डायरी (कथा)

“ अग मधुरा लक्ष कुठे आहे तुझ ? ते दुध उतू चाललंय बघ, मी केव्हाच्या हाक मारतोय  शेवटी वरून खाली आलो”  शरदच्या या उद्गारांनी मधुरा भानावर आली. तिने  गैस बंद केला आणि एकीकडे चहा गाळत शरदला म्हणाली “ सॉरी हं , मला ऐकूच नाही तुझ्या हाका. दोन मिनिट थांब नाश्ता चहा रेडी आहे. तुझं आवरलं का सगळ ?”

“ हो मी रेडी झालोय फक्त रुमाल नव्हता सापडत म्हणून तुला हाका मारत होतो पण सापडला शेवटी. म्हटलं आज एक मिटिंग आहे. बाईकने पोचायला तासभर तरी लागेल” शरद किचन मधील डायनिंग टेबलासमोर बसत  बसत म्हणाला.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

“अहो उगाच  टेन्शन कशाला घेताय. चला नाश्ता करून घ्या चहा पण तयार आहे. तुम्ही गेल्यावर मला बरीच काम आहेत.” शरद समोर गरम पोह्यांची डिश ठेवत मधुरा म्हणाली.

“मधुरा मला सांग घर आवडलं ना तुला ? कामासाठी बाई येतेय ना ? . शरद पोह्यांचा आस्वाद घेत म्हणाला.

“शरद, एक सांगु घर छान आहे. पण एवढ्या मोठ्या घराची सवय नाहीये मला. आपण दोन तर माणस आणि या घरात वर खाली मिळून एवढ्या रूम्स आहेत की सर्व आवरायला पण कठीण पडेल. पण शेजार नाही कोणी जवळपास”. त्यामुळे मला एकटीला कधी कधी खुप कंटाळा येतो.”  चहाचा कप शरद समोर ठेवत मधुरा म्हणाली.

“अग तुला कोकणातली सवय नाहीये पण होईल सवय.कोकणातल गाव हे इथे अशीच घर लांब लांब असतात. पण माणसे प्रेमळ आहेत इथली. आणि या घरात सोई किती आहेत. नेटवर्क पण येतंय इथे. आरामात सोशल मिडिया  एन्जॉय कर. काही वाटलं तर मला ऑफिसला फोन कर. बर आता मी निघु का ? पोहे छान झाले होते. ”

एवढे बोलुन शरद ऑफिसला जायला निघाला. मधुरा त्याला निरोप द्यायला बाहेर आली. काल रात्रीचा प्रकार शरदला सांगाव का याचाच ती आज सकाळी नाश्ता बनवताना विचार करीत होती त्या नादात तिला शरदच्या हाका ऐकू आल्या नव्हत्या आणि दुध उतू गेले होते. आता शरद गेल्यावर परत मधुराचे विचारचक्र सुरु झाले. काल रात्री आलेला अनुभव तिला स्वस्थ बसू देत नव्हता.

