नवीन लेखन...

गणेशाची साडेतीन पीठे

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांकामध्ये  श्री प्रदीप रामचंद्र रास्ते, पुणे यांनी लिहिलेला लेख)

वेदकालापूर्वी आणि सृष्टीची निर्मिती करण्यापूर्वी ॐकार गणेशाने शून्य मंडळात किंवा हवेच्या पोकळीत स्व-आनंदासाठी एक स्थळ निर्माण केले, ते क्षेत्र म्हणजे ‘स्वानंदपूर’ आणि आत्ताच्या काळातील ‘मोरगाव.’ सृष्टीनिर्मितीचे कार्य करून ॐकार या स्थळी येऊन राहिला. त्यावेळी पंचदेव (ब्रह्मा-विष्णु-महेश-शक्ती आणि सूर्य) त्याच्या दर्शनासाठी आले. त्यांनी ॐकाराचे मनोभावे पूजन केले. त्यावेळी ॐकाराने सृष्टीनिर्मितीच्या निमित्ताने या देवांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवून तो अंतर्धान पावला. सृष्टीनिर्मितीचे कार्य ब्रह्मदेवावर, सृष्टीच्या पालन-पोषणाचे कार्य विष्णूवर, संहाराचे कार्य शंकरावर, शक्ती, प्रेरणा देण्याचे कार्य आदि शक्तीवर व सर्वांना प्रकाश व आरोग्य देण्याचे कार्य सूर्यावर सोपविले. अशा प्रकारे कामांची वाटणी केली. स्वानंदपुरी ॐकार गणेश अंतर्धान पावला म्हणून त्या ठिकाणी पंचदेवांनी, ऋषीमुनींनी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. म्हणून या स्वानंदपुरीला गणेशाच्या आद्यपीठाचे माहात्म्य प्राप्त झाले. तेव्हापासून मोरगाव गणेशाच्या आद्य पूर्णपीठाचा मान लाभला.

मैथिली देशातील गंडकी नगरीत राज्य करणाऱ्या चक्रपाणि राजाला सिंधू नावाचा पुत्र होता. तो आसुरी प्रकृतीने संपन्न असा महापराक्रमी होता. त्याने सूर्याची आराधना करून, ब्रह्मांडविजयी सामर्थ्य व सर्वथा अजिंक्यपद प्राप्त करून घेतले होते. पुढे त्यांने ब्रह्मा-विष्णु आदी प्रमुख परमेश्वरांना जिंकून कारागृहात ठेवले. तो अखिल ब्रह्मांडाचा राजा झाला. त्यावेळी त्याने सर्वत्र धर्मनाश केला. देवमूर्तीचा विध्वंस केला. त्यावेळी त्याने मयूरेश क्षेत्रातील मयूरेश्वर मूर्तीचाही विध्वंस केला. त्यानंतर सर्व देव शिवासह स्वानंदपूरला आले. त्यांनी ॐकार प्रसन्न व्हावा यासाठी तप आणि यज्ञयाग सुरू केले. तेव्हा भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी त्यांच्या यज्ञकुंडातील ज्वालेमधून एक सुवर्णमोर उत्पन्न झाला आणि ॐकारही प्रकट झाला. त्यावेळी सर्व देवांनी ॐकार गणेशाला वंदन करून सिंधुसुराच्या विघ्नापासून सर्वांचे रक्षण करा अशी प्रार्थना केली. त्यावेळी ॐकार, यज्ञातून निघालेल्या सुवर्णमोरावर आरूढ झाला आणि सिंधुसुराचा त्याने एका क्षणात वध केला. त्यासरशी सिंधुसुराचा सेनापती कमलासुर सामोरा आला. त्यावेळी त्या गुणेशाचे व कमलासुराचे फार मोठे युद्ध होऊन, त्यामध्ये कमलासुराचा नाश झाला. कमलासुराला मारण्यासाठी गणेशाने जो त्रिशूल फेकला, त्याच्या योगाने कमलासुराच्या शरीराचे तीन विभाग झाले. त्याआधी गणेशाने कमलासुराचे शिर धडावेगळे केले होते, परंतु शिर जेथे पडे, तेथून ते पुन्हा त्याच्या धडाला चिकटे व तो पुन्हा जिवंत होई. त्यावेळी गणेशाच्या पत्नी सिद्धी आणि बुद्धी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे गणेशाने कमलासुराच्या देहाचे तीन तुकडे करून आकाशात उंच फेकले. त्यातील त्याचे शिर परत नेमके स्वानंदपुरीत, ऋषीमुनी यज्ञ करीत होते तेथे पडले. तत्क्षणी मयूरावर आरूढ झालेला ॐकार मोरावरून उतरला आणि कमलासुराचे शिर त्याच्या दुभंगलेल्या धडाला सांधले जाण्यापूर्वीच ॐकाराने त्या शिरावर आपला पाय ठेवला व ते जमिनीखाली दाबले. ॐकार त्या जागेवर थांबला, त्यावेळेला पंचदेवांनी ॐकाराचा जयजयकार केला. कमलासुराचे ते शिर जमिनीतून परत कधीच वरती येऊ नये म्हणून त्याला निरंतर त्या ठिकाणी राहण्याची विनंती केली.
वेदपूर्वकालात ॐकार या स्थळी आलेला होता, तेव्हापासून त्या स्थळाला आद्य-पूर्णपीठाचा मान लाभलेला होताच, पण आता त्या पूर्ण पीठामध्ये आणखी अर्ध्या पीठाची भर पडली. ॐकाराने कमलासुराचे शिरच्छेदन जरी केले होते तरी ते शिर सजीव स्वरूपातच या क्षेत्री यज्ञाजवळ येऊन पडले होते, ते मृत झालेले नव्हते, त्यामुळे ते अर्धे पीठ ठरले. म्हणून मोरगाव हे गाणपत्य संप्रदायाचे १+१/२ असे दीड पीठ म्हणून प्रसिद्धीस आले.

कमलासुराच्या खांद्यापासून ते नाभीपर्यंतचा भाग औरंगाबाद जिल्ह्यातील जालन्याजवळील राजूर येथे पडला. परंतु कमलासुराचे शिर नसल्याने हा धडाचा भाग मृत झाला, म्हणून तेथे एक पूर्ण पीठ निर्माण झाले.

कमलासुराच्या देहाचा तिसरा भाग म्हणजे बेंबी ते पायाची नखे, हा भाग. जळगाव येथील पद्मालय येथे पडला, पण तोही मृत झाला. म्हणून पद्मालयालाही पूर्ण पीठाचे माहात्म्य प्राप्त झाले. कमलासुराच्या वधातून ही अडीच पीठे आणि स्वानंदपूर (मोरगाव) हे अगोदरपासूनचे आद्य पीठ म्हणून एक पूर्ण अशी ही ॐकार गणेशाची साडेतीन पीठे प्रसिद्ध झाली.

ही तिन्ही पीठे महाराष्ट्रातच असून, पुराणोक्त २१ गणपतींमध्ये त्यांचा उल्लेख आहे. मोरगावचा मयुरेश्वर, राजूरचा दैत्य विमर्दन आणि पद्मालयाचा प्रवाळ गणेश ही ती गणेशाची साडेतीन पीठे होत. या विषयीचा उल्लेख स्कंद पुराणामधील विनायक माहात्म्यात आला आहे.

-प्रदीप रामचंद्र रास्ते, पुणे

(व्यास क्रिएशन्सच्या  प्रतिभा दिपोत्सव २०१६ ह्या श्री गणपती विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..