नवीन लेखन...

अंटार्क्टिकातले वणवे

अंटार्क्टिकाच्या बाबतीत ‘वणवा’ हा शब्द अनोळखी वाटतो. अंटार्क्टिकाचा अतिथंड, वृक्षविरहित प्रदेश पाहता, ते खरंही आहे. प्रत्यक्षात मात्र, एके काळी अंटार्क्टिकावरही वणवे लागत होते. मात्र हे ‘एके काळी’ म्हणजे खूपच पुरातन काळी… सुमारे सात ते आठ कोटी वर्षांपूर्वी! ज्या काळी, अंटार्क्टिका हा खंड विविध प्रकारच्या सुचिपर्णी वृक्षांनी, नेच्यांनी व्यापला होता, त्या काळी… ज्या काळी, अंटार्क्टिकावरही डायनोसॉर वावरत होते, त्या काळी… या काळात पृथ्वीवरची परिस्थिती वेगळी होती. हा काळ पृथ्वीच्या इतिहासातला एक उष्ण कालखंड होता. अंटार्क्टिकावरचं तापमान त्याकाळी आजच्या इतकं थंड नव्हतं. अंटार्क्टिकावर या काळात जंगलं अस्तित्वात होती.

अंटार्क्टिका खंड हा आज इतर खंडांपासून वेगळा झालेला भूप्रदेश आहे, दक्षिण ध्रुवाला सामावून घेणारा हा भूखंड पुरातन काळी, गोंडवन नावाच्या एका महाखंडाचा भाग होता. या गोंडवनात अंटार्क्टिकाव्यतिरिक्त आजच्या, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिआ, इत्यादी भूप्रदेशांचा समावेश होता. सुमारे अठरा कोटी वर्षांपूर्वी, हे सर्व भूप्रदेश एकमेकांपासून वेगळे होऊ लागले. सुमारे दहा कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिका हा भूप्रदेश इतर भूप्रदेशांपासून वेगळा व्हायला सुरुवात झाली आणि साडेतीन कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिकाला दक्षिण ध्रुवाभोवतालचं स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं. अंटार्क्टिका जेव्हा इतर भूप्रदेशांपासून वेगळा व्हायला लागला, तेव्हा पृथ्वीवरचं तापमान हे उष्ण होतं. परिणामी, आज अतिथंड असलेल्या या भूखंडावरचं तापमानसुद्धा तेव्हा, सरासरी दहा ते बारा अंश सेल्सियस, इतकं सौम्य होतं. त्यामुळे तेव्हापर्यंत गोंडवनाला जोडलेल्या या भूभागावर, गोंडवनावरील इतर भूभागांप्रमाणेच वैविध्यपूर्ण वनस्पतिजीवन आणि प्राणिजीवन बहरलं होतं.

या उष्ण हवामानाच्या काळात, पृथ्वीवरचं वातावरणही सक्रिय होतं. वातावरणात, ज्वलनाला सहजपणे मदत करण्याइतका मुबलक प्राणवायू उपलब्ध होता. पृथ्वीवर सर्वत्र विजांचंं प्रमाण मोठं होतं. त्याबरोबरच अंतराळातून अशनींचा मोठा माराही होत होता. या सर्व कारणांमुळे जगभर अनेक ठिकाणी वणवे लागत होते. या परिस्थितीला अंटार्क्टिकाही अपवाद असण्याचं कारण नव्हतं. त्यातच, अंटार्क्टिका खंड हा गोंडवनापासून वेगळा होत असल्यानं, हा सगळा प्रदेश भूशास्त्रीयदृष्ट्याही अत्यंत सक्रिय होता. इथे ज्वालामुखींचे मोठ्या प्रमाणात उद्रेक घडून येत होते. त्यामुळे अंटार्क्टिकावरची परिस्थिती वणवे पेटवण्यास अत्यंत अनुकूल होती. असं असली तरी, जगभरच्या विविध ठिकाणी वणव्याचे पुरावे मिळूनसुद्धा, अंटार्क्टिकावर सापडलेले वणव्यांचे पुरावे मर्यादित स्वरूपाचेच होते. जे काही पुरावे सापडले होते, त्यांचंही तपशीलवार विश्लेषण झालं नव्हतं. त्यामुळे अंटार्क्टिकावरील वणव्यांची फारशी माहिती आतापर्यंत उपलब्ध नव्हती. आता मात्र ही माहिती उपलब्ध होऊ लागली आहे आणि पुरातन काळच्या अंटार्क्टिकाचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.

