नवीन लेखन...

कोकणातील लोक संस्कृती आणि परंपरा

चित्रकथी कलाकार मूळचे महाराष्ट्रातील नसून ते भटकत भटकत महाराष्ट्रात आले. राजाश्रय मिळविण्यासाठी चित्रकथांची निर्मिती झाली. सावंतवाडीचे संस्थानिक खेम सावंत, शिवराम राजे यांच्या अश्रयाने ते तिथे कायम स्वरूपी वस्ती करून राहिले आणि हळूहळू ती कला बहरत गेली. बहरलेली ही कला पाहून खूष होऊन राजांनी या कलाकार मंडळींना ठराविक देवळे वतन म्हणून दिली.


कोकण हा महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेला प्रदेश. ठाणे, पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंत पसरलेला कोकण प्रांत. परंपरेने चालत आलेली लोककला संस्कृती अजूनही आपला पाय रोवून उभी आहे. संस्कृती जतन करण्यासाठी या लोकांचा अतोनात प्रयत्न चाललेला असतो. सातासमुद्रापार पोहोचलेली ही कोकणातील लोक संस्कृती, परंपरा यांचा धावता आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

कांबड नाच – (कांबड्या नाच)

ठाणे, पालघरमधील आदिवासी कांबड नाच करतात. कांब म्हणजे काठी या शब्दावरून ज्या हातात  काठी तो कांबडी. असा शब्द रूढ झाला असावा. काही ठिकाणी त्याचा उच्चार ‘कावडी’ असा केला जातो.

कांबडी नाच हा पावसासाठी केला जातो. विशेष असलेल्या या नाचात गाणी, नृत्य आणि त्याबरोबर निरनिराळी सोंगे या गोष्टी असतात. कांबडी हा गावातील सर्वात वयोवृद्ध पुरुष असतो. त्यामुळे त्याच्या हातात काठी ही असतेच. अधिक वयामुळे तो अनुभवी व त्याला पुष्कळ गाणी येत असतात. म्हणून तो नाचाच्या वेळी गाण्याची सुरुवात करून देतो.

धीना गायेला रं यो
नारान देवा मी धीना गायेला रं…

या गाण्यापासून नाचाला सुरुवात होते. नाचात विविध सोंगे घेतलेले एक एक पुरुष झाडामागून किंवा झोपडी मागून येतात. ढोलकी वजा ‘धीना’ हे वाद्य नाचाच्या वेळी वाजविले जाते, तर  तालाला मदत करण्यासाठी तांब्या उपडी ठेवून तो दगडाने वाजविला जातो किंवा ‘काठा’ नावाचे वाद्य वाजवितात. नाचणारे टाळ्या वाजवित नाचतात. पावशा देवाची  (पाऊस  देव) गाणी म्हणताना कनसरी देवता (धनधान्य देणारी) तिला साद घालणारी गाणी याप्रसंगी म्हटली जातात. विनवणी करून पाऊस आला की पेरणी करायची. गावातील पेरणी आटोपली की गावातील सर्वांनी मिळून एक दिवस ठरवायचा. प्रत्येक घरातील किमान एकाने (स्त्री/पुरुष) उपाशीपोटी निघायचे. जंगलात जाऊन ‘कोली’ भाजी आणायची. घरात हिरव्या देवाची (झाडाची फांदी) पूजा करायची, दिवा लावायचा, नारळ फोडायचा, कोली भाजी शिजवून देवाला त्याचा नैवेद्य दाखवायचा. घरातील सर्वांनी देवाला नमस्कार करून कोली भाजी खायची. त्याच दिवशी जेवणानंतर सर्व स्त्री-पुरुष-मुले एकत्र जमतात आणि कांबड्या नाचाची सुरुवात करतात. साधारण पंधरा दिवस हा नाच नाचला जातो.

