नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय योग दिन

भारतीय परंपरेला विश्वमान्यता

युएन जनरल असेंब्लिने २१ जून हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे. हा भारतीयांसाठी मोठा गौरवाचा आणि अभिमानाचा विषय आहे. ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जनसमूहाला योग या विषयाकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष देण्याचे आवाहन केल्यानंतर झाली आहे.

सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांनी युएन जनरल असेंब्लित भाषण केले. त्यात त्यांनी योगमार्गाची माहिती सांगितली होती. ते म्हणाले, योग ही आमच्या प्राचीन संस्कृतीने जगाला दिलेली एक सुंदर देणगी आहे. ही फक्त एक व्यायामपद्धती नाही. तो शरीराला मनाशी जोडणारा मार्ग आहे. तो जगाशी, निसर्गाशी एकात्मता साधण्याचा मार्ग आहे. शारीरिक आणि मानसिक संपन्नता देणारा मार्ग आहे.

या भाषणानंतर लगेच ऑक्टोबर २०१४ मध्ये या विषयीचा प्रस्ताव भारताने तयार केला. त्याचबरोबर देशोदेशींच्या उच्च अधिकाऱ्यांना योगाविषयीची माहिती सांगण्यात आली. यानंतर सर्व सभासदांसाठी प्राथमिक माहिती अहवाल पाठवला गेला. आंतरराष्ट्रीय योग दिन पाळण्याच्या या प्रस्तावाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ९ डिसेंबर २०१४ रोजी या प्रस्तावावर चर्चा झाली. त्यात १९३ पैकी १७५ देशांनी या कल्पनेला पाठिंबा दर्शवला. युएन जनरल असेंब्लिच्या इतिहासात यापूर्वी कोणत्याही एका प्रस्तावाला इतका पाठिंबा मिळाला नव्हता. या प्रस्तावाला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये सुरक्षा परिषदेचे सर्व पाच स्थायी सभासद, अनेक एशियन, युरोपियन, लॅटिन अमेरिकन देश आणि साठ टक्के आफ्रिकन देश होते. या संबंधी असे निश्चित म्हणता येईल की भारताने आपला प्रस्ताव सगळ्यांच्या गळी उतरवला व सर्व देशांकडून पाठिंबा मिळवण्यात भारत यशस्वी ठरला. भारताने योगमार्गाचा जगात प्रसार होण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला.

आंतरराष्ट्रीय योग दिन पाळण्याच्या प्रस्तावाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघून भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी अशोक कुमार मुखर्जी म्हणाले की योग या विषयाला वांशिक-सांस्कृतिक भेदांच्या पलीकडे जाऊन दिलेल्या पाठिंब्याचे हे द्योतक आहे. जागतिक आरोग्य आणि परराष्ट्रीय सामंजस्य धोरणाखाली पारित केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की मनुष्यजातीच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी योग हा उत्तम मार्ग आहे. नेहमीची आवाजी बहुमत घेण्याची पद्धत बाजूला सारून सर्व सभासदांनी उत्थापन देऊन हा प्रस्ताव स्वीकारला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतिहासात एखाद्या देशाने प्रस्ताव दिल्यानंतर तो ९० दिवसांच्या आत स्वीकारला जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

२१ जून हा दक्षिणायनाची सुरूवात आणि उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असलेला दिवस जागतिक योग दिन म्हणून पाळण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने मान्य केले. तसेच त्यांनी त्यांच्या सर्व उपसंस्थांना, त्यांच्या सहयोगी असलेल्या आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संस्थांना जगभरात योगाचे महत्त्व, त्याच्यामुळे होणारे फायदे आणि हा दिवस साजरा करण्याचे आवाहन यासंबंधी साहित्य प्रसारित करण्याची सूचना केली.

त्या सूचनेत संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस जनरल बॅन की मून यांनी म्हटले आहे की योगसाधनेमुळे मानवी समुदायात एकत्वाची भावना वाढीला लागायला मदत होईल. त्याबरोबरच इतरही अनेक बदल घडतील. आणीबाणीच्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या ताणापासून योग मानव जातीला मुक्तता देईल.

