नवीन लेखन...

दैवगती

रेवा रिमोट कंट्रोलची मोठी गाडी घेऊन इकडे तिकडे बागडत होती . खुश होती . साडेचार वर्षाची चिमुरडी . सुप्रिया सारखा सावळा सतेज रंग , नाजुक जिवणी , टप्पोरे डोळे , अतिशय गोड परी दिसत होती . ‘ मम्मा , मम्मा ‘ अशा तिच्या हाका चालू होत्या . छोटा गोरा गोरा पार्थ गाडी बरोबर धावत होता . सीमा समोर बसून त्यांची गंमत बघत होती.

मी , वासंती , नातीकडे कौतुकाने पाहत होते . जवळ जवळ दोन वर्षांनी ती युएस मधून आली होती . रेवाला मराठी समजत असलं तरी जास्त अमेरिकन स्टाईल इंग्रजी मध्ये संभाषण चालू होतं . संतोष आमचा जावई म्हणाला , ‘ आता जेवणासाठी मी काहीतरी बाहेरूनच घेऊन येतो आपण सगळे आरामात गप्पा मारत बसू . ‘ मी मान डोलावली . संतोष पूर्वीसारखाच खुश दिसत होता . त्याच्या आयुष्यात येऊन गेलेल्या वादळाच्या खुणा आता पुसट झाल्या होत्या . संतोष व सीमा एकमेकांबरोबर खूप खुश दिसत होते . माझं मन विचार करत होतं … संतोषचे चौघांचे कुटुंब आनंदात राहावे व त्यांच्यावर काही संकट येऊ नये हेच माझं देवाकडे मागणं होतं . रेवा तर खूप खुश आहे . मग मला आता काय टोचतं आहे ? रेवा माझी ओळख दोन वर्षांत पूर्णपणे विसरली आहे हे ? की ती अगदी पाहुण्यासारखी वागते आहे हे ? मला वाटतं सुप्रिया यात कुठेच नाही . संतोष बरोबरची खरी जागा तर तिची होती . सुप्रियाच्या आठवणीने माझ मन भरून आलं आणि डोळे वाहू लागले . आठवणींचा पट उलगडू लागला .

सुप्रिया हे माझे पहिले अपत्य . लग्नानंतर दीड वर्षांनी तिची चाहूल लागली तेव्हा मन अगदी हरखून गेलं . तिचा जन्म झाला तेव्हाच गोरं गोरं , खूप जावळ असलेलं नाजूकसं बाळ मला अजून आठवतंय . अतिशय गुणी होती ती . कधी रात्री जागवणार नाही वा खूप रडणार नाही . तिने टाकलेलं पहिलं पाऊल , तिचा पहिला दात , तिने पहिल्यांदा आई म्हटलं ते सारे क्षण मला काल घडल्यासारखे आठवतायेत . नंतर शाळेतही अभ्यासात हुशार . वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेई . बक्षिसे मिळवी . आमचा गाव रायगड जिल्ह्यातील मोठं गाव . बारावीत तिला सीईटीमध्ये छान मार्क मिळाले आणि पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिचं नाव लागलं . तिला एवढ्या लांब पाठवायला माझं मन तयार नव्हतं . तिचा बाबा सुद्धा तिला लांब पाठवण्याच्या पूर्णपणे विरुद्ध . तिने मला सांगितले , ‘ आई , आम्ही तीन मैत्रिणी एकत्र एक फ्लॅट भाड्याने घेणार आहोत . प्रत्येकाला एक स्वतंत्र खोली आहे . तुला कधीही माझी आठवण झाली की , तू पुण्याला येऊन राहू शकतेस . ‘ मी मन घट्ट केलं . आपण तिच्या उत्कर्षा आड नाही आलं पाहिजे असं ठरवलं . तिच्या बाबांना पण राजी केलं . या निर्णयाचा कधीही पश्चात्ताप झाला नाही तिने इंजिनिअरिंगची चारही वर्ष फर्स्ट क्लास मिळवला .

मी अनेक वेळा पुण्याला जाऊन राहिले . आम्ही खूप गप्पा मारल्या . रात्री सुद्धा भटकलो . खरेदी केली . वैशालीत जाऊन मिसळ खाल्ली . खूप मजा केली . तिच्या मित्र – मैत्रिणींशीही माझी ओळख झाली .

