नवीन लेखन...

एका लावण्यवतीच्या स्मितहास्याचे रहस्य

लावण्य म्हणजे सौंदर्य! साध्या भाषेत सांगायचं तर ला सुंदरता! परंतु हे लावण्य प्रत्येकाच्या डोळ्यात असते. कुणाला कोणती गोष्ट सुंदर वाटेल हे सांगता येणार नाही. लावण्यवती स्त्रीचं उदाहरण घेऊ. कुणाला तिचे डोळे सुंदर वाटतात तर कुणाला तिचे ओठ सुंदर वाटतात. कुणाला तिचे पाठीवरचे लांबसडक केस सुंदर वाटतात तर कुणाला तिच्या भल्या कपाळावरील बटा सुंदर वाटतात. कुणाला तिची कृश कटी सुंदर वाटते तर कुणाला तिची पाठीमागूनची चाल पाहताना तिचे नितंब सुंदर वाटते. थोडक्यात काय लावण्यवतीचा प्रत्येक अवयव सुंदर वाटतो. सौंदर्य प्रत्येकाच्या डोळ्यात असते असे जरी म्हटले तरी एखादी गोष्ट सुंदर असते ते तिच्या अंतर्गत सुसंगतीसाठी किंवा समानतेमुळे असते. सौंदर्यात समानता सरळता, सहजता त्याबरोबर प्रमाणबद्धता असावी लागते. सुंदर वस्तूच्या निर्मितीस प्रमाणबद्धता आवश्यक असते. तिच्यातील प्रत्येक घटक एकमेकांशी किंवा एकमेकाला पूरक असे असतात. त्यांच्यात विलक्षण प्रमाणबद्धता असते.

स्त्रीचेच उदाहरण द्यायचे झाले तर स्त्रीचं कपाळ, कपोल, नास्तिक, ओठ व हनुवटी या अवयवात प्रमाणबद्धता नसेल तर त्याचा एकत्रित परिणाम तिच्या सौंदर्यात होत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सौंदर्यातून आनंदनिर्मिती होणं हे त्या सौंदर्याचं फार मोठं फलित आहे एखादी गोष्ट आपल्याला सुंदर वाटते कारण ती पाहिल्यावर आपल्याला उच्च प्रतीचा आनंद मिळतो. ही आनंदनिर्मिती उच्च दर्जाच्या सौंदर्यातून होत असते. थोडक्यात लावण्य म्हणजे समानता, प्रमाणबद्धता, आनंदनिर्मितीक्षमता व उच्च कोटीची भावना होय. ही सौंदर्यभावना सगळ्यांच्याकडे नसते. एखादा रसिकच एखाद्या सुंदर वस्तूचं लावण्य हेरून त्याला मनापासून दाद देतो.

ह्याला नजर असावी लागते. हे लावण्य ओळखण्यासाठी मन असावे लागते. त्यालाच आपण सौंदर्य जाणण्याची अभिरुची म्हणतो. या उच्च अभिरुचीसाठी माणसाला सहावे इंद्रिय असावे लागते. हे सहावे इंद्रिय म्हणजेच प्रतिभा. ही प्रतिभा साऱ्यांच्यात नसते. कारण प्रतिभा म्हणजे निर्मितीक्षम प्रज्ञा! ही प्रज्ञा आस्वादात्मक अशी एखाद्यालाच असते. म्हणूनच त्याला आपण रसिक म्हणतो. ही सौंदर्य जाण नसेल तर एखादा कवी किंवा कलाकार निराश होऊन म्हणतो, अरसिकेषु कवित्व निवेदनम् मा लिख मा लिख! म्हणजे देवा एखादा अरसिक माझ्या वाट्याला देऊ नकोस कारण त्यापुढे माझे कवित्व हे काला अक्षर भैस बराबर असते. हे जे सौंदर्य असते ते अनेक प्रकारचे असते. ते कधी भौतिक तर कधी अधिभौतिक किंवा ते कधी अध्यात्मिक असू शकते. भौतिक सौंदर्यात लौकिक सौंदर्याबरोबर शारीरिक सौंदर्याचा भाग असतो तर अध्यात्मिक सौंदर्यात पारमार्थिक सौंदर्य असते. अर्थात हे शब्द जड आहेत. सामान्य माणसाला त्याची उकल लवकर होत नाही. त्यासाठी उदाहरण द्यायचे झाले तर मीरेचे सौंदर्य अध्यात्मिक आहे. तर राधेचे सौंदर्य हे मानसिक सौंदर्य म्हणता येईल तर द्रौपदीचे सौंदर्य लौकिक सौंदर्य म्हणजे शारीरिक सौंदर्यात मोडणारे असेल. मात्र ह्या सौंदर्याला एक गूढरम्यतेचे वलय असते. ही गूढरम्यता नसेल तर त्या सौंदर्याला उच्च भावनिक दर्जा येत नाही. म्हणजे ते सौंदर्य पाहताना आनंदाची निर्मिती होत नाही. कारण हा आनंद स्वर्गीय असतो. तो जणू काय मोक्षप्राप्तीचा आनंद असतो. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे झाले तर हे सौंदर्य पाहताना रसिकाला आनंदाचे डोही आनंदी तरंग या अवस्थेचा अनुभव येतो. ही अवस्था म्हणजेच सौंदर्य अनुभव होय.

