नवीन लेखन...

दिगंबर

“चल यार, बस कर. सकाळपासून खूप काम केलेस. जरा चहा घेऊन येऊया.”
नवीन ऑफिसमध्ये पहिल्यादिवशी हे धाडस दाखवणे कुणाला जमेल असे वाटत नाही. कमीतकमी मुकाटयाने काम करत बसलेल्या सिनियरच्या खांद्यावर तरी कोण हात टाकणार नाही. पण दिगंबरला त्याचे काही वाटले नाही. मी हैराण झालेला त्याने कधी पाहिले नव्हते.
“अरे एवढा हैराण काय होतोयस? चल ना.”
गॅरेजमध्ये आलेल्या कुठल्यातरी मोठया साहेबाने “माझ्याबरोबर चला.” म्हटल्यावर हातातले काम बंद करून तिथले कामगार ज्या आत्मीयतेने जातात तसा मी त्याच्यामागे निघालो.
“कुठे आहे पॅन्ट्री?”
मी त्याला पॅन्ट्री दाखवली. त्याने टपरीवर मागतात त्या सहजतेने “दोन चहा आण रे…” अशी शिपायाला ऑर्डर सोडली आणि शिपाईही उडाला. जनरल मॅनेजरशिवाय एवढया हक्काने त्याच्याशी कोणीच बोलत नव्हते. मी आणि दिगंबरने जवळजवळ एकत्रच कंपनी जॉईन केलेली. मी त्याला सिनीयर असलो तरी दोन महिन्याच्या सिनीअॅरिटीने तसा विषेश काही फरक पडत नाही. दिगंबर पहिल्याच दिवशी ट्रेनी म्हणून जॉईन झाला पण हा पोरगा ट्रेनी आहे यावर कुणाचा विश्वास बसला नसता. ह्याने आल्यापासून एक प्रकारचा वटच ठेवला होता.
मी मुंबईत आल्यानंतर माझे म्हणावे असे कुणीच नव्हते. नंतर जो गोतावळा झाला आणि खडतर वेळेत ज्यांच्यामुळे मी मुंबईत तग धरू शकलो त्यापैकीच हा एक मित्र. तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे पण त्याच्या मोकळया स्वभावाने कधीही वयाचे अंतर जाणवू दिले नाही. हा दिगंबर नावाचा धडा माझ्या आयुष्यात आला नसता तर माझा किती तोटा झाला असता हे सांगणे अवघड आहे.
सगळयात पहिले म्हणजे दिगंबर आमच्या ऑफिसमध्ये आला आणि माझ्या होणार्‍या बायकोला पत्र पाठवायला एक परमनंट पत्ता मिळाला. त्यावेळी मी भांडुपमध्ये रायसाहेब भय्याच्या चाळीत आण्णांच्या आठ बाय दहाच्या खोलीत भाडयाने रहायचो. चाळीत वीसेक खोल्या होत्या, अतिशय सभ्य! तिचे पहिले पत्र आले ते पोष्टमननेच फाडून दिले असे मला शेजार्‍यांकडून सांगण्यात आले. पोष्टमनला असले छंद केव्हापासून लागले हे समजायला मार्ग नव्हता. चाळीत लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकवायला नुसते घराचे उघडे दरवाजे पुरेसे होत नाहीत हे खोटे नाही. वास्तविक लोकांची बंद पाकिटातली कागदपत्रे आली की शेजार्‍यांचं कुतूहल जागं होतं हे मान्य आहे, त्यातूनही रंगीबेरंगी आणि जाडजूड पाकिट असेल तर कधी एकदा ते फोडून आत काय आहे ते बघायचा मोह कुणाला होणार नाही?
त्यावेळी एक अतिशय सभ्य मुलगा म्हणून चाळीत माझा लौकिक होता. ज्याच्याकडून चाळीतल्या स्फोटक वस्तूंना कसलाही धोका संभवत नाही अशा कॅटॅगरीतला मी मुलगा होतो म्हणून मोठे लोकही माझ्याशी आदराने वागायचे. कशी कोण जाणे, मला रंगीबेरंगी पाकिटातली पत्रे येतात ही बातमी चाळीत पसरली आणि आमच्या खोलीवरून येता जाता तिरका कटाक्ष टाकणार्‍या एका अत्यंत रम्य जांभळाच्या झाडाने माझ्याकडे विशिष्ठ नजरेने पहाणे सोडून दिले. जांभळया रंगाची ओढणी आणि ती घेणारी रमणी, आहाहा! ईश्वराने ते शिल्प खूप फुरसतीत बनवले होते यात वादच नव्हता. मला वाईट वाटले, पण इलाज नव्हता.
