नवीन लेखन...

दिवाळी नंतरच्या शुभेच्छा

काय, कशी झाली तुमची दिवाळी? आता पुन्हा साफ-सफाई चालू झाली असेल न! माझंही तेच चालू आहे.

बाकी, फराळ, फटाके, झाले न मनासारखे? तुमच्या गावाच्या, घराच्या, नातेवाईकांच्या भेटी, कशा झाल्या?

आपल्या लहानपणीची मजा एक वेगळीच असायची. सगळे नातेवाईक बऱ्यापैकी एकाच गावात असायचे. जास्तीतजास्त आख्ख्या कोकण-महाराष्ट्रात कुठे न कुठे पसरलेले असायचे. दिवाळी निमित्त सारं मोठं कुटुंब हमखास भेटायचंच. अगदी एखादाच चुकून बाहेर असायचा. आता मात्र उलट झालंय. प्रत्येक विभक्त घरातला निदान एकजण तरी बाहेर असतोच. इथे आम्ही कुटुंबापासून दूर राहातो. त्यामुळे मग आमच्या सारखे गावा-बाहेर राहणारे शेजारी, मित्रमंडळ आम्ही शोधतो, आणि त्यांच्यासोबत हे असे सणवार साजरे करतो. आता लक्षात आलंय, की खऱ्या अर्थाने आपण जिथे राहातो, दुखल्या खुपल्याला ज्यांच्याकडे आपलेपणाने जातो, तेच तर आपले खरे नातलग! मला बरं नसतं ना, तेंव्हा माझ्या आईला कळायच्या आधी शेजारच्या काकू काढा घेऊन येतात. आमचं, आमच्या मुलांच्या वाढ-दिवसाचं planning, आमच्या आधी त्यांच्या इथल्या मावश्या, काका सुरू करतात. कांदे बटाटे अडी अडचणीला इकडून तिकडे जातातच. पण कुणाच्याही घरी साधं जरी गोडाधोडाचं काही बनलं, तरी एकमेकांकडे एक वाटी हमखास जाते. तर अशी ही आमची दूरच्या शहरात राहणाऱ्यांची सोयरीक..

त्यावरून आठवलं, काही जण आपल्याकडे सवयीने विचारतात.. की काय मग, पाडव्याला काय लुटलं? भावांनी ओवळणीत काय काय दिलं? मला आवडत नाही हा प्रश्न तितकासा. काय आहे, ज्या काळात अवाजवी खरेदी केली जायची नाही, त्या काळात हे सगळं मान्य होतं. काळानुरूप होतं. आज आपण बायका सहज कुठे फिरायला, sale बघायला गेलो, की नवऱ्याला लुटून येतो. पुन्हा येता येता वाट्टेल त्यावर मनसोक्त ताव ही मारून येतो. मग अजून पाडवा म्हणून वेगळी लूट ती कशाला? कित्येक घरात आज बायका नवऱ्यांपेक्षा, किंवा बहिणी भावांपेक्षा जास्त कमावत आहेत. मग अशा बहिणींना आपल्याच घरची लूट मिरविण्यात काय बरं आनंद मिळतो? बहिणींनो रागावू नका हं. स्त्रियांना समान हक्क हवेत, मुळात ते कुणी द्यायची गरज नाही, असं म्हणून आपणच भांडतो! मग सुरुवात आपल्यापासून, आपल्याच घरापासून करायला नको काय? “माझा भाऊ एवढे कमावतो, बायकोला diamond pendant दिलंन्, आणि मला मात्र ओवळणीत पाचशेच रुपये टेकवलेन्” असं म्हणून खट्टू झालेल्या बहिणी मला माहिती आहेत. मला वाटतं, आपण साठवलेल्या पैशातून, एकदा मोठ्या भावाला आपणच छानसं दिवाळी gift द्यावं! हं, मोठ्या भावाने ही मोठेपणाची मिजास न दाखवता, त्या वस्तू पेक्षा तिच्या भावनांना समजून घ्यावं. फालतू अहंकार सोडून पुरुषांनी फराळ, नैवेद्य, पूजेची तयारी करायला उभं राहावं. समजत नसलेलं शांतपणे विचारून घ्यावं, आणि बायकांनी ही ‘ह्यांना न काही म्हणून कळत नाही’ असले टोमणे न मारता प्रत्येकवेळी, तेवढ्याच शांतपणे समजावून सांगावं.

सांगा न, अशी दिवाळी का बरं सुखा-समाधानाची आणि भरभराटीची नाही होणार?

सर्वांच्या चेहेऱ्यावरचा आनंद, हेच तर दिवाळीचं खरं तेज! आपणा सर्वांना ते येत्या वर्षभरात भरभरून मिळत राहो, ह्या माझ्या, दिवाळी नंतरच्या शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..