नवीन लेखन...

बिथोवेनचा मृत्यू

लुडविग वॅन बिथोवेन हा अभिजात पाश्चात्य संगीताच्या क्षेत्रातला एक महान संगीतकार. इ.स. १७७०मध्ये जन्मलेल्या या जर्मन संगीतकारानं आपल्या सांगीतिक कारकिर्दीत उत्तमोत्तम अशा सुमारे सातशे सांगीतिक रचना निर्माण केल्या. त्याची ही सांगीतिक कारकिर्द सुमारे पंचेचाळीस वर्षांची होती. आश्चर्य म्हणजे अशी दीर्घ काळ निर्मितीक्षमता लाभलेल्या या संगीतकाराची श्रवणशक्ती मात्र त्याच्या तरूण वयातच क्षीण होऊ लागली होती. वयाच्या पंचेचाळिशीतच ती इतकी क्षीण झाली की त्याला प्रत्यक्ष कार्यक्रमात भाग घेणं अशक्य झालं. वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी, १८२७ साली बिथोवेन मृत्यू पावला. तरीही मृत्यूच्या काही वर्षं अगोदरपर्यंत तो संगीतरचना करीत राहिला. श्रवणशक्ती क्षीण होत असूनसुद्धा, इतक्या मोठ्या प्रमाणात दर्जेदार संगीत रचनांची निर्मिती करणाऱ्या या कलाकाराच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट होतं. त्यामुळे त्याच्या मृत्यूबद्दल संगीतप्रेमींनाच नव्हे तर संशोधकांनाही कुतूहल होतं. हे कुतूहल आता शमलं आहे. आणि हे कुतूहल शमण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत त्या बिथोवेनच्या केसांच्या बटा! इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातील ट्रिस्टान जेम्स अलेक्झांडर बेग आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी बिथोवेनच्या केसांवर केलेलं हे संशोधन ‘करंट बायोलॉजी’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.

बिथोवेनला आपल्या प्रकृतीनं सतत त्रास दिला होता. वयाच्या पंचविशीतच त्याला कानाचा विकार सुरू झाला. त्याच्या कानात सतत गुणगुणल्यासारखा आवाज येऊ लागला. त्यानंतर काही काळानं त्याला मोठ्या आवाजाचा त्रास होऊ लागला. कालांतरानं त्याला वरच्या पट्टीतले आवाज ऐकू येईनासे झाले. यामागचं कारण त्याच्या डॉक्टरांनाही कळू शकलं नाही. कानाचा विकार सुरू होण्याच्या सुमारासच त्याला तीव्र पोटदुखी आणि पचनशक्तीशी संबंधित विकार जडले. बिथोवेनचे हे आजार शेवटी तीव्र होत गेले व अखेर त्याला मृत्यू आला. बिथोवेनच्या मृत्यूनंतर काही काळानं, त्याच्या सामानाची आवराआवर करताना त्याच्या दोन सहकाऱ्यांना त्याच्या टेबलाच्या खणामध्ये, १८०२ साली त्याच्या भावांना लिहिलेलं एक पत्र मिळालं. आपली श्रवणशक्ती कमी होऊ लागल्यानं, त्या काळात तो निराश होऊ लागला होता – इतका की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचं त्या पत्रातून दिसून येत होतं. मात्र त्या पत्रातच त्यानं, मनात असलेल्या सगळ्या संगीतरचना पूर्ण करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. याच पत्रात त्यानं, ‘मृत्यूनंतर आपल्या आजाराची सर्व माहिती जाहीर केली जावी’, अशी इच्छा व्यक्त करताना, ‘त्यामुळे जग मला समजून घेईल!’ असंही म्हटलं होतं. बिथोवेनच्या आजाराचं कारण शेवटपर्यंत काही स्पष्ट झालं नाही. बिथोवेनसंंबंधी केल्या गेलेल्या विविध नोंदींच्या, त्याच्या मृत्यूनंतर केल्या गेलेल्या अभ्यासातूनही, त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला ते समजू शकलं नाही. परंतु आता दोनशे वर्षांनी, ट्रिस्टान जेम्स अलेक्झांडर बेग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिथोवेनच्या केसांच्या बटांवर केलेल्या संशोधनातून त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं आहे.