दिगंबरचा पत्ता दिल्यापासून सगळी पत्रे न उघडता मला मिळू लागली. लिहायची खोड तेव्हापासूनच लागलेली. मग दिवाळी अंक, काही साहित्यविषयी मासिके त्याच्याच घरी यायची. दिगंबर अशी छापील पुस्तके काही घेणे ना देणे अशा भावाने मला आणून द्यायचा, पण बायकोचे पत्र आले की आता काय विषेश म्हणून विचारल्याशिवाय रहायचा नाही.
या माणसाची जडणघडणच वेगळी आहे. आत्मकेंद्री पांढरपेशांसारखा याचा स्वभाव नाही. हा सार्वजनिक माणूस आहे. कुठलीही ओळख नसलेल्या माणसाला काही प्रॉब्लेम असेल आणि बोलता बोलता याच्या कानावर तो पडला की हा लगेच त्याला सांगायला जाणार! मग तो कोण, कुठला, काय करतो, आपण सांगितलेले त्याला आवडेल की नाही याच्याशी त्याचे घेणे देणे नसते. कधी ऑफिसला यायला लेट झाल्यावर फोन केला की दिगंबर स्टेशनवर हजर. पोष्टात पत्र टाकायचे आहे जाऊ या का म्हटल्यावर दिग्या गाडीच्या एका चाकावर तयार. कुठल्याही साहेबाने घरातले एखादे कपाट हलवायचे आहे म्हटल्यावर दिगंबर ते कपाट साहेबाचे मन बदलले तरी हलवल्याशिवाय सोडत नसे. आपल्या कामाच्या नावाने बोंब का असेना, दिगंबर सगळया गावाची कामे अंगावर घ्यायचा आणि ती निभावून न्यायचा. याच स्वभावामुळे त्या एरियातल्या श्रध्दा पानबिडी शॉपवाला बंडया ते समर्थ हेयर कटिंग सलूनवाला नारु ह्यांच्याशी त्याची अत्यंत खाजगी ओळख आहे.
एरियाचा निकष वगळला तर त्याच्या ओळखीचा माणूस भेटणार नाही असे कार्यक्षेत्र जगात नसेल. कुंडली बनवणार्‍या ज्योतिषापासून फक्त एकच अवयव रिपेअर करण्यात पारंगत असणारे डॉक्टरदेखील दिग्याला नावाने ओळखतात. बर्‍याच दिवसांनी तो त्यांच्याकडे फिरकला की “काय दिगंबर, खूप दिवस आला नाही आमच्याकडे?” म्हणून चहाची ऑर्डर देतात आणि दिगंबर पेशंटची “क्या दुखता है?” अशी चौकशी करत बाजूच्या खूर्चीवर बसतो. याच्यासाठी खूर्ची ही बसायचे साधन आहे. एखाद्या कंपनी डायरेक्टरच्या खुर्चीवरही दिगंबर थेटरातल्या खुर्चीवर ज्या सहजतेने बसतात तसा बसतो. तिथे छोटा किंवा मोठा हा भेदभाव नाही. दहा दहा वर्षे काम करूनही हाताखालचे लोक ज्या मॅनेजरशी बोलताना थरथर कापतात त्या मॅनेजरला हॉटेलात जेवताना हा दिगंबर “लाल कांदा खायेगा तो आखोंसे पानी आता है, सफेद कांदा खाना.” हे बिनधास्तपणे सांगतो आणि वेटरला “और कांदा लाव…” म्हणून ऑर्डर सोडतो.
