कृषी पराशर ग्रंथातील सण आणि उत्सव

प्रस्तावना – भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.

कृषि-पराशर हा पराशरांनी लिहिलेला शेतीविषयक ग्रंथ म्हणून मान्यता पावलेला आहे. प्राचीन भारतीय कृषीशास्त्राचा तो एक महत्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाच्या शैलीवरून तो ८ व्या शतकातील असावा असे मानले जाते.* (डॉ. वर्णेकर श्रीधर भास्कर, १९८८,संस्कृत  वाङ्ग्मय कोश (द्वितीय खंड), प्रकाशक- भारतीय भाषा परिषद , कलकत्ता . पृ.८०)

कृषि-पराशर या ग्रंथाचा लेखक पराशर  कोण असावा याविषयीही मतभिन्नता आहे,तथापि वैदिक काळातील सूक्तद्रष्टा पराशर हा या ग्रंथाचा कर्ता नाही असेही अभ्यासक मानतात.

सदर ग्रंथात सामान्यत: पावसाचे, वादळवार-याचे अंदाज, पशुधनाचे व्यवस्थापन,बीजाची निवड व जोपासना,जलाचे व्यवस्थापन, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे. मानवी जीवनात दैनंदिन व्यवहारातही परमेश्वराचे आशीर्वाद घेऊनच एखाद्या कार्याचा आरंभ करण्याची परंपरा आहे. सदर ग्रंथातही शेतीविषयक कामांची सुरुवात करताना पूजनाचे काही विधी सांगितले आहेत. तसेच मानवी समूह  हा उत्सवप्रिय असतो. समूहाने एकत्रितपणे साजरे करण्याचे शेतीसंदर्भातील काही उत्सवही या ग्रंथात सांगितले आहेत.

        सदर निबंधात कृषि-पराशर या ग्रंथात दिलेल्या शेतीशी संबंधित काही पूजाविधी आणि उत्सव यांच्याविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विविध निमित्तांनी केल्या जाणा-या पूजनाचे महत्व विशेष आहे. निसर्गातील विविध गोष्टींच्या पूजनाचा विचार  नागपंचमी, वटपौर्णिमा पूजन अशा निमिताने जपलेला दिसून येतो. कृषी पराशर ग्रंथात अशाच काही केवळ शेतीशी आणि आनुषंगिक जीवनशैलीशी संबंधित सण व उत्सवांचे विवरण केले आहे.

 

अभ्यासविषयाचे महत्व-

आधुनिक युगात तंत्राद्नानाद्वारे होणारी प्रगती सर्वदूर अनुभवाला येते आहे.दुस-या बाजूला पर्यावरणाचा होणारा –हास ही एक मोठी समस्या भेडसावत आहे. या परीस्थितीत काही निवडक शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेतीचा विचार राबवीत आहेत.या पार्श्वभूमीचा विचार करता प्राचीन संस्कृत ग्रंथामध्ये मांडलेले निसर्गपूरक विचार सर्वांसमोर मांडणे महत्वाचे ठरावे. एका वेगळ्या प्राचीन ग्रंथाची ओळखही याद्वारे समाजाला करून देता येईल.

कळीचे शब्द-  कृषी,संस्कृती, परंपरा, निसर्ग पूजन, सण,उत्सव

 

  • पूजनविधी– धान्याची समृद्धी मिळण्यासाठी वेताच्या वृक्षाचे रोपण करण्याचा विधी सांगितला आहे- कार्तिक महिन्यातील संक्रांतीच्या काळात अतिशय पवित्र भावनेने

 

