नवीन लेखन...

दिवस घटला…!

जपानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंतर पृथ्वीच्या प्रदक्षिणाकाळात घट होऊन दिवसाचा कालावधी कमी झाला आहे….. का?


पृथ्वीचं कवच हे अनेक भूपट्ट्यांचं मिळून तयार झालं आहे. या भूपट्ट्यांची सतत हालचाल होत असते. जपानमध्ये नुकताच झालेला अतितीव्र स्वरूपाचा भूकंप हा अशाच हालचालींदरम्यान एका भूपट्टीनं दुसर्‍या भूपट्टीला ढकलण्यामुळे झाला आहे. जपानचा उत्तरेकडील प्रदेश हा उत्तर अमेरिकीय भूपट्टीवर वसला आहे. या भूपट्टीच्या पूर्वेला असलेल्या प्रशांत महासागरात प्रशांत भूपट्टी वसली आहे. प्रशांत भूपट्टी ही वर्षाला सुमारे नऊ सेंटीमीटर या गतीनं पश्चिमेकडे सरकते आहे.

या वेळी ही भूपट्टी उत्तर अमेरिकीय भूपट्टीच्या खाली घुसली. प्रशांत भूपट्टीच्या या रेट्यामुळे उत्तर अमेरिकीय भूपट्टी वर उचलली गेली व यामुळंच हा भूकंप घडून आला. या भूकंपादरम्यान तिथल्या परिसरातला समुद्रतळ हा सुमारे दहा मीटरनं उचलला गेला असावा, तसंच उत्तर अमेरिकीय भूपट्टी हीसुद्धा सुमारे वीस मीटरनं पूर्वेकडे सरकली असावी. उत्तर अमेरिकीय भूपट्टीच्या सरकण्यामुळं जपानचा समुद्रकिनाराही सुमारे चार मीटरनं पूर्वेकडे सरकला असावा.

भूपट्टींच्या हालचाली

पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणार्‍या या भूपट्टींच्या हालचाली म्हणजे पृथ्वीच्या जडणघडणीतले बदल आहेत. पृथ्वीच्या जडणघडणीतील या बदलांमुळं पृथ्वीकडील वस्तुमानाच्या वितरणावर किंवा रचनेवर परिणाम होतो. त्यामुळं पृथ्वीचं वस्तुमान ज्या अक्षाभोवती तोललं जाऊ शकेल (किंवा ज्या अक्षाभोवती पृथ्वीवरील वस्तुमान समप्रमाणात वितरित झालं आहे असं म्हणता येईल), अशा अक्षाभोवतालचं पृथ्वीच्या वस्तुमानाचं वितरण बदललं आहे. नव्या वितरणामुळं या अक्षाची जागा किंचितशी बदलली आहे. हा अक्ष या भूकंपानंतर सतरा सेंटिमीटरनं सरकला आहे.

पृथ्वीवरील वस्तुमानाच्या वितरणातील बदलामुळं पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेगातही बदल झाला आहे. बर्फावर कसरत करताना स्वतःभोवती गिरक्या घेणार्‍या कसरतपटूसारखीच ही स्थिती आहे. हा कसरतपटू स्वतःचे हात जवळ किंवा लांब नेतो, तेव्हा त्याच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेगात फरक

पडतो. पृथ्वीच्या बाबतीतही असंच घडलं आहे. जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळं पृथ्वीच्या वस्तुमानाच्या रचनेत जो बदल झाला आहे, त्यामुळं पृथ्वी (या कसरतपटूप्रमाणे) स्वतःभोवती किंचितशी जलद फिरू लागली आहे. परिणामी, पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या प्रदक्षिणाकाळात घट होऊन दिवसाचा कालावधी अठरा कोट्यांश सेकंदांनी कमी झाला असावा. (गेल्या वर्षी चिलीमध्ये झालेल्या भूकंपातही पृथ्वीचा स्वतःभोवतीच्या प्रदक्षिणेचा कालावधी असाच सुमारे तेरा कोट्यांश सेकंदानं कमी झाला होता.)

अक्ष सरकला?

जपानमधील भूकंपामुळं, ज्या अक्षावर पृथ्वीचं वस्तुमान तोललं जाऊ शकेल, तो अक्ष सरकला आहे – पृथ्वी स्वतःभोवती ज्या अक्षात फिरते, तो अक्ष नव्हे! पृथ्विच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षापेक्षा हा अक्ष वेगळा आहे. या दोन्ही अक्षांतलं एकमेकांपासूनचं अंतर सुमारे दहा मीटर इतकं आहे. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या अक्षात या भूकंपामुळं काहीच फरक पडला नाही. कारण, या अक्षाच्या कलण्याच्या प्रमाणात बदल घडण्यासाठी पृथ्वीबाहेरून कोणतीतरी आपत्ती यायला हवी. उदाहरणार्थ, एखाद्या लघुग्रहाची धडक!

पृथ्वीवरील अंतर्गत घडामोडींचा या अक्षाच्या दिशेवर कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळं पृथ्वीचा या अक्षाभोवती फिरण्याचा वेग बदलला असला, तरी या अक्षाच्या कलण्याच्या प्रमाणात कोणताही बदल झालेला नाही. ऋतुचक्र हे, पृथ्वीचा हा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष कललेला असल्यामुळं निर्माण झालं आहे. या अक्षाच्या कलण्यात कोणताही बदल झाला नसल्यानं पृथ्वीवरच्या ऋतुचक्रातही बदल घडून येणार नाहीत.

सतत होणारे गतिबदल

पृथ्वीवर सतत होणारे वार्‍याच्या दिशेतील आणि वेगातील बदल, समुद्राच्या पाण्यातील प्रवाहातील बदल, अशा अनेक गोष्टींमुळं पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीत नेहमीच बदल होत असतात. अशा सर्वसाधारण नैसर्गिक घटनांमुळं वर्षभराच्या काळात होणारा एकत्रित बदल हा सुमारे एक सहस्रांश सेकंद इतका भरतो. हा बदल जपानमधील भूकंपाच्या वेळी झालेल्या बदलाच्या तुलनेत पाचशेपेक्षाही जास्त पटींनी मोठा आहे.

जपानमधील या अतितीव्र भूकंपानं पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या कालावधीत घडवून आणलेला बदल हा अत्यल्पच असल्याचं यावरून स्पष्ट होतं. मात्र एक गोष्ट महत्त्वाची… पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या वेगात सर्वसाधारण कारणांनी होणारा बदल हा हळूहळू होत असतो; पण भूकंपासारख्या विध्वंसक कारणांमुळे होणारा बदल हा अवघ्या काही सेकंदांत घडून येतो.

डॉ. राजीव चिटणीस
कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद
सी-४/४२, चित्तरंजन नगर, राजावाडी, विद्याविहार (पूर्व), मुंबई ४०० ०७७.
इ-मेल :
rajeev.chitnis@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..