
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे… हा तोच श्लोक आहे ज्या श्लोकाने श्रीमद्भवद्गीतेचा श्रीगणेशा झाला.. कुरूक्षेत्राची धर्मक्षेत्र म्हणून ओळख करून देणारा हा श्लोक हस्तिनापुरात सिंहसनावर बसून दिव्यचक्षु लाभलेल्या सारथी संजयाला ‘किम कुर्वत’ असा प्रश्न विचारणाऱ्या धृतराष्ट्राची जटिल कुटील मनस्थिती सांगून जातो.
विश्वास पाटील यांच्या पानिपताचा शेवट वाचताना नकळत डोळ्यांत अश्रुंचे थेंब तरळले. महाराष्ट्राची कूस उजाड करणाऱ्या या भीषण युद्धापूर्वी अशी दिव्यदृष्टी लाभलेला एखादा संजय पुण्यातल्या शनिवारवाड्यात सदरेवर बसलेल्या नानासाहेब पेशव्यांजवळ असता तर? पण पुन्हा असा प्रश्न सतावतो कि, महाराष्ट्राची एक संपूर्ण पिढी राष्ट्ररक्षणार्थ ‘स्वाहा’करणारे हे पानिपत घडलेच नसते तर ?.. आज हा हिंदुस्थान तालिबानपेक्षा वेगळा नसता.. त्याच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा रंग, ढंग आणि गंध बदलून गेला असता.अफगाण लूटेरा अहमदशाह अब्दालीच्या त्या धर्मांध वादळाला रोखण्याची ताकद संपूर्ण हिंदुस्थानात त्यावेळी फक्त मराठ्यांतच होती. जर मराठा पानिपतावर अब्दालीशी भिडला नसता तर आज देशाचे चित्र काही वेगळेच असते.
कानांत बोळे घालून मोबाईलवर पब्जी खेळण्यात व्यस्त असलेल्या महाराष्ट्रपुत्रांनो हे ऐका. तुमच्या गौरवशाली इतिहासाचा तुमच्या परंपरेचा तुम्हाला विसर पडला आहे पण आजही हजारो किलोमीटर दूर मराठयांच्या पिढ्या आज अडीचशे वर्षांनंतरही आपली मराठी संस्कृती अभिमानाने मिरवत सन्मानाने जगत आहेत.
1765 मध्ये पानिपतचे तिसरे युद्ध झाले त्यानंतर 260 वर्षांचा कालखंड लोटला पण महाराष्ट्र आपल्या या लेकरांशी जवळीक साधू शकला नाही याचे नवल वाटते.. होय मी रोड मराठा आणि बलुची मराठा समाजाबद्दलच लिहीत आहे. यापैकी इतिहासकार डॉ. वसंतराव मोरे यांच्या ‘रोड मराठ्यांचा इतिहास ‘ या पुस्तकात याचा उल्लेख आलेला आहे. पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला मात्र 14 जानेवारी 1761 हा दिवस रोड मराठा शौर्य दिन म्हणून साजरा करतो पानिपतावर आपल्या शूर पूर्वजांना श्रद्धाजली वाहून स्मरण करतो.
युगानुयुगे इतिहास पुढे जात असतो. युद्ध, लढाया होतच असतात..पण पानिपतची ही तिसरी लढाई अतुलनीयच..इथे इतिहास एक क्षण थांबला, सह्यपुत्रांच्या अतुलनीय शौर्याने तो शहारला. थरारला… तो आवंढा गिळू शकला नाही.राष्ट्रासाठी पडणाऱ्या समक्ष पडणाऱ्या त्या आहुती पाहून तो रडला. 14 जानेवारी 1761 च्या भर दुपारी रणरणत्या उन्हात राष्ट्ररक्षणार्थ पानिपतावर उपाशीपोटी लढून पराक्रमाची शर्थ करणाऱ्या त्या शूरवीरांनी महाराष्ट्राची कूस धन्य केली. भारतवर्षाच्या इतिहासात दाशराज्ञ युद्धा पासून आजतागायत अनेक युद्ध व लढाया लढल्या गेल्या पण पानिपतावरील या तिसऱ्या लढाईला इतिहासात तोड नाही.
कुरुक्षेत्र अर्थातच आर्यावर्तातील युद्धभूमी जिथे कुरुपुत्रांमध्ये धर्मयुद्ध लढले गेले. महर्षी वेद व्यासांच्या महाभारत या महाकाव्यात कुरुक्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. कौरवांचे अकरा अक्षौहिणी व पांडवांचे सात अक्षौहिणी सैन्य इथे सतरा दिवस लढले होते. या कुरुक्षेत्रापासून अंदाजे सत्तर किमी अंतरावर पानिपत आहे याचे आर्यवर्तातील नाव पांडवप्रस्थ. पांडवांनी वसवलेले ते पांडवप्रस्थ.
