नवीन लेखन...

एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट

माझ्या दुसऱ्याच जहाजावर फोर्थ इंजिनिअर म्हणून प्रमोशन मिळाल्यावर आणखी एक जहाजावर साडेतीन महिने केल्यावर पुन्हा पुढच्याच म्हणजे माझ्या चौथ्या जहाजावर चार महिन्यांतच मला थर्ड इंजिनीयर म्हणून ऑनबोर्ड प्रमोट केले. आणखी महिनाभरात चौथ्या जहाजावर पाच महिने पूर्ण झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होऊन घरी परतलो. 2012 मध्ये मरीन इंजिनियर ऑफिसर क्लास टू (MEO class II) परीक्षा द्यायची आहे म्हणून ऑफिसमध्ये सांगितले होते. परीक्षा देण्यापूर्वी चार महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. हा कोर्स जहाजावरून आल्यानंतर दोन महिने झाले तरी बुक केला नाही. पण दोन महिने झाल्यावर मुंबईच्या रे रोड कॅम्पस मधील लाल बहादुर शास्त्री कॉलेज मध्ये चार महिन्यांचा कोर्स बुक करून क्लासेस अटेंड करून कोर्स पूर्ण केला. पण नंतर परीक्षा देण्याऐवजी आमच्या घरातील बांधकाम व्यवसायात लक्ष घातले. कोर्स आणि नंतर कन्स्ट्रक्शन साईट वर काम यांच्यामुळे अभ्यास करायला जीवावर यायचे, त्यामुळे परीक्षा देण्याचा विचार पुढे ढकलला.

प्रियाला चौथा महिना लागला होता साडे तीन महिन्यानंतर मिस करियेज होण्याची भीती आता कमी आहे असे तिनेच सांगितले. मागील प्रेगनन्सी मध्ये मिस कॅरीयेज झाले होते त्यामुळे तिच्या बोलण्यामुळे दडपण कमी झाले.

ती स्वतः डॉक्टर असली तरी पण रुटीन चेक अप साठी गायनेकोलोजिस्ट कडे दर महिन्याला जावे लागायचे. अनोमली स्कॅन ज्यामध्ये बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही तसेच बाळ जितक्या महिन्याचे असेल त्याप्रमाणे बाळाच्या अवयवांची वाढ होते की नाही हे पाहिले जाते. सोनोग्राफी करताना आपल्याला होणारे बाळ हे मुलगा आहे की मुलगी याचे निदान करता येतं. पण आपले होणारे बाळ मुलगा आहे की मुलगी याबद्दल जाणून घ्यावे असे आमच्या दोघांसह घरात कोणालाही वाटत नव्हते. मला मुलगी व्हावी असे वाटत होते तर प्रियाला मुलगा व्हावा असे वाटत होते. पहिल्या बाळाची उत्सुकता घरात सगळ्यांनाच लागली होती. कल्याणला निदान डायग्नोस्टिक सेंटर मध्ये डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याकडे सोनोग्राफी साठी जावे लागायचे. डॉक्टर प्रशांत पाटील नेहमी प्रसन्न दिसायचे त्यांच्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य पाहायला मिळायचे. सोनोग्राफी करत असताना बाळाच्या आईला आणि सोबत असलेल्या नातेवाईकाला बाळाच्या वाढीबद्दलची तपासणी आणि माहिती छानपैकी समजावून सांगतात. बाळाचा प्रयेक अवयव त्याचे अंदाजे वजन, मुव्हमेन्ट आणि हृदयाचे ठोके ऐकवणे आणि समोरील स्क्रीनवर गर्भात असणाऱ्या बाळाची आकृती आणि x-ray मध्ये दिसतात तशी अवयवांची हाडे दाखवायचे. सातव्या महिन्यात एका बाजूचे अवयव तपासून झाल्यावर त्यांना दुसऱ्या बाजूचे अवयव तपासायचे होते. बाळ गर्भात एका बाजूला गेल्याने बाळाने मुव्हमेन्ट करून दुसऱ्या बाजूचे अवयव दिसावे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील यांनी प्रयत्न केले. पण बाळ फिरायला तयार होईना म्हणून ते मिस्कील पणे म्हणाले की बाळ झोपा काढतय हलायला तयार नाहीये आणि त्याचक्षणी बाळाने एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरावे तशी गर्भात गिरकी मारली. बाळाची पूर्ण तपासणी संपत आली असताना बाळाचा एका हाताचा पंजा सोनोग्राफी स्क्रीन वर हलताना दिसला. डॉक्टर प्रशांत पाटील यांनी लगेच बघा बाळ गर्भातुन आपले बोलणे ऐकून आता आपल्याला टाटा बाय बाय सुद्धा करत आहे असे हसून सांगितले.

