नवीन लेखन...

गोवा –

Goa

गोव्याला आमच्या श्री. शांतादुर्गा देवीचं देऊळ आहे. श्री. शांतादुर्गादेवी ही आमची कुलदेवता. कोकणातल्या गावातला गणपती उत्सव साजरा करुन मुंबईला परतण्याआधी गोव्याला जाऊन देवीचं दर्शन घेणं हा रिवाज आम्ही अनेक वर्षे पाळतो आहोत. गंमत अशी की दरवर्षी आणखी एका कामानिमित्त गोव्याला जावंच लागतं. थोडक्यात गोव्याच्या दरवर्षी दोन फेर्‍या ठरलेल्या. एखाद्या वर्षी तीनवेळा सुद्धा जाणं होतं. फेरी कितवीही असो, गोव्याला जायचं म्हणजे अंगात उत्साह संचारतो. हिशेब केला तर आतापर्यंत गोव्याला पंचवीसएक फेर्‍या सहज झाल्या असतील. पण म्हणून गोव्याला जाण्याचा कंटाळा कधीच घडत नाही. गोवा साद घालतो आणि मी गोव्याला जातो. आतुरतेने, ओढीने. ही ओढ नेमकी गोव्याबाबत का भासते याचं उत्तर देणं कठीण आहे.

गोव्याला विमानाने, रेल्वेने अथवा बसने जाता येतं. विमानाचा आणि रेल्वेचा प्रवास तसा आरामदायी. परंतु गोव्याला जायची खरी मजा बसच्या प्रवासाची. मुंबईहून दुपारी तीनसाडेतीच्या सुमारास सुटणार्‍या लक्झरी बसेस सकाळी साडेसहाच्या सुमारास गोव्याला पोहोचतात. मांडवी नदी शेजारी वसलेल्या पणजी शहरात बस प्रवेश करते तो क्षण अंगावर अक्षरश: रोमांच उभे करतो. अगदी दरवर्षी, दरवेळा ! समोर मांडवी नदीचं शांत पात्र वाहात असतं. नदीच्याच पुलावरनं पणजीत प्रवेश करतो. त्यावेळी मनात विचार येतात …. आलं, गोवा आलं, ! आपलं गोवा आलं !

पणजीला उतरुन आम्ही रिक्षाने फोंड्याला जातो. श्री. शांतादुर्गादेवीचं देऊळ या फोंड्यातच कवळे गावात आहे. पणजी ते फोंडा टप्पा मनाला उभारी देऊन जातो. या टप्प्यातील बराचसा प्रवास मांडवी नदीच्या काठाने होतो. शेजारी मांडवी नदीचं शांत पात्र वाहात असतं. आपण तिच्या अगदी कडेकडेने जात असतो. नदीच्या शांत प्रवाहाजवळून जाताना मनही शांत होऊन जातं. वर्षानुवर्षे संथपणे वाहणार्‍या या नद्या. या नद्यांच्या काठावर असंख्य घडामोडी घडत असतात. असंख्य स्थित्यंतरं घडत असतात. खुद्द नदीच्या प्रवाहात मात्र या स्थित्यंतरांची कसलीही छटा कधी उमटत नाही. मनात विचार येतो, माणसालाही आपलं मन असं नदीसारखं शांत ठेवता आलं तर ? सभोवती घडणार्‍या प्रत्येक घटनेला प्रतिसाद देणं खरोखरच आवश्यक असतं का ? नदीच्या पात्रासारखं तटस्थ राहणं खरंच कठीण असतं का?

पणजी फोंडा टप्प्यातील पुढच्या भागातील घरेही आपल्या नजरेत भरतात. खास पोर्तुगीज शैलीतील ती घरे आजही उत्तम स्थितीत आहेत. त्यांचं भव्यपण आजही मनात ठसतं. या घराची विशिष्ट शैली आपल्याला सारखी जाणीव करुन देते – आपण गोव्याला आलो आहोत !

