नवीन लेखन...

नागालँड राज्याचा स्थापना दिवस

१९५० चा काळ, नुकतेचं पदरात पडलेल्या स्वातंत्र्याचा काळ, जगातील सर्वात मोठी लोकशाही, एखाद्या नवजात शिशुप्रमाणे अगदी जेमतेमचं दुडकी पावलं टाकू लागली होती. संसाराचे नव्या नवलाई नऊ दिवस संपले कि काहीनाकाही धुसफुसायला सुरवात होतीच. हे जाणकार लोकं माझ्यापेक्षा जास्त चांगले जाणतातचं.

सगळीकडचा कारभार सुरळीतपणे चालण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांची लय जुळविताना, राज्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होतं होती, पण कुठलीही काम अडून राहिली नव्हती. १९५० च्या दशकात एकीकडे काश्मीरसाठीची सांगड घालण्याची कामं चालू असताना, हिमालयाचे दुसरे टोक फणफणत होते. इथे नागा लोकांनी आपले आकांत सरकारसमोर मांडले होते. काश्मीरची डोकेदुखी आज रोजी देखील सर्वांना माहिती आहेच, पण भारताची नागा समस्या ठाऊक असणारे लोकं तेव्हाही विरळचं होते, आणि आजही नगण्यचं आहेत, वास्तविक नागांची हि समस्या काश्मीरपेक्षाही जुनी होती.
नागालँड म्हणजे भारताच्या पूर्व सीमेवरील अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले डोंगरी जमातींचे एक स्वायत्त राज्य. जेमतेम १७ हजार चौरसकिलोमीटरचे क्षेत्रफळ असणाऱ्या राज्याच्या दक्षिणेस मणिपूर, पश्चिमेस मेघालय, उत्तरेस अरुणाचल प्रदेशचा तिराप जिल्हा तर पूर्वेस ब्रह्मदेश आहे. बांगलादेश आणि चीन हे देश नागालँडपासून जवळच आहेत. राजकीय दृष्ट्या नागालँड हा भारताचा अत्यंत महत्त्वाच्या जागी असलेला प्रदेश आहे. हि आजमितीची गोष्ट पण तेव्हा………..!
तेव्हा नागा टोळ्यांची वस्ती बर्माच्या सीमेवर पूर्व हिमालयाच्या रांगांमध्ये होती. पर्वतांमुळे, हा प्रदेश, नागांचे जीवन, सामाजिक विकासापासून वेगळेचं पडले. या पर्वतांमुळेचं ते सुरक्षित राहिले असे देखील म्हणावे लागेल. ब्रिटीशांचे त्यांच्यावर व्यवस्थापन जवळपास नव्हतेचं आणि नागांच्या चालीरीतीला देखील हात लागण्याचा कधी प्रसंग नव्हता. फक्त बाप्टिस कॅथलीक धर्माचा स्वीकार तेथील काही नागांनी केला होता., काहीजण शिक्षणाकडे वळाले होते त्यामुळे तेवढी नरसंहार हि प्रथा बंद झाली होती.

१९१७-१९ मध्ये मणिपूरमधील कुकी जमातीविरुद्धच्या मोहिमेत भारत-ब्रह्मदेश सीमा निश्चित झाली, तेव्हा तिच्या पूर्वेकडचा नागा जमात प्रदेश अशासित ठेवण्यात आला, पहिल्यांदा नागा टेकद्यांचा समावेश आसाम प्रांतात करण्यात आला होता. पण नागा हिल्स जिल्ह्याचा कारभार मात्र कोहीमा ठाण्यातून चालू राहिला. दुसऱ्या महायुद्धात मार्च ते जून १९४४ कोहीमा जपान्यांचा ताब्यात होते. त्यांना घालवण्यात ब्रिटिशांना नागांनी मदत केली. युद्धात मिळविलेल्या शस्त्रांमुळे आणि ब्रिटिश, भारतीय व जपानी सैन्यांशी आलेल्या संपर्कामुळे ह्यांचे एकाकी जीवन विचलित होऊन त्यांच्या डोक्यात नवीन विचार येऊ लागले.