अंटार्क्टिकावर, दक्षिण अमेरिकेला अगदी जवळ आलेला एक भूभाग आहे. हा भूभाग अंटार्क्टिका द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. या द्वीपकल्पाजवळ नेल्सन नावाचं एक बेट आहे. या बेटावर रीप पॉईंट या नावे ओळखली जाणारी एक जागा आहे. काही वर्षांपूर्वी, ब्राझिल या देशाने काढलेल्या अंटार्क्टिकावरील मोहिमेतील संशोधकांना या ठिकाणी, ज्वालामुखीच्या राखेपासून सात-आठ कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या खडकांत, काळ्या रंगाचे आणि काहीसे अर्धवट जळलेल्या लाकडासारखे दिसणारे लांब तुकडे आढळले होते. हे तुकडे जवळपास या खडकाचाच भाग झाले होते. सुमारे पस्तीस सेंटिमीटरपर्यंत लांबी असणाऱ्या या तुकड्यांची जाडी सुमारे अडीच सेंटिमीटरपर्यंत होती. या संशोधकांनी, पुरातन खडकांचा भाग झालेल्या या लाकडांचे काही मिलिमीटर लांबीचे नमुने गोळा केले व ते प्रयोगशाळेत आणले. जेव्हा या तुकड्यांचं इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, या वस्तू खूप मोठ्या करून दाखवणाऱ्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून निरीक्षण केलं, तेव्हा त्यात त्यांना वनस्पतींच्या पेशींचं अस्तित्व दिसून आलं. यावरून हे तुकडे म्हणजे लाकडाच्या ज्वलनातून निर्माण झालेला कोळसा असल्याचं नक्की झालं. हे संशोधन २०१४ साली प्रसिद्ध झालं.

या संशोधनानंतर आता, अंटार्क्टिकावरील वणव्यांचा आणखी एक पुरावा सापडला आहे. हा पुरावा अंटार्क्टिका द्वीपकल्पाच्या टोकाजवळ असणाऱ्या जेम्स रॉस आयलंड या बेटावरचा आहे. ‘ब्राझिलिअन अंटार्क्टिक प्रोग्राम’ या कार्यक्रमातील, २०१५-१६ या काळातील मोहिमेतील संशोधकांना, जेम्स रॉस बेटावरील पुरातन अवशेषांचा शोध घेताना तिथल्या खडकांत, कोळशाचे पातळ तुकडे सापडले. हे तुकडेही रीप पॉईंटजवळ पूर्वी मिळालेल्या तुकड्यांच्या काळातलेच होते. या तुकड्यांची लांबी चार सेंटिमीटरपर्यंत आणि रुंदी दोन सेंटिमीटरपर्यंत आहे. ब्राझिलमधल्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ पेर्नाम्बुको या विद्यापीठातील फ्लॅव्हिआना जोर्ग डी लिमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तुकड्यांचं अलीकडेच विश्लेषण केलं. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून तपशीलवार निरीक्षण केल्यानंतर, या तुकड्यांतही आगीपासून वाचलेल्या काही पेशी आढळल्या. या संशोधकांनी, या पेशी कोणत्या वनस्पतीच्या असाव्यात हेसुद्धा या निरीक्षणांद्वारे शोधून काढलं. या पेशींवरून, हे तुकडे एका विशिष्ट पुष्परहित सुचिपर्णी वृक्षाच्या लाकडाचे असल्याचं दिसून येत होतं. मुख्य म्हणजे हे सुचिपर्णी वृक्ष या भागात सात-आठ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचे पुरावे पूर्वीच सापडले होते. यावरून हा कोळसा इथल्याच आणि त्या काळच्याच वनस्पतींपासून निर्माण झाला होता, हे स्पष्ट झालं.

गोंडवनात विविध ठिकाणच्या जंगलांत वणवे लागल्याचे पुरावे ज्या काळातले आहेत, अंटार्क्टिकावर सापडलेले हे कोळसेही त्याच काळातले आहेत. या काळात अंटार्क्टिकाही गोंडवनातील इतर भूप्रदेशांपासून पूर्ण वेगळा झालेला नव्हता. यावरून हे कोळसेसुद्धा अंटार्क्टिकावर लागलेल्या वणव्यांद्वारेच निर्माण झाले असल्याची, संशोधकांना खात्री पटली आहे. हे कोळसे ज्वालामुखीच्या राखेपासून तयार झालेल्या खडकांत आढळल्यामुळे, हे वणवे लागण्यात ज्वालामुखींच्या उद्रेकाचा मोठा सहभाग असावा. संशोधक आता अंटार्क्टिकावर इतर ठिकाणीही वणव्यांचे पुरावे शोधतील. या पुराव्यांमुळे अंटार्क्टिकावर लागणाऱ्या वणव्यांची व्याप्ती कळू शकेल आणि अंटार्क्टिकावरील पुरातन काळातल्या हवामानाची अधिक चांगली ओळख होईल.

चित्रवाणीः https://www.youtube.com/embed/FmM1lDFjoOE?rel=0

— डॉ. राजीव चिटणीस.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..