दिल की सुनता जा रे : अरूणा ईराणी

नाते संबंधाची एक व्हिडीओ क्लीप एकदा पाहण्यात आली. ३ ते ६ वयोगटातील १० मुलांमुलीच्या डोळ्यावर पट्ट्या बांधण्यात आल्या होत्या. त्यांच्या समोर प्रत्येकाच्या आईला उभे करण्यात आले. मग एकएक करून डोळ्यावर पट्टी बांधलेल्या मुलाला/मुलीला आपली आई कोणती ते ओळखायला सांगितले गेले. मग प्रत्येक मुल समोरच्या आईला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून बघत पूढे जाई आणि बरोबर आपल्या आईला शोधून ही माझी आई असे म्हणे…विशेष म्हणजे सर्वच मुलांनी आपापली आई बरोबर शोधली. स्पर्शज्ञानाचे हे अत्यंत उत्कट आणि उत्कृष्ट उदाहरण होय.

पूढे आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे डोळे व आवाजाने समोरची व्यक्ती ओळखू लागतो. मानवी चेहरा हा ओळख पटविण्याचा सर्वात मोठा केंद्र बिंदू असतो. म्हणून आजही गुन्हेगाराची ओळख आपण चेहऱ्या वरूनच पटवत असतो…अर्थात आजचा आपला विषय गुन्हेगारावर मात्र अजिबात नाही. काही चेहरे अगदी बालपणा पासून ते म्हातारे होई पर्यंत फारसे बदलत नाहीत. अशाच एका चेहऱ्या विषयी मला आज सांगायचं आहे.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

१९६१ मध्ये दिलीप कुमारचा “गंगा जमुना” प्रदर्शीत झाला. यात एक गाणे आहे- “इन्साफ की उगर पर बच्चो दिखाओ चलके……” खेड्यातील एका शाळेत एक शिक्षक हे गाणे म्हणत आहेत आणि मुले त्यांच्या सोबत गात आहेत. या गाण्यात एक सात वर्षांची चुणचुणीत मुलगी सर्वात पूढे बसलेली आहे आणि अत्यंत तन्मयेतेने ती हे गाणे म्हणते आहे. तिच्या चेहऱ्या वरचे ते निरागस भाव आणि काहीसे खट्याळ डोळे खूपचे बोलके..आणि ठसठसशीत लक्ष वेधून घेणारा हनुवटीवरील तीळ… एका मराठी कार्यक्रमात ही मुलगी हेलन बरोबर एका वाहिनीवर दिसली. अगदी तशीच जी मला ‘गंगा जमुना’ मध्ये दिसली होती…काळाने शरीरावरचे थोडे पापूद्रे ठिसूळ केले इतकाच काय तो फरक. बाकी तोच खट्याळपणा, तोच सळसळता उत्साह आणि तोच लक्ष्यवेधी तीळ….मस्तपैकी न बुजता मराठीत तिल्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली……होय ती अरूणा ईराणी.…..तिच्यात मुख्य अभिनेत्रीच्या सर्व क्षमता असतानांही सहकलाकार म्हणूनच सतत पडद्यावर आम्हाला दिसत राहिली…

वडील फरिदुन ईराणी आणि आई शगुणा यांना एकूण ८ आपत्ये. पाच मुले आणि तीन मुली. या भावंडातील सर्वात मोठी अरूणा. आई व वडील रंगभूमीवरचे अभिनेते. त्यांची स्वत:ची एक नाटक कंपनी होती. पण एवढा मोठा गाडा चालवायला रंगभूमी कमी पडू लागली. सर्वात मोठी म्हणून मग काही जबाबदारी अरूणावर येणे स्वाभविकच होते. का कुणास ठावूक पण मुली मुलांपेक्षा लवकर जबाबदार होतात असं माझं मत आहे. कुटूंबातील ओढाताण त्यांच्या खूपच लवकर लक्षात येते आणि मग त्या शाळकरी वयातही प्रौढा सारख्या जबाबदारी शीरावर घेऊ लागतात. अरूणानेही मग तेच केले. “गंगा जमुना”चा निर्माता आणि कथाकार दिलीप कुमार यांनी अरूणाची स्क्रीन टेस्ट घेताना विचारले- तुला संवाद बोलता येतील ना? ती हो म्हणाली आणि तिला या चित्रपटातील अझरा या अभिनेत्रीच्या बालपणाची भूमिका मिळाली.