 कोकणातल्या रत्नगिरी जिल्ह्यतील या एका छोट्या खेडेगावातील या घरात राहायला येउन तिला आज दहा दिवस झाले होते.मधुराचा नवरा  शरद एका सरकारी बँकेत नोकरीला होता. काही दिवसापूर्वी त्याची बदली या गावात झाली होती. बँकेच्या एका खातेदाराच्या ओळखीने त्याला खूप कमी भाड्यात हे घर मिळाले होते. घर शहरापासून दूर व तसे एकाकी होते पण होते मोठे मजबूत अगदी चिरेबंदी वाड्यासारखे.  खालच्या मजल्यावर स्वयंपाक घर आणि माजघर समोर बसायला ओसरी तर वरच्या मजल्यावर बेड रूम. बेडरूम मध्ये जाण्यासाठी माजघरातून गोलाकार जिना. माजघरातून मागील दारी जाणाऱ्या जागेत काही खोल्या होत्या. त्यातील  एका मोठ्या खोलीला कुलूप घातले होते त्यात या घराच्या मालकांचे काही सामान ठेवले होते. ही खोली वगळून बाकी सर्व जागा वापरायला मिळणार होती. घराच्या समोर छानदार अंगण आणि तुळशी वृंदावन होते. घराला दोन दरवाजे एक दर्शनी बाजूचा अंगणातून येणारा मुख्य दरवाजा तर मागच्या परसात विहिरी कडे नेणारा दुसरा दरवाजा.  विहिरीच्या बाजूला पंप रूम, स्टोअर रूम होती. जवळच एक छोटा हौद होता त्याच्या बाजूला कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्या साठी सोय केली होती. तर बाजूच्या मोकळ्या जागेत केळी नारळ, पोफळी, फणस, रातांबा यांची झाडे होती. घराच्या चारी बाजूला छान लालसर चिर्याचे कुंपण होते. घराच्या मागील बाजूला शेतजमीन तर दूरवर एक छोटासा ओढा होता. आजूबाजूचा सर्व परिसर झाडांनी वेढलेला होता. विहिरीवर पंप बसवला होती आणि नळाने सर्व घरात पाणी पुरवठा केला गेला होता तसेच घरात वीज व इतर आवश्यक त्या सोई केल्या होत्या. त्यामुळे घर तसा एकाकी आणि मुख्य वस्तीपासून थोडे दूर  असले तरी पण सर्व सोई बघता  भाडे पण तसे कमीच होते त्यामुळे शरदने हे घर पसंद केले होते. शरद कामावर गेल्यावर मधुरा दिवसभर एकटीच असे. त्यांच्याकडे घरकामाला येणाऱ्या रखमाची तिला थोडी सोबत होई. पण मुंबईला शहरात राहणाऱ्या मधुराला या एकाकी वातावरणात दिवस काढणे जरा कठीणच जात होते.

त्यात गेले काही दिवस मधुराला थोडे विचित्र अनुभव येत होते. एकटी असताना तिला जाणवयाचे की आपल्या जवळपास कोण तरी वावरताय. बरेचदा काही वस्तूंच्या जागा बदलेल्या जाणवत होते. पहिले काही दिवस मधुराने त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. कदाचित एवढ्या मोठ्या घरात वावरायची सवय नसल्याने आपणाला भास होत असावेत. मधुरा धीट होती आणि भूत, आत्मा, दुष्ट शक्ती हे सर्व माणसाच्या कमकुवत मनाचे खेळ आहेत अशी शिकवण तिला लहानपणापासून मिळाली होती. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे  डोळसपणे पहायची तिची सवय होती. मात्र काल रात्री आलेला अनुभव तिला विचार करायला भाग पाडणारा होता. काल रात्री तिला झोपेतून जाग आली कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने. एकदा तिला वाटल की शरदला उठवावे पण तो दमुन गाढ झोपला होता. रोज त्याचे दोन तास  प्रवासात जात व त्याच्यावर कामाचा लोड पण खूप होता  त्यामुळे तिने तो विचार सोडून दिला.  ती जिना उतरून खाली आला तिने लाईट ऑन केले  आणि तिने आवाजाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जाणवलं की तर रडण्याचा आवाज घराच्या मागील दारी असणाऱ्या बंद खोलीतून येतो आहे. “कोण आहे तिथे ?”  तिने धीर करून विचारले. आणि आवाज एकदम थांबला. तिला आश्चर्य वाटले. रात्रीची वेळ असल्याने तिने  आवाजाचा शोध घेण्याचा ज्यास्त  प्रयत्न केला नाही आणि लाईट ऑफ करून ती परत झोपायला आली. थोड्या वेळाने परत तो रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मधुरा वैतागली पण आता त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत झोपण्याचा प्रयत्न केला. तिला झोप लागेपर्यंत तो रडण्याचा आवाज ऐकू येत होता.

*********.

शरद कामावर गेल्यावर थोड्या वेळाने घरकाम करायला  रखमा आली होती.  नेहेमी प्रमाणे ती धुणी भांडी करण्यासाठी  ती मागील दारी गेली आणि तिने लाईट लावला आणि  घाबरून  ती ओरडलीच.  किचन मधुन मधुरा तिचं ओरडण ऐंकून मागील दारी आली.  तिने पाहिले की मागील दरापासून त्या बंद खोलीच्या दारापर्यंत पावलांचे ठसे उमटले होते. ते पाहुनच रखमा ओरडली होती. आता मात्र मधुरा घाबरली पण तिने रखमाला धीर दिला आणि  जवळ जाऊन ते पावलांचे ठसे नीट बघितले. ते बाईच्या पावलांचे ठसे वाटत होते. मधुराला आश्चर्य वाटले कारण ठसे उमटण्याचे कारण समजत नव्हते. मधुराने रखमाला ते पावलांचे ठसे पुसायला लावले. रखमा त्यासाठी घाबरत होती पण मधुराने धीर दिल्यावर तिने सर्व ठसे पुसून टाकले.

