नवीन लेखन...

डोळेझाक (कथा)

(साकीच्या The Blind Spot या लघुकथेचे मुक्त मुक्त रूपांतर)

“यशोमतीबाईसाहेबांच्या– देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो – अंतिम संस्कारानंतर येताय ना?”, रिटायर्ड मेजर मालोजीराव गायकवाडानी त्यांच्या पुतण्याला विचारलं. “कशी काय होती व्यवस्था? सगळं ठीक पार पडलं ना?”

“आबासाहेब, आम्ही सगळं सविस्तर सांगू तुम्हाला जेवताना. या थंडीच्या लाटेत गारठून जायला झालंय आणि भूक लागलीय फार. खानसाम्याला सांगा ना थाळे लावायला.” चंद्रभान, मालोजीरावांचा पुतण्या म्हणाला.

“अं हं ! चंद्रभानराव, नाही ! जेवताना बोलायचं हा जेवणाचा आणि तुमच्या दिवंगत मावशीच्या स्मृतीचा, दोन्हींचा अपमान होईल. आपण आधी जेवू, आणि मग बोलू.” पट्टीचे खाणारे आणि खिलवणारे मालोजीराव जेवणावर तासन्तास बोलू शकत पण फक्त पोटभर जेवल्यानंतरच. त्यांनी खानसाम्याला बोलावून थाळे लावायला सांगितलं, “खंडू, असं कर, आधी ती परवा संपतरावानी आणलेली दिंडोरी रिझर्व वाईन ओत दोन ग्लासात. आणि मग जेवण वाढ. आज काय बनवलयस? भाकरी आणि सावजी मटन? आणि तुझा स्पेशल कोल्हापुरी पांढरा रस्सा नि गोळी पुलाव आहे का नाही? मग बास्. जा. वाईन आण लवकर, जा. आणि हे बघ, हरकाम्याले सांगून दिवाणखान्यात शेगडी पेटवून ठेव म्हणजे ऊब येईल या थंडीत. ….. आता बघा चंद्रभानराव, ह्या जेवणात तुमच्या मावशीच्या अंत्ययात्रेचा विषय बसतो का? – देव तिच्या आत्म्याला शांती देवो – तशी बिनधास होती आमची ही चुलत मेव्हणी, तिच्या स्वत:च्या व्यवहारात पुरेशी हुशार होतीच म्हणा, पण अगदी खरं सांगायचं तर तिच्या स्वभावावरून आम्हाला आमचा आधीचा खानसामा बनवायचा त्या पुचकवणी मद्रास सांबाऱ्याचीच आठवण व्हायची.”

“रागावू नका आबासाहेब, पण तुमच्याबद्दलही मावशींचं मत काही चांगलं नव्हतं. कुचकामी, छिचोर म्हणायच्या तुम्हाला त्या.” चंद्रभान हे वाक्य बोलला तेव्हा तो स्वत:देखील मावशीच्या त्या मताशी सहमत असल्याचा भास होत होता.

“हा हा हा!” मालोजीराव गडगडून हसत म्हणाले, “अहो चालायचंच. तुम्हाला माहीत आहे का? यशोमतीला तशी विनोदबुध्दी कमीच होती. अहो, एकदा आम्ही तिला म्हणालो की नितळ, बाऊलचा तळ दाखवणारं क्लियर चिकन सूप हे मनाचा तळ दाखवणाऱ्या भोळेपणापेक्षा जास्त महत्वाचं वाटतं आम्हाला. तर काय भडकली होती ती तेव्हा. आमचीच काय, आमच्या मंडळींची, म्हणजे तिच्या भगिनी सीमंतिनीदेवींची सुध्दा हसून हसून पुरेवाट झाली होती तेव्हा. अशी बाई ती. पण काय हो चंद्रभानराव? तिनं मृत्त्युपत्रात तुम्हाला तिचा वारसदार म्हणून नेमलंय असं ऐकतो. खरंय का?”