या चित्रपटा नंतर अनपढ (धर्मेंद्र मालासिन्हा),जहाँ आरा, उपकार, गुनाहो की देवता यात छोट्या मोठ्या भूमिकेत दिसली. मग आला १९६७ मधील जितेंद्रचा “फर्ज”. यातील ‘मस्त बहारोका मै आशिक..’ या गाण्यावर ती जितेंद्र बरोबर चांगलीच थिरकली. यात तिच्या नृत्याची दखल मग पूढे अनेक निर्मात्यांना घ्यावी लागली…. फर्ज त्या वर्षीचा सिल्व्हर ज्युबली हीट ठरला. १९६८ मध्ये कुदंन कुमार या दिग्दर्शकाचा “औलाद” प्रदर्शीत झाला. यात जितेंद्र व बबीता मूख्य भूमिकेत होते. यात विनोद वीर मेहमूदने चार्ली चॅप्लीनवर बेतलेले चमनलाल चार्ली सिंगापूरी हे पात्र मस्त वठवले यात त्याची नायिका अरूणा ईराणीने अस्सल गावरान शोभा ची भूमिका साकार केली. या जोडीने चांगलीच धमाल आणली..यातील या दोघावर चित्रीत केलेले ‘जोडी हमारी जमेगा कैसे जानी’…..हे गाणे पण चांगलेच गाजले. या दोघांनी मग पूढे चांगलीच धूम केली. अरूणाचे फटकेबाज संवाद आणि मेहमुदचे विनवणीवजा संवाद यातुन विनोदाचा वेगळाच बाज समोर येत गेला. निर्माते या जोडीला चित्रपटात घेतानां एक गाणे हमखास या जोडीवर चित्रीत करत. अरूणाने नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले होते त्यामुळे ती कोणत्याही नृत्य प्रकार सहज करू शकत असे.

१९६८ ते ७० या काळात अनोखी रात, आया सावन झूमके, बधंन, बडी दीदी, अनमोल मोती, मेरी भाभी, हिम्मत, आन मिलो सजना, जवाब, हमजोली यातील तिच्या भूमिका लक्षात रहातील अशाच होत्या. विशेष म्हणजे यातील बहूतेक चित्रपट जितेंद्रचे होते तर मेहमूद सोबतीला हमखास दिसे. एक दिवस अचानक अभिनेता मेहमूदला फोन आला. मेहमूदने फोन उचलला. दुसऱ्या बाजूला राज कपूर बोलत होते-
“अरे बाबा तुझ्या बरोबर जी पोरगी नेहमीच काम करते ती कोण?”
मेहमूद उत्तरला-
“कोण? अरूणा ईराणी” !!!
“हो तीच. माझ्या चित्रपटासाठी ती हवी आहे.” आणि अरूणा इराणीला बॉबीतली भूमिका मिळाली…”मै शायर तो नही” आणि “अरे अरे फसा”…या गाण्यावर तिने नृत्य केले.

कुटूंबाचा गाडा अरूणामुळे बऱ्यापैकी रूळावर येऊ लागला. कुटूंबातील सर्वात मोठी कर्तृत्वान पुरूष आता तिच होती. मग आला १९७१ मधील जितेंद्र-आशा पारेख या जोडीचा “काँरवा”. या चित्रपटाचे निर्माते होते ताहीर हुसेन. नासिर हुसेन या निर्मात्या दिग्दर्शकाचे लहान बंधू आणि अमिर खान या अभिनेत्याचे पिता. पचंमदाचे गाणे आणि अरूणा ईराणी यातील आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरले. त्या वर्षी हा चित्रपट सूपर डूपर हिट ठरला….”चढती जवानी” आणि “दिलबर..दिलसे प्यारे”, “गोरीया कहॉ तेरा देस” अशी तिन गाणी अरूणा ईराणीवर चित्रीत केली होती. ही तिनही गाणे तुफान हिट झाले. यातील बंजारन नीशा अरूणा ईराणीने इतकी प्रभावीपणे केली की तिच या चित्रपटाची खरी नायिका वाटावी. कारवाँ हा १९५३ मधील Girl on the Run या इंग्रजी चित्रपटा पासून स्फूर्ती घेऊन केला होता.