ह्या प्रकारानंतर रखमा मधुराला म्हणाली “ वाहिनी तुम्ही हे घर घेण्यापूर्वी नीट चौकशी नव्हती का केली ?

“ का ग असं का विचारतेस ? चांगल आहे की हे घर, सर्व सोयी आहेत, जागा मोठी आहे आणि भाड तर किती कमी आहे” मधुरा म्हणाली.

“अहो मी अस ऐकलय की या  घरात भूतांचा वावर आहे. तुम्ही येण्या पूर्वी दोन तीन भाडेकरू मोठ्या हौसेने आले राहायला पण अनुभव आल्यावर गेले जागा सोडून. माझ ऐका आजचा अनुभव तुम्ही स्वतःच पाहिलाय नका राहू इथे” रखमा म्हणाली.

“या घरात भूतांचा वावर ? काय आहे काय हा प्रकार ? “ मधुराने विचारले.

मला नीट नाही काही माहित पण गावकरी बोलतात. रात्री इथे कोणाच्या तरी रडण्याचे आवाज येतात तसेच चालण्याचे, धावण्याचे आवाज पण ऐकू येतात. तुम्ही येण्यापूर्वी बरेच दिवस हे घर बंद होते. वाहिनी साहेब माझे ऐका तुम्ही नका राहू इथे. मी पण घाबरते इथे काम करायला” रखमाच्या बोलण्यातुन त्या घरात काही अमानवी शक्तींचा वास असावा असे मधुराला समजले. पण कोकणात हे काही नवीन नव्हते. आज शरद आला की त्याला विचारायचे असे तिने ठरवले. त्याप्रमाणे रात्री जेवण झाल्यानंतर मधुराने शरदला काल रात्री तिला आलेला अनुभव सांगितला तसच आज सकळी दिसलेले पावलांचे ठसे  आणि रखामाने सांगितलेली हकीगत पण सांगितली.

  “ हे बघ शरद आजच्या अनुभवांनी मी खूप घाबरले. पण मला कळत नाहीये हा नेमका काय प्रकार असावा माझी बुद्धीच चालत नाहीये कारण अशा प्रकारचा अनुभव मला कधीच आला नव्हता” मधुरा शरदच्या खांद्यावर मान रेलत म्हणाली

ते ऐकून शरद जरा गंभीर झाला. त्याला जागा भाड्याने  घेताना मध्यस्थाने सांगितलेले बोलणे आठवले. “ हे बघा घर खूप छान आहे सर्व सोयी आहेत. मालकाने माझ्याकडे सोपवलय कारण तो इथे नसतो.  पण एक सांगतो कमी भाडे ठेवण्याचे कारण की पूर्वी काही भाडेकरूना काही विचित्र अनुभव आलेत. गावात पण काही बाही बोललं जात त्या घराबद्दल. तुम्ही विचार करा नी ठरवा. त्यातून तुम्ही राहायला गेल्यावर  तुम्हाला काही वेगळा अनुभव आला तर सांगा. मी दुसरी जागा मिळवून देईन तुम्हाला”

 “अग मधुरा या आधीच मला का नाही सांगितलास ? खर तर माझंच चुकलं मला एजंट बोलला होता या बाबतीत मला पण मला वाटलं कोकणात अंध श्रद्धा असतात. जागा खरच सर्व सोयीने युक्त आहे. पण आता तुझे अनुभव ऐकल्यावर वाटतंय उगाच विषाची परीक्षा नको. मी उद्याच त्या एजंटला भेटून दुसरी जागा बघतो”  शरद तिला जवळ घेत धीर देत म्हणाला.

“काय शरद एवढा का गंभीर झालास ? अरे मी काही घाबरले नाहीये एवढी. उलट मला तुझ्या त्या इस्टेट एजंटला भेटायला आवडेल. त्याच्याकडून खर काय ते समजेल. ” मधुरा म्हणाली.