“हो. खरंय ते. आणि मृत्त्युपत्रातल्या नोंदीप्रमाणे त्यांच्या सगळ्या दस्तावेजांचा व्यवस्थापक म्हणून देखील. त्याबाबतच आम्हाला तुमचा सल्ला विचारायचाय आबासाहेब.”

“अंहं! हे सल्ला बिल्ला प्रकरण आपल्याला जमत नाही हो,” मालोजीरावांनी मान हलवली. “आणि त्यातूनही जेवणाचे थाळे लावले जात असताना तर नाहीच.”

“नाही हो सल्ला असा नाही, पण त्यापेक्षाही काही गंभीर बाब तुमच्या कानावर घालायची आहे.”

“मग तर आता यावेळी आपण त्यावर काही बोलायला नकोच. अहो चंद्रभानराव, खंडूच्या हातचा झकास सुरमट आणि अफलातून चवदार पांढरा रस्सा पिताना तर मुळीच नाही. अहो ती पांढऱ्याची चव तोंडात घोळवताना असले काही विचार मनात आणायचेही नसतात. आणि झणझणीत सावजी मटणात भाकरी कुस्करून खाताना आम्ही कदाचित एकाद्या नव्या शिकारकथांच्या पुस्तकावर बोलू, किंवा फार फार तर खिमागोळी पुलाव्याचा फडशा पाडल्यावर नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकांबद्दल काही आडाखे बांधूही. पण बाकी इतर कुठल्याही विषयाला आम्ही फक्त जेवणानंतर, तेही ११० नंबरचा जर्दा आणि किवाम घातलेल्या फर्मास पानानंतरच, चघळायला घेऊ. हा हा हा हा.”

चंद्रभानराव तसे जवळजवळ मुकाट्यानेच जेवत होते. मनात खदखदत असलेला विषयच त्या शांततेच्या मागे होता हे नक्की. जेवण फर्मास बनलेलं होतं यात काही शंकाच नव्हती पण चंद्रभानरावांनी ते कितपत एंजॉय केलं यांची शंकाच आहे. जेवण झाल्यावर दोघेही दिवाणखान्यात आले. नोकरानं शेगडी पेटवून ठेवलेली होती सोफ्याजवळ ती चांगली धगधगली होती आणि दिवाणखान्यात सुखद ऊब आली होती त्यामुळं. नीट स्थानापन्न झाल्या झाल्या मालोजीरावांनी सुरू केला नागपूर महापालिकेच्या निवडणुकांचा विषय. पण त्यांना काटत चंद्रभानरावांनी सुरुवात केली, “आबासाहेब, मावशीनी आम्हाला त्यांचं मुखत्यारपत्र दिल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलंच. तशा तंटाबखेड्यांच्या, कायदेशीर मामल्यांच्या अशा बाबी काही नव्हत्या त्यात; पण त्यांच्या पत्रव्यवहारात मात्र आम्हाला बरंच गुंतून पडावं लागलं.”

“वाटलंच होतं आम्हाला. फार मोठा पत्रव्यवहार असणार तिचा. तशी बुधोजीराव कदमबांडेंची फॅमिली फार मोठी होतीच हो. मग पत्रापत्रीही तशी जास्ती असणारच.”

“गठ्ठेच्या गठ्ठे होते आबासाहेब. बहुतेक सगळी अगदी फालतू, निरर्थक बाबींचीच होती. पण एका बंडलानं मात्र आमचं लक्ष वेधून घेतलं. मावशींचा भाऊ होता नं सूर्याजीराव म्हणून, त्याची पत्रे होती त्यात.”

“हं, म्हणजे दु:खद आठवणी !”

“हो ना. अगदीच दु:खद. सूर्याजीरावांचा मृत्त्यू हे अजूनपर्यंत न उलगडलेलं रहस्यच राहिलंय ना?”

