नवीन लेखन...

महाभारतातील स्त्री व्यक्तीरेखा

महाभारत सर्व भारतीयांच्या मनात आदर व विशेषतः हिंदू धर्मीयांच्या भाव भावनांचे प्रतीक. महाभारत किंवा त्यातील विविध पात्रे माहीत नाहीत अशी व्यक्ती सापडणे हे अत्यंत दुर्मिळ. मानवी जिवनातील भावभावनांचे प्रतिबींब आपणास यात पहायला मिळते. माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरणारे काम, क्रोध, लोभ,मोह,मद, मत्सर हे षड्रिपू जर कुठे एकत्रीत पहायचे असतील तर तुम्ही फक्त महाभारत अभ्यासा तुम्हाला ते पावलोपावली दिसून येतील. हा झाला यातील एक नकारात्मक भाग तर जिवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान हे सुध्दा आपणास महाभारत शिकवते. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर त्यांच्या प्रिय अर्जुनास जी भगवत गीता सांगितली ती एक अलौकिक असा ज्ञानकोश आहे. जी पुढे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्र्वरी रुपात सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितली.

अशा या व्यासमुनी यांच्या खंडकाव्याचे अध्ययन करताना मनात काही प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे मिळत नाहीत. महाभारतातील स्त्री पात्रांचा अभ्यास करत असताना बहूतांशी त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटते व महाभारतात शेवटी जे महायुद्ध होऊन अनेक राजे, राजपुत्र,शुरवीर सेनापती व लक्षावधी सैन्य यांचा वध झाला त्या सर्वांस शेवटी स्त्रीलाच जबाबदार धरले गेले. यातून पौराणिक काळापासून असलेली पुरुष सत्ताक पध्दती व एकंदरच समाजात स्त्रीचे नगण्य स्थान व तीला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. महाभारता मधील स्त्री पात्रांचा विचार करता प्रामुख्याने खालील स्त्री पात्रांचा विचार करणे आवश्यक वाटते.

सत्यवती, अंबा, अबीका, अंबालीका, कुंती माद्री, गांधारी, द्रौपदी व ऊत्तरा.

सत्यवती

महाभारताचा विचार करता त्याची सुरुवात कोठून करावी असा एक प्रश्न निर्माण होतो. पण सर्वसाधारणपणे राजा शंतनु व सत्यवती यांचे पासून. सत्यवतीचे मुळ नाव मत्स्यगंधा. मत्स्यगंधा हिचे जन्माचे बाबतीत पुराणांमध्ये असे सांगितले आहे की ब्रह्मदेवाने शाप दिला व आद्रीका नामक अप्सरेला माशाचा जन्म मिळाला वसुद्वारा स्थापीत स्त्री गर्भ त्या माशाच्या पोटात होता. एका कोळ्यास तो मासा मिळाला. त्याने तो मासा कापल्यावर त्याचे पोटातून जी बालीका मिळाली तिच्या सर्वांगास माशाचा वास येत असल्याने तिला मत्स्यगंधा असे नाव मिळाले. पुढे ती वयात आल्यावर एकदा पराशर मुनी तिचेवर भाळले व त्यांचे तपसामर्थ्याने त्यांनी माशाच्या वासाची दुर्गंधी दूर केली व तिला अदभुत अशा सुगंधाचे वरदान दिले. त्यामुळे तिचे नाव योजनगंधा असे झाले. तिला सत्यवती म्हणूनही ओळखले जाते.पराशर मुनींनी तिचेशी संबंधाची ईच्छा व्यक्त केली त्यावेळी तिने ती अविवाहित असलेने असमर्थता व्यक्त केली. त्यावर त्यांनी प्रसुतीनंतर सुध्दा तु कुमारी रहाशील असे सांगितले. त्यांनी आपल्या तपोबळावर आसपास धुके निर्माण कले ज्या योगे त्यांचा प्रणय कोणी पाहणे शक्य होणार नाही अशी व्यवस्था केली. पुढे मत्स्यगंधेने एका दिव्य बालकाला जन्म दिला जे जन्मताच मोठे झाले व वेदमहर्षी व्यास म्हणून प्रसिध्द झाले. पुढे एकदा राजा शंतनु शिकारीसाठी जंगलात आले असता ते सत्यवतीवर मोहीत होऊन लग्न करणेची ईच्छा व्यक्त केली. त्यावर सत्यवतीचे पालक वडिलांनी सत्यवतीचे पोटी होणारी संतान ही हस्तीनापूरची सम्राट होणार असेल तर लग्नास संमती मिळेल असे सांगितले. पण शंतनूस गंगापुत्र देवव्रत ऊर्फ भिष्म हा पहिला पुत्र व राज्याचा ऊत्तराधिकारी होता त्यामुळे शंतनू निराष झाला. पण पित्यासाठी भिष्म यांने विवाह न करण्याची प्रतिज्ञा केली व सत्यवती व शंतनू यांचा विवाह झाला. महायोध्दा भिष्म यांनी विवाह न केल्याने राजपदावर अधिकार नसल्याने पुढे अनेक समस्या निर्माण होऊन महाभारत घडले. यामधे भिष्माने विवाह न करण्यामागे सत्यवतीची राजकीय महत्वाकांक्षा आड आली व स्वताचे मुलासच राजपद मिळावे म्हणून तिने सर्वगुण संपन्न भिष्म यांचा अधिकार हिराऊन घेतला असा तिला दोष दिला जातो. तसेच विवाह होणेपुर्वीच पराशर मुनींपासून पुत्र जन्माला घातला त्यामुळे तिचे चारित्र्यावर प्रश्र्न ऊभे केले जातात. वास्तविक पराशर मुनींना जर नकार दिला तर त्यांचे तपसामर्थ्याने शाप मिळण्याची भिती होती हे कोणीच विचारात घेत नाही. तसेच आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांची मातेस काळजी वाटणे म्हणून आपल्या मुलाला राजपदाची मागणी समर्थनीय ठरु शकते. पण याला स्त्रीमत्सर असे रुप दिले जाते. व शेवटी महाभारत युध्द होण्यासाठी अनेक व्यक्ती पैकी तिला एक महत्त्वाची व्यक्ती मानले जाते.