युएनजीएचे अध्यक्ष सॅम कुटेसा यांनी याबाबत पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, या प्रस्तावाला जगभरातून मिळालेला प्रतिसाद हे दर्शवतो की मानव जातीला याची गरज आहे. जगभरातले लोक योगमार्ग स्वीकारायला उत्सुक आहेत. पोर्तुगालचे प्रतिनिधी आल्व्हारो मेंडोंसा म्हणाले की अनेक शतकांपासून निरनिराळ्या कार्यक्षेत्रांतले लोक योगसाधना करत आहेत. योग अव्दितीय आहे. शरीर व मनाची एकरूपता साधण्यासाठी त्यापेक्षा उत्तम दुसरा मार्ग नाही. योगामुळे विचार आणि कृती यांच्यात संतुलन साधते. त्याचबरोबर तो शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचाही राजमार्ग आहे.

विख्यात योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत केलेल्या कष्टांचे कौतुक केले. ते म्हणाले, त्यांनी योगमार्गाला जागतिक स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्याद्वारे त्यांनी आपल्या ऋषीमुनींच्या परंपरेला आदरांजली वाहिली आहे. योग ही भारताची ओळख आहे. योगमार्गाचा मान म्हणजे भारतीयत्वाचा बहुमान.

हरिद्वार येथील प्रसिद्ध योगी स्वामी चिदानंद सरस्वती म्हणाले की हा एक ऐतिहासिक दिवस आहे. यातून हे सिद्ध होते की जगातील सर्व देशांतील आणि व्यवसायांतील लोक योगाचा स्वीकार करू इच्छितात. योग म्हणजे सांधणे. योगाद्वारे शरीर आणि अंतर्मन यांचे एकत्रीकरण साधते. त्याचा परिणाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत दिसतो. योग दिनासाठी २१ जून हा दिवस निवडण्याचे कारण या नंतर येणारे दक्षिणायन हा योगाभ्यासासाठी उत्तम काळ असतो. या काळात माणसाची आत्मिक शक्ती उंचावलेली असते.

अमेरिकेतील योगा अलायन्स, बार्बरा डेबरथिन या संस्थेचे ५३,००० सभासद आहेत. तिचे प्रमुख सुहाग शुक्ला यांनी जागतिक स्तरावर योग दिन पाळण्याच्या कल्पनेचे स्वागत केले. ते म्हणाले, योग अलायन्सची स्थापना जगभरात योगशक्तीचा प्रसार करण्यासाठीच झालेली आहे. जागतिक योग दिनामुळे आम्हाला एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यातून भारताचे मानव जातीला दिलेले सर्वात मोठे योगदान समोर येणार आहे. इतकेच नव्हे तर माणसाची आतली प्रकृती, त्याचा बाह्य विश्वाशी संबंध यांच्यात संबंध स्थापित होणार आहे. तसेच अंतर्गत व बाह्य शांतीसाठी याचा उपयोग होणार आहे. 

योग दिवसाचे महत्त्व काय ?

योगाचे महत्त्व समजून घेतल्याशिवाय आंतरराष्ट्रीय योग दिनाचे मूल्य समजणार नाही. भारताच्या प्राचीन ऋषिंनी शरीर आणि मनाची रचना मजबूत आणि सक्षम करण्याची एक पद्धत विकसित केली आहे. ज्याद्वारे बाह्य जग आणि अंतर्मन यांच्यात सुसंवाद घडून येतो. तसेच शरीराचे अवयव निकामी होण्याची क्रिया संथ होते. परिणामी वार्धक्य लांबणीवर पडते. मानवाचे तीन पातळ्यांवर अस्तित्त्व असते. भौतिक देह, मानसिक देह आणि ऊर्जात्मक देह. या तिन्ही पातळ्यांवर योगाभ्यासामुळे क्रांतीकारी बदल घडतो. कुठल्याही वैज्ञानिक पद्धतीप्रमाणेच योगाचेही एक प्रत्यक्ष तंत्र आहे. योग पद्धती असे मानते की ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीशी आपल्या शरीराचा संबंध असतो. विज्ञानाने मान्य केलेले आहे की अणुच्या आतही सतत हालचाली चालत असतात. ज्या अर्थी हालचाली आहेत त्या अर्थी तिथे ऊर्जा आहे. योगशास्त्र असे मानते की ही वैश्विक ऊर्जा सर्व प्राणिमात्रांमध्ये वास करते. योग या वैश्विक ऊर्जेशी मानवी शरीरातील ऊर्जेचे नाते जोडतो.

