नवीन लेखन...

‘दलाल पर्व’

गोव्यामधील मडगाव हे छोटंसं निसर्गसुंदर गाव. गावातील एकमेव शाळेतील पाचवीचा वर्ग. वर्गावरचे मास्तर रजेवर असल्याने मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. पहिल्या बाकावरील एक मुलगा गोष्ट ऐकता ऐकता मुख्याध्यापकांचे पेन्सिलीने वहीमध्ये चित्र रेखाटत होता. पाऊण तासाने गोष्ट संपली व शाळेची घंटा वाजली. सर्व मुलांनी त्या मुलाभोवती गर्दी केली व त्याने काढलेले चित्र पाहू लागली. मुख्याध्यापकांनी देखील उत्सुकतेने ते चित्र पाहिले व ते आश्र्चर्यचकीत झाले. एवढ्या कमी वयात त्या मुलाने त्यांचे हुबेहूब चित्र काढले होते. मुलाला त्यांनी नाव विचारले. त्यावर विनम्रपणे त्यांना उत्तर मिळाले, ‘दिनानाथ दामोदर दलाल!’
मुख्याध्यापकांनी दिनानाथच्या वडिलांना भेटून सांगितले की, ‘तुमचा मुलगा चित्रकलेत हुशार आहे, त्याला पुढील शिक्षणासाठी मुंबईला पाठवा.’ वडिलांनी दिनानाथला मुंबईला पाठविले व त्यायोगे महाराष्ट्राला एक महान चित्रकार लाभला.
३० मे १९१६ रोजी दलालांचा जन्म मडगाव, गोवा येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर ते चित्रकलेच्या पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. केतकर आर्ट इन्स्टिट्युटमध्ये त्यांनी चित्रकलेतील बारकावे, कौशल्य शिकून घेतले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातून १९३७ मध्ये उत्तीर्ण होताच आपल्या चित्रकला कारकिर्दीस त्यांनी सुरुवात केली. त्यांनी पहिली नोकरी केली ‘बी. पी. सामंत आणि कंपनी’ या जाहिरात वितरण संस्थेमध्ये. त्यानंतर बा. द. सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी ते काम करु लागले. मामा वरेरकर यांच्या ‘वैमानिक हल्ला’ या पुस्तकासाठी त्यांनी पहिले मुखपृष्ठ केले. याच दरम्यान दलालांनी प्रा. अनंत काणेकर व मो. ग. रांगणेकर या साहित्यिक पत्रकार मित्रांच्या ‘चित्रा’ या साप्ताहिकासाठी व्यंगचित्रं काढली. ती व्यंगचित्रे तत्कालीन राजकीय परिस्थितीवर आणि ब्रिटीशांच्या धोरणावर टीका करणारी होती. काणेकरांच्या कल्पना प्रत्यक्षात साकारणारी व्यंगचित्रे बोलकी असल्याने प्रचंड गाजली. काणेकरांबरोबर दलालांनी भारतभर भ्रमंती केली, त्यावर आधारित ‘आमची माती, आमचे आकाश’ या पुस्तकाची निर्मिती झाली. ना. धों. ताम्हणकरांचा ‘गोट्या’, वि. वि. बोकिलांचा ‘वसंत’ ही त्यांनी साकारलेली व्यक्तिचित्रे विशेष गाजली.
१९४४ मध्ये ‘दलाल आर्ट स्टुडिओ’ची स्थापना करुन मराठी प्रकाशन विश्वात पुस्तकांची मुखपृष्ठे व अंतरंगातील चित्रे रेखाटने त्यांनी सुरु केले. त्यांच्या कामातील कलात्मक ताकदीचा प्रकाशकांना परिचय झाल्याने त्यांना भरपूर कामे मिळाली व मराठी पुस्तकांचा चेहरामोहराच बदलून गेला आणि ‘दलाल पर्व’ सुरु झाले…
दलालांची चित्रे मराठी मातीशी नातं सांगणारी होती. भारतीय पारंपरिक चित्रशैलीचे संस्कार त्यांच्या चित्रांत दिसत. वास्तववादी चित्रणातील त्यांचे कसब अप्रतिम होते. त्यांना साहित्याची मनापासून आवड होती. त्यांच्यासमोर साहित्यातील सर्व प्रकार येत असत व त्यांना ते योग्य न्याय देणारे चित्र साकारत असत.