शेतक-याने , स्नान करून शेताच्या ईशान्येकडील कोप-यात ; पाने असलेल्या वेताच्या रोपाचे काळजीपूर्वक रोपण करावे.त्यानंतर धूप, गंध आणि  सुगंधी फुले यांनी वेताच्या रोपाचे आणि धान्याच्या छोट्या रोपांचे पूजन करावे.तालवृक्षाच्या फळांचा गर, दहीभात आणि मिठाई व खीर यांचा नैवेद्य दाखवावा.’धान्याची लहान, मोठी, वृद्ध , रोग झालेली तसेच निरोगी अशी जी झाडे असतील ती सर्वच सुषेण,राघव आणि पृथु यांच्या आज्ञेने समानप्रकारे नलदंडाच्या योगाने फुलांनी आणि फलांनी लगडलेली होवोत.लवकरच त्यांची वाढ पूर्ण होवो आणि त्यायोगे धन आणि धान्याने शेतक-याला स्वस्थता मिळो.’ वेताच्या रोपाचे रोपण करून अशी प्रार्थना केल्याने शेतक-यांना  धान्याची समृद्धी मिळते. तूळ राशीतील घटसंक्रांतीच्या काळात जे शेतकरी अशाप्रकारे वेतवृक्षाचे रोपण करीत नाहीत त्यांच्याकडे धान्याची निर्मिती चांगल्याप्रकारे होत नाही ( असे सांगितले आहे.)१*

घटसंक्रांती ही सूर्याचे बीज पृथ्वीत येण्याचा काळ. जमीन भाजली की तिची उर्वराशक्ती वाढते. त्यामुळे सूर्याचे पृथ्वीच्या घटयोनीतील बीजारोपणाचे प्रतीक म्हणून  भोगी व संक्रांतीच्या काळात सुवासिनी सुगडात वाण देतात.या वाणामध्ये शेतातून नुकतेच हाती आलेले धान्य असते. भूमीच्या सुफलनाशी याचा संबंध आहे असे यातून दिसून येते.

 

  • नांगरणीपूर्व कर्म- शेतामध्ये नांगर चालविण्यापूर्वी करण्याचे पूजनही पराशराने सांगितले आहे.इंद्र,शुक्र, पृथुराम तसेच पराशर यांचे स्मरण करून अग्नी, द्विज आणि देवतांचे पूजन करून नांगरणीला सुरुवात करावी.काळ्या अथवा लाल (तपकिरी) असे बैल नांगरणीसाठी योग्य असतात.अशा बैलांच्या मुखाला आणि पार्श्वभागाला लोणी किंवा तूपाचे लेपन करावे.उत्तर दिशेला तोंड करून दही , दूध आणि पांढरी फुले यांचे अर्घ्य द्यावे आणि प्रार्थना करावी- “शचीपती इंद्र या अर्घ्याने संतुष्ट होवो आणि सुंदर वृष्टी करो”. जी व्यक्ति नांगरणी करणार आहे तिने भक्तीपूर्वक जमिनीवर बसून गुडघे टेकून इंद्राला प्रार्थना करावी की “हे देवा,धान्यसंपत्तीला समृद्ध कर.”त्यानंतर आकाशस्थ मेघांसहित मरुतदेवांना तुपाचा दिवा आणि नैवेद्य अर्पण करावा.

 

या संदर्भात ऋग्वेदात म्हटले आहे की ‘आमचे अश्व आणि नांगर सुखकारकपणे परिवहनाचे आणि नांगरणीचे काम करोत.बैलांच्या जुंपण्या सुखाने बांधल्या जाऊन चाबूक सुखाने उगारला जावो.’

३.पेरणी– धान्याची पेरणी करण्यापूर्वी पवित्र मनाने व्यक्तीने तन्मयतेने मनात इंद्राचे ध्यान करावे. गार पाण्यात भिजविलेल्या  धान्याच्या तीन मुठी पेराव्यात.त्यानंतर पूर्वेकडे तोंड करून कलश घेऊन पुढील मंत्र म्हणावा-“ भरपूर अन्न देणा-या , धान्य उत्पन्न करणा-या हे वसुंधरे , तुला नमस्कार असो.सर्व प्रकारचे विपुल धान्य उगवावे,मेघांनी योग्य वेळी पाउस पाडावा आणि धन आणि धान्याने शेतकरी समृद्ध व्हावा.”शेतात प्रारंभिक पेरणी झाल्यानंतर शेतक-यांनी  तूप आणि दूध यांच्या मिश्रणाने तयार केलेल्या खिरीचे भोजन करावे.असे केल्यामुळे शेती निर्विघ्नपणे सुफलित होते असे पराशराने सांगितले आहे.

