नवीन लेखन...

इंग्रज अधिकारी रँण्डला यमसदनी धाडणारे दामोदर चाफेकर

इंग्रज अधिकारी रँण्डला यमसदनी धाडणारे दामोदर चाफेकर यांचा जन्म २५ जून १८६९ रोजी झाला.

पुण्यामध्ये १८९७ मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडित रूग्णांना शोधून उपचार करण्याच्या नावावर इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा हौदोस घातला. इंग्रजांविरूद्धात असंतोष पसरू लागला. रँड हा अत्यंत क्रुर, खुनशी इंग्रज अधिकारी पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर होता. दामोदरपंतांनी रँडचा वध करण्याची योजना आखली. २२ जून १८९७ रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांना वधकर्यांची नावे कळाली व त्यांनी दमोदरपंतांना पकडले. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण व वासुदेव चापेककर, तसेच महादेव रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले.

चाफेकर हे मूळचे कोकण प्रांतातील वेळणेश्वर गावचे राहणारे होते. त्यांच्या घराण्याची एक शाखा पुण्याजवळ चिंचवड येथे स्थायिक झाली. विनायकराव चाफेकर यांनी तेथे मोठी मान्यता मिळवली. त्यांच्या मुलाचे नाव हरी होते. हरीचा गळा होता व पाठांतर चांगले होते. तो लहान वयात कीर्तने करू लागला.

लवकरच हरीपंतांची चांगल्या कीर्तनकारांत गणना होऊ लागली. ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांना दोन मुली व तीन मुलगे अशी अपत्ये होती. मुलांमध्ये सर्वात मोठा दामोदर होता. बाळकृष्ण यांचा १८७३ साली व वासुदेव यांचा १८७९ साली जन्म झाला.

तिन्ही मुले बुद्धिमान व पाणीदार होती. ती आपल्या वडिलांना कीर्तनात साथ देत असत. ‘दास्यभाव रुजवणारे हे इंग्रजी शिक्षण मला नको,’ असे म्हणून दामोदराने दुसरीतून इंग्रजी शाळा सोडली. आधी वडिलांबरोबर व मग स्वतंत्रपणे तो कीर्तन करू लागला.

हरिपंतांकडे ‘केसरी’ येत असे. आसपासच्या घरांतील अनेक मंडळी एकत्र जमून नित्यनेमाने केसरीचे वाचन करीत असत. दामोदर श्रोत्यांमध्ये सर्वांत पुढे बसे. वाचनानंतर होणार्याा चर्चेत तो आवेशाने भाग घेई. कोल्हापूरच्या राजाच्या छळाच्या गोष्टी वाचून त्याला फार वेदना होत असत. ‘कोणीतरी यांना चांगली शिक्षा केली पाहिजे.’ असे तो वारंवार म्हणत असे.
१७ जुलै १८८२ रोजी टिळक आणि आगरकर यांना बर्वे प्रकरणावरून चार महिन्यांची शिक्षा झाली. तो समाचार ऐकून दामोदर धाय मोकलून रडला. तो त्या दिवशी जेवला नाही. त्याची आई म्हणाली, ‘दामू टिळकांनी रडायला शिकवले नाही. त्यांनी लढायला शिकवले.’

मग दामोदर आपली नेहमीची कामे करू लागला. पण टिळक तुरूंगातून सुटून येईपर्यंत तो एक वेळच जेवत होता. टिळक आणि आगरकर सुटले त्या दिवशी तो तुरुंगाच्या फाटकावर गेला. त्यांना पाहून तो आनंदाने नाचला. त्याने टिळकांचा जयजयकार केला. टिळकांच्या चरणाची धूळ त्याने मस्तकी लावली.

