नवीन लेखन...

कवी आणि गीतकार दासू वैद्य

दासोपंत हरिहरराव वैद्य उर्फ दासू वैद्य यांनी कवितांप्रमाणेच नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन या प्रांतातही विपुल लेखन केले आहे. कवी आणि गीतकार दासू वैद्य यांचा जन्म १० डिसेंबर १९६७ रोजी झाला. त्यांनी काही एकांकिकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. ‘दासू’ ची कविता आजूबाजूच्या जीवनात अधिक रमते. विसंगती आणि विरोध ही त्यांच्या कवितेची शक्तिस्थाने आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण नसलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड गावी दासूंचे बालपण गेले. तिथे कुस्तीचे फड रंगत होते, तरीही निसर्गाशी जोडले राहिल्याने कविता बहरली. शाळेत असताना ग्रामीण जीवन जवळून अनुभवता आले. गणितासारख्या विषयाशी त्याकाळात कधी जमले नाही तरी लहानपणापासून सगळ्या कविता तोंडपाठ असायच्या.

“आई-वडील व भावाने तुला जे काय करायचे आहे ते कर अशी मुभा दिली, त्यामुळे चौकटीत राहून स्वैराचारासारखे मिळवत गेलो,” असेही दासू यांनी स्वतः बाबत सांगितले आहे. दासू वैद्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून मराठी या विषयात एम.ए. तसेच डिप्लोमा इन ड्रामा शिक्षण घेतले. यु.जी.सी. तर्फे त्यांना रिसर्च फेलोशिप देखील मिळाली होती. तर एम.फिलसाठी ‘भारत सासणे यांच्या दीर्घकथा’ तर पीएच.डी.साठी ‘भारत सासणे यांचे साहित्य’ हे विषय निवडून सदर विषयांवर त्यांनी प्रबंध लेखन केलेले होते. काहीकाळ बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्यपद देखील त्यांनी भूषविलेले आहे. वृत्तपत्र विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद पुरस्कृत ‘शिक्षक प्रतिभा पुरस्कार-२००९’ त्यांना प्रदान करण्यात आलेला होता.

१९८७ पासून मराठीतील वाड्मयीन नियतकालिकांमधून सातत्याने ते कविता लेखन करत आहेत. मौज, अनुष्टुभ, प्रतिष्ठान, युगवाणी, अभिरुची, साक्षात, ललित, अक्षर चळवळ, कवितारती, शब्दवेध, अभिधानंतर, महाराष्ट्र टाईम्स, मिळून साऱ्याजणी, शब्दालय, साधना इत्यादी अनेक वाड्मयीन अंकांमधून आजवर त्यांच्या कविता प्रकाशीत झालेल्या आहेत. पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला ‘तूर्तास’ हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह. मान्यवर समीक्षक व रसिक वाचकांनी गौरविलेल्या या पहिल्याच काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचे समजले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्या पुरस्कारांमध्ये रा.ना.पवार प्रतिष्ठान, सोलापूरचा काव्य पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा ‘मराठी कविता राजधानी पुरस्कार’, बुलडाणा साहित्य संघाचा ना.घ.देशपांडे साहित्य पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीचा इंदिरा संत काव्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाचा विशाखा पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे ललित मासिकाच्या लक्ष्यवेधी पुस्तकात व अंतर्नाद मासिकाने निवडलेल्या शंभर वर्षांतील पन्नास पुस्तकांत ‘तूर्तास’ या कविता संग्रहाची निवड झालेलीं आहे. दासू वैद्य यांना मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या हस्तलिखित कवितांसाठीच्या ‘कवी प्रफुल्ल दत्त काव्य पुरस्कार’, ललित लेखनासाठीच्या लोकमत उत्कृष्ट लेखन पुरस्कार, समग्र लेखनासाठीच्या कै.नरहर कुरुंदकर स्मृती पुरस्कार या सारख्या अनेक पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आलेले आहे. पॉप्युलर प्रकाशन प्रस्तुत ‘चौघांच्या कविता’ या कार्यक्रमाचे त्यांनी महाराष्ट्रभर सादरीकरण केलेले आहे. दासू वैद्य हे केवळ कविता लेखनच करतात असे नाही तर कवितांचा इंग्रजी, मल्याळम, हिंदी इत्यादी भाषांमधून प्रभावीपणे अनुवाद देखील करतात.

