घाला तुम्ही सगळे म्हणजे गोरगरिबांचे कल्याण होईल.’ भ्रष्टाचार म्हणाला.

‘अरे बाबा तुला समजत नाही का, तुझ्याच मुळे महागाई इतकी शेफारली आहे. तुझी तर कायमच तिला फूस असते!’ लोकशाही म्हणाली.

‘हे बरं आहे! तुझं म्हणजे ‘मेरी मुर्गी की एक ही टांग.’

‘नाही… नाही. आधी कोंबडी की आधी अंडं, या वादात मला

नाही पडायचं.’

‘हे बघ, महागाईमुळे सर्वसामान्यांना किती त्रास होतो हे माहीत आहे नां? तुमच्याकडे धान्य भंडारगृहात सडून जातं आणि तरीही न्यायालयाच्या निर्णयानंतरदेखील तुम्ही ते उपासमार झेलणाऱ्या गोरगरिबांमधे मोफत वाटत नाही, याला काय म्हणावं? उघड्यावर धान्य पावसापाण्यात सडून जातं याला काय म्हणावं? जीवनोपयोगी वस्तू मिळेनाश्या झाल्या आहे. हीच का तुमची लोकशाहीव्यवस्था? किती ही महागाई? हिला लगेच जा बरं असं का म्हणत नाही?’

‘मी सांगितलं नां… सध्या तरी मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. तू लगेच चालता हो.’

‘नाही जाणार!’ भ्रष्टाचार ठामपणे म्हणाला, ‘गेल्या कित्येक वर्षांत तुमच्या देशात एक मोहीम फार जोरात सुरू आहे. ती म्हणजे प्रगती हवी असेल तर भ्रष्टाचार सहन करावा लागेल. असं तुमच्या देशातील राजकारणीच म्हणत आहे. म्हणजे प्रगती हवी असेल तर माझी मदत आलीच नां?

आता बघ, आज काय परिस्थिती आहे? ती म्हणजे, ऐपत नसताना

अनेकांजवळ मोठमोठाले राजसी बंगले आहेत, अनेक घरांत दोनदोन, तीनतीन महागड्या चारचाकी आहेत, प्रत्येकाच्या घरात प्रत्येक खोली वातानुकुलीत आहे. इतकंच काय तर सामान्य माणसांच्या प्रत्येक घरात आज टीव्ही, चारचाकी, दुचाकी, आहेत. घरात प्रत्येकाच्या हातात दोनदोन, तीनतीन मोबाइल आहेत. लहान पोरंदेखील मोबाइल व बाइकशिवाय शाळांमध्ये जात नाही. महागडे मॉल भरभराटीवर आहेत. बाजारात खूप महागडी खरेदी वाढलेली आहे. चंगळवाद मौजमजा वाढला आहे. दागिन्यांनी सजलेल्या नटलेल्या बायकांच्या महागड्या हॉटेलमध्ये, किटी पार्टी व बर्थडे पाय जोरात सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचे लग्नसोहळे होतात. साधारण लग्न असलं तरी लोक पंगतीच्या पंगती उठवतात. पंचतारांकित सर्व सुखसोयी-संपन्न महागड्या शाळांमध्ये व कॉलेजमध्ये मुलांना शिकवण्यात आईवडील अभिमान आणि भूषण मानतात. समाजातदेखील त्यांना कौतुकाने बघितले जाते. डीझेल, पेट्रोलचे भाव कितीही वाढो, वाहनांची विक्री अनेक पटीने वाढते. कोणाला काहीच फरक पडत नाही. विजेचा खर्च कितीही वाढो, एसी, फ्रीज, टीव्ही व इतर इलेक्ट्रॉनिक सामानांची विक्रीदेखील कित्येक पटीने वाढलेली आहे. कसल्या ग गोष्टी करते माझ्या जाण्याच्या? माझ्या मदतीशिवाय या लोकांना या सुखसोयी मिळविणे शक्य तरी होतं का? खरं तर हे आहे, की माझ्या मदतीशिवाय हे काहीच शक्य नाही, आणि हल्ली तर तुमच्या देशात शोधूनही प्रामाणिक माणूस सापडत नाही.’ भ्रष्टाचार मोठ्या अट्टहासाने म्हणाला. त्याची छाती गर्वाने फुलून आली.

लोकशाही निरुत्तर झाली.