पुस्तकांची मुखपृष्ठे व आतील चित्रे ही फक्त सजावट नसून पुस्तकाचा आशय दृष्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकांशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते, यांची जाणीव पहिल्यांदा दलालांच्या मुखपृष्ठांनी करुन दिली.
१९४५ मध्ये दलालांनी ‘दीपावली’ वार्षिकाचा पहिला अंक प्रकाशित केला. दर्जेदार साहित्य व दलालांच्या उत्तमोत्तम चित्रांनी सजलेला ‘दीपावली’ अल्पावधीतच लोकप्रिय झाला. हातात व्यावसायिक कामे प्रचंड प्रमाणात असूनही स्वतंत्र वेळ काढून दलालांची ‘दीपावली’ साठी चित्रनिर्मिती चालू असे.
भारतातील विविध चित्र प्रदर्शनात त्यांचा सहभाग असे. ‘दि बाॅम्बे अलर्ट सोसायटी’च्या वार्षिक प्रदर्शनात १३ वेळा दलालांची चित्रे पुरस्कार प्राप्त ठरली. गोवा, हैदराबाद, अमृतसर येथील प्रदर्शनामध्ये त्यांच्या चित्रांना सुवर्ण, रौप्य पदकं मिळाली.
‘दलाल आर्ट स्टुडिओ’ द्वारे प्रकाशित झालेली ‘शृंगार नायिका’, ‘चित्रांजली’, ‘भारताचे भाग्यविधाते’, ‘अमृतमेघ’ ही सचित्र पुस्तके रसिकमान्य ठरली.
दलाल यांनी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे यांच्या सह अनेक नामवंतांची व्यक्तिचित्रे रेखाटली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकातील सर्व प्रसंगचित्रे पुरंदरेंच्या ऐतिहासिक माहितीनुसार, बारकाव्यांसह साकारली. त्या सर्व चित्रांचे ‘महाराज’ नावाने स्वतंत्र चित्रमय पुस्तक देखील प्रकाशित झाले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सल्ल्यानुसार दलालांनी ४ फूट उंच व दहा फूट लांबीचे ‘शिवराज्याभिषेक सोहळ्या’चे चित्र कॅनव्हासवर साकारले. ते चित्र पुण्यात असताना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य मला लाभले.
दलालांची चित्रे पहातच माझी पिढी लहानाची मोठी झाली. इयत्ता पहिलीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकापासून मी त्यांची चित्रे पाहिली आहेत. सहावीच्या मराठी पुस्तकातील ‘नव्याची पौर्णिमा’ हे रंगीत चित्र अजूनही लक्षात आहे. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘माणदेशी माणसं’, ‘बनगरवाडी’ व गो. नी. दांडेकरांच्या ‘शितू’ कादंबरीतील चित्रं अविस्मरणीय आहेत.
१९७१ मध्ये ‘दीपावली’चा रौप्यमहोत्सव समारंभ पार पडला आणि वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी हा रंगसम्राट आपली चित्रमैफल अपुरी ठेवून स्वर्गवासी झाला…
दलाल गेले तेव्हा मी सहावीत होतो. चित्रकलेची आवड आम्हा दोघां बंधूंना होतीच. तेव्हापासून दलालांचे अंक जिथे कुठे दिसतील तिथून खरेदी करीत राहिलो. चित्रसंग्रह वाढताना, अंकही वाचल्याने ज्ञानात भर पडत गेली. आज ऐहीक सुखापेक्षा दलालांच्या चित्रसंग्रहाने व मासिकांनी, पुस्तकांनी आम्ही समृद्ध आहोत….
– सुरेश नावडकर ३१-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहे
सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..