नमन खेळे

नमन खेळे म्हणजे देवीचे विधी नाट्य. उत्तर कोकणातील अतिशय लोकप्रिय असा लोककला प्रकार आहे. रत्नागिरीच्या गणपतीला म्हणजे गणोबाला प्रसन्न करण्यासाठी ‘खेळे’ नाचविले जातात. बहुजन समाजातील कुणबी शेतकरी लोकांत हा खेळ खेळला जात असून तो धार्मिक विधी म्हणूनही याकडे पाहिले जाते. त्यामुळे आजमितीपर्यंत हा खेळ जतन करून ठेवला आहे. नमन खेळाची परंपरा पेशवाईपासून असावी असे वाटते. कारण की, खेळांच्या काही गीतांमध्ये राघोबादादांचा उल्लेख आढळतो. 1728 साली शामजी नाईक-काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार आणला त्याचेच दोन भाग होऊन एक दक्षिण कोकणात दशावतार म्हणून प्रसिद्ध झाला, तर उत्तर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात नमन-खेळे म्हणून होऊ लागला. खेळ्यातील नृत्य, नाट्य, वादन, संगीत, वेषभूषा हे कर्नाटकातील यक्षगान या लोककला प्रकारांशी साम्य दाखविते. तर दुसरी उपपत्ती अशी सांगतात की, अंदाजे अकराव्या, बाराव्या शतकात नमन खेळे उदयाला आले आहेत असा उल्लेख सापडतो.

नमन खेळाचा प्रारंभ फाल्गुन महिन्यात होळी सणांच्या वेळी कोकणात ठिकठिकाणी सुरू होतो तो वैशाखापर्यंत चालू राहतो. ग्रामदेवतेच्या पालखीबरोबर निघणाऱ्या खेळ्यांना देवीचे खेळे म्हणतात. हे खेळे पालखीबरोबर गावातील घरच्या अंगणात जातात. देवीच्या पालखीची पूजा गावचा मानकरी करतो आणि त्या ठिकाणी खेळे खेळले जातात. ‘गावाला सुखशांती लाभू दे. संकट टळू दे’ ही प्रमुख भूमिका नमन खेळाची आहे. गावातील लग्नकार्य, पूजा, नामकरण विधी अशाप्रसंगीही गावकऱ्यांच्या निमंत्रणावरून हे खेळे घरी जातात व अंगणात खेळे खेळतात. नमन खेळे दोन भागात सादर होतात. पहिला भाग पूर्व रंग आणि दुसरा भाग उत्तर रंग.

नमनाची सुरुवात प्रथम मृदुंग वाजविणाऱ्यांकडून होते. प्रत्येक  नमन खेळात किमान दोन मृदुंग वाजवणारे असतात. मध्यभागी सूत्रधार असतो तो नमनाला सुरुवात करतो. मागच्या बाजूला एका ओळीत अन्य कलाकार उभी भिंतीची ओळ दोन्ही टोकांनी जरा पुढे उभे असलेले मृदुंग वाजवणारे नमन सुरू झाले की मागची मानवी भिंत ढोपरापासून वाकून एकदा डाव्या बाजूला आणि एकदा उजव्या बाजूला वाजवित गीत म्हणतात –

देव पयलं नमन… देव गणेश देवाला…
देव दुसरं नमन… देव…

एकूण 12 नमनानंतर शंकासुर प्रवेश करतो. यात शंकासुर केवळ नृत्यप्रधान पात्र म्हणूनच रंगमंचावर येतो. नमनात मुख्यतः अलौकिक अशी दैवी सोंगे येत असतात आणि जात असतात. गणपतीचे सोंग गेल्यानंतर नटवा हे सोंग येतं. नटवा म्हणजे मानवी मुखवटा चढवलेले सोंग.

गणपती आला न् नाचून गेला… नटवा रं मांगराला (मागे राहिला) सूत्रधार आणि नटवा यांच्यात हास्य विनोदाच्या अंगाने सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संवाद, सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न व त्याच्या उत्तराचा शोध  या साऱ्यांचा विचार त्यांच्या संभाषणात असतो. नंतर तमाशातील गौळणीसारखी गौळणी सादर  होते. त्यात कृष्ण, पेंड्या, राधा, गौळणी या साऱ्या पात्रांची वर्णी तिथे लागते.  कृष्ण आपली ओळख गीतांतून करून देतो. अशाप्रकारे पूर्व रंग संपतो  आणि उत्तर रंगाला सुरुवात होते. उत्तर रंगात कथानक लावले जाते.