खुद्द फोंड्याचा बसस्टॅन्ड हे माझ्या मनाला भूरळ घालणारं आणखी एक ठिकाण. या बसस्टॅन्डला गोव्यातील कुठल्याही स्टॅन्डचं प्रतिनिधी मानता येईल. इथे येणार्‍या जाणार्‍या बसेसची लगबग सुरु असते. माणसं आपल्याला हवी ती बस पकडण्यासाठी सैरावैरा धावत असतात आणि बसच्या दारात उभे राहून कंडक्टर ती बस कुठे चालली आहे याच्या आरोळ्या ठोकत उभे असतात. “पणजी-पणजी, मडगांव-मडगांव, म्हापसा-म्हापसा”या त्यांच्या अस्सल कोकणी लयीतल्या ललकार्‍या मला वेदमंत्रांसारख्या मोहून घेतात. हातात कोंबलेली नोटांची बंडलं सांभाळात कंडक्टर्सनी ठोकलेल्या या ललकार्‍या मी बाजूला उभा राहून शांतपणे ऐकत राहतो. गोव्याचं वर्णन अथवा वैशिष्टय एका वाक्यात स्पष्ट करा असं जर कुणी मला सांगितलं तर मी “फोंडा-फोंडा, पणजी-पणजी, मडगांव-मडगांव, वास्को-वास्को” असा ओरडत उभा राहीन. या ललकार्‍या म्हणजे गोवा, गोवा म्हणजे या ललकार्‍या !

गोव्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभलं आहे. विशाल समुद्र किनारा हे गोव्याचं खास आकर्षण. या आकर्षणावर मोहित झालेल्या सार्‍या जगातील पर्यटकांची रीघ आता गोव्याकडे लागलेली असते. काश्मिर समस्या चिघळल्यापासून खुद्द भारतातील विविध राज्यांतील पर्यटकही मौजमजा करण्यासाठी आता गोव्यात दाखल होतात. आणि गोवाही या मंडळींना भरभरुन आनंद देत राहतो. पर्यटकांच्या सोयीसाठी गोव्याचे साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा असे दोन विभाग पाडले जातात. नॉर्थ गोवा हा मुख्यत: समुद्र किनार्‍याचा विभाग. फेसाळणार्‍या लाटांसोबत पांढर्‍या शुभ्र वाळूवर मनमुराद भटकणं हे या भागाचं आकर्षण तर साऊथ गोवा मंदिरांचा, चर्चेसचा, थोडक्यात भक्तीभाव जोपासणारा भाग. रामनाथी, मंगेशी, शांतादुर्गा, म्हळासा, महालक्ष्मी अशी अनेक देवळे या भागात गोव्याच्या सृष्टीसौंदर्‍यात भर घालत उभी आहेत. ओल्ड गोव्यातील चर्चेसही आपल्याला नतमस्तक व्हायला लावतात. खुद्द पणजी शहरात अगदी टोकाला एक चर्च आहे. या चर्चची वास्तूरचना पाहिली की त्या वास्तूकाराच्या क्रिएटिव्हिटीला खरोखरच दाद द्यावीशी वाटते. साध्या दोन जीन्यांची सांगड घालून त्या वास्तूकाराने चर्चची इतकी अप्रतिम इमारत उभी केली आहे की धर्मभेद, वंशभेद वगैरे सर्व क्षणार्धात विसरुन आपण त्या वास्तूला वंदन करतो. माणसातील माणूसकी जागवणारं पर्यटनस्थळ अशी कुणी गोव्याची व्याख्या केली तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