आजचे आयुष्य जगणारा हा माणूस आहे. उद्याची चिंता, काळजी, फिकीर नावाचा प्रकार नाही. या माणसाने वाया जाणार्‍या पैशांकडे कधी पाहिले नाही. तीच दृष्टी येणार्‍या पैशांकडेही! पगार झाला की त्याची आठवडयात पद्धतशीर विल्हेवाट कशी लावायची हे दिग्याकडून शिकावे. एकूण नाद म्हणण्यासारखे ह्याला धंदेही नाहीत. चहा आणि कॉफीशिवाय कुठलाही उत्तेजक पदार्थ तो घेत नाही, सिगरेट पित नाही, गुटख्याचा वासही ह्याला चालत नाही. तरीही खिशात शंभर आले, टाक गाडीत पेट्रोल, जा कुठेतरी. पन्नास आले, जा हॉटेलात जेवायला. आपल्याकडे पैसे नसतील तर आपण उद्या काय करू, हा विचार त्याला खिशात पैसे असल्यावरच काय नसल्यावरदेखील शिवत नाही.
साहेब ज्यावेळी ट्रेनमधून यायचे त्यावेळी दिगंबरकडे होंडाची बाईक होती. साहेबांकडे नव्हता त्यावेळी दिग्याकडे मोबाईल होता. त्यावेळी कॉल घ्यायलाही पैसे पडायचे. पण साहेब काहीतरी बोलतील म्हणून तो त्यांच्यासमोर कधी मोबाईलवर बोलायचा नाही. सधन आणि सज्जन कुटुंबातला हा मुलगा. त्याचे एखाद्याशी जमायचे नाही (असे बहुधा व्हायचेच नाही), त्याच्याकडे हा ढुंकूनही बघायचा नाही. कुणाशी कसे वागावे याचे त्याला उपजत ज्ञान होते. दहाएक वर्षे एकत्र घालवलेल्या काळात दिग्या कुणाशीही आकस किंवा कुटील नीतीने वागला आहे हे मला तरी आठवत नाही. खरोखर हा माणूसच भारी आहे.
त्यावेळचे आमचे डिपार्टमेंट म्हणजे आमच्या साहेबांचे स्वत:चे छोटेसे राज्यच होते. न विचारता कुठेही गेलेले त्यांना अजिबात चालायचे नाही. दिगंबरला काही खायची इच्छा झाली किंवा स्पेशल चहा प्यायचा असला की हा हळूच मला विचारायचा. मी त्याच्याबरोबर जाणे लांबच, त्यालाच जाऊ नको म्हणून घाबरवायचो. साहेबांच्या नजरेतून सुटशील पण वॉचमन पकडतील वगैरे त्याला सांगायचो, पण दिगंबरला त्याचे काही नसायचे.
“साल्या, बाहेर जाताना चेहर्‍यावर एक आटिटयुड आणावा लागतो.”
“कसला?”
“एवढया कॉन्फिडन्सने बाहेर जायचे की आपणच साहेब वाटले पाहिजे. तुझ्याकडे पाहिल्या पाहिल्या वॉचमन हाक मारून अडवतील.”
“अरे पण वॉचमनने पकडले आणि त्याने साहेबांना फोन केला तर?” माझी रास कन्या आहे हे अजून नव्याने सांगायला नको!
“केला तर केला. साहेब काय बोलणार आहेत? त्यांना त्यांच्या नोकरीची काळजी नाही का? वॉचमनला ह्याला मीच पाठवला होता असे सांगतील. आपल्याला प्रायव्हेटमध्ये झापतील, नाही असे नाही. पण असे काही होणार नाही. तू न घडणार्‍या छोटया छोटया गोष्टींचा खूप विचार करतोस यार!”
त्याचे बाबा, काका आणि मामा आमच्याच कंपनीत असल्यामुळे त्याला कंपनी म्हणजे फार काहीतरी अचाट प्रकार वगैरे वाटला नाही. ऑफिसमध्येही अगदी घरच्यासारखा वागायचा. आम्ही दुसर्‍या मजल्यावर असायचो. बर्‍याचदा शॉपफ्लोअरवर त्याच्या मामाला भेटायला तो मला घेऊन गेला आहे. नंतर मामाचीही पक्की ओळख झाली.
अशा स्वभावामुळे हा निवांत असायचा आणि मी कामात. त्याचं काम करण्याचं टेक्निकच मला उमगत नव्हतं. एकदिवशी ते समजून सांगण्याचा त्याने अनुग्रह केला. त्याच्या उपदेशानंतर मी अवाक् झालो. साहेबानी काम सांगितलं की हातातलं जे काही आहे ते टाकून द्यायचं. फक्त सांगेल तेच करायचं. मग ऑफिसमधलं आधी करत होतो ते काम किती महत्वाचं आहे हे बिलकुल बघायचं नाही. दोन दिवसांनी साहेबांनी ते काम अर्धे का म्हणून झापल्यावर त्यांना “मी तुम्ही दिलेली कामेच करतो असे सुनवायला काही प्रॉब्लेम आहे का तुला?” असे मलाच विचारले. त्याची ही मेथड मी दोनचार दिवस वापरून बघितली, फार सुखाचं वाटलं पण मला ते जमण्यासारखं नव्हतं.