ही ऊर्जाच पृथ्वीवरील सर्व व्यवहार घडवत असते. ही ऊर्जा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरुपात रुपांतरित होत असते. तिचे फक्त रूप बदलत असते. मनुष्य जात ही उत्क्रांतीतील सर्वात उच्च पायरी आहे. वैश्विक ऊर्जेशी एकरुपता साधणे हे फक्त मानव जातीलाच शक्य आहे.

या पातळीवर मनुष्य वैश्विक चैतन्याशी एकजीव होतो. योगशास्त्राचे असे म्हणणे आहे की ही अवस्था काही यमनियमांचा अवलंब केल्यावरच साधता येऊ शकते. त्या यमनियमांचा अवलंब करत असतानाच शरीर व मन यांचे एकत्रीकरण झाले पाहिजे. त्यासाठी भौतिक, मानसिक आणि ऊर्जात्मक या तिन्ही स्तरांवर माणसाची प्रगती व्हावी लागते.

भौतिक शरीर हे क्रिया करण्यासाठी आहे. जीवनपद्धती अशी असली पाहिजे की जी सर्व शरीराला व सांध्यांना पुरेसा व्यायाम पुरवेल. तसेच ती थकवा आणता कामा नये आणि इतर दोन प्रकारच्या अस्तित्वाला सहाय्यकारी असेल. योगशास्त्रात शरीराला जास्तीत जास्त ताण दिला जातो. योगासनांमध्ये हळूहळू क्रिया करत, श्वासवरोधन करून एकेका स्थितीत शरीर नेले जाते. त्यांमुळे शरीर लवचिक बनते. ते तरूण राहते. योग मुख्यत: पाठीच्या कण्यावर लक्ष केंद्रित करतो. पाठीचा कणा हा सर्व संवेदना वाहून नेणारा आहे. तो भौतिक शरीराचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्यातून पूर्ण मज्जासंस्था वाहते. तोच रक्तप्रवाह नियंत्रित करतो. तो मजबूत आणि लवचिक राहिल्याने शरीरभर रक्तप्रवाह सुरळीत चालतो. मज्जासंस्था व्यवस्थित काम करते.

प्राण हा शरीरातील शक्तीस्रोत आहे. प्राणायाम हे एक शास्त्र आहे. त्याने शरीरातील प्राणशक्तीचे वहन होते. नियंत्रित श्वसनाद्वारे फुफ्फुसांची ताकद वाढते. पुरक, कुंभकाने प्राणशक्तीवर नियंत्रण साध्य होते. तिला वळण लावता येते. प्राणायामाद्वारे श्वसनशक्तीचा पूर्ण उपयोग होतो. श्वसन हे रोगप्रतिकारकही आहे. बहुसंख्य लोक आपल्या श्वसनशक्तीचा नीट वापरच करत नाहीत. त्यामुळे रक्ताभिसरण, रक्तशुद्धीकरण कमी प्रमाणात होते. प्राणायाम हे असे शास्त्र आहे की ज्याद्वारे रोगप्रतिकारक शक्ती, चयापचय, उत्सर्जन संस्था जोरात काम करू लागतात. त्याचा शेवटचा परिणाम भौतिक, मानसिक व ऊर्जादेहाच्या उत्क्रांतीत होतो.

कोणत्याही व्यक्तिच्या हातून कोणतेही कार्य नीट होण्यासाठी त्याच्या अस्तित्वाच्या तीनही पातळ्या एकरूपतेने काम करत असणे आवश्यक असते. तुमची ऊर्जाशक्ती कशा प्रकारे काम करत आहे यावर तुमची कार्यक्षमता अवलंबून असते. जर तुम्ही या ऊर्जाशक्तीवरच नियंत्रण मिळवलेत तर तुमच्या कार्यक्षमतेत अफाट फरक पडतो. जेव्हा भौतिक शरीर मानसिक व ऊर्जापातळीच्या समन्वयाने काम करू लागते तेव्हा हातून होणाऱ्या कामात अचूकता, कौशल्य दृष्टीला पडते. जेव्हा अंतर्गत ऊर्जा व बाह्य ऊर्जा यांचा संयोग घडतो तेव्हा मेंदूत रासायनिक अभिक्रिया पटकन घडते. विचारशक्तीची गती वाढते. क्रिया योग ही यापुढील पायरी आहे. त्यात या एकत्रित शक्तीचा आत्मिक उन्नतीसाठी कसा वापर करावा हे शिकवले जाते.