पानिपताच्या रणभूमीवर इतिहासात तीन मोठ्या लढाया लढल्या गेल्या. पहिली लढाई 21 एप्रिल 1526 मध्ये बाबर आणि इब्राहिमखान लोधी यांच्यात झाली होती या युद्धात सर्वप्रथम तोफांचा वापर झाला. पंचवीस हजार सैन्य घेऊन आलेल्या बाबराने लक्ष सैन्यांनीशी लढणाऱ्या इब्राहिम लोधीचा पराभव केला. पानिपतची दुसरी लढाई बाबरचा नातू अकबर आणि हेमू (हेमचंद्र विक्रमादित्य )यांच्यात झाली. तो दिवस होता 5 नोव्हेंबर 1556. या लढाईत हत्तीवरून लढणाऱ्या हेमूच्या डोळ्याला बाण लागल्याने तो जखमी झाला मात्र आपला राजा मारला गेल्याची अफवा सैन्यात पसरली आणि हेमुचा पराभव झाला. या घटनेसारखीच घटना पानिपतच्या या तिसऱ्या लढाईत घडली विश्वासराव पेशव्यांच्या बाबतीत तसेच घडले आणि इतिहासाची पुनरावृत्ती होऊन मराठ्यांचा पराभव झाला. पानिपतच्या या भूमीला कुठला शाप असावा कि काय अशी शंका येते इथे भारतीय राज्यकर्त्यांच्या पराभवाची वारंवार पुनरावृत्तीच झालेली आहे.
उत्तरेत मराठ्यांना स्पर्धक उरलाच नव्हता अटकेपार भगवा फडकत होता. नजीब खान रोहिल्याच्या चिथावणीने वायव्येकडून भारतात आलेल्या अहमदशहा अब्दालीने प्रचंड संहार केला होता. कुतुबशहा आणि नजीबखान यांनी हैदोस मांडला होता. दत्ताजी शिंदेंची क्रूर हत्या केली होती. अहमदशहा अब्दालीचा कायमचा बिमोड करायचा आणि नजीबखान रोहिल्याला धडा शिकवून दत्ताजींच्या हत्येचा बदला घ्यायचा निश्चय करूनच चिमाजीअप्पा पेशव्यांचा मुलगा सदाशिवरावभाऊने आपला पुतण्या व नानासाहेब पेशव्यांचा पुत्र विश्वासरावा सहित मराठा फौजेसह उत्तरेकडे प्रयाण केले होते. शीख, जाट, राजपूत, बुंदेले यांना मराठयांचे वर्चस्व नको असल्याने परकीय आक्रमणपासून धोका असतानाही मराठ्यांना एकाकी सोडले. मल्हारराव होळकरांच्या कुशीत शिरून इस्लामच्या नावाने चिथावणी देत नजीबखान रोहिल्याने अयोध्येच्या नबाबासहित सर्व मुस्लिम सत्ताधीशाना अब्दालीच्या बाजूला वळते केले होते. ज्या दिल्लीच्या तख्तासाठी मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली होती तो मुघल बादशाह स्वतः अहमद शाह दुराणीशी संपर्क साधून होता. .मग मराठ्यांनी कुणासाठी लढावं ?एकीकडे ही अराजकता असताना निसर्गाने देखील मराठ्यांशी असहकार पुकारला होता. हरियाणाची भूमी आज सुजलाम सुफलाम आहे त्या भूमीत दुष्काळाने थैमान घातले होते. गवताची हिरवी काडी कुठे दिसणे दुरापास्त होते. मराठ्यांनी सुकलेल्या झाडाच्या साली आणि मुळ्या काढून घोड्याना खाऊ घातल्या. सैन्याची उपासमार घडत होती. अशा विपरीत परिस्थितीत एकतर बिनशर्त माघार घ्यायची नाहीतर उपाशी लढून मरायचं. इतकेच भाऊच्या हातात उरले होते न लढता माघार घेणे मराठ्यांच्या रक्तात कधीच नव्हते अखेर मल्हारराव होळकर आदी बुजूर्गांचा माघार घेण्याचा सल्ला नाकारून कुरुक्षेत्रातील त्या पानिपतच्या रणभूमीत रण यज्ञ करण्याचा निर्णय घेतला.
