नवीन लेखन...

गोजिरा माळिते गजरा

पेडर रोडवरची आकाशगंगा ही वीस मजली आलिशान इमारत. त्यात तेराव्या मजल्यावर फ्लॅट नंबर तेरामध्ये ‘मिळून साऱ्या सया’ या आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या भारतीय महिला संघटनेच्या कार्याध्यक्ष सौ. चारू चिटे राहतात. ‘चाची’ या टोपणनावाने त्या स्त्रियांच्या समस्या, प्रश्न, आंदोलने यावर लेख, कथा, पुस्तके, प्रबंध (विशेषकरून इंग्रजी दैनिके, साप्ताहिके, मासिके) लिहितात.

मराठीतील अग्रगण्य दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक सूर्याजी रवीसांडे, जे जे स्वतःला विशेषांकाचे सम्राट म्हणवतात, त्यांनी आपल्या महिला विशेषांकात ‘चाची’ यांच्या ‘गोजिरा माळिते गजरा’ या सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या नियोजित कार्यक्रमाबद्दल त्यांची विशेष मुलाखत छापावी या उद्देशाने त्यांच्या मुलाखतीची वेळ ठरवली आहे. तशा त्या मराठीत मुलाखतीसाठी फार उत्सुक नाहीत पण सूर्याजींच्या आग्रहाखातर त्यांनी सकाळी साडेआठ ही वेळ दिली. सूर्याजींनी आपले प्रमुख मुलाखतकार काका सरधोपट यांची या कामावर नियुक्ती केली.

काका सरधोपट, एक ‘वेष असावा बावळा परि अंतरी नाना कळा’ असा अवलिया पत्रकार. त्याच्या मुलाखत घेण्याच्या कौशल्यावरच सूर्याजीरावांनी विशेषांक सम्राट’ ही बिरूदावली सांभाळली आहे.

असो, तर चाची, रोजची पहाट, सूर्याजीराव आणि काका सरधोपट यांची एवढी प्रस्तावना आपल्या कथानकाला पुरे. आता मूळ कथेकडे वळतो.

काकांनी ठीक साडेआठ वाजता चाचीच्या घरची घंटी वाजवली. तसे एका नीटनेटक्या गणवेशधारी नोकराने दरवाजा उघडला.

“कोण आपण? कोण हवंय आपल्याला?”

“मी काका. काका सरधोपट. चाचींनी मला सकाळी साडेआठची वेळ दिली आहे.”

या, आत या. त्या तुमचीच वाट पाहत आहेत.” त्याच्या मागोमाग काका आत गेले. प्रवेश दालनातून ते एका प्रशस्त हॉलमध्ये आले. उंची फर्निचर आणि सजावटीने तो दिवाणखाना सजला होता. एका बाजूला संपूर्ण लांबीची दरवाजावजा खिडकी होती. बाहेर सुंदर बगिचावजा गच्ची होती. एकूण फारच उंची थाटमाट दिसत होता. त्यांना बसवून नोकर आत गेला.

थोड्याच वेळात चाची आल्या. काळाभोर चमकता आणि यांच्या कमनीय देहाला फिट बसणारा गुडघ्याच्या थोडा वर असा ड्रेस त्यांनी घातला होता. चेहऱ्यावर हलके फेशियल आणि मानेभोवती वळणारे चमकदार काळे केस, त्यावर थोडी लालसर झाक त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवत होते. डोळ्यावर रेबॉनचा हलक्या तपकिरी शेडचा मोठा गॉगल आणि गळ्यात चमचमणारा प्लॅटिनम हार. आल्या आल्या हात पसरून त्या म्हणाल्या, “ओ काका! या, या बसा.” यांचे ‘काका’ हे शब्द काकांना ‘खा खा’ असे वाटले. आजूबाजूला काही खायला ठेवले आहे की काय असे वाटून काकांनी आजूबाजूस पाहिले) पण मग त्यांच्या लक्षात आले की ते हा त्यांच्या इंग्रजी उच्चारांचा परिणाम. ते हसले. खाली बसले.

(यापुढील चाचींचे संभाषण वाचकांच्या सोयीसाठी नेहमीच्या बोलीत दिले आहे.)

“आभारी आहे मॅडम, आपण सुरुवात करायची का?”