“माझ्या मते अगदी साधा खुलासा आहे त्याचा. दगडी पायऱ्यांवरून चढताना पायरी चुकून पडले आणि कवटी फुटली हेच खरं आहे.”

चंद्रभानरावांनी मान नकारार्थी हलवली. “नाही आबासाहेब, वैद्यकीय तपासणीत कवटीला झालेली जखम ही त्यांच्या पाठोपाठ पायऱ्या चढत येणाऱ्या कुणीतरी वार केल्यामुळं झालेली आहे असं सिध्द झालंय. पायरीवरून पडल्यावर जखम अशा अँगलमध्ये होणार नाही. तपासणी करताना वेगवेगळ्या अँगल्समध्ये डमी पुतळा पाडून बघितलं होतं. त्यामुळं मागून झालेला वार हीच वस्तुस्थिती आहे असं दिसून आलं.”

“पण मग ज्या कुणी असा वार केला त्याचा हेतु काय होता?” मालोजीरावांनी प्रश्न केला, “सूर्याजीरावाला मारून कुणाला काय मिळणार होतं? तसा कफल्लक, अंधश्रध्दा उच्चाटन मंडळाचा डायरेक्टर तो. हं, आता काही माथेफिरू असतात अशा हत्या करवणारे. त्यांच्या स्वत:च्या तत्वांच्या विरोधात असणाऱ्यांचा काटा काढणारे. पण ते लपून बसत नाहीत, उलट फुशारकीने ‘ही आमच्या संघटनेची करणी आहे’ अशी जबाबदारी घेत असल्याचं मोठ्या दिमाखात जाहीरही करतात.”

“आबासाहेब, सूर्याजीरावांच्या स्वैपाक्यावर संशय घेतला जात होता.” चंद्रभानरावानी माहिती पुरवली.

“हो, ठाऊक आहे आम्हाला,” मालोजीराव म्हणाले. “त्यावेळी वाड्यावर तोच होता म्हणून त्याच्यावर संशय! होय ना? पण काय मिळणार होतं त्याला मालकाला मारून ? नुकसानच होणार होतं ना नोकरी जाऊन? सूर्याजीराव पगार चांगलाच देत होते त्याला. आता, नंतर त्याला चांगली नोकरी मिळाली आणि पगारही वाढीव निळाला हे त्याचं नशीब. पण सूर्याजीरावांच्या मृत्यूनंतर त्याला वाईट दिवस आले होते हे मात्र खरंय. कुणी जवळ उभंही करून घेत नव्हतं त्याला. आम्ही तर म्हणतो सूर्याजीराव जिवंत राहण्यातच त्याचा, म्हणजे त्यांच्या स्वैपाक्याचा, फायदा होता. कशाला मारेल तो त्यांना आपल्याच पायावर धोंडा पाडून घ्यायला?”

“आबासाहेब, अहो अविचारी माणसं रागाच्या भरात एखादं कृत्य करतात तेव्हा परिणामांची पर्वा करत नाहीत. तो विचारही त्यांच्या मनात त्यावेळी येत नाही. आणि तो स्वैपाकी भडकू स्वभावाचा होता असंही सांगितलं जातंय.”

“चंद्रभानराव, तुम्ही काय सांगून ऱ्हायलेत आम्हाला? अहो तो माणूस मूळ कोल्हापुरातला. तिकडल्या माणसांचा स्वभाव तापट असतोच हो. अहो त्यानं तं एकदा माळ्याच्या पोट्ट्याले बेदम मारला होता हो. का? तं म्हने आंबट चुक्याची भाजी आणायला सांगितल्यावर त्यानं दुसरीच काईली भाजी आणली होती. आता सांगा.”

“बघा आबासाहेब, तुम्हीच सांगा, इतक्या फालतू कारणांसाठी इतकं मारायचं का पोटट्याले?”