 

४. कापणी- मार्गशीर्ष महिन्यात शुभदिवशी  स्नान करून त्यानंतर शेतक-याने आलेल्या पिकातील केवळ अडीच मुठी धान्य कापावे.शेताच्या ईशान्य कोप-यात गंध, फुले,धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मगच  धान्य कापावे. धान्य कापणीला आल्यावर त्यापूर्वी शेताच्या ईशान्य कोप-यात गंध, फुले,धूप आणि नैवेद्याने धान्याची पूजा करावी व मगच  धान्याची कापणी करावी.

५. झोडपणी-तयार झालेल्या पिकांची झोडपणी करून त्यातून धान्य वेगळे काढण्यासाठी मेढी तयार करावी लागते. त्यासाठी जमिनीवर एक समतल खड्डा करावा आणि तो शेणाने सारवावा आणि त्यामध्ये मेढी रोवावी.मेढी चांगली असेल तर त्यामुळे धान्याची समृद्धीही वाढते.न्यग्रोध (वड), सप्तपर्ण(सातवीण),गंभारी(),शाल्मली (सावरी)तसेच औदुंबरच्या तसेच कोणत्याही चिकाच्या झाडाच्या खोडापासून मेढी तयार करावी. यांच्या अभावी एखाद्या स्त्रीवाचक नावाच्या वृक्षाच्या झाडाच्या खोडापासून मेढी तयार करावी. त्यावर कडुनिंबाची पाने व मोहरी यांचे आच्छादन करावे आणि त्यावर पताका लावावी.धान्याचे केशरासारखे गवत  आणि तांबडा ऊस यांनी सुशोभित मेढीचे गंध आणि फुलांनी पूजन केल्यास ती विपुल धान्य देणारी होते.

लोकपरंपरेनुसार  शेतकरी शेताचा एक तुकडा कापणी न करता तसाच ठेवतात. त्याला सीता किंवा शीतला देवी असे नाव आहे.शेतक-यांची अशी श्रद्धा असते की धान्याच्या शेवटच्या मुठीत धान्याचे सार असते.खळे केल्यावर खाली उरलेल्या धान्यास ‘मातर’ अशी संज्ञा आहे.**

 

६.साठवण – धान्य हातात आल्यावर त्याची साठवणूक करताना काय करावे याविषयी पराशर म्हणतात की- “ हे देवी  कामरूपिणी, सर्व इच्छा पूर्ण करणारी ,सर्वांचे हित करणारी अशी तू मला धन प्रदान कर.” अशा आशयाचा मंत्र शेतक-याने स्वत: कागदावर लिहून तो धान्यागारात ठेवावा व त्यानंतर लक्ष्मीची पूजा करावी.

 

सामाजिक उत्सव-

या विधि-विधानांची माहिती दिल्यानंतर पराशराने  काही सामूहिक उत्सवांची माहिती दिली आहे. शेतीच्या संदर्भात शेतक-याच्या  व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनात पशुधनाचे महत्व अविवाद्य आहे.त्यामुळे गाय, बैल यांच्या पूजनाचा उत्सव साजरा करण्यास सांगितले आहे.

गोपूजन-कार्तिक महिन्यातील लगुड प्रतिपदेला हा उत्सव करावा. गायीच्या अंगाला तेल वा हळद लावून चोळावे.त्यांच्या शिंगाना श्यामलता नावाची वनस्पती बांधावी. पशुपालकांनी आपल्या पशुधनाच्या संरक्षणासाठी हा उत्सव करणे उपयुक्त आहे.त्यासाठी पशुपालकाने स्नान करून, स्वत:च्या अंगाला कुंकू व चंदन यांचा लेप लावावा व आभूषणे परिधान करावी. वस्त्र, दागिने यांनी आपल्या मुख्य बैलाला सुशोभित करावे. स्वत: हातात लगुड म्हणजे काठी घेऊन बैलाची गावामध्ये वाजत-गाजत  मिरवणूक काढावी. त्याच दिवशी गाई व बैलांच्या अंगावर तापलेल्या लोखंडाचे डाग द्यावेत आणि कान व शेपटी येथे छेदन करावे.या नियमांचे पालन जो करील त्याचे पशुधन पुढील वर्षभर निरोगी व स्वास्थ्यपूर्ण राहील. दररोज संध्याकाळी ज्या गोठ्यात दिवा लागणार नाही तेथील जनावरे दु:खी राहतात असेही पराशर सांगतो.१०

आपल्या परंपरेत वसुबारसेला असे पूजन करण्याची प्रथा आजही दिसून येते तसेच पोळा उत्सवाच्या रूपाने ही परंपरा आजही चालू आहे.