योगाभ्यासाचे व्यावहारिक फायदे

तुम्ही एक खेळाडू असा किंवा कामगार असा योगाभ्यासामुळे तुमची एकाग्रता, सहभागिता आणि उत्पादनक्षमता प्रचंड प्रमाणात वाढते. मनुष्यप्राणी हा सुखाच्या मागे धावणारा आहे. त्यासाठी तो खूप हातपाय आपटत असतो. खूप यश मिळवावे आणि खूप सुखसुविधा मिळवाव्यात अशी त्याची धडपड सतत चालू असते. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर सर्व सुखे ( आणि दु:खेसुद्धा ) क्षणभंगूरच असतात. खरे सुख व समाधान हे मनात असते. शाश्वत सुख आणि मूलभूत शांती मिळवण्यासाठी जाणीवेचा प्रवाह मनात वळवला पाहिजे. स्वअस्तित्वावर केंद्रित केला पाहिजे. जेव्हा मन स्वत:वर केंद्रित झालेले असते तेव्हा वेळेचे भान रहात नाही. त्या अवस्थेतून बाहेर यावे असे वाटत नाही. त्या अवस्थेला समाधी असे म्हणतात. जेव्हा ही अवस्था प्राप्त होते तेव्हा मनातील सर्व विचार नष्ट होतात. जगाचे भान नष्ट होते. वैश्विक चैतन्याशी एकरूपता निर्माण होते.

या सगळ्यासाठी अर्थातच अवखळ मनाला बांध घातला पाहिजे. मन आवरणे आणि त्यातील विचार नष्ट करणे ही फार अवघड गोष्ट आहे. एक साठ वर्षाचा माणूस साठ वर्षांच्या आठवणींचे ओझे खांद्यावर घेऊन वावरत असतो. जर तो कालातीत झाला तर त्याच्या मनावरील साठ वर्षांच्या आठवणीचे ओझे संपेल व तो लहान बालकासारखा होईल. तसेच त्याच्या मनात चालणारे काल्पनिक भावनांचे खेळही थांबतील. त्यामुळे त्याची खरी क्षमता उफाळून वर येईल.

जेव्हा तो योगाची साधना करतो तेव्हा बाहेरचे जग जरी तेच राहिले तरी त्याच्या आत अनेक बदल होत जातात. त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.त्याला जगाशी बांधून ठेवणाऱ्या भावनांचा निचरा होतो. तो जगाविषयी निरिच्छ बनतो. या सगळ्यामुळे त्याचे शरीर व मन यांच्यातील साधर्म्य वाढते. साधनेसाठी ती एक पूर्वअट आहे.

योग हा शेवटी आत्म्याचा पारलौकिकाशी संयोग घडवणारा अभ्यास आहे. योगामुळे भौतिक शरीर अधिक बलशाली बनते. मानसिक स्तर अधिक सोशिक बनतो. ऊर्जात्मक स्तर अधिक संचारित बनतो. प्राणायाम, हठयोग व क्रिया योगामुळे ही अवस्था प्राप्त होते. तेव्हा द्वैत नसते. तिथे सापेक्षता नसते. साध्य वा साधना उरत नाही. ज्ञाताच ज्ञान बनतो. त्यामुळे जाणण्याची क्रिया घडतच नाही. पातळीचे सगळे स्तर एकत्र येतात. जगाशी, सृष्टीशी, वैश्विक चैतन्याशी एकरुपता साधते.