‘आता बाबा तुला काय सांगू? ही सर्व माझीच भक्त व उपासक मंडळी. म्हणजे माझी लेकरंच! आता लेकरांसाठी कायकाय सहन करावं लागतं ते एका आईलाच ठाऊक! काही लेकरांच्या स्वार्थामुळे आणि विकृत मानसिकतेमुळे बहुसंख्याकांचं जगणं कठीण झालेलं आहे. म्हणून बहुसंख्याकांनी आता ठरवलेलं आहे की बहुसंख्याकांच्या सर्व जीवनोपयोगी गरजा भागणार नसतील, त्यांना उन्नती करता येणार नसेल आणि त्यांना कायम मागासलेले राहावं लागणार असेल तर मग माझा काय उपयोग? आता मी काय करू?’ लोकशाहीच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. खरं तर भ्रष्टाचार निर्धास्त होता. त्याला माहीत होतं की त्याला कोणीही येथून जाऊ देणार नाही. पण त्याला लोकशाहीचेही मन दुःखवायचे नव्हते. ‘अगं पण आपले तर राखी-भाऊबीजेचे संबंध आहे नां?’

सर्व प्रजाजनांसमोर भ्रष्टाचाराने हे म्हणताच लोकशाहीला कसंसं झालं. ‘तुला लाच आणि भेट यामधलं अंतर कळायला हवं. खरंतर गरजेपायी आणि स्वार्थासाठी मागितली किंवा दिली जाते, ती लाच आणि प्रेमापोटी आपुलकीने दिली किंवा घेतली जाते, ती भेट.’

‘फार बारीक रेषेचं अंतर आहे हे.’ भ्रष्टाचार म्हणाला, ‘खरंतर प्रत्येक सत्ता ही भ्रष्टचं असते. म्हणजेच माझ्या मदतीशिवाय जगातील कोणतीच सत्ता टिकूनच राहू शकत नाही. निदान कणकीत मिठाप्रमाणे ती सर्वांना मान्य करावीच लागते. पण हल्ली तुमच्याकडे मिठात कणिक मिळवण्याचा स्वच्छंदीपणा सुरू आहे आणि इथेच सर्व गोंधळ आहे.’

लोकशाही फार दुखावली. भ्रष्टाचार सर्व बड्या लोकांचे प्रताप एकएक करून सांगू लागला, ‘स्त्रियांवर बलात्कार, त्यांची हत्या, शेतकऱ्यांची आत्महत्या, गोरगरिबांची उपासमार, कधीही न संपणारे घोटाळे, रोजचे होणारे हिंसक आंदोलन, जाळपोळ, तोडफोड, उंदडणे, विनाकारण निघणारे रोजचे मोर्चा, सरकारी संपतीला इजा पोहोचवणे, हे तर आता नेहमीचेच झालेले आहे. माणूस स्वच्छंदी आणि उदंड झालेला आहे. एकूण माणूस संस्कारी राहिला नाही, विनम्र राहिला नाही. सर्वत्र हेवेदावे. मग कसा चालेल देश आणि कशी टिकेल लोकशाही?’ लोकशाही निरुत्तर झाली. खरंच प्रजा त्रासली होती. काय करावं लोकशाहीला सुचत नव्हतं. काही स्वार्थी लोकांच्या गैरवर्तनावर किती पांघरूण घालायचं? आजवर ती हेच करत आली होती. एक न एक दिवस सर्वांना समज येईल व सर्व या लोकशाहीच्या मायेच्या सावलीत आनंदाने नांदतील असा तिचा समज होता. पण तसं होताना प्रत्यक्षात दिसत नव्हतं. तरी ती भ्रष्टाचारापुढं हार मानायला तयार नव्हती.

‘हे बघ… तुला आता जावंच लागेल.’ लोकशाही शांतपणे म्हणाली, ‘जंतरमंतरवर सर्वांचा सर्वसंमत ठराव झालेला आहे. अण्णा आणि बाबा एकत्र आलेले आहे आणि त्यांच्या समक्ष सर्वांनी तशी भावनादेखील व्यक्त केलेली आहे. तेव्हा तू लगेच आपली सोय इतर दुसऱ्या जागी पाहा. तुला आता इथं जास्त राहता येणार नाही.’

‘ते शक्य नाही.’ आता भ्रष्टाचाराने मोठा अट्टहास केला, ‘अगं अण्णाबाबा काय घेऊन बसलीस? हे तर दोन दिवसांचे. महात्मासुद्धा होतेच की तुमच्याकडे. आणि अम्माभगवान, बापू, परमपूज्य, श्रीश्री, मुनी, महाराज, साधू-संत कितीकिती फिरत आहेत तुमच्या देशात. काही असर होतो का यांचा? तुला माहीत आहे का माझ्या मदतीने मिळालेला सर्वात  जास्त पैसा लोकांनी मंदिरात आणि मस्जिदमध्येच लपविलेला आहे. तुमच्या देशात ईश्वराची मात्र चंगळ आहे बरं का? आणि धर्मालाच सर्वात जास्त पैसा लागतो. आहे की नाही गमंत?’