गुहागरपासून पाच किलोमीटर अंतरावर वरवेली गाव आहे.   या गावातील जगन्नाथ शिंदे व त्यांचे सहकारी 1947 पासून नमन खेळे प्रकार खेळतात. नमन खेळे हा पारंपरिक कला प्रकार जतन करण्यासाठी त्याची सतत धडपड चाललेली असते. कळंबट डोंगरांनी वेढलेल्या खेड्यात नमन खेळाचा कार्यक्रम चालतो. देवीची पालखी सजविली जाते. आपल्या देवीचे नाव घेऊन पालखी व खेळे प्रत्येकाच्या दारात जातात. तिथे खेळे खेळले जातात.

घुमटाचा फाग

कोकणातील गाबीत समाजाचा हा लोककलेचा नाट्यप्रकार आश्चर्यचकित करणारा आहे. कर्नाटकातील कारवारपासून ते कोकणातील गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई ते पार गुजरातच्या कच्छपर्यंत, समुद्र खाडीच्या काठाने मासेमारीसाठी हे गाबीत वस्ती करून  आहेत. गाबीत समाजाचे लोक मनाने भावुक असून भागवत वारकरी संप्रदायांचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पेशवाईपर्यंत ही गाबीत मंडळी आरमारात  होती. सरखेल कान्होजी आंग्रे  हे विजयदुर्ग येथे आरमारी केंद्राचे प्रमुख होते. त्यावेळी या समाजातील लोककलावंतांनी, हिंदू, मुस्लीम यांच्यात ऐक्यभाव वाढावा, समाजातील विषमता नष्ट व्हावी यासाठी आपली लोककला सादर केली.

पारंपरिक लोककला प्रकारात लिखित संहिता नसते. त्याचप्रमाणे याही लोककलेत लिखित संहित नाही. घुमटाचे वादन, नमन, गण गायन, गणपती, सरस्वती, शिव-पार्वती यांचे अवतरण, फागाचे गायन, निरनिराळ्या सोंगांचे प्रवेश, सलामी आणि शेवटी आरती असे या लोककलेचे मूळ रूप आहे. या लोककलेचा आत्मा म्हणजे फाग रचना  गायन-वादन. यांच्या गाण्याची रचना ही अठरा, बावीस आणि सव्वीस मात्रांत आढळते. देवदेवतांचे फाग, रामायण, महाभारतातील कथानकांचे फाग सरळ सोप्या भाषेत, बोली भाषेत रचलेले असतात. अलीकडच्या दोनशे पन्नास वर्षातील शिवकालापासून ते इंग्रजांच्या राजवटीपर्यंत फागच्या रचनांची नोंद बारा बलुतेदारांपैकी एक राऊळ सुतार यांनी केल्याचे दाखले मिळतात.

पयले नमन घटतेर मातेला
दुसरे नमन माझे आकाशीला…

घुमटावर थाप पडते आणि नमन सुरू होते. नमनानंतर गण गायला जातो आणि त्याची सुरुवात होते गणपती फागाने.

गणपती इंगणी घागुरी चटणी
पहिले लोचनी… अहो पहिले लोचनी…

हळूहळू घुमटाच्या थापेबरोबर खेळाला रंग चढू लागतो. गाबीत  समाज समुद्र खाडीच्या किनारी राहून आपली रोजी रोटी सांभाळत, आपली लोककला जपण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्यावर कितीही संकटे येऊ देत, मी माझी लोककला जिवंत ठेवीन आणि तिला लोकाश्रय मिळवून देईन असे कोकणातील गाबीत समाजातील लोककलावंत म्हणतो.

चित्रकथी

चित्रकथी म्हणजे चित्र दाखवून कथाकथन करणे. महाराष्ट्रात चित्रकथीच्या पिंगुळी कुडाळ, सिंधुदुर्ग आणि पैठण अशा दोन शैली प्रचलित आहेत. निरुपण व संवाद घालून सादर होणारा चित्रकथीत दोन्ही शैलीत थोडाफार फरक आहे.

