नवीन लेखन...

‘दोन स्पेशल’ आणि ‘Brexit’

Marathi Drama - 'Don Special' and its similarity with Brexit

क्षितिज पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित ” दोन स्पेशल ” हे नाटक सध्या मराठी रंगभूमीवर गाजत आहे . कमीतकमी ५ – ६ वेळा तरी पाहावे असेच हे नाटक आहेत . परत – परत जाऊन पाहावे अशी नाटकं मराठी रंगभूमीवर अभावानेच आजकाल येतात . त्यामुळे तर या नाटकाचे विशेष महत्व आहे . गिरीजा ओक – गोडबोले आणि जितेंद्र जोशी यांचा अप्रतिम अभिनय , ह . मो . मराठे यांची तशी जुनी पण प्रभावी कथा , क्षितिज पटवर्धन यांचे तुफान लेखन असा हा संगम आहे . हे नाटक पाहायला मी एक मराठी नाट्यवेडा म्हणूनच गेलो होतो . परत परत ही नक्कीच जाईन. पण आज Brexit चा विचार करत असताना मला राहून राहून हे नाटक आठवत आहे . कारण या दोन गोष्टीत कमालीचे साम्य आहे .

” दोन स्पेशल ” हे नाटक नवीन असले तरी ते ज्या कथेवर आधारित आहे ती ह . मो . मराठे यांची कथा तशी जुनीच आहे . अगदी तसेच इंग्लेंडने जरी युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याचा निर्णय ( म्हणजेच Brexit ) घेणे हा निर्णय जरी नवा म्हणजे २३ जून २०१६ च्या सार्वमतातून ठरला असला तरी इंग्लेंडने युरोपियन यूनियन मधून बाहेर पडण्याच्या चर्चेची कथा तशी जुनीच आहे .

Brexit ही राजकीय – आर्थिक घटना आणि ” दोन स्पेशल ” हे मराठी नाटक या दोन घटकातले दूसरे साम्य म्हणजे हा निर्णय पुरूषी राजवटीत झाला असला तरी त्याला महिला वर्चस्वाची भक्कम पार्श्वभूमी आहे . नाटकाची आणि कथेची नायिका जशी वेळेवर भेटत नाही , न सांगता निघून जाते अशा नायकाच्या भावावस्थेतून जसे हे नाटक घडते ; अगदी तसेच ब्रिटन ने युरोपियन यूनियन मधे सहभागी होण्यास सुरुवातीच्या काळात मार्गारेट थँचर यांच्या पंतप्रधान पदांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत विरोध झाला होता . त्यातूनच ब्रिटन युरोपियन यूनियन मधे सहभागी झाला तरी त्यांचे पौंड – sterling हे चलन स्वतंत्र राहील अशी तडजोड झाली . स्वाभिमानी जर्मनी आणि त्यांच्या पोलादी पंतप्रधान अन्जेला मार्केल यांना हे मनोमन मान्य असणे कठीणच होते . त्यामुळेच तर सार्वमतानुसार विभक्त होण्याचा निर्णय अंमलात आणण्याचे इंग्लेंडने ठरवले तरी त्यासाठी त्यांना दोन वर्षांची मुदत आहे . पण तेवढा वेळ इंग्लेंडने घेऊ नये अशीच जर्मनीची भूमिका आहे . असे सार्वमत घेण्याची घोषणा इंग्लेंडचे आता भूतपूर्व पंतप्रधान डेविड कमेरोन या पुरूष पंतप्रधानांचा . सार्वमत घेतलेही गेले त्यांच्याच कारकिर्दीत . पण त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मात्र आली आहे ब्रिटनच्या नवीन ” महिला ” पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर .

Brexit ही जागतिक अर्थकारण – राजकारणातील महत्वाची घटना आणि ” दोन स्पेशल ” हे मराठी नाटक यांच्यातील तिसरे साम्य म्हणजे आपल्या आजबाजूच्या माणसांचा न आलेला अंदाज . नाटकाच्या नायिकेला आपल्या बहिणीच्या मनोवृत्तीचा , सिनेमात जाण्याच्या झपाटलेलपणाचा नेमका अंदाज येत नाही . त्यामुळे स्वतःच्या वडिलांना अंधारात ठेवत ती बहिणीच्या घर सोडून पळून जाण्याच्या निर्णयाला साथ देते . पण नाटकाच्या नायिकेचा हा अंदाज चुकतो आणि बहिणीच्या आयुष्याची वाताहत होते . Brexit बाबत सार्वमत घेण्याची घोषणा आधी करतांना आणि नंतर ती अंमलात आणताना डेविड कमेरोन यांचाही अंदाज असाच चुकला . सार्वमत सरकारच्या विरुद्ध जाईल असं त्यांनाच काय , कदाचित ( कदाचित इतका मराठीत दुसरा धोकादायक शब्द कदाचित मराठीत नसावा ) Brexit च्या समर्थकांनाही वाटले नसावे .