लोकशाही निरुत्तर होत होती. तिला कळेच ना की भ्रष्टाचाराला कसा आवर घालावा. तरी तिनं मैदान सोडलं नाही, ‘अरे बाबा, माझे काम व्यवस्थापनासाठी लोकांची निवड करणे आहे; पण तुझे काम निवडून आलेल्या लोकांना बिघडविणे आहे. त्यामुळे व्यवस्था लुळीपांगळी होते. तिचा फटका गोरगरिबांना बसतो.’

‘व्यवस्था?’ भ्रष्टाचाराला जोराने हसू आले, ‘व्यवस्थेमुळेच तर माझी मौज आहे. ज्या व्यवस्थेत पैसा एके पैसा असतो, त्या व्यवस्थेत गुंडगिरी आणि अपराध आलेच. तुला ठाऊक आहे का, की तुमच्या या व्यवस्थेत पैशांचे महत्त्व किती वाढवून ठेवले आहे ते? काय म्हणे आर्थिक नियोजन, मोकळी अर्थव्यवस्था? वैश्वीकरण? या असल्या मोठमोठाल्या शब्दांनी गोरगरिबांना चिरडून टाकले आहे. वर तुमची भांडवलशाही? पैसा… पैसा… पैसा… काय म्हणता तुम्ही सर्व… ‘पैसा खुदा तो नहीं, पर खुदा से कम भी नहीं!’ पण प्रत्यक्षात पैशाला खुदापेक्षासुद्धा जास्त मोठं करून ठेवलेलं आहे. आणि पैशांची तुलना देवांशी? जेव्हा पैशांना तुम्ही देवापेक्षा जास्त मानता, तेव्हा माझी मदत तर सर्वांना घ्यावीच लागणार नां? खरंतर अर्थशास्त्रातली परिभाषा आहे, ‘पैसा सर्वकाही नाही, पण काहीतरी आहे.’ याला किती सोयीस्करपणे तुम्ही देवाहून मोठं केलं! अगं, तुमच्या देशातील सर्वश्रेष्ठ मूल्यं म्हणजे, नैतिकता, प्रामाणिकता, संस्कार, अनुशासन, स्वाभिमान, सहृदयता, भावना, नातीगोती, प्रेम, आपुलकी, ही सर्व मूल्यं पैशांनी चिरडून टाकलेली आहे. आता ही सर्व समाजात परत कशी रुजणार? ‘

लोकशाही निरुत्तर झाली. सर्वांसमोर एकच प्रश्न होता. या वादात कोण टिकणार? भ्रष्टाचाराला देश निकाला मिळणार का? हा प्रश्न चारीकडे विचारला जाऊ लागला. भ्रष्टाचार अफाट वाढला होता; पण लोकशाहीदेखील खूप बळकट झाली होती. पण आता एकदुसऱ्यांमुळे एकदुसऱ्यांच्या अस्तित्वावर संकट आलेले होते. लोकशाही तिच्या नागरिकांच्या वर्तनामुळे दुखावली होती. पण आता तिच्यासाठीदेखील काही कठोर निर्णय घेण्याची वेळ आलेली होती. तिनं भ्रष्टाचाराला जवळजवळ धमकीच दिली, ‘बाबा रे, तू जा इथून. नाही तर माझी माणसं तुझा जीव घेतील.’

‘मला असं नाही वाटतं.’ भ्रष्टाचार अगदी शांतपणे म्हणाला, ‘वरवर म्हणत असले तरी सर्वांना मनापासून मी हवाहवासा वाटतो. ही मानवी दुर्बलता आहे. जोपर्यंत स्वार्थ आहे आणि स्वार्थपूर्तीची साधनं आहेत, तोपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही. आणि ज्याप्रमाणे सर्वांनी आपल्या गरजा विनाकारण अवास्तव फार जास्त वाढवून ठेवल्या आहेत, त्यामुळे माणसांच्या वृत्तीत बदल होणे शक्यच नाही.’

भ्रष्टाचाराने एक दीर्घ श्वास घेतला, मग म्हणाला, ‘जिथं लोभ, तिथे मी! जिथे स्वार्थ, तिथे मी!! जिथं द्वेष, तिथेदेखील मीच !!!’

