नवीन लेखन...

महाराष्ट्र फिल्म कंपनी निर्मिति संस्थेची स्थापना

महाराष्ट्र फिल्म कंपनी या चित्रपट निर्मिती संस्थेचे जनक बाबूराव पेंटर हे होत. तानीबाई कागलकर यांनी दिलेल्या आर्थिक सहाय्यावर दामले, फत्तेलाल तसेच शिवराम वाशिकर, नानासाहेब सरपोतदार, बाबूराव पें ढारकर, केशवराव धायबर, भालजी पेंढारकर आणि विनायकराव घोरपडे यांच्या सहकार्याने बाबूरावांनी या संस्थेची उभारणी केली. महाभारतातील कीचकवधाच्या कथानकावर काढलेला सैरंध्री हा या संस्थेचा पहिला चित्रपट असून तो ७ फेब्रुवारी १९२० रोजी पुण्याच्या आर्यन सिनेमात (चित्रपटगृह) प्रथमतः प्रदर्शित झाला. दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळकांनी हा चित्रपट पाहून व बाबूरावांना घरी बोलावून या चित्रपटाची प्रशंसा केली; तर ११ फेब्रुवारीला बाबूरावांचा लोकमान्यांच्या हस्ते आर्यन चित्रपटगृहात त्यांना ‘सुवर्णपदक’ देऊन व ‘सिनेमा केसरी’ ही पदवी बहाल करून, जाहीर सत्कार करण्यात आला. १० फेब्रुवारी १९२० च्या केसरीत सैरंध्री चित्रपटावर स्तुतिपर अभिप्रायही आला होता.

सैरंध्री चित्रपटात स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनीच केल्या असल्याने चित्रपटसृष्टीतील एक वास्तव प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा त्याकाळी या संस्थेने गाठला होता. सामाजिक बंधने व कौटुंबिक तीव्र विरोध असताही गुलाबबाई व अनसूयाबाई यांनी अनुक्रमे ‘सैरंध्री’ व ‘सुदेष्णा’ या स्त्री-भूमिका करण्याचे त्यावेळी धैर्य केले आणि ऐन वैभवात असणाऱ्या रंगभूमीवर जे दिसू शकले नाही, ते महाराष्ट्र फिल्म कंपनीने प्रत्यक्षात आणून दाखविले.

दादासाहेब फाळके यांचे चित्रपटही पौराणिकच असत; तथापि महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या पौराणिक चित्रपटांच्या नेपथ्यातील भव्यता, कलात्मकता, सौंदर्य, वास्तवता, सजावटीतील चोखंदळपणा व यथातथ्य केशवेशभूषा इत्यादींमुळे तिने भारताचे प्राचीन ऐश्वर्य पडद्यावर यथार्थपणे साकार केले होते. वत्सलाहरण (१९२१), भगवत्भक्त दामाजी (१९२२), कृष्णावतार (१९२३), मायाबाजार (१९२५), गजगौरी (१९२६); भक्त प्रल्हाद (१९२६), मुरलीवाला (१९२७), सती सावित्री (१९२७), कर्ण (१९२८), लंका (१९३०) या पौराणिक चित्रपटांतूनही तेच कलावैभव प्रकट झाले होते.

महाराष्ट्र फिल्म कंपनीचे ऐतिहासिक चित्रपटदेखील बरेच वैशिष्ट्यपूर्ण ठरले. दादा साहेब फाळक्यांपेक्षा महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या चित्रपटांत तांत्रिक सफाई कमी होती; तरीपण त्यांत कथावस्तूंची संगती व नाट्यत्मकता आणि अभिनयातील सहजता इ. गोष्टी प्रामुख्याने दिसत होत्या; शिवाय फाळक्यांच्या चित्रपट निर्मिती पेक्षा बाबूरावांच्या चित्रपट निर्मितीतील चमत्कारदृश्येही अधिक आकर्षक असत.

या चित्रपटसंस्थेच्या चित्रपटांचे दिग्दर्शन बाबूराव पेंटर करीत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलादिग्दर्शन आणि छायालेखन दामले व फत्तेलाल हे दोघे सांभाळीत. बाबूराव पेंटर, दामले आणि फत्तेलाल यांनी निर्मिलेली भित्तिपत्रकेदेखील देखणी असत. पुढे बाबूरावांना दिग्दर्शन-संकलनासाठी व्ही. शांताराम यांचा शिष्य म्हणून लाभ झाला.