या दोन गोश्तितील चौथे साम्य म्हणजे निर्णय घेतला कोणी आणि भोगावे लागले कोणाला ? तसेच घटनेनंतर मालकी कोणाकडे गेली ? घर सोडून पळून जाण्याचा निर्णय कथा आणि नाटकाच्या नायिकेच्या बहिणीचा . भोगावे लागले नायिकेला आणि मालकी गेली नायिकेच्या नवऱ्याकडे आणि नोकरी देणाऱ्याकडे . यात बिचाऱ्या नाटकाच्या नायकाचे काय ? Brexit मधेही झाले आहे तसेच . सार्वमताचा निर्णय डेविड कमेरोन यांचा . सार्वमत जिंकले नायजेल फराज ने . तो निर्णय अंमलात आणण्याआधीच या दोघांनीही राजिनामे दिले आहेत . त्यामुळे आता जबाबदारी नवीन पंतप्रधान थेरेसा मे यांची . भोगायचे सर्वसामान्य जनतेनी . इंग्लेंड मधल्याही आणि युरोप मधल्याही .

या दोन गोष्टीतले पाचवे साम्य याच नाटकातील एका संवादात सांगितले आहे . ” सवयी आणि परिस्थिती या दोन वेगळ्या गोष्टी असतात . ” Brexit च्या निर्णय जेंव्हा खरंच अंमलात येईल तेंव्हा इंग्लेंड आणि इतर यूरोपीय जनतेला यांचा नक्कीच अनुभव येईल . कारण थोडी – थोडकी नव्हे तर तब्बल ४३ वर्षे इंग्लेंड युरोपियन यूनियन चा सभासद आहे . चलनाचे विलिनीकरण झाले नसले तरी व्यक्ति – माल – वस्तू यांची अनिर्बंध देवाण – घेवाण विनासायास सुरू होती . इंग्लीश विद्यापीठात प्रवेश ते नोकरी अशा अनेक बाबतीतील आजपर्यंतच्या सवयी आता परिस्थिती नुसार सगळ्यांनाच बदलाव्या लागतील .

Brexit आणि ” दोन स्पेशल ” यातले सहावे साम्यही असंच याच नाटकातील अजून एका वाक्याने सांगता येईल . नाटकात तिच्या ऑफीसचे एक काम करून घेण्यासाठी नायकाच्या ऑफीस मधे येते . तिथे अचानक अनेक वर्षानंतर नायक – नायिका एकमेकांच्या आमनेसामने येतात . तत्वनिश्थ नायक असले काम करणार नाही याचा नायिकेला पूर्ण अंदाज येतो . पण परिस्थिती मुळे तिचाही नाईलाज असतो . तेंव्हा ती नायकाला सांगते की ” तुलाही compromise करायला लागू नाही आणि मलाही manage करायला लागू नाही असं काहीतरी व्हायला हवे . ” जागतिक अर्थकारण आणि राजकारण प्रत्यक्षात ज्याप्रमाणे घडते आणि ज्या तर्हेने सर्वसामान्यांना सांगितले जाते , त्याचं यापेक्षा जास्त समर्पक शब्दांत वर्णन करता येईल ? आहे फक्त इतकेच नाटकात तशी घटना घडते . प्रत्यक्ष आयुष्यात नाही ना होत तसं ! !

या दोन गोष्टीतले सातवे साम्यही याच नाटकातील अजून एका वेगळ्या विधानाने मांडता येईल . या नाटकाची नायिका एकमेकांना स्वतःचा भूतकाळ आणि वर्तमान स्पष्ट करतांना नायकाला सांगते ” ज्याला भूतकाळात सोडून आले , त्याच्या हाती आपला भविष्यकाळ ठरवण्याचे आधिकार द्यायला लागावे असा कोणाचाही वर्तमानकाळ असू नाही ” . Brexit लाही हे तंतोतंत लागू पडत नाही का ?

” दोन स्पेशल ” हे मराठी नाटक आणि Brexit ही जागतिक राजकारण व अर्थकारण यातली एक महत्वाची घटना यात असणारे आठवे साम्य म्हणजे या नाटकात वर्तमानपत्र ऑफीस चे नेपथ्य उभे करतांना मधोमध एक बांबूचा आधार दाखवला आहे . लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे काहीही म्हणले , त्याचा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजची या क्षेत्राची सर्वांगीण नाजूक परिस्थिती या बान्बूतून समोर येत राहाते . ब्रिटन चा इतिहास कितीही गौरवास्पद असला तरी आजचे त्यांचे स्थान जागतिक अर्थकारण व राजकारणात असेच तकलादू आहे का हा प्रश्न ही आहेच ना !

सरतेशेवटी , या वर्षी डॉ . गिरीश ओक त्यांच्या ” ती फूलराणी ” या नाटकातील भूमिकेसाठी , तर गिरीजा ओक – गोडबोले ” दोन स्पेशल ” या नाटकातील भूमिकेसाठी निश्चितच अनेक पुरस्कारांसाठी अधिकारिक आहेत . त्या पिता – पुत्रीची कामगिरी च तशीच आहे . Brexit बाबत असं म्हणता येईल का ?

चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवी बंगल्याजवळ, राजाजी पथ
डोंबिवली ( पूर्व ) ४२१२०१
मोबाईल – ९८२०२९२३७६ .
इ-मेल – tilakc@nsdl.co.in

चंद्रशेखर टिळक
About चंद्रशेखर टिळक 25 Articles
श्री. चंद्रशेखर टिळक हे अर्थतज्ज्ञ असून NSDL चे उपाध्यक्ष आहेत. गेली अनेक वर्षे ते केंद्रीय अर्थसंकल्पावर विश्लेशणात्मक व्याख्याने देत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..