अंबा, अंबीका व अंबालीका

सत्यवतीला चित्रांगद व विचित्रविर्य असे दोन पुत्र झाले. चित्रांगद गंधर्वाबरोबर युध्दात मारला गेल्यावर भिष्म विचित्रवीर्य यास हस्तीनापुरच्या गादीवर बसवतो. काशीराजाच्या तिन कन्या अंबा,अंबीका, व अंबालीका यांचे स्वयंरातून भिष्म सर्वांचा पराभव करून तिन्ही कन्यांचे विचित्रविर्य बरोबर लग्न करून देण्यासाठी पळवून आणतो. पण अंबाने भिष्म यास मी तनमनधनाने राजा शाल्व यास वरले असल्याने अन्य कुणाशी विवाह करु शकत नाही असे सांगितले. त्यामुळे भिष्म तिला राज शाल्व याचेकडे पाठवून देतो व अंबीका व अंबालीका याचा विवाह विचित्रवीर्य याचेबरोबर लाऊन देतो. भिष्माने अंबेचे हरण करुन पळवून नेले असल्याने शाल्व अंबेचा स्विकार करत नाही व ती परत भिष्माकडे येऊन त्याला तिच्या बरोबर विवाह करणेची विनंती करते. पण लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली असल्याने भिष्म तिचे बरोबर लग्न करण्यास असमर्थता व्यक्त करतो. व पुढे अंबेला आपले जिवन संपवणे भाग पडते. आता यात काही दोष नसताना अंबेचे जिवन उध्वस्त होते पण यात भिष्माला दोशी धरले जात नाही. विचित्रवीर्यच्या अकाली मृत्यूमुळे वंश वृध्दी साठी सत्यवती व्यासमुनींना बोलावून नियोग द्वारे संतान प्राप्तीसाठी अंबिका व अंबालीका यांना बाध्य केले जाते. येथे त्यांच्या ईच्छा आकांक्षा यांना काहीच महत्त्व नाही. कुरुवंशाला वारस देणे एवढेच त्यांचे कार्य. त्यांचेवर अन्याय झाला असे कुणाला वाटत सुध्दा नाही.