चित्रकथी सादर करताना चित्रकथांचा कागद प्रेक्षकांना दाखवून त्याचा भावार्थ पदबंधात गुंफून गायला जातो. ‘मानसोल्लास’ या ग्रंथात म्हटले आहे की, चित्रकथी तालाशिवाय सादर होऊ शकते. असे जरी असले तरी झांज आणि विणा या वाद्यांच्या साहाय्याने चित्रकथी सादर  करण्याची प्रथा रूढ झाली आहे. दोनशे वर्षांपूर्वीचे रामायण, महाभारतातील दुर्मिळ चित्रे दाखवून कथेकरी चित्रकथी सादर करतात. पारंपरिक पद्धतीची गीतबद्ध कथा सांगताना कथेतील प्रसंगांची चित्रे चित्रकथीत दाखविली जात असताना चित्ररूपाने कथा समोर येते.

चित्रकथी कलाकार मूळचे महाराष्ट्रातील नसून ते भटकत भटकत महाराष्ट्रात आले. राजाश्रय मिळविण्यासाठी चित्रकथांची निर्मिती झाली. सावंतवाडीचे संस्थानिक खेम सावंत, शिवराम राजे यांच्या आश्रयाने ते तिथे कायम स्वरूपी वस्ती करून राहिले आणि हळूहळू ती कला बहरत  गेली. बहरलेली ही कला पाहून खूष होऊन राजांनी या कलाकार मंडळींना ठराविक देवळे वतन म्हणून दिली. दसरा, गणेशोत्सव, नवरात्र, लग्न समारंभ देवळातील ठराविक कार्यक्रम अशा प्रसंगी सावंतवाडी दरबारात चित्रकथीचे कार्यक्रम ठाकर जमातीचे कलाकार अशा प्रसंगी सादर करीत असत.

पिंगुळी इथली चित्रे शुद्ध मराठा शैलीतील आहेत. जगभर प्रसिद्ध असलेले मराठा चित्रशैलीतील परंपरागत पद्धतीने चित्रे काढणारी ठाकर जमात अजूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यात अस्तित्वात आहेत. चित्रकथी कलाकारांच्या घरी एकतरी संच असतोच. आपल्या पारंपरिक कलेचे जतन करण्यासाठी. कुठल्या कुटुंबाकडे हा चित्रसंच नसेल त्यांना दंड ठोठावण्यात येतो. जेणेकरून ही कला जोपासली जाईल. आपली पारंपरिक कला जोपासताना देबू जीवबा गंगावणे व लाडू बाबू पालवे यांच्याकडे 80 वर्षांपूर्वीची चित्रे उपलब्ध आहेत.

गेल्या काही वर्षापासून पिंगुळीतील गुडीगावचे वसंत गंगावणे हे परदेशात उच्च शिक्षण घेऊन आले. ठाकर समाजातल्या या विद्वानाने  आपल्या समाजाच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. आपल्या पारंपरिक चित्रकथीच्या संशोधनासाठी आणि कलाविष्कारासाठी ते परिश्रम घेत आाहेत, धडपडत आहेत.

कळसूत्री बाहुल्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावची कळसूत्री बाहुल्यांची परंपरा साडेतीनशे वर्षांची आहे. देशभरातील राजस्थानी कठपुतळी इतकाच महाराष्ट्राच्या कळसूत्री बाहुल्याचा खेळ प्रसिद्ध आहे. ठाकर समाजातील गावचे पोलीस पाटील असणारे  गणपत मसगे आणि त्यांच्या तीन-चार पिढ्यांनी ही कळसूत्री बाहुल्यांची परंपरा जोपासली आहे. मसगे यांच्याकडे जवळपास अठ्याहत्तर बाहुल्यांचे संच तयार आहेत. मात्र या बाहुल्यांच्या खेळाची निश्चित अशी संहिता नाही. आमच्या वडिलांनी या पारंपरिक खेळाचे प्रकार लिहून काढले होते असे मसगे म्हणाले. परशुराम गंगावणे हे कळसूत्री बाहुलीकार आपल्या मुलांसह कळसूत्री बाहुल्यांचे खेळ करत जगभर फिरत असतात. पिंगुळी येथे त्यांनी आपली कला जतन करण्यासाठी कलादालन उभारले आहे. कळसूत्री बाहुल्यांची परंपरा संत ज्ञानेश्वर, संत रामदास यांच्या काळापासून असल्याचे दाखले मिळतात. ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायात.