हतो वा प्रापस्यसी स्वर्गयम, जित्वा वा भोक्ष्यसे महीम
तस्मात उतिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय:
(हरलास तर स्वर्ग प्राप्त होईल आणि जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. यास्तव हे कुंतीपुत्रा, निश्चयाने युद्ध कर ) हे भगवदवचन सार्थ ठरवत सदाशिवरावभाऊ अब्दालीशी भिडला. 14 जानेवारी 1761चा दिवस उजाडला सकाळच्या प्रहरी इशारत होताच इब्राहिम खान गर्दीच्या तोफा धडाडू लागल्या. हर हर महादेव गर्जत भगवा रणकेसरी दुराणी सैन्यावर तुटून पडला. रणकंदन सुरू झाले. घोड्यांच्या किंकाळ्या, हत्तीचे चित्कार अन तोफांचा भडिमार. कुठे महाराष्ट्र अन कुठे पानिपत. .कुठे शनिवारवाड्याचे वैभव अन अन कुठे हा वेदनादायी अकाल. दख्खनपासून सतराशे किमी दूर अंतरावर उत्तरेत तहान भुकेने व्याकुळ मराठा एकाकी लढत होता कुणाशी तर दुराणी साम्राज्याचा बादशाह अहमदशाह अब्दाली दुराणीशी. अब्दालीसारख्या लुटेऱ्याला मात्र इथे अनेक सत्तांचा आश्रय होता.
शहाण्णवकुळी क्षत्रिय मराठा, आगरी, सागरी,वाघरी यांसह अठरापगड जातीचा मराठा तरुण, गारदी, मुसलमान अशी मराठा फौज पराक्रमाची शर्थ करत होती. सह्यपुत्रांनी पानिपतावर जणू राष्ट्ररक्षणार्थ यज्ञ मांडला होता. इब्राहिम खान गारदीच्या तोफा आग ओकत होत्या. या तोफांनी दुराण्यांना अक्षरशः भाजून काढले. पराक्रमात कुणीच कसर सोडली नव्हती. रण चंडिकेचा अवतार धारण केलेल्या भाऊच्या सैन्यासमोर टिकाव धरता न आल्याने अब्दालीचे सैन्य पळून जाऊ लागले होते. या पळपुटयाना अब्दालीने जीवाचे भय दाखवून परतवले होते दुपार पर्यत मराठ्यांनी अब्दालीच्या सैन्यावर सरशी घेतली होती मात्र अब्दालीने आपली रणनीती बदलली. त्याने हत्तीच्या मदतीने चालणाऱ्या अवजड तोफा मागे ठेवल्या आणि उंटावर जांबुरे बसवून युद्ध करता झाला. विश्वासराव पेशवा शौर्याने लढत असताना एक जंबुरा कपाळावर आदळून तो खाली पडला. विश्वासराव ठार झाल्याची बातमी सैन्यात वाऱ्यासारखी पसरली. पानिपतावर लढता लढता विश्वास पडला दुराण्यांनी मराठी फौजेला घेरले.
बलीवेदीवर आहुती पडत राहिल्या तरी सदाशिवाचे तांडवनृत्य सुरूच होते. अखेरच्या क्षणापर्यंत. अफगाण आणि रोहिल्यानी भाऊला घेरले होते शरीरावर कैक जखमा झाल्या तरी भाऊ लढतच होता अखेर तो जर्जर देह जीर्ण वटवृक्षासारखा धरणीवर कोसळला. अब्दालीच्या ताज्या दमाच्या दुराणी फौजेने मराठा सैन्याला कापून काढले हजारो कैद झाले. पानिपतावर हात, पाय, धड मुंडकी यांचा खच पडला होता कोण जिवंत आहे कोण मेलं युद्धाच्या वावटळीत कुणाचा कुणाला थांगपत्ता नव्हता जनकोजी शिंदे, इब्राहिम खान गारदी यांसह अनेक शूर मराठा कैद झाले त्यांना हाल हाल करून ठार मारले गेले. बेशुद्ध जर्जर अवस्थेत पडलेल्या महादजी शिंद्यांना राणेखानाने जीवाची बाजी लावून बैलाच्या पाठीवर टाकून सुरक्षित आणले.
