नवीन लेखन...

केळ्यांतली गुंतागुंत

केळ्याचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न बराच पूर्वीपासून सुरू आहे. लागवड केली जाणारी आजची केळी ही केळ्यांच्याच विविध जाती-उपजातींत झालेल्या संकरातून निर्माण झाली आहेत. आजच्या मुसा अ‍ॅक्युमिनाटापासून निर्माण झालेल्या केळ्यांत, या जातीच्या जनुकांबरोबरच इतर काही जंगली केळ्यांतील जनुकही अस्तित्वात असल्याचं पूर्वीच माहीत झालं आहे. इतर जाती-उपजातींबरोबर झालेल्या या संकराद्वारेच केळ्यांना आजचे विविध गुणधर्म प्राप्त झाले आहेत. यांतलाच एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे त्यांचं बियाविरहित स्वरूप. मात्र केळ्यांवरची अधिकाधिक माहिती जशी उपलब्ध होते आहे, तसा या केळ्यांचा इतिहास अधिकाधिक गुंतागुंतीचा असल्याचं दिसून येतं आहे. या गुंतागुंतीचं एक उदाहरण म्हणजे, केळ्यांच्या पेशींतील गुणसूत्रांच्या संचांची वेगवेगळी संख्या. काही प्रकारच्या केळ्यांत गुणसूत्रांचे दोन संच आढळतात, काहींत तीन संच आढळतात, तर काहींत चार संचही आढळतात! केळ्यांतल्या या जनुकीय वैविध्यामुळे केळ्यांच्या इतिहासाची फोड करणं, हे जुनकीय शास्त्रज्ञांना आव्हानात्मक ठरलं आहे.

खाद्यान्नावर संशोधन करणाऱ्या, ‘बायोव्हर्सिटी इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतील ज्युली सार्दो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केळ्यांवरच्या संशोधनात अलीकडेच महत्त्वाची भर घातली आहे. किंबहुना, या संशोधनातून काढल्या गेलेल्या निष्कर्षांमुळे, केळ्याच्या इतिहासातली गुंतागुंत आणखी वाढली आहे. ज्युली सार्दो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुसा अ‍ॅक्युमिनाटा जातीच्या केळ्यांचा अधिक तपशीलवार अभ्यास केला. या अभ्यासात त्यांनी मुसा अ‍ॅक्युमिनाटाच्या उपजातींतील जनुकीय फरकाचा, केळ्याच्या इतिहासाशी सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्यांनी न्यू गिनीपासून सुरू झालेल्या या लागवडीचा पुढचा मार्गही शोधून काढला. या सर्व संशोधनातून मिळालेली माहिती ही लक्षवेधी आहे. ज्युली सार्दो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘फ्राँटिअर्स इन प्लँट सायन्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झालं आहे.

ज्युली सार्दो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेल्जिअममधील मुसा जर्मप्लाझ्म ट्रान्झिट सेंटर इथे जतन करून ठेवलेले, मुसा अ‍ॅक्युमिनाटा या जातीतील विविध उपजातींच्या केळ्यांच्या पानांचे अर्क आपल्या संशोधनासाठी वापरले. हे अर्क ज्या नमुन्यांतून काढले गेले ते नमुने, पूर्वी आखल्या गेलेल्या मोहिमांद्वारे इंडोनेशिआ, न्यू गिनी, बुगेनव्हिल बेट, इत्यादी ठिकाणांहून गोळा केले गेले होते. यांतील ६८ नमुने हे मुसा अ‍ॅक्युमिनाटा या जातीच्या जंगली उपजातींचे होते आणि १५४ नमुने मुसा अ‍ॅक्युमिनाटाच्याच लागवड केलेल्या उपजातींचे होते. तुलनेसाठी मुसा अ‍ॅक्युमिनाटाशी दूरचं नातं असणाऱ्या चार जंगली उपजातींच्या नमुन्यांचाही या संशोधनात समावेश केला होता. या सर्व अर्कांचं या संशोधकांनी जनुकीय विश्लेषण केलं. या विश्लेषणावरून या सर्व जाती-उपजातींचा त्यांनी वंशवृक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वंशवृक्षाद्वारे त्यांनी लागवडीखालील केळ्यांच्या प्रसाराचा मार्गही शोधण्याचा प्रयत्न केला. केळ्याच्या लागवडीचा प्रसार जरी न्यू गिनीतून सुरू झाला असला तरी, ज्युली सार्दो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनावरून, त्यानंतरच्या काळात सुमात्रा आणि मलाय द्वीपकल्पानंही या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं स्पष्ट झालं आहे. या ठिकाणांहूनच केळ्यांची लागवड जावा, फिलिपिन्स, यांसारख्या आग्नेय आशिआतील विविध प्रदेशांकडे पसरली असावी.

