नवीन लेखन...

फ्युचर व्हिजन

चीफ इंजिनियरने वयाची पन्नाशी ओलांडली होती. त्याचा मोठा मुलगा सुद्धा मर्चन्ट नेव्ही मध्येच जहाजावर सेकंड मेट म्हणून काम करत होता तर मुलगी एम बी बी एस करत होती. पंचवीस वर्षांपेक्षा जास्त सर्व्हिस झाल्यामुळे, मुंबईत तीन कोटी पर्यंतचे दोन फ्लॅट्स, बी एम डब्लू, नोकर चाकर, मुच्यूअल फंडस्, मोक्याच्या ठिकाणी घेतलेले वाणिज्यिक गाळे त्यातून मिळणारे लाखो रुपयांचे भाडे अशी करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीचे त्याच्याकडून नेहमी वर्णन ऐकायला मिळायचे. रोज सकाळ संध्याकाळी असणाऱ्या फक्त अर्ध्या तासाच्या टी ब्रेक पुरता तो खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये चहा प्यायला यायचा. त्याचे प्रॉपर्टी बद्दल वर्णन करताना दुसऱ्यांना कमी लेखण्याचा किंवा हिणवण्याचा बिलकुल हेतू नसायचा हे त्याच्या सांगण्यावरून सगळ्यांना समजायचे. उलट आर्थिक नियोजन कसे करायचे या फ्युचर व्हिजनच्या उत्सुकतेपोटी सगळे जण त्याचे या विषयावरील बोलणे आवडीने ऐकायचे. फक्त सगळ्यांना त्याची एकच गोष्ट खटकायची आणि ती म्हणजे त्याचा सी टाइम किंवा मागील पंचवीस वर्षांत त्याने प्रत्यक्ष जहाजावर घालवलेला वेळ. वयाच्या पंचविशीत शिपिंग जॉईन केल्यापासून त्याने त्याच्या पन्नाशी पर्यंत आयुष्यातील सुमारे सतरा वर्षे जहाजावर किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की समुद्रात घालवली होती. ऐन तारुण्यातील पंचवीस पैकी फक्त आठ वर्षे त्याने घरी किंवा कुटुंबासोबत घालवली होती. जेवढे कमावले त्याच्यातून उभारलेली प्रॉपर्टीचा उपभोग घ्यायला त्याला स्वतःला त्याच्याच आयुष्यातील अर्धा वेळ सुद्धा देता आला नव्हता. मुलगा त्याच्याच वाशील्याने का होईना पण मार्गाला लागला होता. आणखी दोन एक वर्षांत मुलीचे एम बी बी एस पूर्ण झाल्यावर तिचे थाटामाटात लग्न करून दिल्यावर तो निवृत्ती घेऊन त्याने उभारलेल्या प्रॉपर्टीचा उपभोग घेणार आहे असे वारंवार सांगत असे.

घरापासून किंवा फॅमिली पासून एवढे दिवस लांब राहू शकणारा हा चीफ इंजिनियर खूप प्रेमळ आणि सगळ्यांना समजून घेणारा होता, कोणाकडून चुका झाल्या तर त्यालाच दोष देण्याऐवजी चीफ या नात्याने जवाबदारी स्वीकारून त्यातून मार्ग काढून बाजू घेत असे. जहाज पोर्ट मध्ये असताना शहरात किंवा किनाऱ्यावर जाण्याची संधी मिळाली तर चीफ इंजिनियर पहिले इंजिन क्रू पैकी इतरांना जाऊ द्यायचा आणि त्यांच्या जागी स्वतः वॉच करायचा, इतर जाऊन आल्यावर वेळ मिळाला तर क्वचितच कधीतरी स्वतः जायचा.