या रणसंग्रामानंतर मात्र अब्दालीच्या हाती फारसे काही लागले नाही. नजीबखान रोहिल्याच्या सल्ल्याने मराठ्यांशी घेतलेला पंगा महागात पडला होता. सैन्यात बंडाळी सुरू झाली होती. मायदेशी परतताना त्याने कैद केलेल्या मराठयांचा गुलाम म्हणून लिलाव केला. काही ठिकाणी शिखांनी अफगाणी फौजेशी दोन हात करून मराठ्यांची सुटका केली. कदाचित मराठ्यांचा राष्ट्ररक्षणाचा उदात्त हेतू त्यांच्या उशिरा ध्यानी आला असावा पण आता खूपच उशीर झाला होता. रणधुमाळीत धारातीर्थी पडलेल्या भाऊचे धड तीन दिवसांनी मिळाले काशीराजाने अवधच्या नबाबाकरवी अब्दालीशी बोलणी करून व त्याला खंडणी देऊन भाऊचा देह ताब्यात घेतला व रीतीरिवाजाने सन्मानपूर्वक त्यांचे अंत्यविधी केले. इतिहासात सदाशिवराव भाऊसारखा योद्धा होणे नाही त्याने गाजवलेल्या पराक्रमाचे वर्णन खुद्द अहमदशाह अब्दालीने नानासाहेब पेशव्यांना सुलुकीसाठी पाठवलेल्या पत्रात कथन केले होते ते वाचून पेशव्यांना शोक अनावर झाला.
पानिपतच्या धरेला रक्ताचा अभिषेक होत होता. चहू दिशांना रक्ताचा सडा पानिपतच्या या रणकंदनाचा साक्षीदार असलेले ते आंब्याचे झाड, त्याची पाने रक्ताने काळी ठिक्कर पडली अशी युद्धकथा कदाचित तोफांचा भडिमार झाल्याने असेल पण आजही ते स्मारक ‘काला आंब’ ‘म्हणून मराठ्यांच्या अभूतपूर्व पराक्रमाची साक्ष देत आहे. ती कोण माणसे होती ? कशी घडली होती ??जणू परतण्यासाठी गेलीच नव्हती.. पानिपतच्या बखरीत (इ स.1761) रघुनाथराव यादव यांनी त्याचे वर्णन- कथन केले आहे. उत्तरेतील एका साहूकाराने दक्खनमधील व्यापाऱ्याला दिलेल्या एका पत्रात त्याचा उलगडा झाला. त्यात लिहिले होते -‘दोन मोत्ये गळाली, सत्तावीस अशरफया(मोहरा )हरपल्या रुपये खुर्दा किती गेला त्याची गणतीच नाही. ” मराठ्यांच्या पानिपताचा हा हिशोब.पानिपतच्या या रणसंग्रामाला जगाच्या इतिहासात तोड नाही. असे युद्ध होणे नाही आणि सदाशिवरावभाऊसम योद्धा होणे नाही.
पानिपतची ही तिसरी लढाई माझ्यासाठी सदैव औत्सुक्याचा आणि जिज्ञासेचा विषय राहिला आहे. याच जिज्ञासेपोटी मी रघुनाथराव यादवलिखित पानिपतची बखर, बाबासाहेब पुरंदरे यांचे ऐतिहासिक लिखाण, विश्वास पाटील यांची पानिपत ही कादंबरी, आंतरजालावर उपलब्ध लेख, जुनी कात्रणे वाचून काढली. रोड मराठा, बलुची मराठा या मराठा जमातीचे संदर्भ शोधले. संजय खानच्या द ग्रेट मराठा दूरदर्शन मालिकेतील पानिपतचे एपिसोड युट्यूबवर पुन्हापुन्हा बघितले. पानिपत च्या या तिसऱ्या लढाईची तर उत्सुकता वाढतच गेली.. प्रत्यक्ष जाऊन पानिपतक्षेत्र बघावे असाही विचार मनात आला. जर कधी तीर्थक्षेत्र भेटीचा योग आलाच तर कुरुक्षेत्र आणि पानिपताला नक्की भेट दयावी कारण पानिपतची ही भूमी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे.
मथुरा जाते है लोग गिरीधर से मिलते है
बनारस जाते है लोग हर हर से मिलते है
जाओ तनिक कुरुक्षेत्रपर जहा सुनाई देगी तुमहें
हर हर महादेव कि गुंज भी आज
कुछ पल उस सदाशिव से भी मिल लो
जिस ने रखी थी तुम्हारे भोले शिव कि लाज.
लेखक – कृष्णा हरिश्चंद्र हाबळे
वृत्तपत्र लेखक -मुक्तपत्रकार
संपर्क -7775993105
ऐतिहासिक संदर्भ –
1 पानिपतची बखर -1761 रघुनाथराव यादव
2.पानिपत -विश्वास पाटील
Leave a Reply