दिगंबरने इलेक्ट्रॉनिक्सचा दोन वर्षाचा कोर्स केला आहे. त्यामुळे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक गोष्टींबद्दल तो हक्काने बोलतो. कुठल्याही ओळखीच्या मित्रांत इलेक्ट्रॉनिक वस्तंूची खरेदी करायची म्हटल्यावर दिगंबरचा सल्ला आलाच. तेही वस्तूचे कॅटलॉग घेणार नाहीत पण दिग्याच्या सल्ल्याशिवाय काहीही घ्यायच्या भानगडीत पडत नाहीत. दिग्याला नुसते तेच ठाऊक असते असे नाही तर कुठली वस्तू कुठल्या दुकानात चांगली मिळते हे सांगण्याचीही त्याला उपजत खोड असते. त्यामुळे बहुतेकदा ऑफिस सुटल्यावर दिगंबर स्वत:च्या घरी न जाता कुठल्यातरी मित्राचा मोबाईल घ्यायला स्वत:चे अर्धा लीटर पेट्रोल जाळून जातो आणि त्याचा मोबाईल घेऊन झाल्यावर नाष्टयाचेही बिल तोच देतो.
कुठल्याही दुकानात शिरल्यावर दिगंबरची बॉडी लँगवेजच बदलते. काहीही कारण नसताना तो काऊंटरवरच्या पोर्‍यांना हात करून “क्या दोस्त, कैसा चल रहा है?” असे विचारतो. तेही गोंधळून “एकदम झकास!” वगैरे म्हणून जातात. दुकानात गेल्यावर तो नेमका काय घ्यायला आलाय हे त्या पोर्‍यांनाच काय मालकांनादेखील कळत नाही, म्हणजे तो थांगपत्ताच लागू देत नाही. मोबाईल घ्यायला गेल्यावर तो कॅमेरा आणि मेमरी कार्डांच्या किंमती विचारतो, इंपोर्टेड हेडफोन स्वस्त झालेत का महाग याची चौकशी होते, मागे दुसर्‍याच दुकानातून नेलेल्या कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या क्वालिटीचा पंचनामा करून होतो. एकंदरीत आपल्या जन्मापासून आपण त्याच्याच दुकानात खरेदी करत आहे असे त्या दुकानदाराला भासवतो आणि शेवटी हवे असलेल्या मोबाईलच्या किंमतीला हात घालतो.
“बाईससौ पचास.”
“क्या सेठ, पंधरा दिन पहले तो ये मोबाईल दो हजार को लेके गया, अभी बाईससौ पचास कैसा? अपना कस्टमर के लएि भी ऐसा रेट लगाता है क्या?”
एवढया हक्काने बोलल्यावर दुकानदारही एवढया ओळखीच्या गिर्‍हाईकाला आपण कसे काय विसरलो म्हणून बुचकळयात पडतो आणि एकोणिसशे रुपयांना मोबाईलची खरेदी होते.
तसा दिगंबरही छोटासा बिझनेसमनच होता. नोकरीबरोबरच रिपेरिंगची छोटी मोठी कामे करायचा. स्ट्रगलिंगचाच काळ होता तो! सुटे स्पेअर आणून कॉम्प्युटर तयार करणे, ते खपवणे, त्याच्याकडे आपलीच वस्तू कशी चांगली आहे हे पटवून सांगण्याचे कसबही असे होते की हा सेल्समन का झाला नाही याचे कुणालाही आश्चर्य वाटावे. मग दिलेल्या वस्तूंमध्ये कधी कधी प्रॉब्लेम यायचे. नेमकी गडबड असेल अशावेळी कॉल घेताना त्याची जाम तारांबळ व्हायची. कस्टमरलाच तो “कसा काय प्रॉब्लेम आला?” म्हणून विचारायचा आणि संध्याकाळची अपॉईंटमेंट देऊन टाकायचा. प्रॉब्लेम येतील नाहीत काय होईल? ह्याचा कॉम्प्युटर त्याच्या घरात, त्याचा प्रिंटर दुसर्‍याच्या घरात. अगदीच काही नाही सापडले तर मित्राच्या (दुसरा एक बिझनेसमन, ह्याच्या लोनच्या फॉर्मवर दिगंबरने गॅरंटर म्हणून सही केलेली असल्याने दिगंबरला त्याच्या ऑफिसमध्ये काहीही करायला परवानगी असते) स्टोअर रुममध्ये जाऊन एखादी वस्तू चालू करून कुणालातरी दे, असे त्याचे उद्योग सुरू असायचे.