दामोदरपंत व त्याचे समवयस्क नवतरूण रोज दूर फिरायला जात असत. आसपासच्या किल्ल्यांवरही ते जात असत. एखाद्या शिलाखंडावर बसून ते भारताच्या भविष्याविषयी चर्चा करीत असत. त्यांनी ‘राष्ट्रहितेच्छू मंडळांची’ स्थापना केली. बलाच्या उपासनेशिवाय देशाला तरणोपाय नाही हे जाणून त्यांनी व्यायामशाळा सुरू केल्या. तलवार चालविणे, भाला फेकणे, गोफणीने दगड मारणे अशा गोष्टींचा ते अभ्यास करू लागले. त्यांच्यापैकी प्रत्येकजण रोज पाचशे दंड व हजार बैठका इतका व्यायाम करीत असे. फुलाने कितीही नको म्हटले तरी भुंगे त्याच्याभोवती रंजी घालणारच. दामोदरच्या बोलण्या-चालण्यात तसेच आकर्षण होते. त्याने निवडक तीस-चाळीसजणांशी विशेष संबंध ठेवला. सर्वजण या समूहाला चाफेकर मंडळ म्हणून ओळखू लागले.

‘ठोऽ ठोऽ ठोऽ’ असा रिव्हाल्वरच्या गोळ्यांचा आवाज दणाणला. आयर्स्टच्या डोक्याला त्या गोळ्या भेदून गेल्या. ‘मला मारले’, एवढे शब्द त्याने कसेबसे उच्चारले.

आयर्स्टरबाई गांगरल्या. काय झाले ते प्रथम त्यांना कळलेच नाही. ‘काय मूर्ख आहेत हे काळे लोक! खुशाल रस्त्यावर फटाके फोडत आहेत, असे त्या म्हणाल्या. फटाक्यांच्या आवाजाने त्यांच्या टांग्याचा घोडा बुजत होता. तेवढ्यात मागे टांग्यातच आवाज आला. ‘मूर्खांनी टांग्यावर फटाके टाकलेत की काय?’ असे त्या म्हणतात, तोच आयर्स्टचा देह त्यांच्या अंगावर कोसळला. आयर्स्टच्या डोक्यातून भळभळ रक्त वाहात होते. त्या मोठ्याने किंचाळल्या, ‘वाचवा, वाचवा! भयानक प्रकार! अरे, गाडी थांबव.’

टांगेवाल्याला बाईंचे म्हणणे कळले नाही. फटाके पाहून बाई हर्ष प्रगट करीत असतील असे त्याला वाटले. टांगा घडघडा पुढे चालला होता. घोडा आवरेनासा झाला होता. मागाहून दोन टांगे भरधाव येत होते.

थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला!

तीच खूण ठरली होती. ते इशाऱ्याचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली.

त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला.

दामोदरपंतांनी झटकन खाली उडी मारली. विजेच्या चपळाईने ते झाडीत दिसेनासे झाले. अंधार, फटाक्यांचा आवाज आणि लोकांचा कोलाहल यामुळे टांग्यात काय घडले हे, टांगेवाल्याला कळलेच नाही. तो ऐटीत साहेबांचा टांगा हाकत होता.
पुढे आयर्स्टची गाडी भरधाव धावत होती. आयर्स्टबाई रडत ओरडत होत्या. त्यांच्या मागील टांग्यात लुईस आणि सार्जंट होते. बाईंचे ओरडणे ऐकून त्यांनी आपल्या गाडीतून उड्या मारल्या. धावत जाऊन त्यांनी पुढचा टांगा थांबवला. आयर्स्ट पती पत्नी खूप जखमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मागे त्यांना एक टांगा येताना दिसला. त्यात डॉक्टर असतील अशा कल्पनेने त्यांनी तो थांबवला. त्यांनी आत डोकावून म्हटले, ‘डॉक्टर लवकर चला. आयर्स्टसाहेब जखमी झाले आहेत. लवकर चला.’

पण, हे काय? टांग्यातील माणसाने काहीही उत्तर दिले नाही. त्याने कोणतीही हालचाल केली नाही. त्यांनी टांगेवाल्याला विचारले, ‘काय रे, टांग्यात कोण साहेब आहेत?’