त्यांनी यावेळीसुद्धा एक्सपेक्टेड डिलिव्हरी डेट सांगितल्यावर मला लगेच जहाजावरील ई टी ए म्हणजे एक्सपेक्टेड टाइम ऑफ अरायव्हलची , एका पोर्ट वरून दुसऱ्या पोर्ट वर जायच्या अनुमानित वेळेची आठवण झाली. जहाजाचा वेग, समुद्रातील वाऱ्याचा वेग अंतर्गत प्रवाह, हवामान आणि इतर सगळे अडथळे गृहीत धरून ई टी ए काढला जातो. त्याच प्रमाणे सोनोग्राफी करताना बाळाची होणारी वाढ आणि आणखी इतर कितीतरी गोष्टींवरून बाळ कधी जन्माला येईल त्याची तारीख सांगितली जाते. हल्ली मुहूर्त बघून किंवा ठराविक दिवस व वेळ बघून औषधं किंवा सिझेरियन करुन बाळ जन्माला आणले जातेय. आम्हाला आमचे बाळ कधी जन्माला येईल त्यापेक्षा सुखरूप जन्माला येऊ दे याची ओढ लागली होती.

सातव्या महिन्यात ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला त्यात पेढा का बर्फी हा सोहळा सुद्धा झाला. आईबाप होणार म्हणून सगळ्यांकडून कौतुक आणि आशीर्वाद मिळाले, कोणी मुलगा व्हावा म्हणून तर कोणी मुलगी होईल म्हणून बोलले. नवव्या महिन्यात पहिले बाळंतपण असल्याने प्रिया माहेरी होती. नवी मुंबईत वाशीतील गायनेकोलॉजिस्टकडे नावं नोंदवले होते. 10 एप्रिल 2013 ला रुटीन चेक अप साठी तिला सकाळी डॉक्टर कडे नेले असता डॉक्टर ने ऍडमिट व्हायला सांगितले. संध्याकाळी नॉर्मल डिलिव्हरी होईल असे सांगून त्याने अनेस्थेटिस्टला कळवले. दुपारी आईला वाशीला बोलावून घेतले. तिचे आईवडील पण आले. संध्याकाळी तिला ऑपेरेशन थियटर मध्ये नेल्यावर बाहेर माझ्या हृदयाचे ठोके वाढायला सुरवात झाली. तिचे आईवडील माझी आई सगळ्यांचे चेहरे मानसिक दडपणाखाली काळजीत पडले.