बऱ्याच टोळ्यांचे वास्तव्य असणाऱ्या या परिसरात नागा सर्वात स्वायत्त म्हणता येईल. स्वातंत्र्यचळवळी दरम्यान नागांचा कधी चळवळीशी आणि कुठल्या कॉंग्रेस नेत्यांचा नागा टेकड्याशी संबंध आलाच नव्हता. ब्रिटीशांशी काही संघर्ष झाल्यानंतर नागा आणि ब्रिटीश दोघेही एकमेकांशी आदराने वागत, ब्रिटीशांचा नागा टोळ्यांविषयीचा दृष्टीकोन पालकत्वाचा होता. आधुनिक जगाच्या उजाडपण आणणाऱ्या भ्रष्टाचारापासून ते त्यांना सुरक्षित ठेवू इच्छित होते.

मुळात नागा प्रश्न सुरु झाला तो १९४६ साली., दिल्ली आणि सिमला इथे ब्रिटीश भारताचे भवितव्य ठरत होते. सार्वत्रिक निवडणुका घडत होत्या, तेव्हा या उपखंडातील एका कोपऱ्यावर असणाऱ्या नागांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली., त्यातूनचं मग काही सुशिक्षित नागा लोकांकडून “नागा नॅशनल कौन्सिल” स्थापान झाले. त्यांचे विचार प्रस्तुत करण्यासाठी नागा नेशन नावाचे नियतकालिक ते चालवत. वेगवेगळ्या नागा लोकांमधले वेगवेगळे विचारप्रवाह एकत्र येऊन नागा नॅशनल कौन्सिल बनले होते. काहींचे विचार स्वतंत्र राष्ट्र तर काहीजण भारताचे नागरिक म्हणून राहणे पसंद करत होते.

कौन्सिल तर्फे दिल्लीला स्वतंत्र राष्ट्रासाठी पत्र पाठविण्यात आले., याला कॉंग्रेस नेत्यांनी नागा नॅशनल कौन्सिलकडून आलेल्या पत्राच्या उत्तरात त्यांना पूर्ण स्वायत्ता मिळेल फक्त ते भारताच्या संघराज्यात असेल असे उत्तर कळविले., पण काहीजण अजून संपूर्ण स्वातंत्र्यावर अडून होते. यात आत्ताच जन्माला आलेली (त्याकाळची परिस्थिती) हि लोकशाही टिकेल कि उन्मळून पेल याचीही शाश्वती नसल्याच्या चर्चा इथे रंगत, आणि यातूनचं हा संघर्ष बळावला.

खोनेमा गावातील एका तरुणानं हा इतिहास घडविण्यात वैशिष्ठपूर्ण कामगिरी केली. हि व्यक्ती म्हणजे अंगामी झापू फिझो. पुढची जवळपास ५० वर्ष हा नाग प्रश्न “फिझो”च्या नावाने चर्चेत राहिला. दुसऱ्या महायुद्धात भारतावर चाल करून येणाऱ्या जपानच्या सैन्यात फिझो हे सामील होते. “ब्रिटीशविरोधी जर विजय मिळालाचं तर नागांचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्यासाठी जपान अनुकूल राहील” अशा मोठमोठ्या गोष्टी स्वप्नात रचत फिझोचे मार्गक्रमण चालू होते. युद्धानंतर भारतात येऊन त्यांनी कौन्सिलची सूत्रे आपल्या हातात घेतली. यावेळी भारतीयांना सार्वभौमत्व मिळून ४ वर्षे लोटली होती. पण नागाहिल्सवर याचा परिणाम झाला नव्हता, नेहरूंची भेट घेण्यासाठी दिल्लीला आलेले फिझो मोकळ्या हातानेचं माघारा गेले याचा निषेध म्हणून सार्वजनिक निवडणूकांवर बहिष्कार टाकण्यात आला. यानंतर सहा महिन्यांनी नेहरूंनी कोहीमाला दिलेल्या भेटीदरम्यान होणाऱ्या सभेत बोलायला आले असता नागांनी त्यांना डावललले.