कारवाँ नंतर मात्र अरूणाची दखल चित्रपट सृष्टीला घ्यावीच लागली. मेहमूद हा गुणी कलावंत तर होताच पण तो अनेक नव्या चेहऱ्यानां संधी देण्याची रिस्क पण घेत असे. “बॉंबे टू गोवा” या चित्रपटात त्याने अरूणा ईराणीला नायिका तर अमिताभला नायक म्हणून घेतले.अमिताभ नृत्यात खूपच कच्चा तर अरूणा मुरलेली. खूप रीटेक व्हायचे. शेवटी मेहमूदने बस मधील सर्वच कलावंताना सूचना दिली की ‘अमिताभला चिअर्स करत रहा, तो चांगला नाचू शकेल’. अरूणाने यावेळी अमिताभला खूप सहकार्य केले. नतंर पुन्हा मेहमूदच्याच “गरम मसाला” आणि “दो फूल” ती प्रमूख भूमिकेत होती. मग प्रश्न असा पडतो की मेहमूद शिवाय इतर कोणत्याही निर्मात्याला अरूणा ईराणीला नायिकेच्या भूमिकेसाठी का निवडले नसेल? बरं ती दिसायला पण चांगलीच होती. अभिनयात देखील वाईट नव्हती. नृत्याचे धडे गिरवले होते….पण तरीही या चित्रपटसृष्टनं तिला नायिका म्हणून का स्विकारलं नसावं हे एक कोडंच आहे. मला वाटतं आपल्याकडे कलावंतावर अनेकदा जे शिक्के बसतात त्याचाच ती बळी असावी.

आपल्या वैयक्तीक जीवनात तिने भावंडाची उत्तम जबाबदारी पार पडली. इंद्र कुमार, अदी ईराणी, फिरोज ईराणी, बलराज ईराणी, रतन ईराणी हे पाच भाऊ. पैका इंद्र कुमारने दिल, बेटा, राजा, ईश्क,मन,आशिक, मस्ती,धमाल, सुपर नानी सारखे सूपर चित्रपटा दिग्दर्शीत केले. शिवाय अनेक गुजराती चित्रपटात त्याने कॉमेडीयनची भूमिका साकारली आहे. तर आदी ईराणी हा अभिनेता आहे. फिरोज ईराणी मुख्यत: गुजराती चित्रपट व मालिके मधून सक्रिय असतात. बलराज ईरणीने सुहाग सारखे चित्रपट निर्मित कले तर रतन ईराणी यांनी नफरत की आंधी,कसक, अनोखा बंधन,मेरा धरम या चित्रपटांची निर्मिती केली. सुरेखा आणि चेतना या दोन बहिणी देखिल चित्रपट व्यवसायात आहेत. हे सर्व करतानां अरूणा इराणीनां लग्नाला जरा उशरच झाला. संदेश उर्फ कुकू कोहली यांच्याशी तिने १९९० मध्ये विवाह केला. कुकू कोहली हे यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांनी फूल और कांटे, सुहाग, हकिकत,जुल्मी, अनाडी न.१,ये दिल आशिकाना या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय देवगनला पहिला ब्रेक त्यानीच दिला.