“ठीक आहे तुझी इच्छा असेल तर मी पाठवतो त्याला इथे चल आता झोपूया.

दुसरे दिवशी शरदने त्या जोशी नावाच्या एजंटला घरी पाठवले होते. सुरवातीला थोड्या गप्पा झाल्यावर मधुराने त्याला या घरा बाबत त्याला जे काही माहिती आहे ती सांगायला सांगितली आणि तो सांगू लागला………

“हे घर होत अभ्यंकरांच. पिढ्यान पिढ्या या गावाचे ते जमीनदार होते. गावात बरीच शेतीवाडी होती.त्यांना दोन मुलगे होते. त्यातल्या मोठ्या मुलाचे लग्न  यमुना नावाच्या शेजारच्या गावातील मुलीशी झालं. खूप सुंदर होती ती दिसायला. पण का कोण जाणे लग्नानंतर काही दिवसानी यमुना उदास दिसू लागली. तिचा छळ होतोय असे ऐकू येऊ लागले. असे पण बोलले जातं होती की तिचा नवरा तिच्यावर घटःस्फोट  देण्यासाठी आग्रह करीत होता आणि यमुना त्यासाठी तयार नसल्याने तिला त्रास सहन करावा लागत  होता विचारात होता. यमुनाला माहेरच अस कोणी नव्हत त्यामुळे बिचारी सर्व सोसत होती.

काही दिवसानंतर यमुना त्या घरात दिसेना. लोकांना काही बाही संशय येऊ लागला. चौकशी करणाऱ्या लोकांना असे सांगण्यात आले की यमुना कुठे तरी निघून गेलीय. तशी पोलिसांकडे तक्रार पण तिच्या नवऱ्याने नोंदली. लोकांना हे पटत नव्हते. कारण यमुना पळून जाणार कुठे होती तिला माहेरचे असे कोणीच नव्हते. त्यातच भर म्हणजे यामुनाच्या नवऱ्याचे एका श्रीमंत कुटुंबातील मुलीशी दुसरे लग्न पण झाले. यमुनाच्या नसण्याचा कोणालाही कसलाच विषाद नव्हता. सगळेजण आनंदात होते.

त्यानंतर मात्र  त्या घरात अभ्यंकर कुटुंबियांना विचित्र अनुभव येऊ लागले.लग्ना नंतर महिन्या भरातच  यमुनाच्या नवऱ्याची दुसरी बायको  एके दिवशी सकाळी विहिरीच्या आवारात मृत अवस्थेत आढळली. तिचा मृत्यु हृदय क्रिया बंद पडल्यामुळे झाला असे डॉक्टरानी निदान केले. ती कशाला तरी घाबरली असावी.त्यानंतर काही दिवसातच यमुनाचे सासू सासरे  एका अपघातात दगावले. यमुनाचा धाकट्यां दिराला वेडाचें झटके येऊ लागले. तो सध्या रत्नागिरीच्या वेड्यांच्या हॉस्पिटल मधे आहे. या सर्व घटना ऐकल्यावर गावात असे पसरले की कदाचित यमुनाचा छळ केल्याचे फळ या कुटुंबाला मिळाले असावे. त्या घरात भूतांचा संचार आहे असे पण पसरले.मात्र एक गोष्ट खरी एवढे सर्व सोयी असलेल्या घरात राहायला यमुनाचा नवरा तयार नव्हता. तो  हे गाव सोडून मुंबईला  गेला जाताना त्याने या घराची देखभाल करायला मला दिली आहे. या घरातील एका बंद खोलीत त्याने त्यांचे समान ठेवलेय. त्या खोलीला कुलूप त्यानेच लावलय त्याची किल्ली त्याच्या कडेच आहे. ती खोली सोडून बाकी घर भाड्याने द्यायला हरकत नाही असे त्याने मला सांगितले. तो मुंबईला कुठेतरी नोकरी करतोय. तुम्ही येण्यापूर्वी काही जणांना मी हे घर भाड्याने दिले होते  पण इथे त्यांना पण काही अनुभव आले आणि ते जागा सोडून गेले. मी पण शरद साहेबाना याची कल्पना दिली होती. तुम्हाला पाहिजे तर सांगा दुसरी जागा देईन. एवढ्या सोयी असतील अस नाही.”

