नवीन लेखन...

फार उशीर झालाय गं मम्मी !

— मी कुठं आहे तेच कळत नाही .

शरीराची तडफड होते आहे .
शरीराला झालेल्या जखमांची आग सहन होत नाहीय .
डोळ्यावर झापड आहे , पण तरीही अंधुक असं काही दिसतंय.
गाड्यांचे , हॉर्न चे आवाज असह्य होतायत .
पब्लिकची गर्दी जाणवतेय .
आणि अँब्युलन्सचा सायरन ऐकू येतोय .

काहीतरी घडलंय .

पब मधून येताना लाँग ड्राईव्ह करावं लागणार होतं .
सॅम ला म्हटलं सुध्दा .
” इतक्या लांब कशाला जायचं .”
तो म्हणाला ,
” जायला तर हवंच . अगोदर हुक्का पार्लर . मग आपल्या फार्महाऊस वर जाऊ . तिथं तुझ्यासाठी सरप्राइज आहे .तिथून बहावा पब . आणि लाँग ड्राईव्ह करीत सुसाट येऊ परत . नाहीतरी बहात्तर लाखाच्या निंजा बाइकचा उपभोग केव्हा घ्यायचा ?”

सॅम नं सगळं ठरवून टाकलं होतं .
नाही नाही म्हणताना होकार केव्हा गेला तोंडातून , ते कळलंच नाही . कळलं नाही की हुक्का पार्लरचा मोह पडला ? की निंजा बाईकवरची सुसाट लाँग ड्राईव्ह मोहात पाडून गेली ?
काहीच कळलं नाही .

मम्मीला एक मेसेज टाकला .

” मीटिंग लांबत चाललीय , उशीर होईल यायला , तू आणि पपा जेवून घ्या .”

मला तेव्हा कळलं नव्हतं गं मम्मी , माझेच शब्द असे माझ्यावर कोसळतील …

मम्मी , फार फार उशीर झालाय गं !

सगळंच बिघडलंय .
तू किती सांगत होतीस , किती शिकवत होतीस .
मुलीनं कसं वागायला हवं …
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही…
चारित्र्य महत्त्वाचं …
अंगभर कपडे ही आपली सुरक्षा आहे …
शरीर उघडं टाकण्यात सौंदर्य नसतं …
घर , घराच्या भिंती , दार, दाराची चौकट. त्यातलं आपलेपण …
माया , प्रेम , जिव्हाळा…
नातेसंबंध जपणं, नवीन नाती सांभाळणं …
एक ना दोन .
अनेक गोष्टी सांगायचीस तू .
आणि मी आय टी त मिळणाऱ्या अठरा लाखाच्या पॅकेजच्या गुर्मीत तुला , तुझ्या विचारांना हसत होते .
पप्पानी , मला समजावणं सोडून दिलं होतं .
त्यांच्या दृष्टीनं मी हाताबाहेर गेलेलं प्रकरण होते .
त्यांचा उदास चेहरा मला कधी जाणवलाच नाही .
आणि तुझ्या शब्दातील तळमळ , काळजी माझ्या मनापर्यंत कधी पोहोचलीच नाही .

त्याला कारण होतं अठरा लाखाचं पॅकेज .
त्याला कारण होता सॅम .

चांदणी चौकातल्या हॉरीबल ट्रॅफिकमध्ये प्रचंड बेफिकिरीने निंजा घुसवत तो माझ्या बाजूला केव्हा आला ते कळलच नाही .
ना हेल्मेट . ना ट्रॅफिक जॅमचं टेन्शन .
ना ट्रॅफिक हवालदाराची भीती . चेहऱ्यावर जस्ट बेफिकिरी …
मी पहात राहिले .
तो माझ्या जुन्या गाडीकडे भयंकर नजरेनं पहात होता .
” या नंबरवर मेसेज टाक , उद्या तुला सोडायला येतो आयटी पार्क मध्ये .”
त्यानं त्याचा नंबर त्याच्याच रुमालावर लिहून माझ्या अंगावर फेकला .आणि न बघता स्पिडमध्ये निघून सुध्दा गेला .
मी रुमाल हाती घेतला आणि नकळत तो हुंगला .
कुठल्या तरी उंची सिगारचा वास येत होता .
ट्रॅफिक सरकेल तशी मी हळूहळू पुढं होत होते .
मात्र डोक्यात ‘ तो ‘ होता .

दुसऱ्या दिवशी तो आला .
–आणि मग त्याचं येणं सवयीचं केव्हा झालं ते कळलंच नाही . माझी साधी टू व्हीलर पार्किंग मध्ये ठेवून मी त्याच्या निंजावर बसायची .
जाता येता दोन्ही वेळेला .
तो सॅम होता .
सॅम .

त्यानं त्याच्या फिफ्टीन प्लस ग्रुपवर घेतलं .
तो केवळ पन्नास जणांचा ग्रुप होता .
एकाच महिन्यात त्याने बकार्डी ब्लास्ट ग्रुपवर घेतलं .
तो तर केवळ वीस जणांचा ग्रुप होता .

“कशासाठी आहे हा ग्रुप ? ”
एकदा मी विचारलं सुध्दा .
तो बेफिकिरी दाखवत हसला .
“कळेल . जास्त चौकशा न करता लाईफ एंजॉय करणाऱ्यांचा हा ग्रुप आहे . धमाल , मस्ती , खाना पीना , देन गिव्ह अँड टेक .”