ट्रिस्टान जेम्स अलेक्झांडर बेग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, आपल्या संशोधनासाठी बिथोवेनच्या  केसांच्या बटांचे एकूण ३४ नमुने उपलब्ध झाले. हे नमुने अमेरिका, इंग्लंड तसंच युरोपमधील विविध ठिकाणांहून गोळा केले गेले होते. यांतील काही नमुने हे वैयक्तिक संग्रहातले नमुने होते, तर काही नमुने सार्वजनिक संस्थांच्या ताब्यातले नमुने होते. या संशोधकांनी प्रथम या नमुन्यांची इतिहासावर आधारलेली विश्वासार्हता तपासून पाहिली. त्यासाठी त्यांनी या नमुन्यांचा दोनशे वर्षांत कुठून कुठे प्रवास झाला ते जाणून घेतलं. त्यानंतर या नमुन्यांतून जास्तीत जास्त विश्वासार्ह असणाऱ्या एकूण आठ नमुन्यांची पुढील संशोधनासाठी निवड केली. हे नमुने नोव्हेंबर १८२१ ते मार्च १८२७, या बिथोवेनच्या अखेरच्या सहा वर्षांच्या काळात गोळा केले गेले होते. (यांतील एक नमुना तर, बिथोवेननं हाल्म या आपल्या सहकारी संगीतकाराला स्वतःच दिला होता.) या संशोधकांनी त्यानंतर, निवडलेल्या या आठ नमुन्यांची जनुकीय विश्वासार्हता तपासली. त्यासाठी या संशोधकांनी, या नमुन्यांचं जनुकीय विश्लेषण करून, त्यावरून त्यांचे जनुकीय आराखडे तयार केले. या जनुकीय आराखड्यांची बिथोवेनच्या वंशजांच्या जनुकीय आराखड्यांशी तुलना केली. या तुलनेवरून, या आठ नमुन्यांपैकी पाच नमुने हे बिथोवेनच्याच केसांचे असल्याचा पुरेसा पुरावा मिळाला.

या पाच नमुन्यांच्या जनुकीय आराखड्याच्या तपशीलवार अभ्यासानंतर, बिथोवेनच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झालं. बिथोवेनला मृत्यूच्या वेळी हेपाटायटस बी या विषाणूचा संसर्ग झाल्याचं जनुकीय अभ्यासातून दिसून आलं. कारण बिथोवेनच्या केसांच्या नमुन्यात हेपाटायटस बी या विषाणूचाही डीएनए आढळला. त्याचबरोबर बिथोवेनच्या जनुकीय आराखड्यात या संशोधकांना, यकृताच्या विकाराशी संबंधित इतर दोन जनुकही आढळले. यांतल्या एका जनुकावरून त्याला यकृताचा सिरॉसिस हा विकार जडल्याचं स्पष्ट दिसत होतं. तसंच दुसरा एक जनुक, बिथोवेनला हिमोक्रोमॅटोसिस हा, यकृतावर परिणाम करणारा धोकादायक अनुवांशिक विकारही असल्याचं दर्शवत होता. त्यामुळे जेव्हा त्याच्या यकृताला हेपाटिटिस बी या विषाणूचा संसर्ग झाला, तेव्हा त्याची तीव्रता या अनुवांशिक धोक्यांमुळे वाढली होती. त्यातच बिथोवेनच्या कथित अतिमद्यप्राशनामुळे या संसर्गानं अधिक गंभीर रूप धारण केलं असावं व त्यातचं त्याला मृत्यू आला असावा.

ट्रिस्टान जेम्स अलेक्झांडर बेग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या संशोधनातून बिथोवेनच्या मृत्यूचं कारण जरी कळलं असलं तरी, त्यातून उभा राहिलेला एक प्रश्न म्हणजे बिथोवेनला हा संसर्ग केव्हा व कुठे झाला असावा? कारण बिथोवेनला पोटाचे काही विकार तरूणपणीच जडले होते. या प्रश्नाबरोबर आणखी एक प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. तो प्रश्न म्हणजे, बिथोवेनची श्रवणशक्ती क्षीण का होत गेली असावी? कारण आताच्या या जनुकीय अभ्यासातून, बिथोवेनच्या श्रवणशक्तीच्या ऱ्हासासंबंधी कोणतीच माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र आताच्या या सर्व संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच्या एका संशोधनात बिथोवेनचा मृत्यू शिशाच्या विषबाधेनं झाला असल्याची शक्यता वर्तवली गेली होती. शिशाच्या पेल्यातून दीर्घकाळ मद्यपान करीत राहिल्यास ही शक्यता नाकारता येत नव्हती. आताच्या संशोधनानं मात्र ही शक्यता साफ फेटाळून लावली आहे आणि बिथोवेनचा मृत्यू हा यकृताच्या संसर्गानं झाला असल्याचं निश्चित झालं आहे.

(छायाचित्र सौजन्य : Joseph Karl Stieler / Ira F. Brilliant Center for Beethoven Studies, San Jose State University)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..