नवीन लेखन...

ड्रीम होम

आमच्या गावांत माझ्या आजोबांनी साठ वर्षांच्या पूर्वी बांधलेल्या घरात बालपण गेले. वयाच्या आठव्या वर्षी मनमाडला पोलीस क्वार्टर मध्ये वर्षभर राहिल्यावर पुन्हा मालेगावच्या पोलीस क्वार्टर मध्ये एक वर्ष राहिलो. त्यानंतर श्रीवर्धनला मुस्लिम मोहल्ल्यातील भाड्याच्या घरात एक वर्ष. श्रीवर्धनहुन बाबांची पी एस आय वरून इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशनमुळे बेलापूरला कोकण भुवन मध्ये सी आय डी ब्रांचला बदली झाली. बाबा तिथे असताना चार वर्ष नेरुळ मध्ये पुन्हा पोलीस क्वार्टर मिळाली. तिथून अलिबागला बदली झाल्यावर अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या निसर्ग रम्य हिरकोट तलावाच्या समोर असलेल्या पोलीस क्वार्टर मध्ये पुढील चार वर्ष. अलिबाग पोलीस स्टेशन इन्चार्ज म्हणून काम करत असताना पुन्हा बाबांची बदली झाली ती मुंबई रेल्वे पोलीस दलात. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशनंचे इन्चार्ज म्हणून सलग साडे तीन वर्ष काम केल्यावर रिटायर होईपर्यंत बाबांनी भायखळा येथील रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षात एसीपी म्हणून काम केले तोपर्यंत जवळपास सहा वर्ष आम्ही दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या मागील रेल्वे पोलीस कॉलनी मध्ये राहात होतो.

सगळे सणवार आणि गावातील शेतीची लावणी आणि कापणीच्या कामासाठी गावातल्या जुन्या घरी बाबांना रजा असली नसली तरी महिन्या दोन महिन्यांनी येऊन राहावे लागत असे. श्रीवर्धनला भाड्याच्या घरात राहायचे सोडले तर ईतर वेळी सरकारी घरातच राहायला मिळायचे. बाबा पोलिस अधिकारी असल्याने प्रत्येक ठिकाणी सुस्थितीत असणारीच घरे मिळायची. बाबांच्या नोकरी मुळे शाळा आणि घरे बदलण्याचा प्रवास बाबा रिटायर झाल्यावरच थांबला.

बाबा रिटायर व्हायच्या पूर्वीच गावातील आमच्या जुन्या घराचे नूतनीकरण केले होते. गावातील आमचे दुमजली घर एखाद्या वाड्या सारखेच मोठे होते. घरातील वरचा माळा लाकडाच्या फळ्यांनी आणि त्याच्यावर आणखीन एक पोटमाळा. घराचे छप्पर अजूनही कौलारु आहे. साठ पासष्ट वर्ष होऊनही आमच्या त्या घराच्या भिंतीत खिळा ठोकता येत नाही एवढे मजबूत बांधकाम आजोबांनी करून घेतले होते. पूर्वी आमच्या दारासमोरील अंगण मातीचे होते. प्रत्येक दिवाळीत अंगण उकरून त्यात मुरुमाची भर घालून भुरवण्याने चोपून चोपून गुळगुळीत केले जायचे आणि नंतर शेणाने सारवले जायचे. सारवलेल्या अंगणात पांढरी शुभ्र रांगोळी काढली जायची. घराला अंगणात उतरणाऱ्या पायरीवर ओटी बांधलेली, त्या ओटीवर सकाळ संध्याकाळ आजी बसून राहायची. गावातले कोणी आले की ते गप्पा मारायला घरात न बसता ओटीवरच तासन तास बसायचे. घरातच शेतात पिकणारा भात ठेवण्यासाठी कोठार होते, दरवर्षी गणपतीची प्रतिष्ठापना याच भाताच्या कोठारात केली जायची कारण मे महिना संपायच्या आत कोठारात असलेला भात भरडून त्यांचे तांदूळ केले जायचे आणि बियाणांचे भात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यावर शेतात पेरले जायचे. घरातच माझे दोन चुलते आणि शेजारच्या घरात बाबांच्या दोन चुलत बहिणींचा परिवार अशी एकूण पाच कुटुंब दोन्ही घरात राहायचो.