जहाज दोन दिवसांनी जिब्राल्टर ला पोचणार होते तिथे इंधन भरून पुढे भूमध्य समुद्रातील ट्युनिशिया देशातील पोर्ट मध्ये जाणार होते. त्या दिवशी रविवार होता दुपारी बिर्याणी खाऊन हाफ डे असल्याने सगळ्याना सुट्टी होती. सकाळी बरोबर दहा वाजायच्या काही मिनिटे अगोदरच वरून येताना मेस रूम मधून काचेच्या ग्लास मध्ये आल्याचा तुकडा टाकून न चुकता चहा प्यायला येणारा चीफ इंजिनियर दहा वाजून दहा मिनिटे झाले तरी खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये आला नव्हता. आणखी पाच मिनिटे वाट पाहिल्यावर न राहवून सेकंड इंजिनियरने शीप्स ऑफिस मध्ये फोन केला, पलीकडून कॅप्टन ने सांगितले की चीफ इंजिनियर त्याला ब्रेकफास्ट करायला दिसला नाही म्हणून त्याने त्याच्या केबिन मध्ये फोन केला पण फोन उचलला नाही म्हणून चीफ इंजिनियर खाली इंजिन रूम मध्ये काही काम असेल म्हणून गेला असावा असे त्याला वाटले. कॅप्टन ने मी केबिन मध्ये जाऊन बघतो असे सांगून फोन ठेवला. त्याचा फोन ठेवतो न ठेवतो तोच फोन ची बेल वाजली, पलीकडून स्टीवर्ड बोलत होता की सेकंड साब वर या बडा साबचे केबिन सकाळपासून लॉक आहे, मी सकाळपासून तीन वेळा नॉक केलं पण आतून काहीच प्रतिउत्तर नाही. सेकंड इंजिनियर ने सगळ्यांना सांगितल्यावर सगळेचजण धावत धावत चीफ इंजिनियरच्या केबिन कडे निघाले. कॅप्टन स्वतः बाहेरून बडा साब बडा साब हाका मारून दरवाजा ठोठावत होता. सगळ्यांना पाहिल्यावर त्याने त्याच्याकडील मास्टर कि ने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर आतमधील दृश्य पाहून सगळ्यांची मने अक्षरशः हेलावून गेली. बेडरूम मधील बेड आणि इतर वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या फोनचा रिसिव्हर खाली पडलेला आणि चीफ इंजिनियर बेडरूम बाहेरील डे रूम मध्ये दरवाजाच्या दिशेने हात लांब करून खाली निपचित पडला होता.

रात्री दहा वाजता फोर्थ इंजिनियरने खाली इंजिन रूमचा रुटीन राउंड घेतल्यावर इंजिन आर पी एम आणि मेन इंजिन तसेच जनरेटर यांच्या लोडची माहिती देण्यासाठी नेहमीप्रमाणे चीफ इंजिनियरला त्याच्या केबिन मध्ये फोन केला होता असे सांगितले. रात्री दहा नंतर फोर्थ इंजिनियरशी बोललेला आणि सकाळी आठ वाजता ब्रेकफास्ट करायला येणारा चीफ इंजिनियर कॅप्टनला दिसला नव्हता, त्यानंतर त्याच्या केबिन ची सफाई करण्यासाठी गेलेल्या स्टीवर्डला आतून लॉक असलेला दरवाजा का उघडला नसेल याबद्दल जराही शंका आली नव्हती. चीफ इंजिनियरचा मृत्यू झालाय हे सांगण्यासाठी त्याचे पल्स बघण्यासाठी हात लावायचे पण कोणामध्ये धैर्य नव्हते. ज्या व्यक्तीशी रोज हसत खेळत बोलणारे तो निपचित पडलाय आणि मेला असेल असे समजून त्याच्याजवळ जायला तयार नव्हते. कॅप्टनने कंपनीला कळवले, नेमका मृत्यू हार्ट अटॅक ने की आणखीन कशाने ते पोस्ट मॉर्टेम नंतरच निष्पन्न होणार होते. पण हार्ट अटॅक मुळे छातीत कळ आल्यावर चीफ इंजिनियरने केलेली धडपड, फोन करून दुसऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न आणि तोही जमला नाही तर दरवाजा उघडून बाहेर येण्यासाठी केलेली धडपड कमी पडली आणि त्याला वाचवू शकली नाही. म्हातारपणी भाविष्य सुखकर व्हावे म्हणून घरापासून कुटुंबापासून लांब राहून कमावलेल सगळं जागच्या जागी राहिलं होते. आलिशान फ्लॅट, गाड्या, प्रॉपर्टी यांचा उपभोग घायचे त्याचे स्वप्न एका रात्रीत काही मिनिटात किंवा सेकंदातच संपले होते. कॅप्टन ने पुरावे म्हणून खूप फोटो काढून घेतले. त्याचा मृतदेह खाली मीट रुम मधील चिकन आणि मांस बाजूच्या फिश रूम मध्ये शिफ्ट करून तिथे ठेवला गेला.

