नवीन लेखन...

औषधी वनस्पती आणि अर्थकारण

झाडे लावण्याने पर्यावरण रक्षण होतेच पण निसर्ग साखळी आणि अन्नसाखळीचा विचार करून वृक्षारोपण व संवर्धन करणे गरजेचे आहे. असे झाल्यास वाघ आणि ततसम हिंस्त्र श्वापदे मनुष्य वस्त्यांमध्ये विनाकारण आपल्याला त्रास देण्यास येणार नाहीत तसेच त्यांचा उपद्रवही कमी होऊन समृद्ध पर्यावरण निर्मितीत मदत होईल. आयुर्वेदाची लोकप्रियता वाढत असल्याने आणि जगन्मान्यता मिळत असल्यामुळे औषधी वनस्पतींचा वापर चारशे पटींनी वाढला आहे.

भारत ही जगातील औषधी वनस्पतींची मोठी बाजारपेठ आहे. नैसर्गिक औषधी वनस्पतींची निसर्गतःच जंगलात वाढ होत असते. भारतीय जंगलांतून आणि काही प्रमाणात शेतीतून औषधी वनस्पती मिळतात. पावसाचा अनियमितपणा, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, वनांचे आणि जंगलांचे रूपांतर औद्योगिक, निवासी वापरात मोठ्या प्रमाणात होत आहे. जंगलात पाण्याची तळी कमी झाली आहेत. नद्या, तलाव आटले आहेत. भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. या सर्वांची झळ इतर झाडे आणि औषधी वनस्पतींच्या नैसर्गिक निर्मितीवर व वापरावर होत आहे. यामुळे आयुर्वेदिक वनस्पतींची प्रचंड भाववाढ गेल्या अनेक वर्षांत झाली आहे.

आपल्या देशातच नव्हे तर पाश्‍चात्य राष्ट्रांतसुद्धा पर्यावरण प्रदूषणाची समस्या अत्यंत उग्र रूप धारण करीत आहे. यासाठी त्यांनी “निसर्ग वाचवा’ चळवळ सुरू केली आहे. भारतातसुद्धा पश्‍चिम घाट बचाव चळवळीचे आंदोलन बऱ्याच नेत्यांनी या आधी केले आहे. आधुनिक युगातील माणसांनी आपल्या स्वार्थासाठी प्रगतीच्या नावाखाली निसर्गाची लूट करून तसेच नवनव्या शोधांमुळे निसर्गाचे संतुलन बिघडविले. यामुळे अनेक प्रकारची प्रदूषणाची समस्या सर्व जगासमोर उभी ठाकलेली आहेत. त्यात जलप्रदूषण, वायू प्रदूषण, भूस्खलन, ध्वनिप्रदूषण आणि अन्न प्रदूषण या विविध निसर्गप्रदूषणांपासून सजीवाचे, निसर्गाचे प्राणिमात्रांचे पर्यायाने पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी वनस्पतींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळापासून भारतीयांनी आपल्या संस्कृतीत, दैनंदिन जीवनात, धार्मिक कार्यात वृक्षांना अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. आजही अनेक धार्मिक संस्कारात, सणांत वृक्षांची आवश्‍यकता असते. वैदिक, पुराण, कौटिल्य अर्थशास्त्र, रामायण, महाभारत आदी ग्रंथांत वनस्पतींची स्तुती केलेली आढळते.

सध्याच्या काळात बहुतेक उद्योग वनस्पतींवर आधारित असल्याने वृक्षांना अत्यंत महत्त्व आले आहे. विविध औषधी झाडे वातावरण शुद्धीप्रमाणे तापमान नियंत्रण करतात. वर्षाऋतूचे चक्र नियमित करण्यासाठी जंगलांना महत्त्वाचे स्थान आहे. कागद उद्योग, इंधन, रबर, तेल, मसाल्याची द्रव्ये, सुगंधी द्रव्ये, राळ, अत्तर, इमारती लाकूड, पशुखाद्य, लाख, रसायनिक द्रव्य, औषधी द्रव्य अशा आणि कित्येक दैनदिन गरजा वनस्पती पूर्ण करतात.

कौटिल्य अर्थशास्त्रात सीमाक्षेत्र, जलाशयक्षेत्र आणि मार्गातील झाडे तोडण्यासाठी दुप्पट दंड सांगितलेला आहे. आजच्या काळात वृक्षतोड कायद्याने बंदी असली तरी चोरून जंगलतोड पद्धतशीरपणे केली जाते त्यावर अंकुश ठेवायला हवा. तसेच शासकीय व खासगी स्तरावर वृक्षारोपण आणि संरक्षणाला प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहेत. घराच्या आजुबाजूला, शालेय महाविद्यालय स्तरावर, कार्यालय, शेती, डोंगर माळराने सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करायला हवे. पण वृक्षारोपण करून भागणार नाही तर त्या सर्व झाडांचे संगोपन, संस्कार आणि काळजी आपल्या मुलांसारखी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे.

भारतातील औषधी वनस्पतींची आर्थिक उलाढाल कैक कोटी रुपयात आहे. त्यातून अर्थव्यवस्थेला परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. त्यासाठी त्याचे संवर्धन आणि संयोजन नीट आणि पद्धतशीर होणे गरजेचे आहे कारण येणाऱ्या काळासाठी व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक आहे. औषधी झाडांबरोबर काही गवतांच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळू शकते कारण त्यांना सौंदर्यप्रसाधने आणि अत्तरे बनविण्याऱ्या कंपन्यांकडून चांगली मागणी आहे. यातून सध्या काही कोटींची उलाढाल होत आहे. चांगल्या प्रतीच्या रसायनांना परदेशात चांगली मागणी आहे आणि ती रसायने आपण त्यांना निर्यात करून आपल्या देशाच्या गंगाजळीत भर घालू शकतो. विशेषत्वाने रसायन उद्योगात उपयोगी अशी औद्योगिक झाडे लावली तर किती तरी लोकांना रोजगार मिळू शकतो.