त्यावर मधुरा  म्हणाली  “ अहो मी धीट आहे. मुंबईत वावरलेली आहे. थोडी घाबरले होते. पण घर छान आहे हे. तेव्हा आम्हाला घाई नाही जागा सोडायची.”

“ठीक आहे वाहिनी तुमची इच्छा पण काय वाटल तर लगेच कळवा अस म्हणून जोशी जायला निघाले. मधुराने त्यांना निरोप देऊन  सर्व दारे बंद केली आणि ती वरती बेडरूम मधे झोपायला गेली. बेडरूमचे दार व खिडकी पण तिने बंद केल्या. जोशींनी दिलेल्या माहिती नंतर मधुरा. बेडवर पडून ती विचार करीत होती ऐकलेल्या गोष्टीचा. खरच भूत आत्मा यांच अस्तित्व आहे ? यमुनाचा नेमक काय झालं असेल ?

 थोड्याच वेळात तिला झोप पण लागली. मधुरा झोपेतून जागी झाली त्याच कालच्या रडण्याच्या आवाजाने. आता तो आवाज घरातूनच आल्यासारखा वाटत होता. मधुरा प्रचंड घाबरली. काय करावे ते तिला समजेच ना. तिने घड्याळात पाहिले साडे पाच वाजायला पाच मिनिटे कमी होती.  तिने प्रथम शरदला फोन केला पण त्याचा फोन लगला नाही. शेवटी तिने ठरवले  की आवाजाचा शोध घ्यावा. आणि ती जिना उतरून खाली आली.  तिला आता स्पष्ट जाणवलं की आवाज हा घराच्या मागच्या दाराच्या खोलीतूनच येतोय. माजघरातून मागीलदारी जाणाऱ्या जागेत एकंदर तीन खोल्या होत्या. त्या खोल्यांचा वापर बरेच दिवसात झाला नसावा. एक प्रकारचा कुबट वास तिथे जाणवत होता.  मधुरा खूप घाबरली पण मोठ्या धीराने  तिने दोन्ही खोल्यांची दारे उघडुन पाहिले एक तर अंधारा मुळे नीट दिसत नव्हते  पण आत अडगळ , रद्दी, काही भांडी आणि इतर काही समान दोन्ही खोल्यात अस्ताव्यस्त पसरलेलं दिसलं.  एकदा या खोल्यांची साफ सफाई करायला हवी असे तिच्या मनात आले. मधुराने कुलूप असलेल्या खोलीच्या दाराच्या की होल मधून आत पाहायचा प्रयत्न केला पण मिट्ट काळोखा मुळे काही दिसत नव्हते. पण रडण्याचा आवाज तिथूनच येत होता हे नक्की. मग तशीच ती मागीलदारी गेली आणि तिने मागचे दार उघडले.  बाहेर कोणी नव्हत. थोड्या वेळाने रडण्याचा आवाज आपो आप थांबला.  मधुराला काही समजेना. तिला खूप अस्वस्थ वाटू लागले. तिने दार लावले आणि ती स्वयंपाक घरात आली फ्रीज मधील गार पाणी प्यालावर तिला बरे वाटले. तेवढ्यात दारावरची बेल वाजली मधुराला वाटले शरद आज लवकर आला धावतच जात  तिने दार उघडले  पण बाहेर कोणीच नव्हतं. आपणाला असा कसा भास झाला मधुराला काही कळेनास झालं आणी तिने शरदला फोन केला. फोनवर शरदचा आवाज ऐकुन तिला खूप धीर आला तो उगाच घाबरून जाऊ नये म्हणून तिने “ शरद आज जरा लवकर ये मला जरा बर वाटत नाहीये”  अस मोघम सांगितले शरदच निघालोच आहे हे बोलण ऐकून तिला खूप धीर आला.

रात्री जेवणे झाल्यावर तिने शरदला जोशींनी सांगितलेली हकीगत सांगितली आणि ती म्हणाली “शरद मला वाटतंय की त्या बंद खोलीत काहीतरी गूढ आहे. कारण आवाज तिथूनच येतो. जोशींकडे चावी नाहीये त्याची.”