लोकशाही आता अधिकच अस्वस्थ झालेली होती. भ्रष्टाचार तिच्या मुळावरच उठला होता. देशात सर्वत्र भ्रष्टाचाराला संपविण्यासाठी प्रजाजन आंदोलन करत होते. सर्वत्र भ्रष्टाचाराचा प्राण घेण्याचा संकल्प केला जात होता. जो तो भ्रष्टाचाराला जीवे मारण्याच्या संकल्पात आहुती देण्यासाठी आपले नाव नोंदवीत होता. आश्चर्य म्हणजे भ्रष्टाचार भस्मासुर झालेला होता आणि त्याच्या मरण्याचे काहीच लक्षण दिसत नव्हते. ज्याच्यावर भ्रष्टाचार हात ठेवत होता, तो जीवानिशी जात होता आणि जितक्यांदा सर्व त्याचा जीव घेत होते, तो दुप्पट ताकदीने क्षणातच पुन्हा जिवंत होत होता. हा सर्व प्रकार बघून लोकशाही घाबरली.

‘भ्रष्टाचार असा जाणार नाही आणि असा मरणारही नाही.’ लोकशाही सर्वांना म्हणाली, ‘रावणाची दहा तोंडं असली तरी या भ्रष्टाचाराची हजार तोंडं आहेत. कायद्याने तो मुळीच मरणार नाही. कोणत्याही व्यवस्थेने तो संपणार नाही. पण जर का तुम्ही सर्वांनी ‘पण’ केला, तरच भ्रष्टाचाराला संपविता येऊ शकते.’

‘आम्ही तयार आहोत.’ गर्दीतल्या सर्वांनी हात वरकरून उद्घोष केला. प्रजाजनांचा हा उद्घोष ऐकून लोकशाहीचे ऊर भरून आले. ती म्हणाली, ‘प्रजाजन हो, सर्वात अगोदर आपल्याला नैतिक मूल्ये जपायला हवी. आज सर्वांनी शपथ घ्यायला हवी की स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या कोणाचेही आणि समाजाचे व देशाचेही अहित करणार नाही. नैतिक मूल्ये सर्वोपरी वागणुकीत आणि व्यवहारात आणू. आम्ही आदर्श आणि प्रामाणिकतेचा पायंडा घालू आणि महत्त्वाचे म्हणजे सर्वांनी अगोदर आपल्या अवास्तव गरजांना आवर घालायला हवा. म्हणून शपथ घ्या की गरजा पूर्ण करण्यासाठी कोणताही चुकीचा मार्ग वापरणार नाही. हा संकल्प प्रत्येकाने घेतला तरच या भ्रष्टाचाराला देश निकाला देता येऊ शकतो.’

लोकशाहीच्या सांगण्यावरून सर्वांनी संकल्प घेतला. भ्रष्टाचाराला एकटा सोडून सर्व लोकशाहीबरोबर परतले. परतीच्या मार्गावर जो तो एकदुसऱ्याला एकच प्रश्न विचारत होता, ‘गरजांना कमी करायचं म्हणजे नक्की काय करायचं?’

कोणीही खरं बोलून स्वतःवर संकट ओढू इच्छित नव्हतं. म्हणून उत्तर माहीत असूनही कोणीही याबद्दल बोलायला तयार नव्हते. सर्वांनी जणू मौनव्रत घेतले होते. शांत गर्दीचा प्रवाह लोकशाहीच्या मागोमाग परतीच्या वाटेवर होता.

एव्हांना भ्रष्टाचाराला मात्र शांत झोप लागलेली होती.

-विश्वनाथ शिरढोणकर

Avatar
About विश्वनाथ शिरढोणकर 7 Articles
मी एक सेवानिवृत्त असून साहित्यिक आहे. माझी हिंदी मराठीत 25 पुस्तके प्रकाशित असून, kUKU FM वर कादंबरी - मी होतो मी नव्हतो - 65भागात(अवधी-6-30 तास) आणि AAVAAJ.COM वर 16 कथा ऑडियो स्वरुपात उपलब्ध आहे. कादंबरी महाराष्ट्र शासन च्या ग्रंथमान्य यादीत सामील असून अनेक विद्यापिठात माझी कथा, कविता पाठ्यक्रमात सामील आहे.100 पेक्षा जास्त कथा,250 पेक्षा जास्त कविता आणि 150 पेक्षा जास्त लेख प्रकाशित. अनेक दिवाळी अंकात नियमित प्रकाशन. अनेक पुरस्कार/सम्मान प्राप्त.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (चंद्रपूर) सकट अनेक शहरात साहित्यिक कार्यक्रमात सहभाग.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन माजी अध्यक्ष, डॉ. श्रीपाल सबनीस आणि श्री भारत सासणे यांच्या प्रस्तावना माझ्या पुस्तकांसाठी लाभल्या आहेत. मी बृहन्महाराष्ट्रांतील एक आघाडीचा साहित्यिक आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..