पौष महिन्यात करण्याच्या पुष्ययात्रा उत्सवासंबंधी पराशर सांगतो- धान्याची कापणी करण्यापूर्वी शेतात धान्य उभे असताना पौष महिन्यात शेताच्या परिसरात पुष्ययात्रा उत्सव करावा.केळीच्या पानावर मांस, मासे, आदि सामिष आहार तसेच मिरची,हिंग इ. चा वापर करून केलेले शाकाहारी पदार्थ, दही, दूध,तूप,खीर, पेय विविध फळे ,कंदमुळे , खीर, पुरी तसेच मिठाई इ. पदार्थ वाढावेत. सर्वात आधी वयस्कर व्यक्तींना जेवायला वाढावे.जेवणानंतर  आचमन करून चंदन,केशर,कस्तुरी आणि अन्य सुगंधानी युक्त तेल एकमेकांच्या अंगाला लावावे.नवी वस्त्रे परिधान करून, कापूर इ. नी सुगंधित विडे एकमेकांना द्यावेत.फुलांचे अलंकार घालून इंद्राला नमस्कार करून गीत, वाद्य आणि नृत्याचा आनंद घेत उत्सव साजरा करावा.त्यानंतर आनंदाने सर्वांनी नमस्कार करून सूर्याकडे तोंड करून पुढील चार श्लोक म्हणावेत. त्यांचा आशय – “शेतातील पीक अद्याप काढलेले नसताना पुष्ययात्रेच्या  प्रसंगी आम्ही जिचे पूजन केले आहे ती देवी लक्ष्मी आमच्यावर कृपा करो.कर्म,मन,आणि वाणीने जे आमचा विरोध करतील त्यांचा विरोध पुष्ययात्रेच्या प्रभावाने मावळून जावो. पुढील एक वर्षापर्यंत रात्रंदिवस आमचे धान्य, यश, स्त्री, पुत्र, राजसन्मान, पशुधन, आणि मंत्रशासन व धनाची वृद्धी होत राहो.यानंतर आनंदाने सर्वांनी घरी परतावे तथापि त्या दिवशी रात्री भोजन करू नये.पराशराने प्राचीन काळी सर्वांच्या कल्याणासाठी हा उत्सव सांगितला आहे.त्यामुळे सर्व विघ्नांच्या शांतीसाठी आणि धान्याच्या वाढीसाठी  सांगितलेले नियम पाळून प्रयत्नपूर्वक पुष्ययात्रा उत्सव करावा.जे लोक हा उत्सव करणार नाहीत त्यांना धान्याची आणि धनाची समृद्धी प्राप्त होणार नाहे असेही पराशराने सांगितले आहे.११

निष्कर्ष-

जमिनीची पूजा किंवा पशुधनाची पूजा हा वस्तुत: निसर्गाच्या सर्जनशक्तीविषयीचा  आदरभाव व्यक्त करणे आहे.अन्नप्राप्ती ही प्रत्येकाची मूलभूत गरज असल्याने त्यातून या सर्जनाच्या शक्तीविषयी आदर व्यक्त होत असावा. भूमीची सृजनशक्ती, आकाशातून बरसणारी वर्षनशक्ती, सूर्यापासून मिळणारी ऊर्जा व प्रकाशशक्ती यांच्या समन्वयातून तयार होणारी कृषीसमृद्धी याविषयी कृतज्ञता प्राचीन लोकपरंपरेतून जाणवते.

सूर्याचे तेज व पृथ्वीची सुफलनशक्ती जिला उर्वरा असे म्हणतात त्यांच्यावर आपले नियंत्रण नाही पण त्या शक्तीवरच आपले जीवनमान अवलंबून असल्याने त्यांच्याविषयी आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे ओघाने आलेच.