“हो, हो. करूया ना. मलाही जरा घाईच आहे. आमच्या कार्यक्रमाची तारीख आता अगदी जवळ आली आहे. बरं विचारा तुमचे प्रश्न.”

“चाची, आपण नेहमी भारतीय संस्कृती, रीतीरिवाज, समारंभ, धार्मिक विधी, जीवनपद्धती, महिलांचे प्रश्न यावर लिहीता. महिलांच्या प्रश्नांवर भांडता. आपली उच्च परंपरा, संस्कृती? वगैरेवर लेख, पुस्तके लिहिता हे सारे आपल्याला कसे जमते?”

“कसे म्हणजे? अहो, मी पण एक भारतीय स्त्रीच आहे.”

“हो, ते खरे. पण आपली ही राहणी, शिक्षण, आपण राहता तो समाज, आपले अनुभवविश्व यातून म्हणजे या पाश्चात्त्य राहणीमानातून कसे फुलते? आपण तळागाळातल्या भारतीय स्त्रीच्या समस्या कशा काय समजून घेऊ शकता?”

“काका, त्याचे काय आहे. मी लेखक आहे आणि लेखक जे पाहू शकतो, जाणू शकतो ते इतरांना जमत नाही. मी माझ्या ए.सी. गाडीतून जरी फिरते तरी माझे डोळे उघडे असतात. मी झोपडपट्टीतही हिंडते. मी कल्पना करू शकते दारिद्र्याची, हाल अपेष्टांची. म्हणतात ना की ‘जे न देखे रवी ते देखे कवी.”

“वा, उत्तम. पण मी आज आपली मुलाखत एका वेगळ्याच विषया संदर्भात घेणार आहे.”

“होय, गोजिरा माळिते गजरा, या माझ्या नवीन कार्यक्रमाची तुम्हाला माहिती हवी आहे, होय ना?”

“होय बाईसाहेब. आपल्या या कार्यक्रमाबाबत सध्या फारच बोलबाला ऐकू येतोय. काय आहे हे प्रकरण?”

“छे, छे ! काका, अहो प्रकरण काय म्हणता? ती काय कसली भानगड बिनगड वाटते की काय तुम्हाला? अहो, तो एक भारतीय, विशेषतः मराठी, महाराष्ट्रीयन लोक-कला पाश्चात्त्यांना दाखविण्याचा अनोखा प्रयोग आहे आमचा.”

“जरा सविस्तर सांगाल का?”

“हो सांगते की. काका, तमाशा ग्रामीण महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. त्यातील लावणी हा शृंगारप्रधान प्रकार किंवा लावणी नृत्य हे भारतीय नृत्यकलेचं एक अत्यंत गोजिरे स्वरूप आहे. या कलेला जागतिक पातळीवर प्रदर्शित करायचा प्रयत्न मी या नियोजित ‘गोजिरा माळिते गजरा’ या कार्यक्रमातून करणार आहे.”

“वा, फारच छान! ते आपण कसे करणार?”

“त्यात दहाबारा रूपसुंदर, गोऱ्यापान, गुलाबी अमेरिकन सुंदऱ्या लावणीनृत्य पेश करतील.”

“काय सांगता? ते कसे शक्य आहे?”

“का नाही? त्यासाठी मी दहाबारा अमेरिकन सुंदऱ्यांना लावणीनृत्याचे शिक्षण दिले आहे. त्यासाठी मी फार मेहनत घेतली आहे. खूप तयारी केली आहे. लवकरच ‘गोजिरा माळिते गजरा’ चा पहिला प्रयोग दशमुखानंद हॉलमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यासाठी सिने, नाट्य, कला, साहित्य, प्रसारमाध्यम क्षेत्रातली मोठमोठी मंडळी हजर राहणार आहेत.”

“वा, फारच छान! पण ही कल्पना आपल्याला कशी सुचली आणि आपण या गौरांगनांना हे नृत्य कसे शिकवलेत?”