एकीकडे दिल्लीवाऱ्या यशस्वी होत नाहीत, हे पाहता फिझोंनी शस्त्र गोळा करायला सुरवात केली. याची कुणकुण भारत सरकारला लागल्यानं सरकारने देखील पॅरामिल्ट्री आसाम रायफलच्या तुकड्या नागा प्रदेशात हालवल्या. नागा प्रदेशाचे भौगोलिक रूप पाहता मराठ्यांचा सह्याद्री आणि त्यांचा गनिमीकावा हे युद्ध तिथे तंतोतंत बसणारे होते. या युद्धाचे कणमात्र दर्शन बाहेरच्या जगाला त्याकाळी झाले नाही.नागाहिल्स परिसरात पत्रकारांना पुरता मज्जाव करण्यात आला.

भारतातलं आजच्या तारखेचं एक संघराज्य भारताविरूद्धचं शड्डू थोपटून बंड करण्यासाठी उभे ठाकले होते., नागा हिल्सवर असणारी जी खेडी, जे लोक भारतात येऊ पाहत त्यांच्यावर बंडखोर हल्ला करत होते. भारतीय संघराज्यात विलानीकरणाच्या पक्षात उठणाऱ्या आरोळ्या आडजंगलात कायमच्या गपगार केल्या जात. १९५६ साली गव्हर्नमेंट ऑफ नागालँडची घोषणा करण्यात आली, मुळात साहित्यिकाचा पिंड असणाऱ्या फिझोने तर स्वतंत्र नागा राष्ट्राचे राष्ट्रगीत देखील लिहून ठेवले होतेचं, शिवाय राष्ट्रध्वज देखील तयार करण्यात आला. या हालचाली पाहता नागाहिल्सवर भारतीय लष्काराची संख्या वाढविण्यात आली.

१९५६ च्या मध्यावर नागहील्समध्ये घनघोर युद्ध झाले., महायुद्धातली शिलकी हत्यारे घेऊन सु. १,५०० गनिमी नागांनी भारताशी युद्ध पुकारले, आपले प्रतिसरकार स्थापन केले आणि धाकदपटशाही, लुटालूट, अत्याचार व हिंसा या मार्गांनी सारी नागभूमी पेटवून दिली. याची कबुली सरदार पटेलांनी लोकसभेत दिली. डिसेंबर १९५६ मध्ये भारतीय सैन्याने दिलेल्या अहवालात “सैन्याने नागा बंडखोरांचे कंबरडे मोडले आणि आता तिथे सर्व निरवानिरव करण्याचे काम सुरु झाले” असे नमूद केले होते. पण तरीही कुठलीच बाजू शमली नव्हती. नागांच्या प्रश्नाला न्यान मिळण्यासाठी फिझो नाट्यमयरित्या युनायटेड किंग्डमला उपस्थित झाले. नागांची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या, भारतीय सैन्य सरकार आपल्याला कसा त्रास देत आहे याविषयी देखील त्यांनी बरेच लिखाण केले पण विशेष अशी काही फलप्राप्ती झाली नाही. फिझोची परिसथिती वैफल्यग्रस्त झाली. यातच त्यांना पक्षाघाताच झटका येऊन गेला. आणि या बंडाची आग काहीशी थंडावली

१९५७ पासून शांततापूर्ण तडजोड करण्याचे कार्य चालू झाले. ३० जुलै १९६० रोजी नागा कन्वेन्शनने स्वतंत्र नागा राज्याची मागणी केली. ऑगस्ट १९६०च्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्रींनी आसाम प्रांतातून नागालँड राज्य निर्माण करण्याची घोषणा केली. भारतीय संघराज्यातील हे सर्वात छोटे राज्य निर्माण करण्याच्या निर्णयाने अनेक प्रक्रिया उमटल्या देखील पण अखेर शेवटी १ डिसेंबर १९६३ साली हे राज्य अस्तित्वात आले.

राज्याचे १ डिसेंबर १९६३ रोजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन्‌ यांच्या हस्ते रीतसर उद्‌घाटन केले. नंतर ४० दिवसांनीच निवडणुका होऊन विधानसभा आणि मंत्रिमंडळासह नव्या राज्याचा कारभार सुरू झाला. पहिली दोनतीन वर्षे राज्यात स्थैर्य नव्हते. हटवादी भूमिगत नागांचे उपद्रव चीन व पाकिस्तानच्या मदतीने चालू राहिले; पण बहुसंख्य नागा प्रजेला शांततामय जीवनाचे महत्त्व पटून १९६४ पासून राज्याचा गाडा बराच सुरळीत चालू लागला………….

–अभिषेक कुंभार.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4334 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..