जेव्हा कॉलेजमध्ये प्लेसमेंट सुरू झाल्या तेव्हा सुप्रिया मला म्हणाली , ‘ आई , मी प्लेसमेंट प्रक्रियेत भाग घ्यायचा नाही असं ठरवलं आहे . मी तीन – चार महिने तुझ्या व बाबां बरोबर गावी येऊन राहीन आणि त्यानंतरच मी ठरवीन की मला जॉब करायचा आहे की नाही . ‘ मला खूपच आश्चर्य वाटलं व पटलंही नाही . मी तिला म्हटलं , ‘ तू एवढ्या कष्टाने शिक्षण घेतलं . मग त्याचा उपयोग करायची वेळ आली तेव्हा तू मागे का येतेस ? कॅम्पस इंटरव्ह्यू प्रोसेस हा पण एक वेगळा अनुभव असतो . तुला नोकरी करू नये असं का वाटतं ? ‘ तिने उडवाउडवीची उत्तरे दिली .

इंजिनिअरिंग सेमिस्टरची शेवटची परीक्षा देऊन ती घरी आली . मला तर वाटत होतं की तिला नंतर जॉब शोधायला कठीण जाईल . पण तिच्या इच्छेप्रमाणे करायचं ठरवलं . ती घरी आल्यावर आमच्याबरोबर गप्पा मारणे , स्वयंपाक शिकणे , मैत्रिणींना भेटणे असं रुटीन चालू होतं . त्यात ती काही ऑनलाईन कॉम्प्युटर नेटवर्किंगचे कोर्सेसही करत होती . त्यामुळे ती खूपच व्यग्र असे . तिला घरी येऊन एक महिना झाला असेल .

एक दिवस संध्याकाळी सुप्रियाने मला हाक मारली , ‘ आई , थोडा वेळ गप्पा मारत बसूया ना . मी माझी कामे बाजूला ठेवली . गॅस बंद करून घराच्या पायरीवर येऊन बसले . ती थोडी विचारात हरवलेली दिसत होती . मी विचारलं , ‘ सुप्रिया , काही अडचण आहे का ? तुला काही सांगायचंय का ? ‘ ती म्हणाली , ‘ आई मी संतोषशी लग्न करायचं ठरवलं आहे . तुला आठवतो का आपल्या बरोबर एक – दोन वेळा तुळशीबागेत खरेदीला आला होता . मला दोन वर्षे सीनियर आहे . त्याने इंजिनियरिंग नंतर यूएस मध्ये एमबीए केलं आहे . आता तो नवीन जॉब जॉईन करेल . त्या आधी आमचा लग्न करायचा विचार आहे . संतोषचे आई वडील तो इंजिनिअरिंगला असताना कार ॲक्सीडेंट मध्ये गेले . त्याला भाऊ बहीण कोणी नाहीत . त्यामुळे त्याला भावनिक एकटेपण प्रकर्षाने जाणवते . आई , मला माहिती आहे की मी फक्त एकवीस वर्षाची आहे त्यामुळे तुला माझी काळजी वाटणारच . पण मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय . संतोष बरोबर मी सुखी होईन . ‘

सुप्रियाचं लग्न इतक्या लवकर करायचा मी विचारच केला नव्हता आणि सुप्रियाने स्वतःचं लग्न ठरवलं सुद्धा . त्यामुळे बसलेल्या धक्क्यातून सावरत मी तिला म्हटलं , ‘ आपण संतोष बरोबर खरेदी केली होती . मला वाटतं त्याला दोन वर्षे झाली असतील ना . मुलगा बोलायला चांगला वाटला . पण तेव्हा मी त्याला इतर मित्र – मैत्रिणींपैकी एक असेच समजले होते . त्यामुळे मी तुझ्या बाबांशी बोलते आणि संतोषशी पण बोलायला लागेल . ‘

सुप्रिया म्हणाली , ‘ आपण व्हिडिओ कॉल लावू . तुम्ही त्यांच्याशी भरपूर बोलून घ्या . पण लक्षात ठेव माझा निर्णय झालेला आहे . ‘ संतोष खरोखरच चांगला मुलगा होता . सुप्रियाच्या इच्छेप्रमाणे तिचं लग्न आमच्या गावातच छोटासा समारंभ करून झालं . ती संतोषच्या पाठोपाठ युएसला रवाना झाली . सगळं स्वप्नवत झालं .

तिचा गोड बातमी सांगणारा फोन एके दिवशी आला व मी लगेच अमेरिकावारीच्या तयारीला सुरुवात केली . तिला सातवा महिना लागला आणि मी अमेरिकेत तिच्या घरी पोहोचले . सुप्रिया खूप सुंदर दिसत होती . गर्भारपणाचं तेज आलं होतं . दिवसभर तिची चिवचिव चालू असे . संतोष तिला फुलासारखं जपत होता . तिच्या डॉक्टरी तपासण्या नियमित चालू होत्या . ती अगदी स्वस्थ व आनंदी होती . नवव्या महिन्यात सकाळी तिच्या पोटात दुखायला लागलं . संतोष व मी तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलो . तिकडे तिला ब्लीडिंग होऊ लागलं . डॉक्टरांनी तात्काळ डिलिव्हरी करायला लागेल असं सांगितलं . आणि काही तासानंतर डॉक्टरने सांगितलं की , ‘ मुलगी झाली . चांगली सुदृढ आहे . पण सुप्रियाचा मृत्यू झाला . ‘ हे ऐकून माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली . पुढचं काहीही मला आठवत नाही . बहुदा अतिशय दुःखदायक अशी ही घटना मेंदूने स्वीकारली नाही . त्यामुळे मधले चार – पाच दिवस माझ्या आठवणीतून पुसून गेले . पाच – सहा दिवसांनी बाळाला घेऊन आम्ही भारतात आलो .