दासू वैद्य यांनी बालसाहित्यामध्ये देखील आपले भरीव असे योगदान दिलेले आहे. ‘भुर्रर्र’ या त्यांच्या बालकथा संग्रहाला महाराष्ट्र बालसभा, कोल्हापूरचा २००७ सालचा उत्कृष्ट बालकथा संग्रह पुरस्कार मिळालेला असून ‘क-कवितेचा’ या बालकविता संग्रहाला सौ.शशिकला आगाशे स्मृती बालवाड्मय पुरस्कार, बुलडाणा व मासिक ऋग्वेद बालसाहित्य पुरस्कार, आजरा, जि.कोल्हापूर असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. महावीर जोंधळे यांच्या ‘आसवं गाळती कासवं’ या बालकादंबरीचे त्यांनी नाट्यरुपांतर करून त्याचे महाराष्ट्रात यशस्वीरीत्या व्यावसायिक प्रयोग केलेले आहेत. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या इयत्ता सहावीच्या ‘सुगम भारती’ क्रमिक पाठ्यपुस्तकात ‘पक्ष्यांना घर हवे’ या बालनाट्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेसाठी, अनेक पुरस्कारांच्या निवड समितीवर, कविता विभागासाठी तसेच विविध विद्यापीठांच्या युवक महोत्सवात नाटक, कविता या कला प्रकारांसाठी परीक्षक व तज्ञ म्हणून त्यांची वेळोवेळी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुद्रेमनी, ता.जि. बेळगांव (कर्नाटक) येथे पार पडलेल्या पाचव्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद देखील त्यांनी यशस्वीपणे भूषविलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून, साहित्य अकादमीच्या महोत्सवांमध्ये त्याचप्रमाणे आकाशवाणी व दूरदर्शनवरून अनेकवेळा कविता वाचन करण्याची संधी त्याला लाभलेली आहे. महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी व्याख्याने तसेच विविध चर्चासत्रांमध्ये व कवितांच्या कार्यशाळेमध्ये त्यांनी हिरीरीने आपला सहभाग नोंदविलेला आहे. आकाशवाणीच्या अखिल भारतीय नभोनाट्य स्पर्धेत त्यांच्या ‘वाळवी’ या नभोनाट्याला लेखनासाठीचा पुरस्कार मिळालेला असून या नभोनाट्याचा इतर भारतीय भाषांमधून अनुवाद देखील त्यांनी केलेला आहे.

मदुराई येथे झालेल्या राष्ट्रीय युवक महोत्सवात नाट्यविभागाचे सुवर्णपदक त्यांनी पटकावलेले आहे. महाराष्ट्रातील प्रतिष्टीत एकांकिका स्पर्धांमधून ‘एक लेखक लिहिणार आहे..’ ‘आम्हाला बांधायचय मंदिर..’ या सारख्या एकांकिकांसाठी व ‘च्यानल झीरो’ या पथनाट्यासाठी लेखन, दिग्दर्शनाची अनेक पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत देखील दिग्दर्शनासाठी पारितोषिक त्यांना मिळालेले आहे. एवढेच नव्हे तर साक्षरता अभियानांतर्गत पथनाट्य लेखन व सादरीकरण देखील केलेले आहे. त्यांच्या मरून पडलेला पांडुरंग, एकदा मी, भीती मेंदूत आरपार या सारख्या अनेक कवितांचा, ‘तूर्तास’ या कविता संग्रहाचा तसेच ‘देता आधार का करू अंधार’ या एकांकिकेचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक मान्यवरांच्या वाड्मयीन मुलाखती विविध अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.

दासू वैद्य यांनी आजवर अनेक चित्रपट, जाहिरातपट व मालिकांसाठी लेखन केलेले आहे. ‘बिनधास्त’ या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कै.ग.दि.माडगुळकर उत्कृष्ट गीतलेखन पुरस्कार तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पुरस्कार मिळालेला आहे. ‘भेट’ या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासाठी झी-गौरव पुरस्कार मिळालेला असून या व ‘सावरखेड एक गांव’ या चित्रपटाच्या गीतलेखनासाठी म. टा. सन्मानासाठी त्यांना नामांकन मिळालेले आहे. ‘सोनियाचा उंबरा’ या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी म. टा. सन्मान पुरस्कार तर ‘पदरी आलं आभाळ’च्या शीर्षक गीतासाठी लक्स सह्याद्री माणिक सन्मान देखील त्यांना मिळालेला आहे.

‘गाभ्रीचा पाऊस’, ‘खाली डोकं वरती पाय’ तसेच ‘तुकाराम’, सावरखेड एक गाव अशा चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केलेले आहे. ई टीव्ही, झी टीव्हीवरील ‘पिंपळपान’, ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘एक होता राजा’, ‘आपली माणसं’, ‘रंग माझा वेगळा’, ‘घर श्रीमंताचं’ इत्यादी मालिकांसाठी पटकथा तसेच शीर्षकगीत लेखन करण्याची त्यांना संधी मिळालेली आहे. तर ‘लेक वाचवा’ अभियानासाठी अभियानगीत लिहून सामाजिक उपक्रमांत देखील त्यांनी आपले योगदान दिलेले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4227 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..