“चंद्रभानराव, अहो बेदम मारणे आणि जीवे मारणे यात फरक आहे ना हो. आणि शिवाय माळ्याच्या पोट्टयाले मारणे आणि एकाद्या संस्थेच्या डायरेक्टराले मारणे यातही फरक आहे की नाही? विचार करा, तुमच्या मनात माळ्याच्या पोट्ट्याले मारायचं आलंच एकादेवेळी तरी पन्नाशी उलटलेल्या डायरेक्टराले जीवे मारायचा विचार येईल का? आणि माझ्या माहितीप्रमाणे त्या स्वैपाक्यात आणि सूर्याजीरावात काही तंटाबखेडाही नव्हता. तसा काही पुरावाही आढळून आला नव्हता. चौकशीच्या वेळीही हे स्पष्ट झालंच होतं.”

“तेच,” चंद्रभानराव एखादा मुद्दाम राखून् ठेवलेला पुरावा सादर करत असल्याच्या आवेशात उद्गारले. “आबासाहेब, अहो अगदी नेमकं तेच तर मला तुम्हाला सांगायचंय !”

त्यांनी टेबलावरचा पानाचा डबा डाव्या हाताने पुढे सरकवला, आपल्याजवळच्या पिशवीतून एक डायरी बाहेर काढून तिच्यात ठेवलेला एक लिफाफा काढला आणि त्या लिफाफ्यातून एक नीटनेटक्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र काढून टेबलावर ठेवलं. एकदोन वेळा त्यावरून हात फिरवून ते नीट सपाट केलं आणि म्हणाले, “आबासाहेब, सूर्याजीरावांनी यशोमतीमावशीना लिहिलेल्या अनेक पत्रांपैकी हे एक आहे. सूर्याजीरावांचा मृत्यू व्हायच्या चारपाच दिवस आधी त्यांनी हे लिहिलं होतं. पण, तुम्हाला माहीतच आहे, त्या घटनेच्या आधीच काही दिवसांपासून मावशींची स्मरणशक्ती क्षीण व्हायला लागली होती. त्यामुळंच, मला वाटतं, पत्र वाचल्यानंतर त्या ते विसरूनही गेल्या असाव्यात. नाही तर या पत्रा नंतर जे काही घडलं त्याच्याशी असलेला या पत्राचा संबंध तेव्हाच लक्षात आला असता. सूर्याजीरावांच्या मृत्यूच्या चौकशीत हे पत्र उघडकीला आलं असतं तर पुढच्या कारवाईला वेगळी कलाटणी मिळाली असती. तुम्ही पुराव्याबद्दल जे म्हणालात ना मघाशी, तोच हा पुरावा आहे जो मावशींच्या दप्तरात दडपला गेला आणि म्हणून त्या स्वैपाक्याच्या गुन्ह्यावर पांघरूण पडलं. या पत्रात सूर्याजीरावांचा खून करण्यामागचा त्याचा हेतू अगदी ढळढळीतपणे दिसून येतोय आबासाहेब.”

“असं? मग वाचा बघू ते”. मालोजीरावांचीही उत्सुकता ताणली गेली असावी.

“जरा लांबलचक आहे, त्यांच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणं,” चंद्रभानराव म्हणाले. “मी फक्त मुख्य भाग तेवढा वाचतो. ते लिहितात, ‘मला स्वैपाक्याला कामावरून काढून टाकायचं आहे. जेवण चांगलं बनवतो, पण त्याचा स्वभाव कमालीचा तापट आहे. आणि मला त्यामुळं त्याची भीती वाटायला लागली आहे आताशा. गेल्या आठवड्यात जेवणाच्या मेनूवरून माझ्याशी भांडला. आणि इतक्या थराला गेला होता त्याच्या हट्टाग्रहात की शेवटी माझाही तोल गेला आणि मी त्याच्या तोंडावर हातातल्या कपातली कॉफी फेकून ‘खच्चर कुठला’ अशी शिवी दिली. कॉफी गार होती आणि जास्त काही त्याच्या तोंडावर उडाली नव्हती पण तेवढ्यानं त्यानं मला खतम करायची धमकी दिली. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडं. नंतर वातावरण निवळलं. निदान मला तरी निवळल्यासारखं वाटलं. पण त्या दिवसांपासून तो जास्तच उर्मटपणा करायला लागला. आणि गेले दोन दिवस तर तो माझ्यावर पाळत ठेवून आहे असा मला संशय यायला लागला. विशेषत: मी जेव्हा तळघरात जायचो तेव्हा मला त्याचं पाठोपाठ येणं जाणवायचं.’