सुप्रिया जगात नाही हे कटू सत्य पचवण्याचा प्रयत्न चालू होता . वयाच्या साठीत मी परत आई झाले आणि बाळाचं संगोपन सुरू केलं . संतोष जवळजवळ सहा महिने माझ्याकडेच राहून बाळाला सांभाळण्यात मदत करत होता . एक दिवस संतोष म्हणाला , ‘ आई , मला आता कंपनीचा अंतिम इशारा देणारं पत्र आलं आहे . मला वाटतं की ही नोकरी मी सोडून देतो . इथेच जवळ नोकरी पकडतो . ‘ मी त्याला म्हटलं , ‘ संतोष , हे बघ आमच्या छोट्या गावात तर काही तुला जॉब मिळणार नाही . त्यासाठी तुला मुंबई पुणे किंवा कुठल्यातरी मोठ्या शहरामध्ये जावे लागेल . मग तू मोठा प्रवास करून शनिवारी घरी येणार . त्यात तुझी खूप दमछाक होईल . तुझे करिअरही मागे पडेल . मला माहीत आहे तुला रेवाची काळजी वाटते . पण मला वाटतं तू युएसमध्ये तुझा जॉब चालू कर . मी एक वर्षभर रेवाला सांभाळते . माझी दमछाक होते , पण मला तिला सांभाळताना खूप आनंद होतो . नंतर तू रजा घेऊन ये . मग आपण पुढचे प्लॅनिंग करू . ‘ संतोष म्हणाला , ‘ तिकडचा जॉब , तिकडचं वातावरण मला आवडतं हे खरं आहे . पण माझा जीव रेवात अडकला आहे . तुम्ही आहात म्हणूनच मी तिकडे जाऊ शकतो . पण इथे काही अडचण आली तर मला लगेच कळवा . मला भारतातसुद्धा जॉब मिळू शकतो . ‘

संतोष अमेरिकेला रवाना झाला . आम्ही दोघं रेवाला सांभाळत होतो पण मला तिची खूप काळजी वाटे . तिला थोडं बरं नसलं तरी मला खूप ताण येई . तरुण आई – वडिलांचा सहवास न मिळाल्यामुळे की काय पण ती खूप शांत होती . फार मस्तीही करत नसे . अतिशय समजूतदार . ती दीड वर्षाची झाली आणि संतोषने थोडी रजा घेतली आणि तो घरी आला . त्याच्या डोळ्यात दुःख दिसत असलं तरी थोडा काळ लोटल्यामुळे तो स्थिरावला होता . त्याने रेवासाठी पुस्तकं , खेळणी व कपडे आणले होते . दोघे मस्त खेळत होते . जेवण झाल्यावर रेवा झोपली . मग संतोष म्हणाला , ‘ आई , मला तुमच्याशी काही बोलायचं आहे . ‘ मी त्याला म्हटलं , ‘ अरे तू दमून आला आहेस . तुला रेवाची काळजी वाटते मला माहीत आहे . पण तू थोडी झोप घे . मग आपण बोलू .’संतोषचा चेहरा गंभीर दिसत होता . खोलीत येरझारा घालत तो मला म्हणाला , ‘ मी बोलून टाकतो मनातलं म्हणजे मग मला स्वस्थता मिळेल . ‘ त्याची अस्वस्थता पाहून मी म्हटलं , ‘ ठीक आहे . तू शांतपणे बस व तुझ्या मनात काय आहे ते बोलून टाक . ‘ संतोष म्हणाला , ‘ माझा एक मित्र आहे रोहन . त्याच्या आईने माझ्या लग्नासाठी कोल्हापूरचं एक स्थळ सुचवलं आहे . मुलगी इंजिनियर आहे . पुण्यात नोकरी करते . तिचे मिस्टर चार वर्षांपूर्वी रोड ॲक्सीडेंटमध्ये गेले . तिला एक मुलगा आहे . पार्थ त्याचं नाव . तो रेवा एवढाच आहे . ती पुण्याला राहते . आम्ही स्काइपवर बोललो आहोत . माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे . तिचे विचार खूपच सुप्रिया सारखे आहेत आणि ती विचारी वाटते . तुम्ही हो म्हणालात तर आपण सीमाला प्रत्यक्ष भेटू . ‘

