मराठीतील प्रख्यात अभिनेते दामूअण्णा मालवणकर

नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्द फेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८९३ रोजी निपाणी येथे झाला.

दामूअण्णा मालवणकर यांचे पूर्ण नाव दामूअण्णा बापूशेठ मालवणकर. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण त्यांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. तारुण्यात नाटकांच्या ध्यासामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. मात्र १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली.

चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून ङ्गिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडङ्गेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. १९१८ साली दामूअण्णा मालवणकर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हा ते दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकात भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा दीनानाथ मंगेशकरांकडेच राहिले.

१९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटातल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मा. विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. मा. विनायक यांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात मा. विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सावकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.

त्यानंतर विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या. मा.विनायक यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच. १९४७ साली मा. विनायक यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटातून भूमिका केली. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खर्याी अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत. चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत.

त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वत:ची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे सार्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला. राम गणेश गडकरी यांचा ‘तिंबूनाना’, चिं.वि. जोशींचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या.

भारती मंगेशकर म्हणजेच ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी ह्या दामुअण्णा मालवणकर यांची कन्या. पु.ल नी एकदा भारती मंगेशकर यांना बघितले तेव्हा म्हणाले होते ” ही मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!” दामूअण्णा मालवणकर यांचे निधन १४ मे १९७५ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/शशिकांत किणीकर

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2285 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: कॉपी कशाला करता? लेखकाला लिहायलासुद्धा कष्ट पडतात.. चोरी कशाला करायची ? स्वत:च लिहा की....