नवीन लेखन...

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग दोन

ही डायरी वाचण्यासाठी उघडली. पहिल्याच पानावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, ‘देशाचा इतिहास संपवा, संस्कृती संपेल. इतिहासाला गाडून टाका, भविष्य पोरकं होईल!’

हे काहीतरी भयावह होतं. अनाकलनीय होतं. मेंदूला झिणझिण्या आणणारे शब्द होते. काय असावा त्याचा अर्थ? कुणाची होती ही डायरी?
कुणी लिहून ठेवली? ‘त्या’टॅगलाईन मधून काय सुचवायचं होतं?

प्रश्न पडत गेले आणि डायरीची पानं चाळताना लक्षात आलं. डायरी जीर्ण झाल्यानं प्रश्नांबरोबर पानंसुद्धा गळून पडतायत. झाडाच्या सुकलेल्या पाचोळ्याचा जसा चुरा व्हावा, तशी डायरीची पानंसुद्धा चुरली जात आहेत. मग त्यातली वाचता येतील अशी काही पानं, हलक्या हातानं अलगद बाजूला काढली.
वाचू लागलो.

पान क्रमांक पंधरा

स्वातंत्र्य मिळाल्याच्या आनंदाबरोबर नव्या भारताच्या उभारणीत आपल्याला काही स्थान मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण अचानक दिल्लीहून तार आली. इतिहास लेखन आणि पुरातत्व विभागाच्या समितीत आपल्याला स्वीकृत सदस्य म्हणून घेतले आहे.

खूप आनंद झाला. आपल्या इतिहासविषयक संशोधनाचा, प्राचीन संस्कृतीचा अन्वयार्थ लावण्याच्या प्रयत्नांचा, प्राचीन मंदिरे, संस्कृत भाषेतील विविध विषयांवरील असंख्य ग्रंथ, त्यांचे अनन्यसाधारण महत्व, त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास, प्राचीन विद्यापीठे, वास्तू, शिल्पकला, रंगज्ञान, लिपी यांचा अभ्यास आणि त्यासाठी वेचलेल्या संपूर्ण आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

पान क्रमांक शंभर

काहीतरी बिघडत आहे असं सारखं जाणवतंय. पद्म पुरस्कारासाठी आपली शिफारस झाल्याची बातमी, मनाला सुखावून गेली. त्याचवेळी संपूर्ण भारतात विषयानुरोधाने फिरण्यासाठी खास व्यवस्था, पंचतारांकित निवासव्यवस्था, मुलांना मोठ्या पदावर नोकऱ्या आणि घसघशीत मानधन. हे अपेक्षिलेलं नव्हतं.
साधी राहणी उच्च विचारसरणी या आपल्या तत्वात हे बसत नव्हतं. पण मिळालेल्या सुखोपभोगाचा मोह या वयात देखील टाळता येत नव्हता. पण कुठेतरी काहीतरी बिघडत होतं. नक्की.

पान क्रमांक एकशेवीस

समितीच्या कामात बिनसरकारी लोकांची लुडबूड वाढत आहे आणि आपण तयार केलेल्या मसुद्यात जाणीवपूर्वक बदल केला जात आहे, हे उघडपणे जाणवत होतं. पण सुखोपभोगाची लालसा तोंड उघडू देत नव्हती. सगळ्यांची अवस्था तशीच होती. आपण विकले जात आहोत अशी भावना मनाला टोचू लागली होती. यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. अर्थात मोह अनावर होता.

पान क्रमांक दोनशे

आज वाईट वाटलं. स्वतःची स्वतंत्र प्रज्ञा गहाण पडली होती. स्वतंत्र भारतात जेत्यांच्या इतिहासाला गौण स्थान द्यायचं आणि परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण, दैवतीकरण करायचे असा तोंडी आदेश आला होता. तो कुणी दिला, कशासाठी दिला, त्याची सत्यासत्यता पारखावी, मंत्रालयात थेट चौकशी करावी, असं कुणालाही वाटलं नाही. दोनच दिवसात आमच्या हाती एक अहवाल देण्यात आला आणि त्यावर स्वाक्षऱ्या कराव्यात असा आदेश पण आला. आम्ही प्रयत्नपूर्वक तयार केलेला अहवाल जाणीवपूर्वक बाजूला करण्यात आला आणि या रेडिमेड अहवालावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. प्रज्ञेचा, स्वाभिमानाचा, प्रयत्नांचा खून करण्यात आला आणि स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकांना, त्यांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेची सदैव आठवण राहील असा इतिहास लिहिण्याची शिफारस केली गेली. संस्कृतीवर दिवसाढवळ्या दरोडा घातला गेला. त्यासाठी अगोदरच ठरवलेले तज्ज्ञ बोलावले गेले आणि आमच्या हाती नारळ देण्यात आला. अगदी सन्मानपूर्वक.