कुंती

यादव कुळातील शुरसेन याची कन्या काशीराज याला दत्तक दिल्यावर तिचे कुंती असे नामकरण झाले. हस्तिनापूरचा राजा पंडू यांचेशी विवाह होवून ती हस्तीनापुरची राणी बनते. कुंती चे सर्व आयुष्य म्हणजे एक शोकांतिका आहे. लग्नापुर्वी दुर्वास मुनींनी दिलेल्या मंत्रशक्तीने ती कोणत्याही देवतेचे स्मरण करून पुत्ररत्न प्राप्त करु शकेल असे वरदान लाभते. कुमारी असताना ऊत्सुकतेपोटी सुर्य देवाचे स्मरण करून ती मंत्र म्हणते व कर्ण यांचा जन्म होतो पण ती कुमारी असल्याने ती मुलाला जवळ ठेऊ शकत नाही व त्यामुळे त्या बालकाला एका पेटीत ठेवून पाण्यात सोडून देते. एका सारथ्यास ती पेटी मिळते व तो त्यातील बालकाचे पालन करतो. राजा पंडुच्या हातून एका ऋषी पती-पत्नी यांना शिकारीचे वेळी बाण लागला असतो त्यामुळे त्याला मिळालेल्या शापामुळे तो आपल्या दोन्ही पत्नीशी प्रणय करु शकणार नसतो त्यामुळे तो राज्य ध‌तराष्ट्र या बंधूकडे सोपवून जंगलात निघून जातो. जंगलात गेल्यानंतर कुंती राजा पंडू यास तिला असलेल्या वरदानाची माहिती देऊन त्याद्वारे आपणास पुत्ररत्न होईल असे सांगते. व त्याप्रमाणे मंत्रशक्तीने धर्म, भीम व अर्जून यांचा जन्म होतो. कुंती आपली सवत माद्री हिला सुध्दा मंत्र शक्ती देते ज्या योगे ती नकूल व सहदेव यांना जन्म देते. पण राजा पंडूस स्त्री मोह आवरत नाही व माद्रीसोबत प्रणय करताच त्याचा मृत्यू होतो. कुंती पाची मुलांना घेऊन पुन्हा हस्तीनापूरला परत येते. येथे राजप्रासादात सुध्दा तिच्या वाट्याला हाल अपेष्टाच येतात. एक तर वैधव्य जीवन व पाच मुलांबरोबर तिला ही त्रास होतो. पुढे पांडवांचे बरोबर वनवासात जिणे तिच्या नशिबी येते. स्वताचा प्रथम पुत्र समोर येऊन सुध्दा ती त्याला समाजासमोर पुत्र म्हणून प्रेम देऊ शकत नाही. शेवटी युध्दात आपल्याच दोन वीरपुत्रात युद्ध होत असताना हतबलपणे पहाण्याशिवाय तिला काही पर्याय उपलब्ध नसल्याने एका मुलाचे हातून दुसऱ्याचा मृत्यू पहाण्यासारखी दुर्दैवी घटना तिच्या नशिबी येते. एकूणच तिचै आयुष्य हे सुखापेक्षा दुःखद घटनांनीच जास्त भरलेले होते असेच दिसून येते.

माद्री

मद्र देशाची राजकन्या व हस्तीनापूरचा राजा पंडू याची द्वितीय पत्नी, नकूल सहदेव यांची माता एवढीच तिची ओळख. संपूर्ण महाभारतात याशिवाय तिला फारसे महत्त्व दिल्याचे आढळून येत नाही. कुंती व पाडूपुत्र याचेवरील अन्याय यामधे तिने तिचे आयुष्य कसे जगले असेल याची साधी चर्चाही कोणी फारशी करत नाही. तर तिच्यावर अन्याय झालाय असे वाटण्याचा प्रश्नच नाही. एकूणच तिचे महाभारतातील स्थान काय हाच प्रश्न मनात येतो.