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया॥

या गीतेच्या श्लोकावर टीका लिहिताना ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,

स्व मायेचे आडवस्त्र, लेवूनि एकला खेळवी सूत्र।
बाहेरी नटी छायाचित्र, चौऱ्यांशी लक्ष॥

जो आपल्या मायेचा आडपडदा लावून एकटाच सूत्र हलवून बाहेर चौऱ्यांशी लक्ष छायारूपी चित्र नाचवितो.

संत रामदासांच्या दासबोधामध्ये छायानाट्य व कळसूत्री बाहुल्यांचा उल्लेख केल्याचे आढळते.

खांबसूत्रीची बाहुली। जेणे पुरुषें नाचविती।
तोचि बाहुली हे  बोली। घडे केवी।
छाया मंडपी क्षेत्रा। सृष्टी सारखीच  रचना
सूत्रे चाळी परी तो नाना। व्यक्ति नव्हे॥

कळसूत्री बाहुल्यांचा खेळ विविध छोट्या छोट्या गोष्टींतून सुरू होतो. पौराणिक कथेबरोबर सामाजिक कथाही कळसूत्री बाहुल्यांच्या  खेळातून साकार होतात. महाभारतातील कथा सांगताना जवळपास चाळीस ते पन्नास बाहुल्यांचा वापर केला जातो. प्रत्येक बाहुलीचं व्यक्तिमत्त्व केवळ संवादाच्या आणि त्या बाहुलीच्या हालचालीतून चपखलपणे साकार केले जाते.

कळसूत्री बाहुल्या तयार करताना सोईप्रमाणे त्यांची रचना केलेली असते. बाहुल्यांचे अवयव जसे पाहिजे तसे हलविता यावेत म्हणून त्यांच्या अंगातून तारा नेलेल्या असतात आणि या तारांच्या साहाय्याने बाहुल्यांना युक्तीप्रयुक्तीने नाचविता येते. अशा प्रत्येक बाहुलीला सूत्री म्हणतात. कळा-कळ+सूत्र (दोरी) धरणारा, अदृश्य राहून निर्जीव बाहुल्या स्वयं प्रेरणेने चलनवलन करतात. ही जी त्यांची युक्ती म्हणजे कला ही त्या कळसूत्री बाहुल्यांच्या खेळाच्या कल्पनेला अभिप्रेत आहे.

कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करताना पाच बाय दोन फुटाचा रंगमंच असतो. रंगमंचाच्या मागील भागावर गणपतीचे चित्र असलेला लाल रंगाचा पडदा असतो. सूत्रधार आपल्या दहा बोटांच्या करामतीवर तो या पात्रांचा अभिनय साकार करतो. अलिखित संहिता, पारंपरिक गीते, तबला, झांज या वाद्यांच्या साहाय्याने, संवादाच्या माध्यमातून रंगमंचावरील खेळ उत्तरोत्तर रंगत जातो. कथेतील पात्रे अनेक असतील तर दोन-तीन सूत्रधार आपली दहा बोटे वापरून कथा रंगवत नेतात.

पारंपरिक गीतांच्या आधारावर आपल्या कोकणातील ठाकरी भाषेचा उपयोग आणि तेही कळसूत्री बाहुल्यांचा खेळ सादर करणं एवढं सोपं नाही. ती कला आत्मसात करायला बाहुलीकाराला अपार कष्ट घ्यावे लागतात. बोटांच्या हालचालीवर हुकमी नृत्य करणाऱ्या कळसूत्री बाहुल्या हा खरंच कौतुकाचा विषय आहे.

