नवीन लेखन...

जानेवारी २६ : अ‍ॅडलेडवरील एका धावेची कसोटी

Cricket Flashback - 26 January 1993 - Australia Loose to West Indies by just One Run

२६ जानेवारी. ऑस्ट्रेलिया डे. अ‍ॅडलेड ओवलवरील ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज दरम्यानच्या सामन्याचा चौथा दिवस.

पहिल्या दिवशी पाहुणा कर्णधार रिची रिचर्डसनने नाणेकौल जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी २५२ धावांवर पाहुण्यांचा डाव संपुष्टात आला आणि अवघी एक धाव फलकावर लागलेली असताना मार्क टेलर बाद झाला. दुसर्‍या दिवस-अखेर यजमानांनी ३ बाद १०० धावांपर्यंत मजल मारलेली होती. कर्टली अ‍ॅम्ब्रोजच्या सहा बळींच्या जोरावर विंडीजने २१३ धावांवर यजमानांचा डाव संपविला आणि विंडीजचा दुसरा डाव अवघ्या १४६ धावांवर त्या तिसर्‍या दिवशीच संपला. अवघ्या साडेसहा षटकांमध्ये केवळ नऊ धावांचे मोल देत टिम मेने तब्बल पाच बळी टिपले. ऑस्ट्रेलियापुढे आता विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य होते आणि पूर्ण दोन दिवसांचा खेळ बाकी होता.

७२ धावा काढण्यातच कांगारूंचे बून, टेलर, वॉ बंधू आणि अ‍ॅलन बॉर्डर हे मोहरे खर्ची पडले होते. ७३ धावांवर इअन हिली पडला आणि ७४ वर किम ह्युजेस. पदार्पणवीर जस्टिन (जस्ट-इन ?) लँगरने मग शेन वॉर्नच्या साथीत आठव्या गड्यासाठी अठ्ठावीस धावा जोडल्या. संघाच्या १०२ धावांवर वॉर्न परतला आणि सामना पुन्हा एकदा वेस्ट इंडीजच्या बाजूने झुकला. चार वर्षांनंतर कसोटी सामना खेळणारा टिम मे अखेर संघाच्या कामी आला.

लँगर-मे जोडीने नवव्या गड्यासाठी ४२ धावा जोडल्या. ऑस्ट्रेलिया दिनादिवशीच (??) कांगारूंचे दुर्दैव असे की टिम मे नाही तर जस्टिन लँगर इअन बिशपच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकरवी झेलबाद झाला. क्रमांक अकराचा फलंदाज क्रेग मॅक्डरमॉट फलंदाजीस उतरला तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ४२ धावांची आवश्यकता होती. दहा, वीस, बघता-बघता तीसहून अधिक धावा टिम मे आणि मॅक्डरमॉट जोडीने जोडल्या.

मैदानावरील ह्या उत्कंठावर्धक नाट्यामुळे ऑस्ट्रेलियातील अनेक टीव्ही सुरू झाले. शक्य असलेल्या बर्‍याच जणांनी थेट अ‍ॅडलेडच्या मैदानावर धाव घेतली.

मैदानावरचे प्रेक्षक तालासुरात वॉल्ट्झिंग मटिल्डा गात होते. (हे ऑस्ट्रेलियाचे अनधिकृत राष्ट्रगीत मानले जाते.)

तब्बल चाळीस धावांची भागीदारी अखेरच्या जोडीने केली. टिम मे ४२, मॅक्डरमॉट १८ आणि अखेर कोर्टनी वॉल्श आणि सहकार्‍यांनी केलेला यष्टीमागे झेलबादचा आग्रह पंच डॅरेल हेअर यांनी उचलून धरला. केवळ एका धावेने वेस्ट इंडीजने ही कसोटी जिंकली ! ११६ वर्षांच्या आणि १२०९ अधिकृत कसोट्यांच्या इतिहासातील हा सर्वात “छोटा” विजय होता. मैदानावर स्मशानवत‌ शांतता पसरली.

२६ जानेवारी १९९३ हा टिम मेचा एकतिसावा वाढदिवस होता ! फलंदाजी करताना तो स्वतःला “आज ऑस्ट्रेलिया दिवस आहे, आज माझा वाढदिवस आहे, ऑफ कोर्स आम्ही जिंकणारच आहोत” असा धीर देत होता. ड्रेसिंग रूममध्ये तो परतल्यानंतर सुमारे वीस मिनिटे कुणीही काही बोलले नाही असेही मेने सांगितले आहे.

अखेर हेअर यांच्या त्या निर्णयाबद्दल : अ‍ॅलन बॉर्डरने या निर्णयाबाबत नाराजी दर्शविली नाही. मॅक्डरमॉटच्या ग्लव्ह्जना तो चेंडू लागला होता का ह्याबाबत मॅक्डरमॉटने काही बोलल्याचे आढळत नाही. बिनटोल्या टिम मे म्हणतो की, आवाज तर आला होता पण मी नीटपणे पाहू शकलो नाही. लाखो ऑस्ट्रेलियनांना मात्र अजूनही असे वाटते की, चेंडू मॅक्डरमॉटच्या ग्लव्ह्जना लागलाच नव्हता.

‘ऑस्ट्रेलिया डे’ला अ‍ॅडलेडमध्ये विंडीजचा केवळ एका धावेचा कसोटी-विजय आणि बर्थ-डे बॉय टिम मेची अपयशी झुंज.

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..