गांधारी

गांधारी सारख्या एका संपन्न देशाची राजकन्या आणी हस्तीनापूरचा सम्राट धृतराष्ट्र याची पत्नी. तिच्या इतकी दुर्दैवी स्त्री संपूर्ण महाभारतच काय अन्य कोणत्याही पौराणिक काव्य अथवा इतिहासात सापडतणार नाही. निव्वळ एक राजकीय सोय व राजकारणासाठी तिचा धृतराष्ट्र सारख्या अंध व्यक्ती बरोबर विवाह लावून दिला जातो. तिच्या त्यागाची महती लोकांना पटवून देणे साठी तिला संपूर्ण आयुष्य दृष्टी असून सुध्दा डोळ्यांवर पट्टी बांधून एका अंध व्यक्ती प्रमाणे कंठावे लागले. नुसते तिच्या त्यागाचे गोडवे गाऊन तिच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन होईल काय? एखाद्या दृष्टी असलेल्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य हे डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळ्या सारखं जगणं हे किती कष्टप्रद असू शकते हे ज्याच्या वाट्याला असे जगणे येईल तीच व्यक्ती जाणू शकते. इतिहासात तरी असे दुसरे उदाहरण सापडणार नाही. पोटी शंभर पुत्र व त्या सर्वांचे महायुध्दात निधन व शेवटी निपुत्रिक म्हणून मृत्यू यापेक्षा अजून दुर्दैव ते काय असू शकते. कुंतीला फक्त एक पुत्र युध्दात गमवावा लागला होता हे येथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. येथे कौरव वाईट व पांडव हे चांगले हा विषय नाही तर एका स्त्रीचे द्रृष्टीने सर्व गोष्टी विचारात घेत आहोत. म्हणूनच महाभारतातील अन्याय झालेले पण ज्यांची फारशी दखल न घेतलेल पात्र असेच तिचे वर्णन करावे लागेल.

