नवीन लेखन...

द्विपाद पूर्वज

मानवपूर्व जाती या सुमारे साठ-सत्तर लाख वर्षांपूर्वीच्या काळात केव्हातरी कपीपासून उत्क्रांत झाल्या. यातलीच एक जाती म्हणजे सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिस. सुमारे सत्तर लाख वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या या जातीचे अवशेष मध्य-पूर्व आफ्रिकेतल्या चाड या देशातल्या, चाड तलावाच्या परिसरात २००१ साली सापडले. या मानवपूर्व जातीला दिलं गेलेलं सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिस हे नाव, साहेल या प्रदेशावरून आणि चाड या देशावरून दिलं गेलं आहे. ही जाती जिथं वास्तव्याला होती तो भाग वाळवंटातलाच, परंतु तलावाच्या काठचा होता. या तलावाच्या काठावर गवताळ जमीन होती, तसंच तिथे मोठी झाडंही अस्तित्वात होती. टोरोस-मॅनेला इथे केल्या गेलेल्या या उत्खननात हे जे सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिसचे अवशेष सापडले, त्यांत एका कवटीचा आणि त्याचबरोबर अनेक सुट्या दातांचा समावेश होता. या दातांवरून हे अवशेष किमान पाच वेगवेगळ्या प्रौढांचे असल्याचं दिसून येत होतं

अवशेषांत सापडलेली कवटी जवळपास पूर्ण स्थितीतली होती. या कवटीचा आकार काही प्रमाणात आजच्या चिम्पांझीच्या कवटीसारखा असला तरी तो, दोन पायांवर चालू शकणाऱ्या मानवपूर्व जातींच्या कवटीशीही काही प्रमाणात जुळणारा होता. कवटीतून जिथून मज्जारज्जू बाहेर येतो, तो भाग उभं चालणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीत कवटीच्या खालच्या दिशेकडे रोखलेला असतो. चार पायांवर चालणाऱ्या प्राण्याच्या बाबतीत मात्र तो आडव्या दिशेला रोखलेला असतो. या पुराव्यावरून सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिस ही जाती दोन पायांवर चालू शकत असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली होती. मात्र काही संशोधकांच्या मते, ही जाती द्विपाद असल्याचं सिद्ध होण्यासाठी हे पुरावे पुरेसे नव्हते. त्यामुळे ही चर्चा पुढे चालू राहिली. या चर्चेनं आता पुनः वेग घेतला आहे. कारण सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिसच्या कवटीवर आधारलेल्या पूर्वीच्या संशोधनात आता, फ्रँक गाय आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या इतर संशोधनाची भर पडली आहे.

सन २००१मध्ये याच ठिकाणी सापडलेले इतर काही अवशेष हेसुद्धा सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिसचे असल्याचं, दरम्यानच्या काळात स्पष्ट झालं होतं. या अवशेषांत डाव्या मांडीच्या हाडाचा एक मोठा तुकडा, तसंच कोपर आणि मनगटाला जोडणारे, दोन्ही हातांच्या हाडांचे तुकडे सापडले. यांतील मांडीच्या हाडाच्या तुकड्याची लांबी चोवीस सेंटिमीटर होती. कोपराखालच्या हाडाच्या तुकड्यांपैकी एकाची लांबी चोवीस सेंटिमीटर तर दुसऱ्या तुकड्याची लांबी सोळा सेंटिमीटर इतकी होती. फ्रँक गाय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनात या मांडीच्या व कोपराखालच्या हाडांचा तपशीलवार अभ्यास केला. या संशोधकांनी आपल्या संशोधनात या हाडांचं बाह्यरूप तर अभ्यासलंच, परंतु सीटी-स्कॅनद्वारे मिळवलेल्या या हाडांच्या अंतर्भागाच्या प्रतिमांचाही त्यांनी अभ्यास केला. या सीटी-स्कॅनवरून हाडांच्या अंतर्गत (भिंतीच्या) जाडीची आणि अंतर्गत स्वरूपाची त्यांना पूर्ण कल्पना येऊ शकली. या संशोधकांनी, या हाडांची बाह्य तसंच अंतर्गत अशी सुमारे वीस वैशिष्ट्यं अभ्यासली आणि त्यांची तुलना इतर मानवपूर्व जातीच्या, तसंच चिम्पांंझी आणि गोरिलाच्या हाडांशी केली. या वीस वैशिष्ट्यांत या हाडांचं बाह्यस्वरूप, विविध ठिकाणचा हाडांचा बाक, हाडांची बाहेरची जाडी, त्यांची अंतर्गत जाडी, हाडांचं अंतर्गत स्वरूप, इत्यादींचा समावेश होता. या तुलनेतून महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या.