लोक रंगभूमीवरील दक्षिण कोकणातील लोककला प्रकार, दशावतार, कोकणातल्या अस्सल मातीतील एक प्रमुख लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दशावताराला पाचशे वर्षांची परंपरा आहे.

परमेश्वराने मस्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कल्की असे दहा अवतार घेतले. या प्रत्येक अवतारात देवाने विविध रूपे धारण केली आणि ज्या लीला केल्या, खेळ केले त्याचे हे लीला नाट्य होय. दशावतारात परमेश्वराने विविध सोंगे घेऊन लीला नाट्य सादर केले, अशी माणसाची धारणा आहे. तो  एक खेळ असतो याची अनुभूती माणसं घेतात. म्हणूनच ‘दशावतार’ खेळे ही संज्ञा रूढ झाली आहे. दशावतारातून निरनिराळ्या आरत्याद्वारे सत्त्व, तम आणि रज या तीन गुणांमधून निर्माण झालेले आणि अलौकिक रसांनी भरलेले लोकजीवन पहायला मिळते. कोकणी माणसाच्या दशावतारावर असलेल्या अतूट श्रद्धेमुळे विष्णूने घेतलेल्या  दहा अवताराचे नाट्य दर्शन त्यांना मोहून टाकते. मूळ परंपरा न सोडणाऱ्या कोकणी माणसाप्रमाणे दशावतारानेही आपली मूळ परंपरा सोडलेली नाही. कोकणातील निरनिराळ्या ग्रामदेवता आणि सीमेवरील देवतांचा दशावतार हा ग्रामविधी आहे. या ग्रामविधीमागे गावातील अज्ञान, अंधःकार, रोगराई नष्ट होऊन गावात सुखशांती, समृद्धी नांदावी यासाठी देवतेला याकडे (गार्‍हाणे) घातले जाते. या धर्माचाराला, विधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच दशावतारी नाट्यकलेला दक्षिण कोकण व गोवा या प्रदेशातील सामाजिक, सांस्कृतिक व कला जीवनाच्या दृष्टीने आदर्श मूल्ये प्रसारित करणारे एक माध्यम तसेच मनोरंजनाचे साधन मानतात. सन 1798 या काळात कोणा शामजी काळे नावाच्या कीर्तनकार गृहस्थांनी कर्नाटकातून दशावतार खेळे कोकणात आडिवरे गावी आणले असे म्हणतात. आडिवऱ्याच्या महाकाली उत्सवात खेळे उभे करताना पहिला मानाचा नारळ या शामजी नाईक काळे यांच्या नावे ठेवला जातो. मात्र तेराव्या शतकाच्या आधीपासून अशा प्रकारचे खेळ प्रचलित आहेत असा उल्लेख ज्ञानेश्वरीत आहे. दशावताराचे पहिले सादरीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल या गावी नारायणाच्या देवळात केशव गोरे भटांनी केले असल्याचे पुरावे सापडतात. केशव गोरे भटजींकडून दशावताराचा पेटारा वालावलकरांनी स्वीकारला. आज वालावलकर दशावतारी मंडळाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. त्या वालावलकरांची तेरावी पिढी तितक्याच समर्थपणे दशावतार सादर करत आहेत. ज्येष्ठ दशावतारी कलावंत बाबी नालंग या वालावलकर दशावतारी मंडळातील कलाकाराला संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. वालावलकर दशावतारी मंडळाप्रमाणे नाईक मोचेमाडकर, मामा मोचेमाडकर, बाबी कलिंग, पार्सेकर आणि मंडळी यासारखी अनेक नामवंत दशावतारी मंडळे आपली पारंपरिक लोककला टिकवण्याचे काम, मानसन्मान, प्रतिष्ठा वा मानधन या कशाचीही अपेक्षा न करता वर्षानुवर्षे लोकरंजनाचे, प्रबोधनाचे तसेच लोकजागृतीचे काम इमाने इतबारे करीत आहेत.

–सदानंद राणे

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..