“ मधुरा उगाच नसत धाडस नको करू. ती खोली आपल्याला नाही दिलीय वापरायला.  इथल रहस्य शोधण हे काही आपलं काम नव्हे . मला वाटत आपण ही जागा सोडावी. मी सांगतो जोशाला. चल झोपूया आता आणि आज जर कालच्या सारखा अनुभव आलाच तर मला नक्की उठव.”  शरद म्हणाला.

“नको शरद मी सांगितलंय जोशीना की मला नाही भीती वाटत आता. राहू काही दिवस . बघू तरी  किती दिवस असे आवाज येतात ते.” मधुरा म्हणाली आणि ती खिडकी बंद करायला गेली. मधुराने खिडकीतून पाहिले आज वारा जोरात सुटला होता. थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता. बेडरूमच्या खिडकीतून बाहेर विहीर दिसत होती. आजू बाजूच्या झाडांची होणारी सळ सळ पण ऐकू येत होती. नकळत तिची नजर विहिरीच्या दिशेने गेली आणि ती मोठ्याने ओरडली ‘ शरद ते बघ कोणी तरी बाई आहे तिथे” ते ऐकून शरद धावत खिडकी पाशी आला त्याने विहिरी कडे पाहिले एक तर बाहेर खूप काळोख होता नीट दिसत नव्हते.  बाहेर कोणी बाई त्याला दिसली नाही. “ मधुरा अग कोणी नाहीये तिथे मला वाटत तुला भास झाला असेल” तो मधुराला म्हणाला.

“ नाही शरद अरे ती बाई माझ्याकडेच बघत होती. अस वाटलं तिला काही तरी सांगायाचय आपण खाली जाऊन बघायचं का ? “ मधुरा म्हणाली.

“ठीक आहे तुझी खात्री होऊन जाऊंदे” अस म्हणून शरदने टौर्च घेताल आणि दोघे जिना उतरून मागीलदारी गेले. शरदने लाईट ऑन केला आणि मागचे दार उघडले. दार उघडताच थंडगार वारयाच्या झोताने ते गारठून गेले. शरदने सगळीकडे टोर्च मारून बघितले पण कोणीच दिसलं नाही. मधुराची खात्री पटवल्यावर दोघे वर गेले. शरदने सर्व दार खिडक्या बंद केल्या आणि तो मधुराला म्हणाला की आता काही विचार करू नको शांत झोपून जा आणि त्याने दिवा बंद केला. मधुराला प्रयत्न करून देखील झोप येत नव्हती. तिच्या डोळ्या समोर सारखा त्या बाईचा चेहरा येत होता. अखेर केव्हा तरी तिला झोप लागली पण रात्री ती एकदम दचकुन जागी झाली. तिने पाहिले खिडकी उघडली होती आणि वाऱ्याने पडदा हलत होता. काल झोपताना शरदला खिडकी बंद करताना तिने पाहिले होते. मग आता उघडली कशी  का तो खिटी लावायला विसरला होता काय कळायला मार्ग नव्हता. खिडकीतून थंड गार वारा आत येत होता . ती  उठली आणि खिडकी जवळ गेली नकळत तिची नजर विहिरीकडे गेली आणि भीतीने ती गारठली. विहिरीच्या आवारात काल रात्री दिसलेली बाई तिला परत दिसली. खिडकी कडे एकटक बघत होती ती. म्हणजे काल रात्री झालेला भास नव्हता. मधुराला समजेना कोण असेल ती बाई आणि हवंय काय तिला आपणाकडून. यमुना तर नसेल ? मधुराला काही समजेना. एकदा तिला वाटले शरदला उठवावे पण परत भासच ठरला तर म्हणून तिने तो विचार सोडून दिला.  तिने परत खिडकीतून खाली पाहिले आता ती बाई विहिरी कडे नव्हती. बर झाल शरदला उठवलं नाही अस तिला वाटल. तिने खिडकी बंद केली. म्हणजे हा पण भासच होता का या विचाराने ती अस्वस्थ झाली आणि बेडवर आडवी झाली आणि डोक्यावरून पांघरून ओढुन घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागली पण लवकर झोप लागली नाही कारण तिला जाणवत होत की खालच्या रूम मधे कोण तरी वावरताय पण मोठ्या निग्रहाने ती त्याकडे दूर्लक्ष करीत होती आणि झोपायचा प्रयत्न करीत होती.