दोन दिवसानी जिब्राल्टर मध्ये दुसरा चीफ इंजिनियर जॉईन झाला. कंपनीत एका वर्षी रिलिव्हर मिळत नव्हता म्हणून सलग चौदा महिने चीफ इंजिनियर म्हणून काम केलेल्या त्याच चीफ इंजिनियरचा मृत्यू झाल्यावर त्याची जागा घ्यायला दुसरा चीफ इंजिनियर दोन दिवसात कंपनीने जहाजावर पाठवला होता. सेलिंग करणारे जहाज चीफ इंजिनियर नसेल तर सेल करता येत नाही म्हणजेच समुद्रात चालवता येत नाही. मरण पावलेल्या चीफ इंजिनियरचे प्रेत कॅप्टन ने नव्या कोऱ्या पांढऱ्या शुभ्र बेडशीट मध्ये बांधायला लावले होते. जहाज यार्ड डिलिव्हरी पासून म्हणजेच बांधणी झाल्यापासून पाहिल्यान्दा समुद्रात उतरवले गेले तेव्हा हाच चीफ इंजिनियर दहा वर्षांपूर्वी होता. मागील दहा वर्षांत त्याला रिलीव्ह करणारे अनेक चीफ इंजिनियर येऊन गेले पण जवळपास दहापैकी साडे सहा वर्ष ज्या जहाजावर त्याने काढली होती त्या जहाजाला वर्षातून कमीत कमी दोन वेळा हात हलवून निरोप देऊन पुन्हा अडीच तीन महिन्यात हसत हसत माघारी येणारा चीफ इंजिनियर यावेळेला हात हलवून निरोप न घेता अनंतात विलीन व्हायला कायमचाच जाणार होता. त्याच्या पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट मध्ये सिव्हियर हार्ट अटॅक आल्याचे निष्पन्न झाले होते. आठ महिन्यापूर्वी केलेल्या मेडिकल टेस्ट मध्ये फिट असलेल्या कधीही दारू किंवा सिगारेट न पिणारा कोणतेही व्यसन नसणाऱ्या व्यक्तीच्या अशा दुर्दैवी आणि आकस्मिक मृत्यूने सगळेच जण बिथरले होते. त्याचे कुटुंबीयां पर्यंत प्रेत पोचायला मृत्यू झाल्यापासून पाच ते सहा दिवस लागणार होते, त्याचा मुलगा जहाजावर होता आणि त्याचे जहाज आणखीन तीन दिवसानी पोर्ट मध्ये पोचणार होते आणि तिथून त्याला घरी पोहचायला आणखीन एक दीड दिवस लागणार होता पण तेवढेच चार पाच दिवस त्याचे प्रेत मुंबईतील शवागारात ठेवले जाणार होते. मुलगा परतल्यावर काही तासांकरिता प्रेत त्याच्या स्वतःच्या घरी ठेवले जाणार होते. त्याची आयुष्यभराची कमाई आणि मृत्यू नंतर इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळणारी भरपाई आणि फ्युचर व्हिजन जिथल्या तिथे राहिले होते .

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर

B.E.(mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 106 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..