एकदा ऑफिसमधून बाहेर पडला की आपल्या पाठीमागे काही काम आहे हे तो साफ विसरून जायचा. कधी कधी तो त्याच्याबरोबर मलाही घेऊन जायचा. त्याच्या गाडीवर बसायला खूप भीती वाटायची. एकतर मला सायकलही नीट चालवता येत नाही आणि हा बाबा ऐंशी पंच्याऐंशीशिवाय चालवायचा नाही. त्याला चिकटून मी बसायचो आणि तो मला “साल्या माझी गर्लफ्रेंडही अशी बसत नाही, जरा नीट बस.” म्हणून फटकरायचा. त्याच्या मागे बसण्याची भीती घालवायला मला दुसर्‍या एका भन्नाट मित्राच्या गाडीवर बसावे लागले. त्याचा काटा गाडी थांबताना सोडली तर नेहमी शंभराच्यावर असतो हे अनुभवल्यानंतर दिगंबरबरोबरचा प्रवास सुरक्षित वाटू लागला.
खाण्याच्या बाबतीत दिग्या एकदम चोखंदळ आहे. कुठे काय चांगले मिळते या विषयावर त्याची मास्टरी आहे. कन्न्मवारनगरमधली मुगभजी, मग पुढच्या चौकातला चहा, कुठल्या हॉटेलमधली पावभाजी, कुर्ल्याच्या नाझमधली तंदुरी या सगळयांच्या चवी दिगंबरमुळे कळू शकल्या. उन्हाळयाच्या सुट्टीत आमची खाणावळवाली मावशी गावी गेली आणि कॅन्टीनचे खायचा कंटाळा आला की आम्ही बाहेर जायचो. मग कुठे जायचे आहे, काय खायचे आहे ते तोच ठरवायचा.
एकदा साहेब नाहीत म्हणून स्टेशनवरच्या सत्कारमध्ये पुलाव खायचं ठरलं. तिथे जाऊन बसलोही, पण दिगंबरला अचानक पावभाजी खायची कल्पना सुचली आणि तो म्हणाला, “इथं पावभाजी चांगली मिळत नाही. मोहिनी विलासमध्ये चल.” मला खरं म्हणजे उठायचं जीवावर आलं होतं कारण रणरणत्या उन्हातून आम्ही आल्याचे बघून त्या वेटरने थंड पाण्याचे ग्लास तेवढयाच थंडपणे आणून ठेवले होते.
दिगंबरने त्या वेटरच्या खांद्यावर थाप टाकली. त्याच्या हातातल्या प्लेटी पडता पडता वाचल्या. हा असा काय करतोय ते मला कळेना. अगदी हसत तो म्हणाला, “आण्णा, आज थोडा चेंज करेगा. उधर जाके पावभाजी खाता है.” तोही केविलवाणे हसत “वोके वोके.” म्हणाला.
तिथून बाहेर निघालो आणि ह्याला कोणतरी ओळखीचा दिसला.
“काय रवी इकडे कुठे?” ऑफिसमधली कामे ह्याच्या लक्षात रहात नाहीत पण असंख्य लोकांची नावे मात्र ह्याच्या बरोबर लक्षात रहातात.
त्या रवीने जाग्यावरच उभा राहून उगीचच पोटात गडगडल्यासारखा चेहरा केला.
“काय रवी इकडे कुठे?” जाऊन हातात हात दिल्यावर आणखी एकदा प्रश्न विचारायचाच असतो.
“हां इकडे मित्राच्या घरी आलो होतो.”
“मला ओळखलंस ना?”
रवी त्याच्याकडे सोडून माझ्याकडेच त्याची आणि माझी सात जन्माची ओळख असल्यासारख बघू लागला. मीही हसलो.
“चेहरा बघितल्यासारखा वाटतोय.”