बाळ कसे असेल? मुलगा की मुलगी? कोणासारखे दिसेल? रंग कोणता असेल ?? डिलीव्हरी व्यवस्थित होईल न ? असे अनेक प्रश्न डोक्यात फिरू लागले. एक एक क्षण जाता जात नव्हता, सगळ्यांचे ऑपेरेशन थियेटर च्या दरवाजाकडे डोळे आणि आतल्या आवाजाकडे कान लागले होते. डॉक्टर आणि नर्स च्या बोलण्याचा आवाज येत असताना काही वेळातच बाळ रडण्याचा आवाज आला. प्रियाच्या आईने देवाला हात जोडले. सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलायला सुरुवात झाली आणि बाळाच्या कर्कश रडण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून, हा केकाटी आवाज आहे हा आपल्याला मुलगी झाली असे म्हणून आईने मिठी मारली. एवढा वेळ बांधून ठेवलेला भावनांचा बांध फुटला आणि सगळ्यांच्याच डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ऑपेरेशन थियेटर चे दार अजून बंदच होते. मुलगा आहे की मुलगी अजून खात्री झाली नव्हती आईने नुसता रडण्याच्या आवजावरून अंदाज बांधला होता. काही मिनिटात दरवाजा उघडून सिस्टर बाहेर आली तिने अभिनंदन करून तुम्हाला मुलगी झाली आहे असे सांगून ती पुन्हा आत गेली. धनाची पेटी नाही , आज गुढीपाडव्याला आपल्या घरात लक्ष्मीचे रूप घेऊन परीच आली आहे असे आई बोलायला लागली. काही मिनिटात पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये गुंडाळलेल्या माझ्या इवल्याशा परीला ऑपेरेशन थियेटर बाहेर आणून आईच्या हातात दिले, तिला बाहेर आणायच्या काही मिनिट अगोदर तिचा काका पण नेमका येऊन उभा राहिला. गर्भात असताना ज्यांचे ज्यांचे आवाज ती ऐकत होती त्या सर्वांनाच डोळे किलकिले करून टकामका बघत होती अशा सर्वांनाच शोधताना ती गोंधळली होती. तिच्या अंगाभोवती गुंडाळून ठेवलेले कापड आईने सोडले त्यासरशी तिने तिचे नाजूक हात उचलले आणि पाय झटकून आळस द्यायला लागली आळोखे पिळोखे देताना तिचा गोरा रंग गुलाबी झाल्यासारखा भासू लागला . तिचे ते नाजूक आणि मनमोहक रूप पाहून सगळ्यांच्या डोळ्यातून पुन्हा एकदा आनंदाश्रु वहायला लागले.

जहाजावर असताना बऱ्याच जणांकडून ऐकायला मिळायचे की जहाजावर काम करणाऱ्या सेलर्सना होणारे पहिले अपत्य ही मुलगीच असते, याचा प्रत्यक्ष अनुभव आला. आमच्या घरात पहिली मुलगी जन्मली आणि घरात आनंदाच्या सगळ्या व्याख्याच बदलल्या. घरात हर्ष आणि उल्हास ओसंडून वाहू लागला. कन्यारत्नाच्या प्राप्तीने सगळे सुखी झाले असताना आता पुन्हा काही दिवसांनी किंवा महिन्यात माझ्या छोट्याशा परीला सोडून जहाजावर जावे लागेल या नुसत्या कल्पनेनेच अस्वस्थ व्हायला होत होते. पण हीच मुलगी जसं जशी मोठी होईल आणि तिला कळायला लागेल तस ती मला सांगेल बस झाली नोकरी आता मला सोडून जायचे नाही यापुढे . एकवेळ नवरा त्याच्या बायकोचे ऐकत नाही पण एक बाप मुलीला कधीच नाही बोलू शकत नाही. यामुळेच कदाचित सेलर्सना पहिली मुलगीच होते असे बोलले जात असावे.

हल्ली व्हाट्सअँप किंवा मेसन्जर मुळे रोज जमेल तेव्हा व्हिडिओ कॉल केल्यावर तिच्या कडून येणाऱ्या निरागस आणि भाबड्या प्रश्नांना उत्तरे देता देता गाळण उडते. पाच पाच महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट सिनियर रँक मध्ये आल्यापासून तीन महिन्यांवर आले पण तीन महिने सुद्धा तिच्याशिवाय काढताना नकोसं होऊन जातं.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर

B.E.(mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे .

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 145 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..