गोव्यातील इमारतींइतकीच मला स्वत:ला आकर्षण असतं ते तिथल्या साध्याभोळ्या माणसांचं. मधाळ कोकणी हेलात गप्पा छाटणारी निष्पाप माणसं निरखणं हा माझा आवडीचा छंद. अगदी मुंबईतही मुणी आपापसात कोकणी भाषेत बोलत असलं की मी तिथे अंमळ घुटमळून ते संभाषण कानात साठवू लागतो. खुद्द गोव्यात तर माझी चंगळच असते. अगदी किती ऐकू आणि कुणाचं ऐकू असं होऊन जातं ! गोव्यातील माणसं खरोखरच निरागस आणि निष्पाप. अगदी कालपरवा पर्यंत इथले रिक्षावाले रिक्षा थांबल्यानंतर मागे येऊन अदबीने रिक्षाचं दार उघडत असत. एकदा एक टॅक्सीवाला ड्रायव्हर माझी तुटलेली चप्पल हातात घेऊन ती शिवून घेण्यासाठी पणजीला मोची शोधत फिरला होता. याचा अर्थ गोव्यात कुणी बनेल आणि बेरकी नसतंच असं मला म्हणायचं नाही. कुणाला कदाचित तसेही अनुभव आले असतील. मी मात्र गोव्याचा माणूस म्हटला की तो म्हणेल त्याला हो म्हणून टाकतो. कदाचित त्यामुळेच मला नेहमीच साधीभोळी माणसं भेटत गेली. त्या माणसांची ओढ मला गोव्यात खेचून आणते.

मनाला आनंदाच्या धारांनी चिंब भिजवणारं आणि कानावर पडताच क्षणार्धात ताल धरायला लावणारं संगीत हा गोव्याबद्दलच्या आकर्षणाचा आणखी एक महत्त्वाचा घटक. मला अनेक कोकणी गाणी पाठ आहेत. एकेकाळी रॉड्रिग्ज नावाचा माझा एक सहकारी ऑफिसमध्ये सबंध दिवस कोकणी गाणी म्हणत असे. ती गाणी कायमची माझ्या स्मृतीत राहिली. पणजीला पर्यटकांसाठी संध्याकाळी फेरी बोटचं आयोजन केलं जातं. या फेरीबोटमध्ये ही कोकणी गाणी सादर केली जातात. काठावरल्या इमारतींची रोषणाई पाहात मांडवी नदीतून शांतपणे विहार करत ही गाणी ऐकणं ही सुखाची परमावधी. गोव्याला गेलो की निवांत वेळ काढून ही गाणी ऐकायला मी हमखास जातो. तीच ती गाणी, वर्षानुवर्षे ऐकलेली, परंतु त्यांची अविट गोडी मनाला उभारी देऊन जाते. पुन्हा पुन्हा …. पुन्हा पुन्हा !

सुशेगात गोवा आता बदललं आहे. एकेकाळी गोव्यातील सर्व व्यवहार सकाळी नऊला सुरु होऊन दुपारी एकच्या सुमारास थबकत असत. नंतर चार वाजेपर्यंत वामकुक्षीची वेळ. चारला उघडणारी दुकानांची दारं संध्याकाळचे सात वाजले की पुन्हा बंद. सातनंतर पणजी सारख्या मध्यवर्ती भागातही शुकशुकाट असे. आजकाल रात्रौ दहापर्यंतही दुकानं उघडी असतात. एकदा तर मी थबकलोच. रात्रौ दहा वाजता पणजीतलं दुकान उघडं ! माझा विश्वासच बसेना ! पण हा बदल आता मी स्वीकारला आहे.

काळाला अनुसरुन गोव्यात आधुनिकता फोफावते आहे. माझी त्याबद्दल जराही तक्रार नाही. जोपर्यंत मांडवीचं पात्र शांत वाहणार आहे, जोपर्यंत कोकणी भाषेतला गोडवा तसाच राहणार आहे आणि जोपर्यंत गोव्यातील देखण्या इमारतींची सुंदरता अभंग राहणार आहे तोपर्यंत माझी कसलीही तक्रार राहणार नाही. जराकुठे चारसहा महिने लोटले की मला पुन्हा गोव्याला जाण्याचे वेध लागतील. निवांतपणी मग मी पत्नीला म्हणेन – बरेच दिवस झाले, गोव्याला गेलो नाही. एकदा जाऊन येऊ या !

— सुनील रेगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..