‘संतोष , तुझ्या पुढे खूप मोठं आयुष्य आहे आणि रेवालाही आईची गरज आहे . सुप्रियाची आठवण दाबून टाकत मी विचारले , ‘ कधी भेटायचं आपण ? ‘

संतोष म्हणाला , ‘ आपण फक्त तासभर भेटण्यापेक्षा सीमाची अशी सूचना आहे की ती व पार्थ आठवडाभर इकडे येऊन राहतील . म्हणजे मी , रेवा , सीमा व पार्थ आमचं कसं जमतं याचा अंदाज येईल . तुम्ही एकंदर बघून मला सांगा की रेवा नवीन संसारात खुश राहील ना ? तुमचं मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे . तुम्हाला चालेल ना ती दोघं इकडे राहायला आली तर ? आपण खाणं बाहेरून मागवू . एखादी बाई पण मदतीला बोलवा म्हणजे तुम्ही शांतपणे सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करू शकाल . ‘

दोन दिवसांनी सीमा व पार्थ आमच्याकडे आले . सीमा सडपातळ अंगकाठीची , गोरी , खांद्यापर्यंत कापलेले केस . तिने सलवार – कमीज घातला होता . शांत चेहरा , स्थिर व ठाम हालचाली . घरात आल्याबरोबर तिने व पार्थने हातपाय धुतले . पार्थचे कपडे बदलून तिने त्याला रेवा बरोबर खेळायला पाठवले . दोन खेळण्यातल्या सारख्या गाड्या दोघांना दिल्या . मग सीमा , मी व संतोष गप्पा मारत बसलो . संध्याकाळी सीमा , संतोष व दोघं मुलं किल्ल्यापर्यंत फिरायला गेले तेव्हा तिने मुलांसाठी थोडं खाणं , पाणी व त्यांचा एक ड्रेस असं बरोबर घेतलं . सीमा बद्दल माझं मत चांगलं झालं . रेवाची व तिची दोन दिवसातच गट्टी जमली . सीमा कमी बोले पण वागणं समजूतदार . स्वयंपाक साधारणच जमतो तिला . आम्हा सगळ्यांनाच सीमा चांगली वाटली . पुढच्याच आठवड्यात सीमा व संतोषने कोल्हापूरला रजिस्टर लग्न केले . व्हीसा प्रोसेस झाल्यावर सगळेजण युएसला रवाना झाले . त्यानंतर आता दीड वर्षाने सुट्टीवर आले .

तेवढ्यात सीमाचं लक्ष माझ्याकडे गेलं . तिने माझा हात हातात घेऊन किंचित दाबला . ‘ आपलं काय ठरलं आहे जुन्या आठवणी काढायच्या नाहीत . रडायचं नाही . आपली दोन्ही छोटी मुलं किती खुश आहेत बघा . आता मी पण आठवड्याला वीस तास काम करते . मुलांच्या शाळेच्या वेळात व संतोष घरी आल्यानंतर . माझे आई – वडील तीन – चार महिने आमच्याकडे राहून गेले . आता तुम्ही दोघांनी आमच्याकडे यायचं आहे . संतोषने तिकडूनच तुमचे सगळे पेपर पाठवले आहेत . परवा व्हीसा इंटरव्यू आहे . व्हीसा मिळाला की आपण सगळे बरोबरच जाऊ . तुम्ही तीन – चार महिने हे घर बंद असणार असं धरूनच आवराआवरी करायला घ्या , ‘ सीमा म्हणाली .

‘आम्ही कुठे एवढ्या लांब येणार ? ‘ मी म्हणाले . ‘ तुम्ही संतोषचे आई – वडील आणि रेवाचे आजी आजोबा आहात , ‘ सीमाने मला जवळ घेत म्हटलं . मला तिची आपुलकी , प्रेम जाणवलं . थोड्या सुट्टीतही ती आठवडाभर माहेरी राहून इकडे राहायला आली . सुप्रियाचा प्रेमळ , लाघवी स्वभाव , तिचं दुसऱ्याचं मन ओळखून वागणं हे सीमातही जाणवू लागलं . वाटलं की सीमामध्ये कुठेतरी सुप्रिया सामावलेली आहे . मनात खोल , खूप शांत आणि समाधानी वाटलं आणि मनापासून युएस च्या तीन – चार महिन्याच्या वास्तव्याची आखणी सुरू केली .

— संध्या सिनकर

(सेवानिवृत्त अधिकारी , बँक ऑफ बडोदा)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..