“काका, गेल्याच वर्षी माझ्या घरी एक अमेरिकन पाहुणी, ‘ज्युली’ आली होती. ती अमेरिकन विद्यापीठात संगीत आणि नृत्य शिकते. भारतीय नृत्यकलेचा अभ्यास करण्यासाठी ती इकडे आली होती. एकदा आमच्या घरच्या होम टीव्ही वर तिने ‘ऐका दाजिबा’ या गाण्यावर एक लावणीनृत्य पाहिले. ते पाहून ती एवढी खूष झाली की मला हे लावणीनृत्य शिकावयाचे म्हणून मागेच लागली. मी तिला माहिती काढून कळवते म्हणाले. नंतर ती परत गेली. मी पण विसरले. पण तिचे फोनवर फोन यायला लागले तशी मी काही तमाशा मंडळींची भेट घेऊन चौकशी केली. तेव्हा ‘चंद्राबाई वडगावकर आणि पार्टी’ या तमाशा  पार्टीशी संपर्क झाला. त्यांच्याशी बोलणी केली आणि ज्युलीशी संपर्क साधून चंद्राबाई आणि तिच्या दोन साथीदारीणींना अमेरिकेला पाठवले.’

“काय सांगता?”

“हो ना. त्यांच्या येण्याजाण्याचा, तिकडच्या मुक्कामाचा सगळा खर्च ज्युलीनेच केला. त्या तिथे दोन महिने राहून त्यांना लावणी शिकवून आल्या. त्यांनी दोन तासांचा ‘गोजिरा माळिते गजरा’ हा शाहीर अनंत छंदी यांचा लावणीनृत्याचा कार्यक्रम बसवला आहे. त्याचे सूत्रसंचालन चंद्राबाई करणार आहेत. दहा अमेरिकन सुंदऱ्या, चंद्राबाई आणि तिच्या दोन साथीदार, त्यात एक लावणी गाणारी आणि एक ढोलकी वाजवणारी असेल.”

“ढोलकी वाजवायला स्त्री साथीदार?”

“हो, या संपूर्ण कार्यक्रमात एकही पुरुष कलाकार नाही हेच तर त्याचे वैशिष्ट्य.”

“वा! वा! चाची आपण तमाशाला एकदम आंतरराष्ट्रीय दर्जा द्यायचाच प्रयत्न करणार आहात!”

“हो ना.”

“मग यात आपल्या मराठी नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनाही सहभागी करून घेतले असणार!”

“छे! छे! त्यांना मी चार हात दूरच ठेवते. अहो एकतर परदेशी माणसं, त्यातून अमेरिकन म्हणजे यांना अगदी देवच वाटतात. त्यांना नुसते पाहायला मिळाले तरी त्यांना जन्माची पुण्याई कामाला आली असे वाटते. त्यांच्याशी कसे बोलावे, वागावे काही काही कळत नाही. ओ शिट् ! सगळ्या कार्यक्रमाचा सत्यानाश करायचे! फार चीप वाटतात ही आपली तथाकथित मान्यवर मंडळी!”

“अहो पण लोककला, लोकनृत्य या कला तर याच मंडळींनी जपल्यात नाही का आजपर्यंत? शिवाय बरीच नट, नट्या, कलाकार ही मंडळी पण यांच्यातूनच, या माध्यमातूनच आली ना? मग त्यांना टाळून कसे चालेल?”

“काका सगळे काही करता येते. त्यासाठी आपला माल कसा आणि कुठे वापरायचा, खपवायचा हे कळले पाहिजे. त्याचे मार्केटिंग समजले पाहिजे.” तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजतो.

“काका, जस्ट ए मिनिट हं! हा कार्यक्रम घेतल्यापासून एका क्षणाचीही फुरसत नाही मिळत मला.”

“हॅलो, हॅलो, हाय शैला? बोला!”

“———–”

“काय? पार्टी पोहोचली एअर पोर्टवर?”

“———–”

“मग ठरल्याप्रमाणे सगळी व्यवस्था झाली ना?”

“———–”

“अग सगळ्या अमेरिकन नृत्यांगनांची ओबेरॉयमध्ये सोय केली आहे ना! अॅडव्हान्स बुकिंगही झाले आहे, मग आता काय प्रॉब्लेम आहे?”

“———–”

“काय? चंद्राबाई आणि पार्टीपण विमानतळावर आलीय त्यांना रिसीव्ह करायला त्यांना कुणी बोलावलं? बरं ठीक आली तर आली. त्यांना म्हणावं कार्यक्रमाच्या दिवशी या हॉलवर.”

“———–”

“काय? चंद्राबाई आणि पार्टी कुठे राहणार?”

“———–”

“कुठे म्हणजे? अग तुझ्याकडेच उतरणार असे ठरलेय ना? मग?”