केशवराव धायवर हे छायालेखन आणि विष्णुपंत दामले हे व्यवहाराची बरीचशी बाजू सांभाळीत. चित्रपटनिर्मितीबरोबरच स्वतःची चित्रपटवितरण व्यवस्था असावी, या दृष्टीने महाराष्ट्र फिल्म कंपनीने कोल्हापुरात स्वतंत्र वितरण-विभाग चालू केला होता. मुंबईतील व्यवहार दादासाहेब तोरणे व बाबूराव पै करीत. पुढे ६ नोव्हेंबर १९२२ रोजी महाराष्ट्र फिल्म कंपनीला आग लागून सर्व मालमत्ता व तयार झालेले चार चित्रपट आगीत जळून खाक झाले. फक्त कॅमेरा वाचविण्यात मात्र यश मिळाले. तरी या भयंकर संकटाने खचून न जाता सरदार नेसरीकर यांच्या आर्थिक साहाय्यावर महाराष्ट्र फिल्म कंपनीने सिंहगड (१९२३) हा पहिला भारतीय ऐतिहासिक चित्रपट काढला. कृत्रिम प्रकाशावर चित्रण करण्याचा प्रयत्न या चित्रपटात प्रथमच करण्यात आला. कल्याणखजिना (१९२४), सती पद्मिनी (१९२४), शहाला शह (१९२५), राजा हमीर (१९२५), नेताजी पालकर (१९२७) व बाजीप्रभू देशपांडे (१९२९) यांसारखे एकाहून एक सरस ऐतिहासिक चित्रपट या संस्थेने सादर केले होते. एवढेच नव्हे तर, १९२५ साली सावकारीपाश हा शोषितांच्या ज्वलंत समस्येवर वास्तव सामाजिक मूकपट निर्माण केला होता. भारतीय चित्रपटनिर्मितीचा हाच पहिला वास्तववादी चित्रपट. पुढे १९३६ साली बोलपटाच्या स्वरुपात तो बाबूराव पेंटर यांनी शालिनी सिनेटोनसाठी दिग्दर्शित केला.

इंग्लंडमध्ये १९२५ साली भरलेल्या वेम्बले येथील चित्रपट-प्रदर्शनात बाबूराव पेंटर दिग्दर्शित कल्याण खजिना व सती पद्मिनी हे दोन भारताचे प्रातिनिधिक चित्रपट म्हणून दाखविण्यात आले होते आणि त्यांबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र आणि पदकही मिळाले होते. विलायतेहून शिकून आलेल्या मोती वी. गिडवाणी दिग्दर्शित निशासुंदरी (मिड्नाइट गर्ल-१९२९), भालजी पेंढारकर दिग्दर्शित राणी रूपमती (१९३१), द. स. अंबपकर व बाळासाहेब यादव दिग्दर्शित दुष्मन की रात (नाईट ऑफ टेरर, १९३१) आणि बाबूराव पटेल दिग्दर्शित किस्मत (१९३२) या चित्रपटांचाही उल्लेख महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या संदर्भात करणे क्रमप्राप्त ठरते. पुढे दामले, फत्तेलाल व व्ही. शांताराम या संस्थेतून मे १९२९ मध्ये बाहेर पडले आणि १ जून रोजी त्यांनी प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली. त्यांच्या मागोमाग बाबूराव पेंटर यांनीही संस्था सोडली. त्यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट लंका हा होय. त्यानंतर तीन वर्षातच महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद पडली.

मूकपटाच्या जमान्यात भव्यता व कलात्मकता यांच्या जोडीला उत्तम कथानक देऊन वास्तवपूर्ण चित्रपटनिर्मिती करणारी महाराष्ट्र फिल्म कंपनी ही त्याकाळची एकमेव चित्रपटसंस्था होती. या संस्थेने एकूण २४ चित्रपटांची निर्मिती केली होती. तिच्या या कार्याचे स्मरण म्हणून विद्यमान मराठी चित्रपट व्यावसायिकांनी दोन लाखांचा निधी जमवून संस्थेच्या परिसरात एक मानस्तंभ उभा केला आहे. त्याला महाराष्ट्र शासनाचे सक्रिय आर्थिक सहाय्यही लाभले आहे.

लेखक : बापू वाटवे

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संदर्भ : गजबर, बाबा; भिडे, ग. रं. कलामहर्षी बाबूराव पेंटर, कोल्हापूर, १९७८.

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..