द्रौपदी

महाभारतातील एक सर्वात महत्त्वाचे व संपूर्ण महाभारत ज्या एका पात्रा भोवती फिरत रहाते किंवा जिच्या मुळेच महाभारत घडले असे सर्रास लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सुशिक्षित, अशिक्षित व ज्याने कधीच महाभारत वाचले नसेल अशा सर्व प्रकारच्या लोकांकडून म्हणले जाते असे एक प्रमुख पात्र. आपण कल्पना करा की जर महाभारतातील द्रौपदी हे पात्रच काढून टाकले तर महाभारतात काय शिल्लक राहील. द्रौपदीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक अलौकिक घटनांप्रमाणेच तिचा जन्म सुध्दा अशीच अलौकीक घटना आहे. यज्ञातून ती ऊत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी या नावे सुध्दा आळखले जाते. पांचाल नरेश द्रुपद याची कन्या म्हणून तिला पांचाली तसेच राजा द्रुपद याची कन्या म्हणून द्रौपदी या नावाने सुध्दा संबोधले जाते. पांचाल नरेश द्रुपद याने यज्ञातून तिला जन्म दिला तोच मुळी कुरु कुळाचा नाश करणे या एकमेव उद्देशाने. गुरू द्रोण यांचे शिष्यांनी राजा द्रुपद यांचा पराभव करून पांचाल देशाचे दोन तुकडे केले याची सल त्याच्या मनात असलेने कुरुंचा विनाश या एकमेव उद्देशाने द्रौपदीची निर्मीती. म्हणजे तिचा जन्मच एका वाईट उद्देशाने झाला. आता कोणत्याही निर्मीतीचा उद्देशच मुळात वाईट असेल तर निर्माण झालेली वस्तू सुध्दा वाईट ठणारच. व त्यामुळेच पुढे द्रौपदीचे आयुष्यात अनेक दुर्दैवी घडत गेल्या हेच तर रचनाकारांना यातून सुचवीत करायचे नसेल ना ? अजून एक अतर्क्य म्हणजे द्रौपदीस बालपण नाही. ती उपजताच पुर्ण वाढ झालेली तरुण मुलीचे रुपात जन्मास आली. या अतार्कीक घटनेचा संबंध ती एकाच वेळी पाच पुरुषांची पत्नी झाली या दुसऱ्या अतार्कीक घटनेशी आपण लाऊ शकतो. अन्यथा एका वेळी पाच पुरुषांची पत्नी हे बुध्दीला न पटणारे आहे. अर्जुनाने तिला स्वयंवरात जिंकून आणल्या नंतर माता कुंतीच्या आज्ञे प्रमाणे तिला पाची पाडवांशी विवाह करावा लागतो. भले ती आज्ञा कुंतीने गैरसमजुतीने दिली असली तरी त्याच्या ज्या काही वेदना असतील त्यातरी या द्रौपदीलाच भोगाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. येथे रचनाकार एका स्त्रीवर तर अन्याय करतातच पण त्या अन्यायाचे कारण सुध्दा दुसरी स्त्रीच कशी राहील याची काळजी घेताना दिसतात. व कदाचीत यातूनच एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची वैरी असते अशी म्हण प्रचलित झाली असावी. आता एका वेळी पाच पुरुषांची पत्नी असणं हे कोणाही स्त्रीला किती अपमानास्पद असू शकते याचा येथे कोणी विचारच करत नाही. आता अजून एक घटना म्हणजे युधीष्ठीर व द्रौपदी एकांतात असताना चुकीने अर्जुनाने तेथे प्रवेश करणे व त्यांचे प्रायश्र्चीत्त म्हणून त्याला त्रिदंडी संन्यास घ्यावा लागणे. कोणीही पती-पत्नी एकांतात असताना तेथे अन्य पुरुषाचे अचानक येणे ही स्त्रीसाठी किती लज्जास्पद बाब आहे हे तीच जाणू शकते. पुन्हा अर्जुनाने संन्यास घेणे ही शिक्षा सुध्दा द्रौपदीने ठरवलेल्या नियमानुसार होते. येथेही नकळत बोट द्रौपदीकडे दाखवले आहे.आता महाभारतातील सर्वात महत्त्वाचा व ज्या मुळे पुढे महायुद्ध घडले तो वस्त्रहरणाचा प्रसंग. द्यूतगृहामधे सर्व काही हरल्यानंतर युधिष्ठिर त्याच्यावतीने द्रौपदीस तेथे पणास लावतो. यातून काय सुचीत होते युधिष्ठिराने सोने,नाणे, जडजवाहीर, स्वत:चे राज्य याचे बरोबर द्रौपदीस पण एक निर्जीव वस्तू समजले काय. आणी पुढचा प्रश्न एखाद्या पुरुषाला इतका अधिकार असतो का की तो आपल्या पत्नीला द्युतामधे पणाला लावू शकेल. युधिष्ठिर तीही खेळी हरतो व नंतर रजस्वला अवस्थेतील द्रौपदीला अपमानास्पद अवस्थेत सभेमध्ये आणले जाते. दुष्यासन तिला भर सभेमधे निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्ण कृपेने तिचे लज्जारक्षण होते. मला एका प्रश्र्नाने कायम अचंबित केले की तेथे एकापेक्षा एक धुरंधर उपस्थित असताना कोणीही साधा विरोध केला नाही. त्यावेळची समाजव्यवस्था इतक्या वाईट स्तराला गेली होती काय की भर सभेत हा प्रसंग घडत असताना कोणीही प्राण पणाला लावून विरोध केला नाही. स्त्रीला एवढीही किंमत नव्हती की तिच्या साठी कोणीतरी जीव धोक्यात घालावा. का जे घडतंय त्यात काही चुकीचे आहे असं कुणाला वाटल नाही. पुढे विनाशकारी असे महायुद्ध घडले व ज्यात मोठा नरसंहार होऊन लाखो स्त्रियांना वैधव्य आले व त्या सर्वांस कारणीभूत द्रौपदीसच धरले गेले.

मी अशा अगदी मोजक्या स्त्री व्यक्तीरेखांचा येथे विचार केलाय. संपूर्ण महाभारतात या वितीरिक्त अभिमन्यू पत्नी ऊत्तरा, कर्णपत्नी वृशाली अशा कित्येक व्यक्तीरेखा असतील ज्याचा कधी कुठे फारसा उल्लेखही कोणी केला नसेल तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा काय विचार होणार. पण कोठेतरी त्यावेळची समाज व्यवस्था व एकूणच स्त्रीयांकडे पहायचा द्रृष्टीकोन याबाबत मनात प्रश्र्नचिन्ह निर्माण करतो एवढे निश्चित.

— सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.
३१ जुलै २०१८

टीप:- हा लेख हा महाभारतकालीन समाज व्यवस्था व त्यावेळची स्त्रियांकडे पहाण्याची मानसीकता या दृष्टीकोनातून लिहीला आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..