सकाळी शरद कामावर गेल्यावर मधुरा कालच्या प्रकारचा विचार करू लागली.  तिला आपल्या दिवंगत आजोबांची खूप आठवण आली. ते खूप विद्वान आणि व्यासंगी होते. विशेष म्हणजे भूत योनी, आत्म्याचा प्रवास या बाबतीत त्यांचा गाढा अभ्यास  होता. ते नेहेमी सांगत की भूत ही माणसाच्या मनातील कल्पना आहे हे जरी खर मानल तरी मानवी मनाच्या तर्काच्या पलीकडे काही तरी गूढ असू शकत मात्र आपण त्याचा आपल्या बुद्धीने शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मधुराला हे जाणवलं की या घरात आपल्याला जे गूढ जाणवतंय ते आपण शोधल पाहिजे. जरी एक वेळ या घरातील भूताच अस्तित्व मान्य केल तरी त्याच्या पासून आपणाला अजून तरी काही धोका झालेला नाही. आपल्याला जी बाई दिसली अस आपल्याला वाटल ती काही भेसूर किंवा उग्र नव्हती उलट आपणच भुताच्या कल्पनेने घाबरलो. आता जर पुनः ती बाई दिसली तर धाडस करून तिच्याशी बोलायचं. हा विचार करताच का कोण जाणे तिच्या मनातील भीतीची जळमट दूर झाली. तेवढ्यात बेल वाजली. रखमा आली होती. मधुराने ठरवले होते त्याप्रमाणे त्या अडगळीच्या खोल्या रखमाला झाडायला सांगितल्या. आपणाला त्या खोल्यात काहीतरी सापडेल असे मधुराला वाजत होते. अडगळीच्या त्या दोन्ही खोल्यात मुख्यतः रद्दी पेपर, मासिके, काही जुने कपडे आणि भांडी होती. सर्व खोल्या नीट झाडून रखमा परत नीट ठेवत होती. मधुरा उत्सुकते पोटी तिथल्या वस्तू पहात होती. दोन्ही खोल्यांची झाडलोट करून झाली पण मधुराला काही हाती लागल नाही. थोड्या वेळाने रखमा कामे आवरून निघुन गेली. मधुराने दार लावले. आता तिला अजिबात भीती वाटत नव्हती. आपल्यात झालेला बदल बघून तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते. आता थोडा वेळ शांत झोप घ्यावी म्हणुन ती वरती जायला निघाली त्याच वेळी मागील दारी काही तरी पडल्याचा आवाज आला. मधुरा थोडी दचकली पण  न घाबरता ती मागील दारी गेली. दार उघडुन तिने बाहेर पाहिले नारळाच्या झाडाचा नारळ पडला होता. त्याचाच आवाज आला होता. मधुराने दार लावले. चालता चालता ती कशाला तरी अडखळली ती नेमकी त्या कुलुप घातलेल्या बंद खोलीसमोर. तिने खाली वाकुन  पाहिले तिचा पाय एका छोट्याशा डायरीला लागला होता. मधुराला आश्चर्य वाटले तिने ती डायरी उचलली. धुळीने माखली होती ती. कदाचित रखमा कडून त्या खोल्यांची साफ सफाई करताना चुकुन ठेवायची असेल.उत्सुकते पोटी तिने डायरी उचलली ती बरीच जीर्ण होती.वरती शांतपणे वाचावी म्हणून तिने फडक्याने ती साफ केली आणि ती  आपल्या बेडरूम मधे गेली. डायरीचे पाहिले पान तिने पाहिले मात्र आणि ती हादरली.  ती डायरी होती यमुनाची.त्या डायरीतून तिचा लग्नानंतरचा त्या घरातला सगळा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे उलगडत होता. लग्नानंतर तिला मुल होऊ शकणार नाही हे समजल्या नंतर तिला प्रचंड छळ सहन करावा लागला.तिच्या सासू सासर्यांना आपल्या मुलाच दुसर लग्न करायचं होत, त्यासाठीच यमुनाचा छळ चालू होता. शेवटी तिला त्या घरातल्या अडगळीच्या खोलीत कोंडून ठेवलं होत. तिला अन्न पाण्यावाचून दिवस कंठावे लागत होते. त्या अंधार कोठडीत तीच्या हाताला लागलेल्या डायरीत यामुनाने सर्व घटना लिहिल्या होत्या अगदी तारीख वार टाकून.  साधारण ४८ दिवसांची त्यात नोंद होती.. या पैकी पाहिले काही दिवस तिला थोडे फार अन्न पाणी दिले गेले होते.त्या डायरीतील शेवटची नोंद खूप भयानक होती. एका दिवशी तिचे सासू सासरे आणि नवरा यांनी एक मोठा पेटारा त्या खोलीत आणला. त्या दिवशी जवळ जवळ १२ दिवसानंतर तिला थोडे फार अन्न देऊन तिला त्या पेटाऱ्यात बळजबरीने झोपायला लावले होते. त्यानंतर आणि पेटारा बंद झाला होता. आता आपण यातुन वाचत नाही जर ही डायरी कोणाला मिळालीच तर पोलिसांना द्यावी आणि माझ्या खुन्यांना शिक्षा मिळावी अशी इच्छा व्यक्त केली होती. डायरी वाचता वाचता मधुराच्या डोळ्याला अश्रूंची धार लागली होती……….