औषधी वनस्पतीत झाडांत शतावरी, कडूनिंब, वड, पिंपळ, कुटज, कदम्ब, कवठ, गुग्गुळ, तेजपत्र, सप्तपर्णी, औदुंबर, आंबा, रोहितक, वरुण, कंकीळ, अर्जुन, अग्निमंथ, आरग्वध, आमलकी, कटफल, नागकेशर, पळस, लोथ्रा, कुचला, हिरडा, बेडहा, शेवगा, पारिजातक, जांभूळ, चंदन, शाल्मली, सुरंगी, मद्यन्तिका, कापूर, भूर्जपत्र, पद्मकाष्ट, निलिका निर्गुण्डी, खदीर, अश्वगंधा आदी वनस्पतींचा समावेश आहे. वरील झाडांची पानं, फुलं, फळं, सालं, खोडांचा आणि मुळांचा औषधांमध्ये वापर करता येतो.

जंगल सर्व प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध करण्याची गरज आहे. झाडाला झाड न लावता त्याचा उपयोग, पर्यावरणाचा समतोल, प्राणी जीवनाला फायदा तसेच आपल्या बरोबर देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

भारताच्या केंद्र आणि राज्याच्या अर्थसंकल्पात आयुर्वेदाला नगण्य स्थान दिलेले आहे. संपूर्ण भारतात आयुर्वेदाची आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात असली, तरीही दुर्लक्ष झालेली शाखा म्हणून आहे. एका आर्थिक वर्षात वनस्पतींची उलाढाल २५०० कोटी रुपयांची आहे. त्याचप्रमाणे तयार आयुर्वेद औषधे आणि प्रसाधने यांची दोन हजार कोटींची बाजारपेठ आहे. दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. या बाजारपेठेकडे भारतीय उद्योगपतींचे लक्ष मोठ्या प्रमाणावर पडणे गरजेचे आहे. भारताच्या केंद्रीय आणि राज्याच्या अर्थसंकल्पात आयुर्वेदाला नगण्य स्थान दिलेले आहे.

आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड शेतीच्या माध्यमातून शेतीला पूरक आणि उजाड नापिक जमीन वापरून उपलब्ध नैसर्गिक पावसाच्या पाण्यात, उगवणाऱ्या वनस्पती लावून आणि विकासात शेतकऱ्यांना सहभागी करून सुरवातीला अनुदान देऊन औषधी उत्पादकांनी शेतकऱ्यांना खरेदीची हमी दिल्यास हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी होईल असे वाटते. भारतीय शेती मंत्रालय आणि भारतीय आरोग्य मंत्रालय यांनी समन्वय करून या विषयाकडे दीर्घकालीन धोरणात्मक काही योजना राबविल्या तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळेल. आणि यातून आयुर्वेदाचे पुनरुज्जीवन करता येणे शक्‍य आहे. शेती हाच आयुर्वेदाच्या विकासाचा राजमान्य मार्ग आणि स्वस्तात उपचाराकरिता औषधी निर्मिती शक्‍य आहे. गेल्या दहा वर्षांत आयुर्वेद वनस्पतींची दरवाढ ३०० ते ७०० टक्के झाली. आयुर्वेदातील शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार सुमारे २००० वनस्पतींमध्ये निरनिराळे आजार बरे करण्याची क्षमता असून सुमारे १३०० वनस्पती त्यांच्या निरनिराळ्या सुगंध व स्वादासाठी प्रसिद्ध आहेत.

औषधी वनस्पतींची जागतिक व्यापाराची वार्षिक उलाढाल सुमारे ६० दशलक्ष डॉलर्सची आहे. भारतातून सध्या सुमारे ४५० कोटी रुपयांची वनस्पतीजन्य औषधे विविध देशांमध्ये निर्यात केली जातात. पण यासाठी नवीन नवीन झाडे आणि वनस्पती लाऊन, जगवून, त्यांची योग्य ती निगा राखून वाढ केली तरच सर्व शक्य आहे. कारण आधीची झाडे किती काळ सकस आणि भरपूर उत्पन्न देणार. कारण प्रत्येक गोष्टीला मर्यादा ही असतेच. बऱ्याच जणांचा असा समज आहे की वनस्पतींचा उपयोग हा फक्त आयुर्वेदासाठी होतो पण अनेक होमियोपॅथी, युनानी आणि अॅलोपॅथीक औषधे बनविण्यासाठीही होतो असे डॉक्टर आणि वैद्य मित्रांचे म्हणणे आहे.

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

1 Comment on औषधी वनस्पती आणि अर्थकारण

  1. औषधी वनस्पती उपज उत्पादने
    यांचे खरेदीदार कोण
    त्यांचा पत्ता काय
    व कोणत्या वनस्पतीस बाजारभाव काय याचा कोठेही उल्लेख नाही
    त्यामुळे लोकांचा योग्य प्रतीसाद मिळत नाही.

    वनस्पतीचे बाजारभाव
    आणि
    खरेदीदार यांचे पत्ते कळवावेत

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..