नवीन लेखन...

गजरेवाला

काल संध्याकाळी घरी जाताना, सिग्नलला गाडी थांबवल्यावर एक गजरेवाला दिसला. तो प्रत्येक वाहनचालकाला गजरा दाखवून, विकत घेण्यासाठी विनवणी करीत होता. टू व्हिलरवरील मुली, स्त्रिया मान हलवूनच नको नको, म्हणत होत्या. कारमध्ये मागील सीटवर बसलेल्या स्त्रिला, तो काचेवर टक टक करुन गजरे दाखवत होता.. तीदेखील त्याच्याकडे दुर्लक्ष करुन सिग्नल सुटण्याची वाट पहात होती…

मी मात्र ते दृष्य पाहून, पन्नास वर्षांपूर्वीच्या भूतकाळात गेलो होतो.. सदाशिव पेठेत, भरत नाट्य मंदिर जवळच आम्ही जोशी वाड्यात रहात होतो. उन्हाळ्याच्या दिवसात, भरत नाट्य मंदिरात रात्रीच्या नाटकाला येणाऱ्या स्त्रिया नाट्य मंदिराच्या दाराशी उभ्या असलेल्या गजरेवाल्याकडून हमखास गजरे विकत घ्यायच्या. साडेआठ पासून त्याची सुरु झालेली गजरेवाल्याची विक्री दहा वाजेपर्यंत पूर्ण होऊन तो रिकाम्या हाताने व भरलेल्या खिशाने घरी निघून जायचा.. शेजारील शेडगे आळीमधील, मुलं असे गजरे विकायची. त्यावेळी पंधरा पैसे इतकाच गजऱ्याचा दर होता. नंतर तो वाढत जाऊन, आठ आणे ते रुपयांपर्यंत गेला. तेव्हा नाटक पहाणे, हा माणसांचा शौक होता. नाटकाला येणाऱ्या स्त्रिया, साडीमधीलच असायच्या. गजरा घेतला की तो लगेचच पीनने केसात किंवा अंबाड्याभोवती गुंडाळला जायचा. अशा रसिक प्रेक्षकांमुळे नाट्यगृहात मोगऱ्याचा दरवळ सुटत असे..

दोन पिढ्यांनंतर आता नाटकाला जाणाऱ्या स्त्रीवर्गाचा पेहराव बदललेला आहे. आता साडीमधील स्त्रिया क्वचितच दिसतात. बऱ्याचशा बाॅयकट, पोनीटेल, बाॅबकट केलेल्या असतात. त्यांना गजरा कसा व कुठे लावायचा, हा गहन प्रश्न पडतो. शिवाय गजरेवालेही नाट्यगृहासमोर क्वचितच दिसतात.

पूर्वी ‘ती फुलराणी’ सारख्या नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षागृहात, मोगऱ्याचा दरवळ सुटायचा. आता तशी नाटकंही नाहीत आणि प्रेक्षकही.. काही समारंभाना, सोहळ्यांना आयोजकच प्रेक्षकांना दरवाजाशीच गजरे देत असत. सहाजिकच तेथील वातावरण सुगंधित होत असे..

आता स्त्रियांच्या सणावाराला किंवा हळदीकुंकवाला गजऱ्यांना मागणी असते. अशावेळी मिळतील त्या किंमतीला, ते घेऊन वापरले जातात. त्यासाठी तुळशी बागेच्या आसपास उभे असलेल्या गजरेवाल्यांना गाठावं लागतं.

कधी एखाद्या फुलवालीने मांडलेले मोगऱ्यांच्या कळ्यांचे वाटे, लक्ष वेधून घेतात. किंमतीत घासाघीस करुन तो वाटा देताना ती मोठ्या हिरव्या पानात गुंडाळून देते. घरी तो पुडा उघडल्यावर, अप्रतिम सुगंधाचा दरवळ सुटतो..

पूर्वी मराठी चित्रपटांतून नायक, नायिकेच्या केसात गजरा माळतानाचा प्रसंग हमखास असायचा. अशावेळी नायिका जयश्री गडकर, उमा, कानन कौशल सारख्या, शालीन असायच्या. हेच गजरे हिंदी चित्रपटात, नायकिणीकडे जाणाऱ्या पुरुषांच्या मनगटावर असायचे. बैठकीच्या लावणीत लोडाला टेकून बसलेले खलनायक मगगटावरील मोगऱ्याचा वास घ्यायचे..

घराला लागूनच एखादा फुललेला मोगरा असणं, हे आता निव्वळ स्वप्नच राहिलंय.. निसर्गापासून माणूस दूर होत चाललाय. नैसर्गिक सुगंधाऐवजी, त्याला ‘फाॅग’ चा फवारा आवडू लागलाय… कृत्रिम केमिकल मिश्रीत सुगंध, हा तात्पुरता असतो. नैसर्गिक फुलांचा सुगंध, तुम्हाला दिवसभर ताजंतवानं ठेवतो..

काही वर्षांपूर्वी मी सावंतवाडीला गेलो होतो. तिथे लहान मुलींपासून वृद्ध स्त्रीपर्यंत प्रत्येकीने, कोणतं ना कोणतं फुल केसांत खोचलेलं मी पाहिलेलं आहे. ती साधी भोळी माणसं जितकी निसर्गाच्या जवळ आहेत, त्यांच्या कितीतरी पट आपण शहरी माणसं निसर्गापासून दूर गेलेलो आहोत..

तो गजरेवाला निराश होऊन माघारी फिरला होता.. मी त्याला हाक मारली व पाच गजरे विकत घेतले.. सिग्नल पडला व मी गाडी सुरु केली. त्या सगळ्या गर्दीत फक्त मीच ‘सुगंधित’ होतो…

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

३०-४-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..