भारतीय परंपरेचा विचार करता कृषीशी संबंधित विविध प्रार्थना या वैदिक कालापासून आढळून येतात. ऋग्वेद ( ४.५७ ) या सूक्ताला कृषिसूक्त असेच नाव असून शेतीचा अधिपती असलेल्या क्षेत्रपती या देवाचे , शेतीसाठी आवश्यक भूमीचे ,अवजारांचे वर्णन या सूक्तात आले आहे.क्षेत्रपतीच्या कृपेने पृथ्वीचा वर्ग करणा-या पर्जन्य,शेत,मधुर जल,पशुधन यांची प्राप्ती होते.नांगराच्या फाळाने सुखाने नांगरलेल्या आमच्या शेतावर पर्जन्य सुखाने मधुर जलधारांचा वर्षाव करो. शेतकरी बैलांसह सुखाने नांगरणी करोत अशी प्रार्थना या सूक्तात केलेली दिसते.***

भारतीय सण व उत्सव हे प्रामुख्याने कृषी संस्कृतीशी व अर्थातच ऋतुचक्राशी निगडीत आहेत.महाराष्ट्रातील संदर्भांचा विचार करता श्रावण अमावास्येला कृषी जीवनात पोळा सण साजरा केला जातो, त्याचा प्राचीन संदर्भ हा कृषि-पराशरात आढळतो असे म्हणता येईल.फक्त त्याचा सणाचा दिवस वेगळा आहे. पोळ्याच्या दिवशी लोणी व हळद लावून बैलांची खांदे मळणी केली जाते. धान्याच्या घुग-या त्यांना खायला दिल्या जातात. ज्वारीच्या पिठाची उकडून वा तळून केलेली कडोळी/कडबोळी बैलांच्या शिंगात अडकवितात.बैलांना दागिने,झूल घालून सजवितात  व त्यांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.त्या दिवशी सालदार कष्टकरी जे असतात म्हणजे शेतीच्या कामात ज्या नोकर-चाकरांची मदत होते त्यांनाही मिष्टान्नभोजन देतात.

पराशराने या ग्रंथात सांगितलेले उत्सव आणि विधी-विधान आजही काही प्रमाणात अस्तित्वात असल्याचे अनुभवाला येते.शेतजमीन, शेताची अवजारे, शेतात ज्यांची मदत होते असे पशू आणि अन्य कामासाठी जे मदत करतात असे सालदार कष्टकरी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव यामधून दिसून येतो.

आजही मार्गशीर्ष महिन्याच्या अमावास्येला मराठवाड्यात वेळ अमावास्या असा एक शेतीशी संबंधित सण साजरा करण्याची प्रथा अस्तित्वात दिसून येते. भारताच्या विविध भागातही शेतीशी संबंधित विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात. परंपरेशी धागा अबाधित ठेवून प्राचीन विधी-विधानांचे आयोजन करणे आणि निसर्गाप्रती आदर व्यक्त करणे हे आजही विविध समाजगटांमध्ये दिसून येते. लोकसंस्कृतीचे हे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येऊ शकेल.

— आर्या आशुतोष जोशी 

संदर्भ सूची-

  1. अथ कार्तिक संक्रान्त्या क्षेत्रे च रोपयेत नलं |

केदारेशानकोणे च सयत्नं कृषक: शुचि: ||  
ततो गन्धश्च मालैश्च  धूपैश्च सुमनोहरै: |
पूजयित्वा नलं तत्र पूजयेत् धान्यवृक्षकान् ||
दधि भक्तं च नैवेद्यं पायसं च विशेषत: |
ततो दद्यात् प्रयत्नेन ताला स्थिस्स्य मेव च ||
बालका: तरुणावृद्धा ये चान्ये धान्यवृक्षका: |
ज्येष्ठा  वापि कनिष्ठा वा सगदा निर्गदाश्च  ये ||
आज्ञया हि सुषेणस्य राघवस्य पृथोरपि |
ताडिता नलदण्डेन  सर्वे स्यु: समपुष्पिताः ||
समपुष्पत्वमसाद्य शीघ्रं फ़लन्तु निर्भरम् |
सुस्था भवन्तु कृषका धनधान्यसमन्विता: ||
प्रोपयित्वा नलं क्षेत्रे मन्त्रेणानेन च क्रमान् |
धान्यवृद्धी परां प्राप्य नन्दन्ति कृषका जना: ||
नल तु घटसंक्रान्त्या   क्षेत्रे न् रोपयन्ति ये |
अस्मा बन्ध्य पुष्पाश्च तेषां स्यु: धान्यजातय: ||
(कृषि पराशर -१९८ ते २०५ )
२.लोहिया शैला , २०२२,भूमी आणि स्त्री,गोदावरी प्रकाशन