मांडीच्या हाडाच्या आकारावरून केलेलं गणित हे, सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिस या जातीचं वजन ४४ किलोग्रॅम ते ५० किलोग्रॅमच्या दरम्यान असल्याचं दर्शवत होतं. हे वजन ऑस्ट्रॅलोपिथेकस यासारख्या दोन पायांवर चालणाऱ्या मानवपूर्व जातींच्या वजनाइतकं भरत होतं. सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिसच्या मांंडीच्या हाडाची काहीशी मजबूत बांधणी, हाडाचा बाह्य आकार, त्याचा अंतर्गत आकार, त्याला असलेला किंचितसा अंतर्गत पीळ, अशा अनेक बाबी, दोन पायांवर चालणाऱ्या प्राण्याला जवळच्या होत्या. त्याच्या मांडीच्या हाडांचा बाक हा ऑस्ट्रॅलोपिथेकसच्या मांडीच्या हाडाच्या बाकासारखा होता. त्याच्या मांडीच्या हाडाची वरची बाजू मागच्या बाजूला दाबलेल्या स्वरूपात होती. चालताना तोल सांभाळण्याच्या दृष्टीनं गरजेची असलेली ही रचना द्विपाद प्राण्यांना साजेशी होती. सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिस ही जाती दोन पायांवर चालू शकत असल्याचं यांवरून दिसून येत होतं.

सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिस ही जाती जरी दोन पायांवर चालणारी जाती असली तरी, हा प्राणी झाडावर बराच काळ व्यतीत करीत असण्याची शक्यताही या संशोधकांना दिसून आली. कारण या जातीच्या हाताच्या हाडांचा बाक आणि इतर रचना ही झाडांवर चढण्याच्या व झाडांवरून फिरण्याच्या दृष्टीनं सोयीची असल्याचं दिसून येत होतं. त्याच्या हाताच्या हाडाच्या रचनेचं चिंम्पांझीच्या हाताच्या हाडाच्या रचनेशी साम्य होतं. त्यामुळे ही जाती जमिनीवर जरी दोन पायांवर चालत असली, तरी ती सहजपणे हात-पाय वापरत झाडांवरही वावरत असण्याची शक्यता दिसून येते. सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिस या जातीनंतर सुमारे तीस लाख वर्षांनी अस्तित्वात आलेल्या ऑस्ट्रॅलोपिथेकससारख्या विविध मानवपूर्व प्रजातीसुद्धा अशाच प्रकारे दोन पायांवर चालत होत्या, त्याचबरोबर त्या झाडांवरही वावरत असल्याचं, पूर्वीच माहीत झालं होतं.

सत्तर लाख वर्षांपूर्वीची ही सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिस जाती काय किंवा त्यानंतर निर्माण झालेल्या ऑरोनिन, आर्डिपिथेकस किंवा ऑस्ट्रॅलोपिथेकस यासारख्या प्रजाती काय… दोन पायांनी चालणाऱ्या तसंच झाडांवरही सहजी वावरणाऱ्या या विविध प्रजातींची निर्मिती हा उत्क्रांतीतला महत्त्वाचा टप्पा होता. हा टप्पा दीर्घ काळ चालू राहिला – तीस लाख वर्षांहून अधिक काळ! मानवपूर्व जातींचं हे वर्तन मानवाच्या पूर्वजांच्या, चतुष्पाद स्थितीकडून द्विपाद स्थितीकडे हळूहळू होत असलेल्या वाटचालीचं द्योतक होतं. सॅहलॅनथ्रोपस ट्चॅडेंन्सिसप्रमाणेच दोन पायांवर चालू शकणाऱ्या अशा इतर काही जाती सत्तर लाख वर्षांपूर्वी किंवा त्या अगोदरच्या काळात अस्तित्वात होत्या का, ते आज तरी सांगता येत नाही. त्यासाठी आणखी पुरावे सापडण्याची गरज आहे. हे पुरावे सापडल्यावरच मानवाच्या उत्क्रांतीतील ‘चतुष्पाद ते द्विपाद’ या स्थित्यंतरावर अधिक प्रकाश पडेल.

छायाचित्र सौजन्य :  Sabine Riffaut/Guillaume Daver/Franck Guy/Palevoprim/CNRS/Université de Poitiers)

छायाचित्र सौजन्य :Don Hurlbert/insider.si.edu and Franck Guy/University of Poitiers

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..