ज्युली सार्दो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या जनुकीय विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजली. लागवड केल्या गेलेल्या, मुसा अ‍ॅक्युमिनाटाच्या उपजातींच्या सर्वच केळ्यांत, तीन अज्ञात उपजातींच्या जनुकांचे अंश अस्तित्वात आहेत. यावरून लागवडीखालील केळ्यांच्या उत्क्रांतीत या तीन अज्ञात उपजातींचा महत्त्वाचा सहभाग होता, हे नक्की! या तीन उपजातींपैकी एक उपजाती ही, थायलंडचं आखात आणि साऊथ चायना सी या दरम्यानच्या भागातील असावी; तर दुसरी उपजाती ही उत्तर बॉर्निओ आणि फिलिपिन्स या दरम्यानच्या प्रदेशातली असावी. तिसरी उपजाती ही न्यू गिनी या बेटावरचीच असण्याची शक्यता आहे. परंतु या उपजातींचा अजून शोध लागलेला नाही. या तीन उपजाती आज नामशेष झाल्या असतील किंवा जंगलात कुठेतरी अज्ञात जागी अस्तित्वात असतील. या उपजातींचे कोणते गुणधर्म त्या काळच्या केळ्यांनी उचलले असावेत, हे स्पष्ट होत नाही. या उपजातींचं मुसा अ‍ॅक्युमिनाटातील सार्वत्रिक अस्तित्व लक्षात आल्यामुळे, केळ्यांचा अभ्यास अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. ही गुंतागुंत सोडवणं, हा यापुढे अनेक संशोधकांच्या दृष्टीनं केळ्यांवरील संशोधनाचा पुढचा टप्पा असेल.

केळ्यावरचं हे सर्व संशोधन केळ्याच्या उत्क्रांतीशी निगडित आहे. ज्युली सार्दो आणि त्यांचे सहकारी याच संबंधातलं आणखी एक संशोधन आता हाती घेणार आहेत. न्यू गिनीतील केळ्यांच्या, अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या काही उपजाती अस्तित्वात आहेत का, याचा शोध या संशोधकांना घ्यायचा आहे. कारण या सर्व संशोधनाला कुतूहलाबरोबरच एक वेगळं महत्त्वही आहे. या संशोधनाचा एक उद्देश, संकराद्वारे अधिक चांगल्या दर्जाच्या केळ्यांची निर्मिती करणं, हा तर आहेच; परंतु त्यामागचा दुसरा उद्देश हा, त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबधित आहे. आज अतिशय लोकप्रिय असणाऱ्या या फळांचं उत्पादन वाढवायचं असलं तर, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं हे गरजेचं आहे. कारण केळ्यांना होणारे ‘पनामा’सारखे रोग, हा आजच्या केळ्यांच्या उत्पादकांच्या समोर उभा असणारा मोठा प्रश्न आहे. कदाचित, या अलीकडच्या काळांत निर्माण झालेल्या केळ्यांच्या काही उपजाती, जनुकीय बदलांद्वारे या आजच्या रोगांना अधिक समर्थपणे तोंड देऊ शकत असतील. तसं असल्यास या उपजातींशी संकर करून केळ्यांच्या, या रोगांना प्रतिकार करू शकणाऱ्या अधिक सक्षम जातींचं उत्पादन करणं, हे नजीकच्या भविष्यकाळात शक्य होऊ शकेल.

छायाचित्र सौजन्य : sarangib/Pixabay

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..