मला दिगंबरची कधी कधी रस्त्यात कुणालाही उभा करून “मला ओळखलसं का?” म्हणून विचारेल अशी भीती वाटते.
“अरे विहंगबरोबर निशांत असतो बघ. त्याचा मी मित्र.”
आता या रवीचा मित्र विहंग. तो आणि निशांत आठवडयातून एकदा कधीतरी एकदा भेटतात आणि दिग्या आणि निशांत पंधरवडयातून कधीतरी. त्या बिचार्‍याला रवीला थांबवून घेऊन हा ओळखलंस काय म्हणून विचारतोय!
“हो का?”
“माझे नाव दिगंबर.” त्याला अतिशय आवडणार्‍या एका सुंदर मुलीची स्वत:हून ओळख करून घेताना तिने दोनवेळा नाव विचारल्यावर दिगंबर लाजल्याचे आठवते. एरव्ही तो बेधडक बोलतो.
“अच्छा अच्छा.”
“बाजूला चला.” त्यांचे हस्तांदोलन चालले होते तेवढयात बाजूने एक रिक्षावाला विमानासारखी त्याची रिक्षा घेऊन गेला. एकदा बोलण्यात गुंतला की दिगंबरचे आजुबाजूला लक्ष नसते, ती काळजी मी घेतो. त्यांच्यात कोणताही विषय चालला असला तरी माझी नजर ट्राफिक हवालदारासारखी बाजूने जाणार्‍या वाहनांवर असते.
“चल येतोस मोहिनी विलासमध्ये? पावभाजी खाऊया!” त्याला कॉफी प्यायला, सँडविच खायला, जेवायला अगदी ओळखीचाच माणूस पाहिजे असे काही नसते. दुरच्या मित्रांबरोबरही (म्हणजे मित्राच्या मित्राचा मित्र वगैरे) तो पटकन रंगून जातो.
“नको. मला थोडी गडबड आहे.” असे म्हणून रवी सटकला.
मोहिनी विलासमध्ये दिगंबरने कोपर्‍यातली सीट पकडली. ही त्याची नेहमीची सीट आहे. रोज संध्याकाळी तो इथे बसून चहा वगैरे घेतो. आल्या आल्या वेटरला ऑर्डर द्यायची सोडून तो डायरेक्ट किचनमध्ये घुसला आणि कुठल्यातरी माणसाला पावभाजीची ऑर्डर देऊन आला. थोडया वेळाने एका वेटरने पूर्वजन्माची ओळख असल्याप्रमाणे हसत आमच्यापुढे पाण्याचे ग्लास आणून ठेवले. मीही उगाचच त्याला ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला. बाहेर ऊन रखरखत होते. पाणी प्यावे म्हणून ग्लासला हात लावला आणि मी उडालोच. बाजूची चार टेबले माझ्या हैराण आरोळीने हादरली. माझ्या पुढच्या टेबलावरचं पोरगं आल्यापासून किरकीर करत होतं ते रडायचं थांबून माझ्याकडे बघू लागलं.
दिगंबरने आश्चर्याने विचारलं, “काय झालं रे?”
“अरे गरम पाणी दिलंय प्यायला.”
“हां. आमचं पाणी.”
“काय?”
“अरे आम्ही रोज येतो ना, त्यावेळी गरम पाणीच घेतो.”
“पण बाहेर केवढं ऊन आहे. एक मका टाकला तर त्याचा पॉपकॉर्न तयार होईल. आणि त्यात हे असलं पाणी प्यायचं?” यावर तो वेटरही हसला. वास्तविक या उन्हामुळं माझ्या डोक्याचा पॉपकॉर्न झालाच होता. मी जरा घुश्श्यातच म्हणालो, “ठंडा पाणी लाव.”
“काय आहे, गरम पाणी पिल्यावर तुझे सगळे विकार जातात.” दिगंबर सुरु झाला.
“पण मला कुठे विकार आहेत?”
“तुझे म्हणजे सगळयांचे.”
“हं. मग ठीक आहे.” काहीही कारण नसताना मला कसल्याही विकारांचा बळी द्यायला लागल्यावर मी घाबरलो.