त्याचं बाकी सगळं बोलणं कळलं , पण गिव्ह अँड टेक मात्र कळलं नाही .
ते कळलं , तेव्हा उशीर झाला होता .
त्याच्या फार्म हाऊसवर फिफ्टिन प्लस चे काही मेंबर त्या रात्री जमले होते . बकार्डी ब्लास्ट चे पण काही जण आले होते . धुमाकूळ चालला होता . बिअर, शॅम्पेन , हुक्का आणि काय काय चालू होतं .इतक्यात लाईट गेले . अंधार झाला .आणि काय होतंय ते कळायच्या आत कुणीतरी तरुणींच्या अंगावरचे कपडे फेडण्याचा , किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला . माझ्याही अंगाशी कुणीतरी …
अचानक लाईट आले .
आणि जमलेले सगळे पिसाटल्या सारखे तरुणींच्या अंगावर …

कुणीतरी ओरडत होतं .
“गिव्ह अँड टेक ! ”
सावरण्यासाठी , लज्जा रक्षणासाठी जवळ कपडे नव्हतेच . अंधारात कुणीतरी लपवले होते .
मला शॉक बसला .
तुटून पडणाऱ्या लांडग्यांनी मग मोबाईल वर शूट करायला सुरुवात केली …

आणि मम्मी तुझी आठवण झाली .
अंगभर कपडे ही सुरक्षा असते हे तुझं वाक्य आठवलं .
आणि फिफ्टीन प्लस चा सगळं शरीर दाखवणारा ड्रेसकोड आठवला .

लांडग्यांनी लचके तोडलेच होते पण निर्लज्जपणे ग्रुपवर क्लिप्स टाकल्या होत्या .
सॅमच्या बाईक वरून येताना घरी तोंड कसं दाखवायचं याचीच चिंता वाटत होती .

पण तेही सवयीचं झालं .
कारण क्लिप्स दाखवून ब्लॅक मेलिंग सुरू झालं होतं .

मम्मी , पप्पा , मला वाटलं होतं तुम्हाला काही कळलं नसेल .
आणि नव्हतंच कळलं .
मम्मी तू लग्नाचा सतत विषय काढत होतीस .
या सगळ्या दुष्ट चक्रातून सुटण्या साठी , मी येईल त्या स्थळाला होकार द्यायचा ठरवलं होतं .

एका रविवारी बघण्याचा कार्यक्रम होता .
पण आलेल्या तरुणाने मला बघताक्षणी नकार दिला .
तू कारण विचारलं , तेव्हा त्यानं चक्क मोबाईल मधली क्लिप दाखवली .
त्यांनी नाकारलं .
खूप बोललात तुम्ही मला .
आणि अचानक तुम्हा दोघांनी बोलणं सोडून दिलं .
तुम्हाला शॉक बसला होता . हे मला दिसत होतं .
पण भयंकर दुष्ट चक्रात अडकल्याने काही बोलू शकत नव्हते .

सगळं सवयीचं झालं होतं .
कुणाचाही केव्हाही फोन यायचा .
कोणीही कुठेही बोलवायचा .
नोकरी तर सुटलीच होती .
पण पैशासाठी ड्रग पेडलर म्हणून सुध्दा काम करायला सुरुवात केली होती .
सगळ्या आयुष्याचा विचका झाला होता .
बकार्डी लाईम , बकार्डी रम , बकार्डी पाईनापल…
आणि कुठचे कुठचे ब्रँड घशाखाली ओतण्यासाठी …
नशेसाठी कुणाकुणाला काय हवंय ते देण्यासाठी …

सगळं संपवून बसलेय गं मम्मी .

फार फार उशीर झालाय मम्मी !

— आज तर कहर झाला मम्मी .
बहावा पब मध्ये राडा झाला .
आणि एकमेकांना खुन्नस देत सगळे बाहेर पडले .
सॅमला सगळ्या गोष्टींचा जाब विचारायला सुरुवात केली .
त्याचा त्याला राग आला आणि त्यानं स्पीड वाढवायला सुरुवात केली .
एकशे वीसच्या पुढे काटा जाताना दिसत होता .
मी त्याला शिव्या घालायला सुरुवात केली . तेवढंच माझ्या हाती होतं .

आणि कुठल्यातरी क्षणी निंजा पुढच्या गाडीवर आदळली .
काय होतंय हे कळायच्या आत मी गाडीवरून उंच उडाले .
खाली पडताना भयंकर दृश्य दिसलं .
सॅम ची मान तुटून पडली होती .
आणि मी अर्धवट शुध्दीत खाली पडले होते .

पडल्यावर जाणवलं ते इतकंच की मी तुझं काहीही ऐकलं नव्हतं .
पप्पांचा विचार केला नव्हता .
पण आता हे सगळं आठवणं व्यर्थ होतं . मम्मी , पप्पा मी मरतेय . तुम्ही आठवताय मला .
पण आता फार फार उशीर झालाय मम्मी , फारच उशीर …झालाय … फार… उशीर …!
———-
— तिची तडफड शांत झाली .
गर्दीला तिची डेड बॉडी दिसत होती .
सगळे चुकचुकत होते .

—आणि फिफ्टीन प्लस चा ग्रुप , बकार्डी ब्लास्ट चा ग्रुप नव्या सावजाच्या शोधात मेट्रो सिटीत हिंडू लागला होता .
— ड्रग पेडलर साठी शोध सुरू झाला होता .
— हवाला सिस्टीम नव्याने कार्यरत झाली होती .

( पूर्णतः काल्पनिक )

— श्रीकृष्ण जोशी 

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 117 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..