जसं जसं गावची लोकसंख्या वाढायला लागली, तसं तसं गावाचे शहरीकरण झाले आणि गावांत टू व्हिलर आणि फोर व्हिलरची संख्या वाढायला लागली. ग्रामपंचायत कडून होणारा पाणी पुरवठा अपुरा पडायला लागला. गावांत बकालपणा येऊन घाणीचे साम्राज्य वाढायला लागला. टू व्हिलर आणि फोर व्हिलर मुळे अंगण हरवलं त्यात काँक्रीटीकरण झाल्याने घरासमोर असलेले अंगण नामशेष झाले.

आमची शेती गावाबाहेर असल्यामुळे तिथे हवं तसं मोकळं आणि सुटसुटीत हवेशीर बांधता येणे शक्य होते, त्यातच एका बोअर वेलला एवढं भरपूर आणि स्वच्छ पाणी लागले की वाड्यासारखे प्रशस्त वडिलोपार्जित घर असूनही नव्या घराची स्वप्नं पडू लागली. पाण्याची गैरसोय तसेच गावातील कोंदट व बकाल होणारा परिसर सोडला तर आमचे वडिलोपार्जित घर आम्हा दोघा भावांची लग्न होऊनसुद्धा पुरेसे मोठे होते.

वडिलोपार्जित घर सोडून जेव्हा नवीन घर घ्यायचे किंवा बांधायचे म्हटले की एकतर उभ्या आयुष्याची कमाई खर्च करावी लागते नाहीतर कर्ज काढून आयुष्यभर ते कर्ज फेडावे लागते. सुदैवाने कुठलेही कर्ज न काढता आम्हाला घराचे काम करता येणार होते त्याला कारण सुद्धा तसेच होते. आम्ही पंधरा वर्षाचे असताना बाबांनी त्यांच्यासह आम्हा दोघा भावांचे स्टेट बँकेत पी पी एफ चे खाते उघडले होते. जिथे जिथे बदली होईल तिथे तिथे आमचे पी पी एफ चे खाते ट्रान्सफर व्हायचे. जेव्हा घर बांधायला घेतले तेव्हा आमचे पी पी एफ चे खाते मॅचुअर होऊन व्याजासह त्यात एवढी रक्कम झाली की घरासाठी पैशांमुळे कुठेही तडजोड करावी लागली नाही. बाबा पोलीस खात्यात अधिकारी असूनही त्यांना स्वतःची फोर व्हिलर घेता आली नव्हती. नवीन फ्लॅट किंवा घर बांधणे तर दूरच होते. पण त्यांनी रिटायर होण्यापूर्वी पी पी एफ आणि त्यांच्या इ पी एफ चे केलेले नियोजन यामुळेच ते रिटायर झाल्यानंतर दहा वर्षांनी आम्हाला नवीन घर बांधताना कोणतीही आर्थिक अडचण आली नाही.

जेव्हा माझे मित्र किंवा सहकारी सांगायचे की आम्ही अमुक अमुक कॉम्प्लेक्स मध्ये किंवा अमुक अमुक बिल्डरच्या बिल्डिंग मध्ये विसाव्या मजल्यावर किंवा तिसाव्या मजल्यावर करोडो किमतीचे फ्लॅट घेतलेत तेव्हा त्यांचा हेवा वाटण्याऐवजी कीव यायची कारण ते सोसायटी मध्ये राहून मेंटेनन्स आणि ईतर खर्चासाठी म्हणून स्वतःच्याच फ्लॅटचे भाडे म्हणून महिन्याला हजारो रुपये मेंटेनन्स चार्ज भरणार होते.

वडिलोपार्जित घरासह आमची वडिलोपार्जित जमीन असल्याने जागेचा प्रश्नच नव्हता नवीन घरासाठी नियोजन सुरु झाले, माझा अलिबागच्या जे एस एम कॉलेजला अकरावी बारावी सायन्सचा बॅचमेट चेतन आर्किटेक्ट होता, त्याने घराचे दोन तीन प्लॅन बनवून दिले त्यातील एका प्लॅन मध्ये आणखीन थोडेसे बदल करून प्लॅन फायनल केला, प्लॅन झाल्यावर घर बाहेरून कसे दिसेल याचे थ्री डी डिजाईन आमच्या घराच्या कामाचे सर्वेसर्वा असणारे नवाब खान यांनी बनवून आणले.
नवाब खान यांनी आमच्या जुन्या घराचे नूतनीकरणासह आणखीन तीन बिल्डिंग बांधून दिल्या होत्या. आमचे बाबा ईतर कोणाचे ऐकत नसले तरी नवाब काकांच्या पुढे त्यांचे काही चालायचे नाही, ते बांधकामात काही वाद झाल्यावर बाबांना नेहमी बोलायचे साहेब तुम्ही पोलीस खात्यात असताना तुम्हाला कोणी कायदा शिकवलेला आवडत नव्हता त्याचप्रकारे माझ्या कामातलं मला शिकवू नका असं बोलून गप्प करायचे.