 

       ३.स्मर्तव्यो वासव: शुक्र: पृथुराम: पराशर: |
संपूज्याग्निं  द्विजं देवं कुर्यात् हल प्रसारणम् ||
कृष्णौ वृषौ हल श्लाघ्यौ रक्तौ वा कृष्णलोहितौ |
मुखपार्श्वौ    तयोः लेप्यौ नवनीतै घृतेन वा ||
उत्तराभिमुखो भूत्वा क्षीरेनार्घ्यं निवेदयेत् |
शुक्लपुष्प समायुक्तं दधिक्षीर समन्वितम् |
सुवृष्टी कुरु ! देवेश  गृहाणार्घ्यं शचीपते ||
निविष्टो विष्टरे भक्त: संस्थाप्य जानुनी क्षितौ |
प्रणमेद् वासवं देवं मन्त्रेणानेन कर्षक: ||
निर्विघ्नं सस्य संपत्तिं कुरुदेव नमोस्तुते ||  
ततो द्द्याश्च नैवेद्यं घृतपूर्णं  प्रदीपकम् |
सस्य संपत्तये अवश्यं स्घ्नाय मरुत्वते ||
(कृषि पराशर -३३  ते ३९ )

 

  1. शुनं वाहा: शुनं नर: शुनं कृषतु लाङ्गलम् |

        शुनं वरत्रा बन्ध्यन्तां  शुनमष्टामुदिङ्गय || ऋग्वेद ४.५७.४

 

  1. हिमवारि निषिक्त्सस्य बीजस्य तन्मना: शुचि: |

इन्द्रं चित्ते  समाधाय स्वयं मुष्टित्रयं  वपेत् ||

कृत्वा धान्यस्य पुण्याहं कृषको दृष्टमानस:|

प्रान्ग्मुख: कलश धृत्वा पठेन्मन्त्र मनुत्तमम् ||

वसुन्धरे महाभागे बहुशस्य फ़लप्रदे |

देवराज्ञि  नमोस्तुते शुभगे सस्यकारिणी ||

रोहन्तु सर्वसस्यानि  काले देव: प्रवर्षतु |

सुस्था भवन्तु कृषका धनधान्य  समृद्धिभि: ||

कृत्वा तु वपनं क्षेत्रे कृषकान् घृतपायसै: |

भोजयित्वा सुभोज्येन निर्विघ्ना जायते कृषिः ||  (कृषि पराशर १७७ – १८१ )

 

  1. ततो मार्गे तु संप्राप्ते केदारे शुभवासरे |

धान्यस्य  लवणं कुर्यात् सादध् मुष्टीद्वयं शुचि: ||

गन्धै: पुष्पैश्च नैवेद्य धूपैश्च धान्यवृक्षकान् ||

पूजयित्वा यथान्यायमीशाने लवनं चरेत् || कृषि पराशर २०६-२०७

 

७.कृत्वा तु खननं मार्गे समं गोमय लेपितम् |

आरोपणीयो यत्नेन  तत्र मेधि: शुभे अहनि ||

स्त्री नाम्ना कर्षकै: कार्यो मेधि वृश्चिक भास्करे |

मेधेर्गुणेन कृषक: सस्यवृद्धिमवाप्नुयात् ||

न्यग्रोध: सप्तपर्णाश्च  गम्भारी शाल्मली तथा |

औदुम्बरी विशेषेण अन्या वा क्षीरवाहिनी ||

वटादीनामभावे तु कार्या स्त्री नाम अधारिका |

वैजयन्ती समायुक्तौ निम्बसर्प परक्षित: ||

धान्य केशर संयुक्त तृणकर्कटकान्वित:

