नवीन लेखन...

‘दस्तक’ – मोहोल्ल्याच्या कानांवरची !

१९७० ला हा चित्रपट प्रदर्शित झाला तोवर आम्ही काय पाहायचे याचे निर्णय पिताश्री घेत असतं. “बॉबी, ज्युली” विसरूनच गेलो होतो. भुसावळ, सोलापूरला वेश्या वस्ती कोठे होती हे माहीत नव्हते. (अजूनही माहीत नाही.) पुण्याला ७७ साली आल्यावर, मंडई परिसरातील घरामुळे “बुधवार पेठ” हा भाग दृष्टीस पडला. दिवसाच्या भाजी बाजाराशेजारील रात्रीचा हा शरीर बाजार !

पुढेही सिटी पोस्ट किंवा श्रीनाथ टॉकीज मुळे आणि वार्षिक गणेशोत्सवात घेतलेल्या स्वातंत्र्यामुळे दिसत राहिला. पुढे अनिल कांबळे या कविमित्राच्या घरी रात्री दोन तास काव्यशास्त्रविनोदात घालविले आणि लक्षात आलं आपण पुण्यातील कोणत्या “परिसरात ” आहोत.

दस्तक त्यामुळे खूप उशिरा पाहिला गेला आणि त्याबाबाबतचा गिल्ट मनात कायम राहिला.

दस्तक मधील मोहोल्ला – “अमर प्रेम” सारखा सुश्राव्य नाही. तेथे ” रैना बीती जाय” सारखी आर्त लता नाही की “बडा नटखट हैं ” सारखी गोड शिकायत नाही. हा मोहोल्ला “मौसम “सारखा अंगावर येणारी वस्ती दाखवत नाही.

येथे विरुद्ध बाजूची घुसमट आहे. राजिंदर सिंग बेदी सारख्या बंडखोर माणसाने स्वतःच्याच नभोनाट्यावर हा चित्रपट बेतलाय. संजीव तोवर प्रकाशायचा होता. त्याचे चाचपडणे सुरु होते. रेहाना पूर्णतया नवी होती. समांतर लाट या चित्रपटाने स्थिर केली. दोन कर्तबगार माणसांचे हात या चित्रपटाला लागले – मदनमोहन आणि हृषीदां ! त्यामुळे आता चकाकते      ” सोने ” होणे अपरिहार्य होते.

लालबत्ती मोहोल्ल्यात हमीद (संजीव ) आणि सलमा (रेहाना) हे नवपरिणीत जोडपं अनवधानाने राहायला येतं. त्या घराचा पूर्वेतिहास (शमशाद बेगम नामक मुजरा नर्तिका तेथे राहात होती.) त्यांना माहित नसतो. मुंबईतील जागेची टंचाई ७० सालीही इतकीच तीव्र होती. त्यामुळे आनंदून आणि मागचा -पुढचा विचार न करता ते राहायला येतात. आता दारावरचे “दस्तक” सुरु होतात- बदललेल्या परिस्थितीशी अनभिज्ञ असलेल्या गिऱ्हाईकांचे ! दोघेही शरमून जातात. ” गरती ” स्त्री आणि “वेश्या ” अशा दोन भूमिकांमध्ये गोंधळ सुरु होतो -आतबाहेर !

सलमाच्या नारीजीवनातील हेलकावे मजरुहने ओरखड्यांसारखे टिपलेत –

हम हैं मताये कूचा बाजार की तरहा !
उठती हैं हर निगाह खरीददार की तरहा !!

आजही २०२० साली पुण्याचा बुधवार पेठेतून दिवसा जायचं म्हटलं तर ते टाळण्याकडे कल असतो आणि इथे प्रत्येक नज़र ग्राहकाची, कारण काय तर आम्ही बाजार मांडून बसलोय !

दुसरी भळाळती रचना – ” बैय्या ना धरो ” ( राग चारुकेशी) लताच्या सहज स्वरातून इथे मदनमोहन जाळे टाकतो आणि आपण त्यांत गुरफटतो.

मात्र जास्त पोहोचले ते-  ” माई री मैं कासे कहू पीर अपने जिया की  ! ”

मला स्वतःला ” बैय्या ” आणि ” माई री ” आलटून -पालटून क्र. १ वाटतात.

विशेषतः दस्तुरखुद्द मदनमोहनच्या आवाजातील “माई री “!

त्याच्या आवाजात फक्त दर्द नाही तर शांतवणारा गोडवा आहे.

संगीतकाराने स्वतःची रचना गायली की तो आणखी “पोहोचतो ” हा माझा अनुभव आणि दावा !

दरवेळी इथे पराभव पत्करणारी लता असते हे तिचे ( आणि आपलेही ) भागधेय !

“ज्योती कलश झलके ” वाले बाबुजी आणि ” धीरे से आजा रे ” वाले सी रामचंद्र ही आणखी उदाहरणे !!

पण “दस्तक “मधील लता -सुरीली ! आपल्या आवडत्या मदन भैय्या च्या ओंजळीत ती सगळा गोडवा ओतायची, आणि ही गोड तक्रार खय्याम पासून सर्वांची ! लताच्या सर्वाधिक आवडीच्या पहिल्या दहा गाण्यात मदनमोहनची जास्त आहेत.

पारितोषिकांनी या चित्रपटाची झोळी भरली. यथावकाश या चित्रपटातील सर्व मंडळी कर्तृत्वाच्या उंचीवर पोहोचली – अपवाद रेहानाचा ! तिची दस्तक कानांवर जास्त काळ रेंगाळली नाही.

त्या मोहोल्य्यासारखीच गावकुसाबाहेर राहिली.  तिथून गेलो तरच कानी पडणारी !

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..