नवीन लेखन...

डिसिल्व्हा अंकल

डिसिल्व्हा अंकल… छायाचित्रणाची आवड… आयकर विभागातील सुरक्षित नोकरीत स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याच्या निर्णयातून खऱया अर्थाने त्यांची छायाचित्रकारिता फुलली…

छायाचित्रणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर विज्ञान आणि कला या एकाच नाण्याच्या दोन बाजू. सर्वच छायाचित्रकारांना या दोहोंवर पकड मिळवणं तसं जमतच असं नाही. फार मोजक्या छायाचित्रकारांनी मात्र हे सूत्र त्यांच्या कर्तृत्वाने सहज सोपं करून दाखवलंय. अँजेलो डिसिल्व्हा सर हे या कर्तृत्ववान छायाचित्रकारांमध्ये सांगता येईल असं वरच्या फळीतलं नाव. फोटोग्राफीचा चालता बोलता एनसायक्लोपीडिया असलेल्या डिसिल्व्हा सरांनी गेली अनेक दशकं अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांसाठी तसंच फोटोग्राफी एजन्सीसाठी स्टॉक फोटोग्राफी तसंच कमर्शिअल फोटोग्राफी करत आपलं कर्तृत्व सर्वार्थाने सिद्ध केलं आहे.

डिसिल्व्हा सरांना या क्षेत्रात आदराने डिसिल्व्हा अंकल म्हणतात. या नावामुळेच आपसूक नातं जोडलं जातं आणि मग पुढे भीती वजा होत आदराने हे नातं खुलत जातं. डिसिल्व्हा अंकल अगदी नवशिक्या छायाचित्रकारालाही त्याच आत्मीयतेने आणि तळमळीने छायाचित्रणाचे धडे देतात. फोटोग्राफीची इत्थंभूत तांत्रिक आणि व्यावहारिक माहिती जाणून घेण्यासाठी अनेकदा ज्येष्ठ छायाचित्रकार त्यांच्या घरी बैठक मांडत. फोटोग्राफीची इतकी अभ्यासपूर्ण माहिती आपल्या शिदोरीत जमा केलेल्या डिसिल्व्हा अंकलना छायाचित्रणाची गोडी अगदी बालवयातच लागल्याचं ते सांगतात.
डिसिल्व्हा अंकल मूळचे वर्धा जिह्यातले. इथेच त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. पुढे मॅट्रिकच्या-अकरावीच्या शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि वरळी इथून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानिमित्त आलेले अँजेलो नंतर ठाण्यातच स्थायिक झाले आणि उपजीविकेचं साधन म्हणून त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर ते 1970 साली इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये कामानिमित्त रुजू झाले. अँजेलो यांना लहानपणापासून छायाचित्रणाची वेगळी गोडी होती. मात्र हा छंद त्यांना त्या काळी जोपासता आला नाही. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वर्धा आर्ट गॅलरीत त्यांनी आपल्या वडिलांसोबत एक ग्रुप फोटो काढून घेतला होता. या दिवसापासूनच त्यांची छायाचित्रणाची नाळ जोडली गेल्याचं ते सांगतात. यावेळी छायाचित्रकाराने फोटो हे धुण्यासाठी (रासायनिक प्रक्रियेसाठी) एका ट्रेमध्ये ठेवले होते. छायाचित्र आपण जपून ठेवतो. मात्र हा फोटोग्राफर ते का बरं भिजवत असेल आणि छायाचित्रं कशी बरं खराब होत नाहीत या कुतूहलातूनच त्यांना या विषयाची वेगळी गोडी लागली. पुढे नोकरीच्या व्यापातही हा छंद तसा दुर्लक्षितच राहिला होता.
1978 साली त्यांच्या मुलीचा-सरिनाचा-जन्म झाला आणि तिला बघण्यासाठी ते आपल्या पत्नीच्या सावंतवाडीच्या घरी जात असतानाच त्यांच्या ज्येष्ठ भावाने त्यांना एक कॅमेरा भेटवस्तू म्हणून दिला आणि हा दिवस त्यांच्यासाठी सोन्याचा दिवसच ठरला. एकीकडे मुलगी झाल्याच्या, तर दुसरीकडे लहानपणापासून गोडी लावलेला कॅमेरा प्रत्यक्षात मिळाल्याच्या आनंदाने ते हरखूनच गेले होते. याच कॅमेऱयासोबत त्यांच्या छायाचित्रणाच्या प्रवासाचा श्रीगणेशा झाला आणि पुढे 1979 सालापासून त्यांनी छायाचित्रणाच्या नियमित सरावाला सुरुवात केली.

फोटोग्राफी शिकण्यासाठी त्यांनी सुरुवातीला एकादोघांना विचारलंही. मात्र नकारार्थी सुरामुळे त्यांनी हा छंद स्वतः शिकण्याचा निर्णय घेतला. पुस्तकांनाच गुरू मानून छायाचित्रणाची अनेक पुस्तकं त्यांनी विकत घेतली. पुस्तकात लिहिलेल्या माहितीवर केवळ अवलंबून न राहता त्याचा अभ्यास करून तसंच त्याचा प्रत्यक्ष सराव करून ते पाहत असत. यातूनच त्यांच्यावर फोटोग्राफीचे संस्कार झाले आणि त्यांच्या फोटोग्राफीला एक वळण तर लागलंच, शिवाय उंचीदेखील प्राप्त झाली. पुढे फोटो हे निगेटिव्हवरून डेव्हलप कसे करायचे याचं शिक्षणही त्यांनी पुस्तकी अभ्यासातूनच मिळवलं होतं. रासायनिक द्राव्याच्या अमुक एक प्रमाणातून फोटो पुढे कसे तयार होतात याची प्रक्रिया त्यांनी स्वतः करून पाहिली, तर पुढे या प्रक्रियेत स्वतःचा फॉर्म्युला तयार करून फोटोंमधला कॉण्ट्रास्ट, त्यातले रंग अधिक कसे खुलवता येतील याचं तंत्र अवगत केलं. छायाचित्रणातच पुढे उदरनिर्वाह करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि 1990 साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.

छायाचित्रणात सर्वार्थाने ज्येष्ठ समजल्या जाणाऱया याच छायाचित्रकाराचा ठाणे महापालिकेने ‘ठाणे गुणिजन’ हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. गुरुस्थानी असलेल्या याच ज्येष्ठ छायाचित्रकाराचं त्याच्या कॅमेऱयासोबत एक हसरं पोर्ट्रेट मी त्यांच्याच घरी टिपलं. छायाचित्रकाराचं आणि त्यातही गुरुतुल्य ज्येष्ठाचं हे छायाचित्र टिपताना अर्थातच माझ्यावर एक वेगळं दडपण होतंच. अनेकदा छायाचित्रणाचे धडे देणारा, त्यावर भरभरून बोलणारा आणि वेळेला माझ्या चुकांवर बोट ठेवून कानही पकडणाऱया डिसिल्व्हा अंकलनी छायाचित्रणातले बारकावे मला शिकवले. खरं तर छायाचित्रणात त्यांच्याच प्रमाणे मलाही गुरू नाही. पुस्तकेच माझेही गुरू बनले. मात्र डिसिल्व्हा अंकलनी दिलेली छायाचित्रणातली दूरदृष्टी मला माझ्या क्षेत्रात पावलोपावली नवनिर्माणाची गोडी निर्माण करते. त्यांच्याकडे असलेली ऊर्जा, कामासाठीची धडपड आणि छायाचित्रकारांना घडवण्याची त्यांची जिद्द ही नेहमीच थक्क करणारी आहे.

— धनेश पाटील
dhanauimages@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..