अर्चितो गन्धपुष्पाभ्यां  मेधि: सस्य सुखप्रद: || कृषि पराशर २१४ ते २१८

 

८. लोहिया शैला , २०२२,भूमी आणि स्त्री,गोदावरी प्रकाशन

 

९.ॐ धनदाय सर्वलोकहिताय देवि  मे धनं स्वाहा |

ॐ नवधुर्येसहे देहि मे धनं स्वाहा ||

लिखित्वा तु स्वयं मन्त्रं धान्यागारेषु निक्षिपेत् |

समृद्धिं च परां कुर्यात् ततो लक्ष्मी प्रपूजयेत् || ४३||

 

१०. गोपूजां कार्तिके कुर्यात् लगुड प्रतिपत्तिथौ |

बद्ध्वा श्यामलता शृङ्गे लिप्त्वा तैलहरिद्रया  ||

कुंकुमैश्च  चन्दनै अपि कृत्वा चाङ्गे विलेपनं |

उद्यम्य लगुडं हस्ते गोपाला: कृतभूषणा : ||

ततो वाद्यैश्च गीतैश्च मण्ड्यित्वाम्बरादिभि: |

भ्रामयेयु: वृषं मुख्यं ग्रामे गोविघ्नशान्तये ||

गवां अङ्गे ततो दद्यात् कार्तिकप्रथमे दिने |

तैलं हरिद्रया युक्तं मिलित्वा कृषकै: सह ||

तप्तलोहं  दिने तस्मिन् गवां अङ्गेषु  दापयेत् |

छेदनं च प्रकुर्वीत लाङ्गुलक च कर्णयो: ||

सर्वा: गोजातय: सुस्था भवन्त्येते  न् तद्गृहे |

नानाव्यधि विनिर्मुक्ता वर्षमेकं  न् संशय: || ९९-१०४

 

११.अखण्डीते ततो धान्ये पौषे मासि शुभे दिने |

पुष्ययात्रां जना: कुर्यु: अन्योन्यं क्षेत्रसंन्निधौ ||

परमान्नं च तत्रैव व्यञ्जनै: मत्स्य मासकै: |

निरामिशै: तथा दिव्यै: सहिङ्गु मरीचान्वितै: ||

दधिभिश्च तथा दुग्धै: राज्यपायसपानकै: |

नाना फ़लैश्च मूलैश्च मिष्टपिष्टक विस्तरै: ||

एभि: सुढोकितं कृत्वा तदन्नं कदलीदले |

भोजयेयु: जना: सर्वे यथावृद्ध पुर: सरा: ||

आचम्य च तत: तत्र चन्दनैश्च  चतु:समै: |

अन्योन्यं लेपनं कुर्युः तेलै:  पक्वै: सुगन्धिभि: ||

कर्पूरवासितं दिव्यं ताम्बूलं गन्धपूरितम् |

भक्षयेयु: ततो अन्योन्यं परिधाय नवांबरम् ||

पुष्पै: आभरणं कृत्वा नमस्कृत्य शचीपतिम् |

गीतै: नृत्यै : च वाद्यै : च  कुर्यु: तत्र महोत्सवम् ||

ततश्च हर्षिता: सर्वे मन्त्रं श्लोकचतुष्टयम् |

हस्त संपुटकं कृत्वा पठेयु: वीक्ष्य भास्करम् ||

क्षेत्रे च अखण्डीते धान्ये पुष्ययात्रा प्रभावत: |

अस्माभि: मानिता सर्वै: सास्मान् पातु शुभप्रदा ||

कर्मणा मनसा वाचा ये चास्माकं विरोधिन: |

सर्वे ते प्रशमं यान्तु पुष्ययात्रा प्रभावत: ||

हिताय सर्वलोकानां पुष्ययात्रा मनोहरा|

पुरा पराशरेणेयं कृता सर्वार्थसाधिनी ||

पुष्ययात्रां न् कुर्वन्ति  ये जना धन गर्विता: |

न् विघ्नोपशमस्तेषां  कुत: तद् वत्सरे सुखम् ||२२१ ते २३६

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…