नवीन लेखन...

नाट्य-चित्र कानोसा – प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ………

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ………

प्रेमाचा स्पर्श अलगद आणि हळुवार

प्रेमाची परिभाषा, त्याची व्याख्या विशद करणारे अनेक चित्रपट आपण पाहिले असतील. याचा नेमका अर्थ स्पष्ट करणार्‍या कथा मांडल्या गेल्या आहेत आणि अनेकदा बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी कमालीची लोकप्रियताही मिळवली आहे. पण प्रेमाला ना वयाची बंधनं असतात, ना लग्नाची, केवळ एकमेकांमधील भावनिक नातं आणि जिव्हाळा हेच त्याचं मर्म असतं हे “प्रेम म्हणजे…” या चित्रपटातून दिग्दर्शिका-अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केलेला दिसून येतो.

ही कथा आहे दोन वेगवेगळ्या जोडप्यांची. पहिलं जोडपं म्हणजेच रोहित आणि प्रज्ञा जे घटस्फोटित आहेत. त्यांना दोन मुलंही आहेत पण केवळ करियरमुळे आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यांची मतमतांतर झाल्यामुळे हा काडीमोड. तरीही लग्नानंतर उत्तम मित्र-मैत्रिणी बनून राहणं आणि आपल्या निर्णयाचा मुलांवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. तर दुसरं जोडपं म्हणजे अनुश्री आणि केदार. दोघंही वेगवेगळे राहत आहेत, घटस्फोट न होताही. त्यांना ही दोन मुली आहेत. अनुश्री आपल्या सासू बरोबर मुलींसह अगदी सुखाने राहत आहे, अर्थाजनांसाठी “फ्लॉरिस्ट”चा व्यवसाय ही सांभाळते आहे, गेल्या चार वर्षांपासून आपल्या नवर्‍याची म्हणजे केदारची चातकासारखी वाट पहात आहे, पण तरीही खंबीर आणि येणार्‍या परिस्थितीला स्विकारण्याची तयारीही तिनं दाखवली आहे, कारण आपला नवरा परस्त्रीच्या प्रेमात पडला तरीसुद्धा ठेच लागून जाणीव होऊन त्याला कदाचित चूक उमजेल आणि तो परत येईल या आशेत आहे. रोहित म्हणजेच सचिन खेडेकर हे डॉक्टर असून अनुश्री अर्थात मृणाल कुलकर्णी यांच्या कॉलनीत रहात आहे. पुढे त्यांची ओळख वाढते आणि ओळखीचं रुपांतर हळूहळू प्रेमात होतं. याची जाणीव त्यांच्या आसपास वावरणार्‍या नातलगांनाही होते, पण व्यक्त होतं तेव्हा नेमकं काय होतं? हा ट्विस्ट इंटरवल नंतर पहायला मिळतो.

त्यातच रोहितची बायको म्हणजेच प्रज्ञा अर्थात पल्लवी जोशी जेव्हा यु.एस.ए. हून भारतात परतते तेव्हा तिचा आपल्या “एक्स नवर्‍याबद्दल” चं मत कुटुंबाबद्दलची आपुलकी कशी असते, आपला नवरा जेव्हा दुसर्‍या स्त्रीच्या प्रेमात पडला आहे, त्यावेळची तिची रिअक़्शन, भावना कशी आहे? याचा वेध ही अगदी नेमकेपणाने घेण्यात आला आहे; त्यातच सुनिल बर्वेची मानसिक स्थिती, द्वीधा मन:स्थितीत वावरणं यावर अगदी उत्तमपणे हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, स्मिता तळवलकर, सुहास जोशी, नेहा जोशी यांच्याही भूमिका आहेत. आपापल्या पिढीचं प्रतिनिधीत्व आणि विचारांवर ठाम असणारी ही मंडळी, त्या पिढीनुसार अगदी चपखल वाटतात.

इतकी मातब्बर स्टारकास्ट असल्यामुळे अभिनयात हा सिनेमा छाप पाडून जाणार, हे उघड आहे आणि त्याचं श्रेय हे दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांना जातं, पहिल्याच खेपेत दिग्दर्शकीय कौशल्य उत्तमपणे पेलण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत असं म्हणता येईल.

बालकलाकारांचा अभिनयही उत्तम आणि विशेष म्हणजे कथेत कुठे, कशी अदाकारी दाखवायला हवी हे समजल्यामुळे कथेची मोट एकसंघ राहिली आहे.

चित्रपट सुरुवातीपासून ते इंटरवलपर्यंत काहीसा संथ झाल्यामुळे, अनेक नाती आणि चित्रपटातला विषय उलगडायला थोडासा वेळ जातोच, त्यामुळे पूर्वार्धात चित्रपट किंचित कंटाळवाणा ही वाटतो. पण चित्रपटाला मिळालेल्या उत्तम कलाकारांमुळे ही पोकळी भरुन निघाली आहे. त्यासोबतच चित्रपटातील प्रसंगानुरुप असलेली गाणी आणि पार्श्वसंगीत ही सुद्धा जमेची बाजू आहे.

तांत्रिक, निर्मिती मूल्य या चित्रपटाने जपली असली तरीसुद्धा संकलनात थोडासा घाई करणारा, (अपवादात्मक) आणि एखाद-दोन प्रसंगात डबिंगमध्येही शब्द पाठी-पुढे सरकलेत असं दिसतय. पण एकूणच सशक्त कथानकामुळे या बाबी लक्षात येत नाही कारण भावनेने प्रेक्षकही या चित्रपटात गुंतून जातो, हे तसं कौतुकास्पदच आहे.

चित्रपटात पुणेरी रहाणीमान, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत घरातील वावर जसा असायला हवा, तसाच तो चित्रपटात ही दिसतो, प्रेमात पडल्यानंतरची भावना, ब्रेकअप नंतरचे परिणाम, थोरा-मोठ्यांचा सल्ला, त्यांची मतं, विचार यामध्ये पडद्याच्या माध्यमातून वास्तवदर्शीपणा साकारल्यामुळे हा चित्रपट मनालाही स्पर्श करणारा ठरतो.

चाळीशी नंतरही प्रेमांकुर नव्यानं फुटू शकतात, जरी एकदा त्याची पालवी गळून गेली असेल किंवा पूर्णत: उन्मळून पडली असेल तरीही. प्रेमावर अगदी बोल्ड पद्धतीनं भाष्य मृणाल कुलकर्णीनं या चित्रपटातून केल्याचं हा चित्रपट पाहिल्यावर कळतं. आयुष्याच्या उत्तरार्धात खरा आधार, आणि साथ ही तितकीच महत्वाची असते हे एक “फिलींग” मनात निर्माण होतं.

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..