“———–”

“काय? त्या पूर्ण बस भरून घेऊन आल्यात? तीस माणसं? अग पण हे आधी नाही का सांगायचं? त्या तिघीजणीच आहेत न”

“———–”

“काय? चंद्राबाई म्हणते माझी आख्खी पार्टी येणार म्हणजे येणार? अग पण त्या सगळ्यांना कुठे ठेवायचं? ओ शिट!”

“———–”

“काय? माझ्या सोसायटीच्या हॉलमध्ये? शैला काय वेडबीड नाही ना लागलं तुला? अग ही सगळी पार्टी त्या हॉलचा सत्यानाश करतील. कुठेही बसतील, धुंकतील, वाट्टेल तिथे कपडे टांगतील, वचावचा बोलतील. छे, छे, आय कान्ट इमॅजिन इट! नो! नो! शैला ते नाही जमायचे. तू त्यांना सांग, म्हणावं तुमची तुम्ही काहीही व्यवस्था करा. आमची जबाबदारी फक्त कार्यक्रमाच्या दिवशी.”

“———–”

“काय मी अध्यक्ष म्हणून सगळी जबाबदारी घेतली पाहिजे असं म्हणतेय ती चंद्री? तिची ही हिंमत? हे बघ शीला ते काही नाही तू काय करायचे ते कर, पण माझ्याकडे त्यांना बिलकुल धाडू नकोस.”

“———–”

‘काय? चंद्री कार्यक्रमाला येणार नाही म्हणतेय?’

“———–”

” बरं बरं. मग असं कर, आता ऐन मोक्याच्या वेळी अडवून धरलंय सटवीनं. असं कर, तुझ्या आजूबाजूला तू राहतोस तिथे एखादी म्युसिपल शाळा आहे का?”

“———–”

“हो ना? मग त्या सगळ्या पार्टीला तुझ्या घरी ने. शेजारच्या एखाद्या उडीपी हॉटेलमध्ये त्यांचा नाष्टा, चहापाणी उरकायला सांग. तोपर्यंत तू तिथल्या नगरसेवकाला गाठ. त्याला दशमुखानंदचे दोन पास दे. फार अडला तर चार दे, पण त्यापेक्षा जास्त नाही. शिवाय चंद्राबाई आणि पार्टीचा मोफत कार्यक्रम देऊ म्हणून पटव आणि शाळेच्या दोन खोल्या मिळव. सध्या शाळांना सुट्ट्या आहेत.”

“———–”

“जमेल ना? मग आता आणखी काय अडचण आहे?”

“———–”

“काय? वडगावाहून येण्याजाण्याचा आणि इथल्या मुक्कामात होणारा पेट्रोलचा आणि इतर खर्च आगाऊ पाहिजे? त्या चंद्रीला आयुष्यात कधी अमेरिकेला जायला मिळाले असते का? तिची ही हिंमत?”

“———–”

बरं बरं, अडला नारायण. आपल्या फंडातून दे आणि फक्त चंद्रीलाच VIP पास दे. बाकीच्यांना बाल्कनीचे पास दे. घ्यायचे तर घ्या म्हणावं नाहीतर फुटा. ओ शिट्! सुटले बाई एकदाची!’

“काका पाहिलेत? मी इतकी मरमर मरतेय आपल्या कलेच्या उद्धारासाठी, पण यांना काही आहे का त्याचं?”

“खरं आहे मॅडम. टाकीचे घाव खावे तेव्हाच देवपण येतं म्हणतात ते पटलं.”

“हो ना? पण हे फोनवरचं बोलणं वगैरे आपल्या मुलाखातीत नाही बरं का घ्यायचं!”

“छे, छे! मॅडम अहो तेवढं समजतं मला.”

“हुषार आहात. पण या मराठी पेपरमध्ये फुकट गेलात. इंग्रजीमध्ये नाव कमावलं असतं आजवर.”

“खरं आहे मॅडम. सगळ्यांनाच ते जमत नाही. आपण कुठे? मी कुठे?” मॅडम  खूष झाल्या. तेवढ्यात पुन्हा मोबाईल वाजला.

“हॅलो, हॅलो! कोण? ज्युली? हाय डार्लिंग. कुठून ओबेरॉय मधूनच बोलते आहेस ना? कशी छान झालीय ना सोय? एनी प्रॉब्लेम? टेक रेस्ट. संध्याकाळी येतेच भेटायला.”