“आणि, आबासाहेब, तळघराच्या पायऱ्यांवरच सूर्याजीरावांची बॉडी सापडली होती,” चंद्रभानरावांनी पत्रातून नजर वर करून शेरा मारला आणि पुढं वाचायला लागले.

“‘कदाचित माझी भीति अस्थानी असेल. पण मला वाटतंय त्याला काढून टाकणंच बरोबर होईल. त्याशिवाय मला सुरक्षित वाटणार नाही.’ ”

मालोजीरावांनी काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही, तेव्हा चंद्रभानराव बोलले: “खटल्यात पुराव्याअभावी तो खुनी – हो, मी खुनीच म्हणतो त्याला – सुटला, पण हे पत्र जर त्या वेळी उपलब्ध झालं असतं तर निकाल वेगळा लागला असता.”

“तुम्ही दाखवलंय हे पत्र दुसऱ्या कुणाला?” मालोजीरावांनी हात पुढं करत विचारलं.

“नाही आबासाहेब,” चंद्रभानराव लांब हात करून पत्र आबासाहेबांना देत म्हणाले. “तुमचा सल्ला हवा होता तो त्यासाठीच. पण,.. काय, काय करताय हे आबासाहेब ? अहो हे पत्र..” चंद्रभानराव उभे रहात जवळजवळ किंचाळलेच.

मालोजीरावांनी ते पत्र शेजारीच धगधगत असलेल्या शेगडीत टाकलं होतं. क्षणार्धात त्याची जाळून राख झाली.

“आबासाहेब, अहो, का केलंत असं? अहो हे पत्र म्हणजे एकुलता एक सज्जड पुरावा होता आपल्या हातात त्या स्वैपाक्याचा गुन्हा शाबित करायसाठी.”

“म्हणूनच जाळलं आम्ही ते पत्र चंद्रभानराव.” मालोजीराव शांतपणे उत्तरले.

“पण का? का वाचवायचंय तुम्हाला त्या स्वैपाक्याला?” चंद्रभानराव कपाळावर हात मारून घेत म्हणाले. “उघडउघड एक सामान्य खुनी आहे तो.”

“सामान्य खुनी…. असेल. पण स्वैपाकी असामान्य आहे! तुम्हीही मान्य कराल. चंद्रभानराव, त्याच स्वैपाक्याच्या, खंडूच्या हातचं फर्मास जेवण जेवलात तुम्ही आत्ता.”

— मुकुंद कर्णिक

Avatar
About मुकुंद कर्णिक 31 Articles
मी स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्रातील पदवीधारक असून जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी भारताबाहेर आखाती प्रदेशात आलो तेव्हापासून इथेच वास्तव्याला आहे. इथल्या तीन कंपन्यांमध्ये काम करून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. गद्य, पद्य या दोन्ही प्रकारात मी लेखन करतो. एक छापील पुस्तक (लघु कादंबरी) प्रकाशित झाली आहे. त्याशिवाय एक कथासंग्रह आणि एक कवितासंग्रह ई-पुस्तक स्वरूपात प्रसिध्द झाले आहेत. माझ्या स्वतःच्या तीन ब्लॉग्जमधून तसेच इतरही ब्लॉग्जमधून लेखन सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..