गूढरम्यता ही सौंदर्याची महत्त्वाची गुणवत्ता आहे. गूढरम्यता हा सौंदर्याचा महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या वस्तू वा काव्याचे सौंदर्य या गूढरम्यतेमुळे वाढते. त्याचा खरा अर्थ काय असतो. म्हणजे त्या फुलाच्या पाकळ्या सुंदर असतात की त्या फुलाचा रंग सुंदर असतो की त्या फुलाचा आकार सुंदर असतो. त्या फुलाचा गंध सुंदर असतो हे आपल्याला कळत नाही किंवा सांगता येत नाही. यालाच आपण गूढरम्यता म्हणतो. वरील उल्लेखिलेले सर्व घटक मिळून ते फूल तयार होते. पण त्याच्या सौंदर्याला गूढरम्यतेचे वलय असल्याने ते फूल आपल्याला सुंदर वाटते.

ही गूढरम्यता सौंदर्याचा प्राण आहे आणि हीच गूढरम्यता आपल्या जगप्रसिद्ध लावण्यवतीच्या म्हणजे मोनालिसाच्या पोर्टेटमध्ये दिसते. केवळ एका गूढ स्मितामुळे तिच्या पोर्टेटला जे सौंदर्य लाभले आहे ते जगातल्या कोणत्याच पोर्टेटमध्ये नाही किंवा चित्रामध्ये नाही. तिचं पोर्टेट पाहताना ती लावण्यवती होती ही गोष्ट आंधळाही सांगेल. तिची हनुवटी, तिचे कपोल, तिचे भाल आणि तिची साधी केशरचना ही सुंदर आहेच. पण तिच्या या सौंदर्याला चार चाँद लावलेत ते तिच्या स्मिताने! हे जे गूढ रम्य स्मित आहे ते इतके सुंदर आहे की ते एका घरंदाज लाजवंतीचे प्रणयरम्य होकाराचे स्मित असावे असे वाटते. तिच्या सुंदर स्मितामध्ये तिच्या सौंदर्याची अस्मिता दडली आहे. तिचे स्मित म्हणजे बालकवींच्या भाषेत सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबूनि घ्यावे. हे पोर्टेट चित्रकलेचा आगळा वेगळा अविष्कार असून तिचे हे दुर्मीळ स्मित ब्रशाच्या एका फटकाऱ्यात पकडणारा हा प्रतिभाशाली कलाकार पुन्हा हजारो वर्षात जन्माला येणार नाही. आताच्या तंत्रज्ञानाच्या युगातील उत्कृष्ट कॅमेऱ्याला किंवा फोटोग्राफरला जमणार नाही तो क्षण चित्रकाराने दृश्य केला आहे. प्रतिभा आणि तंत्रज्ञान किंवा माहिती ज्ञान यात हाच फरक आहे.

-ह. शि. खरात

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..