पान क्रमांक दोनशेपन्नास

डायरी लिहिण्याची सवय लावून घेतली होती, ते एका अर्थी चांगलेच होते म्हणायचे. भविष्यात कुणाच्या तरी हाती ही डायरी लागेल आणि त्यावेळी अनेकांना कळेल की आम्ही अभ्यासपूर्वक केले काय आणि सरकारी पातळीवर झाले काय.

हजारो वर्षांचा दैदिप्यमान इतिहास, विकसित असणारी प्राचीन संस्कृती, प्राणांचे मोल देऊन परकीय आक्रमकांना जशास तसे उत्तर देण्याची आणि राष्ट्रनिष्ठा सर्वतोपरी मानण्याची परंपरा, जगाला उपकारक ठरणारे जीवनविषयक तत्वज्ञान, सुजलाम सुफलाम अशी संपन्न भूमी, विश्वात कोठे आढळणार नाहीत अशी उंचच उंच मंदिरे, त्यावरचे संस्कृती दाखवणारे अर्थपूर्ण कोरीव काम. प्राचीन ग्रंथातील कथाभाग उलगडून सांगणारे पाषाणातील कोरीव काम. वैविध्यपूर्ण वास्तुशास्त्र, कल्पनातीत वस्त्रालंकार, प्रत्येक हाताला काम देणारी\, ज्ञान देणारी, स्वयंपूर्ण करणारी, दूरदृष्टी असणारी शिक्षणव्यवस्था, समाजातील शेवटच्या घटकाचाही विचार करणारी अर्थव्यवस्था, चिरंतन सुख देणारी संगीत, नृत्य साधना, भौगोलिक, सामरिक विचार करून सिद्ध केलेली संरक्षण व्यवस्था आणि तदनुषंगिक शस्त्र प्रणाली. एक ना दोन. पुढच्या पिढीला देता येईल असं खूप काही संचित होतं. पण सगळं संपवून टाकणाऱ्या देशविघातक प्रवृत्तींच्या हाती आम्ही आमचा इतिहास दिला. आता भीती वाटते. ‘ते’ आमच्या पुढल्या पिढीच्या हाती कसलं भविष्य देतील? या विचारानं झोप उडून गेली आहे.

सुचवलं होतं आम्ही. जिथे जिथे परकीय आक्रमकांनी विध्वंस करून जे जे नष्ट केले आहे, तिथे तिथे तशाच प्रकारचे पुनर्निर्माण करावे, ज्यायोगे भविष्यात पूर्वीचा समृद्ध हिंदुस्थान पुढच्या पिढीला कळेल, दिसेल. खरा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकवला जावा, ज्यामुळे गुलामगिरीची प्रवृत्ती नष्ट होऊन स्वाभिमानी पिढी निर्माण होईल.असं बरंच काही.

पान क्रमांक चारशे

मागे लिहायचे राहून गेले. पद्म पुरस्कारासाठी केवळ शिफारस तेवढी झाली. आजतागायत तो लाभला नाही. अर्थात झाले ते योग्यच म्हणायचे, कारण पात्रता असूनही स्वाभिमान आणि ज्ञान गहाण ठेवल्यावर इतकी शिक्षा असायलाच हवी. चूक ही चूकच असते, तिचे समर्थन होऊ शकत नाही.किमान आमच्यासारख्या पूर्वीच्या पिढ्यांमधल्या लोकांसाठी तरी.

डॉ . श्रीकृष्ण जोशी

९४२३८७५८०६

रत्नागिरी.

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 77 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..