चित्रपटसृष्टीतील ज्या कलाकारांनी काळाची पावले ओळखली व त्या बरोबर स्वत:ला जुळवून घेतले ते चित्रपटसृष्टीत कायम स्थिरावू शकले. अरूणा ईराणीने हे ओळखले. त्या स्वत:च्या वयोमानानुसार भूमिका स्विकारत गेल्या. १९९२ मध्ये प्रदर्शीत झालेल्या “बेटा” मधील त्यांची सावत्र आई अप्रतिमच….सुरूवातीला गडद काळी असणारी ही व्यक्तीरेखा हळूहळू बदलत जाते आणि शेवटी मातृत्वाच्या झऱ्यात अकंठ न्हाऊन निघते. या भूमिकेसाठी त्यानां फिल्मफेअरचे उत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्यांनी स्वत:च्या वयापेक्षा अधिक वयाची भूमिका साकारली. दिग्दर्शक त्यांचे लहान बंधू इंद्र कूमार होते. मला वाटतं त्यांनी आपल्या या जबाबदार बहिणीला ही भूमिका देऊन् त्यांचे थोडे फार तरी ऋण नक्कीच फेडले असणार. १९८४ मध्ये दुराई या तमीळ दिग्दर्शकाचा “पेट,प्यार और पाप” नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटात स्मिता पाटील आण अरूणा ईराणी या दोघीनी कचरा वेचणाऱ्या स्त्रीयांची भूमिका केली होती. यात अरूणाने अप्रतिम काम केले आहे. तिच्या अभिनयाचे विविध पैलू यात बघायला मिळतात. या भूमिकेने त्यांना फिल्म फेअरचा पहिला सहनायिकेचा पुरस्कार मिळवून दिला. आंधळा मारतो डोळा,भिंगरी, चंगू मंगू,लपवा छपवी, एक गाडी बाकी अनाडी, बोल बेबी बोल या मराठी चित्रपटात पण भूमिका केल्या. अनेक गुजराती चित्रपटातुनही त्या काम करत आल्या आहेत.

काळाची पावले ओळखून छोट्या पडद्यावरही त्यांनी आपला ठसा उमटविला. देस मे निकला होगा चाँद,मेंहदी तेरे नामकी, तुम बीन जाऊ कहाँ, जमिन से आसमान तक,वैदेही, नागीन वगैरे मालिका निर्मित आणि अभिनीत पण केल्या. त्यांना स्वत: आर्थिक परिस्थितीमुळे इयत्ता ६ वी पेक्षा अधिक शिक्षण घेता आले नाही हे जरी सत्य असले तरी अनुभवाच्या विद्यापिठातुन मात्र त्यांनी डॉक्टरेट केली. चित्रपटसृष्टीतला स्त्रीयांचा संघर्ष हा पुरूषांपेक्षा अनेक अर्थाने वेगळा असतो. त्याचं स्त्री असणं हे पदोपदी नवीन अनुभव देणारं असल्यामुळे अशा झगमगत्या मोहमयी नगरीत टिकण्यासाठी खूप काही सहन करावं लागतं. पण अरूणा ईराणीच्या चेहऱ्यावर कुठलाच कटूपणा आजही दिसत नाही किंवा त्या दिसू देत नाहीत. सन २०१२ मध्ये त्यांना फिल्म फेअरचा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला तो वयाच्या ६६ व्या वर्षी. पण त्या तितक्याच उत्सहाने आजही आपल्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्या मनातली कोणतीच खंत त्यानी कुठे व्यक्त केल्याचं आठवत नाही. आपल्या सोबतच्या इतर कलावंता बद्दलही कधी कटुतेचे बोल बोलल्याचं आठवतं नाही मात्र एकदा एका मोठ्या अभिनेत्याचे नाव न उच्चारता त्या बोलल्या होत्या की ज्या मेहमूदने त्याला त्यांच्या पडत्या काळात मदत केली होती तो मात्र मेहमूदला विसरला. त्यांनी स्वत:ही अनेकानां निस्वार्थी मदत केली आहे त्यामुळे कदाचित त्यानां हे खटकले असावे.

१८ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस …..वयाची ७३ वर्षे पूर्ण करणाऱ्या व अफाट परिश्रम करून आपल्या नावाची नोंद या मोहमयी दुनियेत करणाऱ्या अरूणा ईराणी यांना उदंड व निरोगी आयुष्य मिळो.

— दासू भगत

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....