“वा! वा! अमेरिकन नृत्यांगना ओबेरॉयमध्ये? हे कसे काय जमवलेत आपण?”

“काका उद्या दशमुखानंद हॉलवर होणाऱ्या प्रोग्रॅमनंतर हे अमेरिकन दूप ओबेरॉयमध्ये चार प्रोग्रॅम देणार आहे. त्या चार दिवसांत महाराष्ट्रीयन फूड फेस्टिवल पण आयोजित केलं आहे. चार दिवसांचे कार्यक्रमाचे बुकिंग फुल झाले आहे. या बदल्यात अमेरिकन गौरांगनांच्या इथल्या मुक्कामाचा सगळा खर्च ओबेरॉयने स्पॉन्सर केला आहे. अहो अमेरिकन नृत्यांगना नाचणार म्हटल्यावर त्यांचे चारही शो हाऊसफुल झाले आहेत. आमच्याकडे दुप्पट तिप्पट पैसे देऊन तिकिटं, पासांची मागणी होत आहे.”

“वा! वा! मग चंद्राबाई आणि पार्टीला पण चांगलाच फायदा होणार म्हणायचा?”

“हो तर, नाव, प्रसिद्धी, पैसा सगळे मिळणार!”

“वा! वा! चाची आपण भारतीय नृत्यकलेला एक चांगले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिलेत.’

“हो ना, अहो आता ही अमेरिकन नृत्यांगना कंपनी युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, सिंगापूर, मलेशिया, सौदी, रशिया, चीन, जपान असा जगभर दौरा करणार आहे. पुढच्या दोन वर्षाचे बुकिंग आजच झाले आहे. प्रचंड मागणी आहे. या दौऱ्यात आमच्या ‘मिळून साऱ्या सया, या संस्थेच्या दोन सया सहकुटुंब या कंपनीबरोबर असतील.”

“ते कशाला?”

“त्या प्रोग्रॅमच्या मध्ये भारतीय संस्कृती, रीतीरिवाज, पेहराव, खाद्यपदार्थ यावर भाषण करतील. प्रात्याक्षिके दाखवतील.”

“वा! वा! चंद्राबाई आणि पार्टीचा पण काही सहभाग असेलच!”

“छे! छे! त्यांना आता काय काम? म्हणजे एकदा इथला पोग्रॅम पार पडला की आम्ही त्यांना सन्मानाने निरोप देणार!”

“म्हणजे? त्यांना काय मिळणार?”

“का? त्यांना नाव व प्रसिद्धी मिळेल. शिवाय या प्रसिद्धीच्या जोरावर त्यांना महाराष्ट्रभर फॉरेन रिटर्न नृत्यांगना म्हणून भरपूर कार्यक्रम मिळतील.”

“बस एवढेच?”

“एवढेच कसे? अहो दशमुखानंद हॉलवर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा खास गौरव करणार आहोत आम्ही!”

“हो का? तो कसा?”

“चंद्राबाईंना रूपदर्पण या पैठणच्या सुप्रसिद्ध पैठणी कारखान्याची सर्वोत्कृष्ट पैठणी तसेच त्यांचा रूपया, नारळ, साडी, चोळी देऊन आम्ही सत्कार करणार आहोत. त्यांच्या पार्टीतील सर्व महिलांना साडीचोळी आणि पुरुष कलाकारांना फेटा, रूपया, नारळ देणार आहोत. सर्व थोर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या कलेचा गौरव करून त्यांचा सन्मानपूर्वक निरोप घेऊ की!”

“वा! वा! चाची, अमेरिकन नृत्यांगना आणि भारतीय नृत्यांगना यांचा आपण अगदी यथोचित सन्मान करायचे ठरवले. आपण धन्य आहात! आपल्या या ‘गोजिरा माळिते गजरा’ कार्यक्रमास शुभेच्छा.”

“बरं या आपण. मला बरीच कामे आहेत, बाय.”

काका थोडा वेळ रेंगाळले. त्यांना वाटले दोन चार पास तरी आपल्या हाती देतील. पण काकांचा हेतू त्या चाणाक्ष चाचीच्या लक्षात आला. तिने त्यांना हसून म्हटले,

“बाय बाय. या आता!”

दशमुखानंद हॉलच्या कार्यक्रमाची प्रेस तिकिटे ‘रोजची पहाट’कडे येतील या आशेने काकांनी त्यांचा निरोप घेतला.

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..