अशा कितीतरी ठिकाणी आम्ही खाल्ले आहे. मुंबईवरून पुण्याला बाईकने गेलो आहे. लोणावळ्यात जांभळे खाल्ली आहेत. एकत्र नाटके पाहिली आहेत. माथेरानला दोस्तांबरोबर अंधारातून ट्रेकिंग केले आहे. पण कंपनी बदलल्यावर हा माझा मित्र खूपच बिझी झाला. इतका की रविवारीदेखील वेगवेगळ्या साईटसवर त्याचे काम सुरु असायचे. मग भेटण्याबरोबर फोनही कमी झाला आणि आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात व्यस्त झालो. मध्यंतरी काहीतरी एका किरकोळ कारणाने तो माझ्यावर रुसला होता. त्याचा रुसवा जायला तीन वर्षे लागली. पण रुसवा निघाला हे महत्वाचे. माझ्या आयुष्यात जी काही मोजकी आणि खूप जवळची माणसे आहेत, त्यात दिग्याचे स्थान खूप वरचे आहे.
चरित्रनायकाचे लग्न होऊन दहा वर्षे झाली आहेत. नशिबाने बायको चांगली आहे. एक गोंडस मुलगा आहे. मध्यंतरी चांगल्या नोकरीची संधी आल्यावर त्याने कंपनी बदलली. भरगच्च पगारावर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पहातोय. मुंबईत स्वत:चे घर, हौस म्हणून कार, नेहमी फिरायला बाईक असे लाईफ आहे. कितीतरी फॉरेन टुर झाल्या. फेसबुकवर त्याचे फोटो पहायचो. एकदिवशी त्याचा मला फोन आला.
“काय दिग्या, खूप दिवसांनी आठवण आली?”
“फोनवर नाही सांगत. स्टेशनला ये ना, मुलुंडला एक नवीन चायनीज चालू झाले आहे. मस्त आहे. आपण जेवायला तिकडेच जाऊया.”
मी बायकोला कॉल करून दिगंबरबरोबर जेवायला जाणार आहे म्हणून सांगितले. लगेच सँक्शन मिळाली. त्याच्याबरोबर मसणात जरी चाललो तर बायको नाही म्हणणार नाही एवढा दिग्यावर तिचा विश्वास आहे. निवांत वेळेला कुणाबरोबरही बोलता येणार नाहीत अशा नाजुक गोष्टी तो माझ्याशी शेअर करतो. मग जुन्या आठवणी निघतात. कधी आनंद वाटतो, कधी हुरहुर. गप्पांच्या ओघात किती वेळ गेला ते समजत नाही. घडयाळाचे काटे जाग्यावरच थिजतात, किंबहुना मागे जातात. अशावेळी हॉटेलमधले वेटर वेळेची जाणीव करून देतात.
आमच्या गप्पा संपवून आम्ही उठलो त्यावेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. मी घडयाळात पाहिल्यावर दिग्या म्हणाला, “चल मी तुला घरी सोडतो.”
“नको यार. खूप उशिर होईल. मी ट्रेनने जाईन.”
पण ऐकेल तो दिगंबर कसला? त्याने गाडीला किक मारली, मला मागच्या सीटवर बसवले आणि माझ्या बिल्डींगच्या खाली आणून सोडले. वर चौथ्या मजल्यावर न येताच तो पुन्हा जायला निघाला. जास्त काही नाही, फक्त पाणी तरी पिऊन जा म्हटल्यावर “खूप उशिर होतोय, तुझ्या बायकोच्या हातचे पोहे खायला पुन्हा कधीतरी येतो.” म्हणून तो गेलादेखील!
खरोखर खूप उशिर झाला होता नाहीतर दिग्या तसा गेलाच नसता. कारण कांदेपोहे हा त्याचा वीक पॉईंट आहे. ऐन जेवणावेळी येऊन पक्वान्नांऐवजी हिला पोहे करून मागणारा आणि पोट भरल्यावर “मजा आली यार…” म्हणून तृप्त भावाने निघणारा हा माणूस कुणाच्याही समजण्यापलीकडचा आहे!

©विजय माने, ठाणे

https://vijaymane.blog/

Avatar
About विजय माने 21 Articles
ब्लॉगर व खालील पुस्तकांचे लेखक : १. एक ना धड (सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक २००८. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा राज्यपुरस्कार) २. एक गाव बारा भानगडी ३. All I need is just you! (English). मराठीतील ‘आवाज’ व इतर अनेक नामवंत दिवाळी अंकातून लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..