स्वतःसाठी घर बांधणे हे खरोखरच स्वप्नवत असते, घरासाठी पाया खोदण्यापूर्वी भूमिपूजन करून शुभकार्यासाठी नारळ वाढवताना अक्षरशः गहिवरून येतं.

आमच्या नवीन घराचे भूमिपूजन महाराष्ट्र दिनी एक मे 2016 साली झाले. पुढील तेरा महिन्यात घराचा पायाचे एक एक कॉलम उभे राहून एक एक वीट रचून भिंती उभ्या राहायला लागल्या.

पहिला स्लॅब त्यावर पुन्हा भिंती बांधून दुसरा स्लॅब त्यानंतर प्लास्टर, लादी बसवणे, प्लम्बिंग आणि लाईट फिटिंग, फर्निचर आणि रंगरंगोटी या सगळ्या कामात प्रत्यक्ष साक्षीदार होता आले. घरासाठी लागणारी प्रत्येक वस्तू स्वतः जाऊन आणली. घराचे काम तेरा महिन्यात पूर्ण झाले तोपर्यंत आणि त्याच्या अगोदर वर्षभर मी जहाजावर एकदाही गेलो नव्हतो. जवळपास अडीच वर्ष मी आमच्या कमर्शियल बिल्डिंग आणि त्यानंतर नवीन घराच्या बांधकामात जहाजावरील नोकरी आणि मरीन इंजिनियरचे करियर सोडून बिल्डर लाईनचे करियर मध्ये डायव्हर्ट झालो होतो. एकदा स्टेट बँकेत घरासाठी पैसे काढायला गेलो असताना तिथल्या मॅनेजरनी विचारले एवढे पैसे का काढताय, त्यांना म्हणालो मॅडम घर बांधतोय त्यासाठी गरज आहे. त्यावर त्यांनी नशीबवान आहात स्वतः घर बांधताय, नाहीतर हल्ली कोणाला एवढा वेळ असतो, बिल्डर देईल ते ब्लॉक आणि फ्लॅट घेऊन समाधान मानावे लागते. घराच्या कामाच्या शेवटच्या टप्प्यात मामा मुळे कर्ज काढायची वेळ आली नाही, त्याच्याकडून घेतलेले उसने पैसे त्याला वर्षभरातच परत करता आले.

घराचे काम सुरु झाल्यापासून तेरा महिन्यानंतर म्हणजे दहा जून 2017 मध्ये घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेशाची पूजा होऊन राहायला आलो. प्रियाला आठवा महिना सुरु होता, नवीन घरात माझ्या आणि भावाच्या मुलीसोबत खेळायला नवीन बाळ येणार होते पण त्यांना भाऊ मिळणार की बहीण याचा सस्पेन्स पुढच्याच महिन्यात मला मुलगा झाल्यावर संपला.

बिल्डिंगचे काम पूर्ण होऊन नवीन घराचे स्वप्नंसुद्धा प्रत्यक्षात साकारले गेले कंपाउंड मध्ये विविध प्रकारची फळझाडे आणि फुलझाडे लावली गेली होती.

मुलाचा जन्म झाल्यावर महिनाभरात मला जहाजावरील करिअर पुन्हा खुणावू लागले, थर्ड इंजिनियर म्हणून खांद्यावर दोन सोनेरी पट्ट्या असताना सोडलेले करिअर पुन्हा जॉईन करताना सेकंड इंजिनियरचे प्रमोशन मिळाले आणि पुढल्या तीन वर्षातच जहाजाचा चीफ इंजिनियर सुद्धा होता आले.

आता मागील चार वर्षांत घरा सभोवती लावलेली झाडे फुलांनी आणि फळांनी बहरू लागली आहेत. रंगीबेरंगी सुंदर फुलपाखरे, चिमण्या, पोपट, मैना आणि खंड्या पक्षी ये जा करू लागले झाडांवर घरटी बांधून राहू सुद्धा लागले.

नवीन घर बांधल्या पासून तीन तीन महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असल्याने एन आर आय टाइम साठी वर्षातले सहा महिने घरी तर सहा महिने जहाजावर राहावे लागते. जहाजावर असताना एक एक दिवस आणि एक एक क्षण मोजून पुन्हा स्वतःच्या ड्रीम होम मध्ये परततोय अशी रोजच रात्री स्वप्नं पडत असतात.

— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B.E.(mech), DME, DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 184 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..