त्यानंतर घरातील त्या बंद खोलीच दार पोलिसांच्या उपस्थितीत उघडलं गेलं होत. मधुराच्या सांगण्यावरून शरद पोलिसांना घेऊन आला होता. त्याच्या बरोबर घराची देखभाल करणारा एजंट आणि गावातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती पण होत्या. दार उघडलं जाताच कुबट उग्र असा दर्प सर्वाना जाणवला. सगळीकडे त्या खोलीत काही सिमेंट, वाळू याची पोती रचून ठेवली होती. इतर अडगळ पण बरीच होती. त्याच रूममधील एका तळघरात एक मोठा लोखंडी पेटारा दिसत होता. त्याला पण भक्कम कुलूप होत. पोलिसांनी कुलूप तोडुन पेटारा उघडला मात्र  परत एक कुबट दर्प जाणवला. आत मधे एक सडलेला मृतदेह सापडला होता.तपासा अंती तो मधुराचा असल्याचे सिद्ध झाले होते. यमुना हरवली आहे अशी पोलिसात खोटी तक्रार करणाऱ्या यमुनाच्या नवर्याला पोलिसांनी यमुनाच्या खुनाच्या आरोपां खाली अटक केली होती. यथावकाश त्याची केस चालून त्याला शिक्षा मिळणार होती. एका खुनाच कोड उलगडलं होत.

त्या घरात  अभ्यंकर कुटुंबियांचे झालेले मृत्यु, दिराच वेड या घटना  त्यांच्या कुकर्माची फळे होती.त्याचा यमुनाशी काही संबध नसावा. मधुराला होणारे भास ऐकू  येणारे आवाज हा यमुनाचा आक्रोश होता तो मधुराला जाणवला कारण मधुराला पण मुल होऊ शकणार नव्हतं. समजाचे, नातलगांचे टोमणे तिने पण सोसले होते  पण शरदने मात्र तिला खूप समजून घेतलं होत. वाटल्यास मुल दत्तक घ्यायची त्याची तयारी होती. त्यामुळे मधुरा मनाने यामुनाच्या वेदनेशी एकरूप होऊ शकली.

तरी पण  मधुराला एक कोड उलगडत नव्हतं की यमुनाची डायरी त्या बंद खोलीतून  बाहेर कोणी आणली होती ………???

************

(कथेतील स्थळ पात्र आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत).

— विलास गोरे 

Avatar
About विलास गोरे 17 Articles
मी आय डी बी आय बँकेत एन पी ए विभागात (कर्ज वसुली) व्यवस्थापक पदावर काम करतो, मला ३५ वर्षाहून अधिक काळ बँकेच्या विविध विभागात काम करण्याचा अनुभव आहे, मी कॉमर्स पदवीधर असून कायद्याचा अभ्यास पण पूर्ण केला आहे (B, COM , L L B). मी शेअर मार्केट मध्ये नियमित गुंतवणूक करतो व शेअर मार्केट व इतर investment चा मला २५ वर्षाहून अधिक अनुभव आहे. मला हिंदी चित्रपट संगीत, मराठी साहित्य, किल्ल्यांवर भटकंती तसेच इतर पर्यटन याची आवड आहे.मी काही कथा , लेख,व्यक्तिचित्रण लिहू इच्छितो.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..