योगाचे अभ्यासक भारतापेक्षा इतर देशांतच जास्त प्रमाणात आहेत. भारतीय कपाळकरंटे आहेत. भारतीयांकडे हे ज्ञान प्राचीन काळापासून असूनही भारतीयांनी त्याचा यथायोग्य उपयोग करून घेतला नाही. त्याच्याकडे गूढ आणि आध्यात्मिक साधनेचा भाग म्हणून बधितले. अलिकडच्या काळात त्याच्याकडे रोगनिवारणाची पद्धती म्हणून बघितले गेले. काहींनी वजन कमी करण्याचे साधन, कंबरदुखी-सांधेदुखीवरचा उपाय म्हणून बघितले. योग ही फक्त काही रोग, आजार वा विकार पळवून लावण्याची पद्धती नाही.

तो शारीरिक, मानसिक आणि आत्मिक उन्नती करण्याचा मार्ग आहे. मनुष्य जातीला शाश्वत शांती आणि निर्वैरता योगाभ्यासामुळेच मिळू शकते. इतर कोणत्याही आराधना पद्धतीत ते सामर्थ्य नाही.

– प्रशांत असलेकर यांचा महानगरी वार्ताहर मधील लेख


 

युएनचा योग दिन प्रस्ताव आणि आंतरराष्ट्रीय जनमत

२१ जून हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिवस म्हणून पाळला जावा अशा अर्थाचा प्रस्ताव सप्टेंबर २०१४ मध्ये युएन असेंब्लीत मांडला गेला. त्याला जगातील १७७ देशांनी पाठिंबा दिला. त्यात ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजचे ४६ सदस्य देशही सामिल आहेत.

हे सर्व देश या ठरावाचे सह-अनुमोदक किंवा को-स्पॉन्सर होते. या ठरावाला मिळालेल्या पाठिंब्यामुळे योग या प्राचीन भारतीय परंपरेला जागतिक मान्यता मिळाली असे म्हणता येईल. परंतु या ठरावाबाबत तटस्थ राहिलेले, मतदानात भाग न घेतलेले असेही काही देश आहेतच. ते या ठरावावर तटस्थ राहिले याची तीन कारणे आहेत. एक, कट्टर धार्मिक भावनेतून केलेला विरोध, दुसरे कारण भारताबरोबरचे ताणलेले संबंध आणि तिसरे कारण त्या देशांच्या युएन प्रतिनिधींना देशाकडून काहीच सूचना न मिळणे.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीजच्या इराण, कतार आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी या ठरावाला पाठिंबा दिला कारण त्यांचे भारताबरोबर मधुर व व्यावसायिक संबंध आहेत. तर पाकिस्तान, सौदी अरेबिया, ब्रुनेई, लिबिया, मॉरिटेनिया, कॅमेरून, बुरकिन फॅसो या देशांनी या ठरावाला पाठिंबा दिला नाही. त्यातील काहींशी भारताचे संबंध ताणलेले आहेत तर काहींच्या देशातले कट्टर धार्मिक वातावरण योगाला संमती देत नाही. काहींचा पाठिंबा मिळवण्यात भारत कमी पडला.

उत्तर कोरिया आणि मलेशिया यांनी या ठरावाला विरोध केला. उ. कोरियात कम्युनिस्ट हुकूमशाही आहे तर मलेशिया हा देश जरी हिंदू परंपरेचा असला तरी इस्लाम हा राष्ट्रीय धर्म जाहीर झाल्यापासून गेली ४० वर्षे त्या देशात हिंदुची पद्धतशीर गळचेपी चालली आहे. २००८ साली मलेशियातील नॅशनल फतवा कौन्सिलने फतवा काढून योग करणे मुस्लिमांसाठी हराम ठरवले आहे. या ठरावाला अनुमोदन न देणाऱ्या इतर देशांत इस्टोनिया, नामिबिया, स्वित्झर्लंड, झांबिया, मोनॅको, सॉलोमन आयलंडस् यांचा समावेश आहे. त्यातील काही देशांना या प्रस्तावाचे गांभीर्य समजले नाही. काही अंतर्गत यादवी युद्धात होरपळत आहेत. त्यांच्या युएन प्रतिनिधींना या ठरावाबाबत कोणत्याही सूचना मिळाल्या नव्हत्या.

संकलन : शेखर आगासकर 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..