टांगेवाला म्हणाला, ‘रँडसाहेब!’

लुईस आणि सार्जंट टांग्यात चढले. पाहतात तो रँडसाहेब घायाळ झालेले असून जवळजवळ बेशुद्ध होऊन पडले होते. सगळा टांगा रक्ताने भरला होता.

दोन्ही गाड्या ससून हॉस्पिटलकडे नेण्यात आल्या. आयर्स्ट आधीच मेला होता. रँडसाहेब दुसऱ्या दिवशी पहाटे थोडे शुद्धीवर आले. ते थोडेसे बोलले, पण ती सगळी असंबद्ध बडबड होती. त्यांना भयंकर वेदना होत होत्या. लोक म्हणत होते, हजारो लोकांना त्याने छळले, नाडले, पीडले आणि मारले, त्याचे फळ त्याला मिळाले. तीन जुलैच्या रात्री त्याचा अंत झाला. सगळ्या पुण्याला ‘त्राहि भगवान्’ करून सोडणारा जुलमी अधिकारी मेला. रँड आणि आयर्स्ट यांना मारल्यानंतर तिघेही चाफेकर बंधू, रानडे आणि आपटे जवळच्याच शेतामध्ये शिरले. दामोदरपंत आणि बाळकृष्णपंत कालव्याच्या बाजूने चालत गेले आणि मग फर्ग्युसन कॉलेजकडून गावात शिरले. वासुदेवराव चाफेकर, रानडे आणि आपटे हे तिघेजण, आपण जसे काही त्या गावचेच नाही अशा थाटात राजरस्त्याने घरी परत आले.

दोन दिवसांनी चाफेकर बंधूंनी पुणे सोडले. लवकरच दामोदरपंत मुंबईला नित्याप्रमाणे किर्तने करू लागले. पुण्याच्या वार्ता मुंबईला येऊ लागल्या. टिळकांना पकडले, नातूबंधूंना पकडले, अनेकांचा अनन्वित छळ करण्यात येत आहे, इत्यादी गोष्टी दामोदरपंतांच्या कानावर येत गेल्या. त्यांचे अंतःकरण विदीर्ण झाले. त्यांचे मन द्विधा झाले. दूर देशात पळून जावे, की रँडला मारले असे उघडपणे सांगून पकडवून घ्यावे? त्यांनी बाळकृष्ण व वासुदेव यांना अज्ञात स्थळी निघून जाण्यास सांगितले. आपल्या घराभोवती गुप्तचर फिरत असल्याचे त्यांनी पाहिले. ३० सप्टेंबर १८९७ रोजी त्यांना पकडण्यात आले. सर्व प्रकारचे प्रयोग त्यांच्यावर करण्यात आले, पण सगळे मी केले. माझा साथीदार कोणीही नाही. असे ते पुनःपुनः सांगत राहिले. शस्त्रे कशी मिळवली, कशी दडवली, कोणत्या शस्त्रांनी मारले वगैरे सगळे त्यांनी सांगितले. प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. साक्षी, पुरावे, युक्तिवाद इत्यादी गोष्टी झाल्या. द्रवीड बंधूंनी चाफेकरांविरुद्ध अनेक महत्त्वाच्या घटना सांगितल्या. न्यायाधीश क्रो याने दामोदरपंतास फाशीची शिक्षा ठोठावली. ते ऐकून दामोदरपंत निभर्यपण म्हणाले, ‘बस, फाशीच फक्त? आणखी काही घोर शिक्षा असेल तर द्या ना.’ प्रकरण वरिष्ठ न्यायालयापुढे गेले. त्याने फाशीचाच निर्णय दिला.

चाफेकर बंधुच्यावर २२ जून १८९७ हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता.

चाफेकर बंधुना १८ एप्रिल १८९८ रोजी पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली. स्मृतीदिनानिमित्त दामोदरपंत चाफेकरांना विनम्र आदरांजली!

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..