आयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा ‘मुक्री’

आयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा मुक्री तथा मोहम्मद उमर अली मुक्री याचे आज पुण्यस्मरण त्यानिमित्त समीर परांजपे यांचे ब्लॉग मधून…


हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मुक्रीचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.(जन्म: ५ जानेवारी १९२२)

पूर्वीच्या संस्कृत नाटकांमध्ये विदूषकाचे पात्र असायचे. हसविण्याच्या उद्योगातून तो राजाला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायचा.
उंचीने ठेंगणीठुसकी, गोरी-तांबूस, गरगरीत देहयष्टी व उपजत विनोदबुद्धी असल्याचे भाव चेहेर्यावर जपणारी व्यक्तीच संस्कृत नाटकांमध्ये विदूषकाच्या भूमिकेस पात्र समजली जायची. मुक्रीकडे बघितलं की संस्कृत नाटकातील शहाण्यासुरत्या विदूषकाचीच आठवण मनात ताजी होत असे. हिंदी चित्रपटसृष्टीत विनोदी भूमिका करणार्या मुस्लिम कलावंतांची एक परंपरा आहे. नूर महंमद चार्ली, मिर्झा मुशर्रफ, जाॅनी वाॅकर, मेहमूद, जगदीप यांच्या परंपरेतील एक माणिक म्हणजे मुक्री. `अमर अकबर अँथनी’ मधील आपल्या कोवळ्या कन्येवर करडी नजर ठेवणारा पिता तय्यब अली, `शराबी’मधील वीरप्पन स्टाईल मिशांचा नथ्थुलाल यांसारख्या भूमिकांमुळे मुक्री अविस्मरणीय ठरला.
मुक्री हा अस्सल महाराष्ट्रीय होता. मोहम्मद उमर अली मुक्री अशी शब्दांची आगगाडी मागे लावून घेणारी ही वल्ली ५ जून १९२२ रोजी कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील उरण गावी जन्मली. मुक्रीच्या वडिलांची मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्रीला शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. एका मुलाखतीत मुक्रीने सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस अाली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे अाणि त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.’ वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.

शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ’ असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.

कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिअोच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवााजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.

अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान’ चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा’ चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम अौर श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता. स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली.

हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.

त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला. विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.

सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बाॅम्बे टू गोवा’पासून ते थेट `शराबी’पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. शराबीतील भरघोस मिशांचा मुक्री अमिताभच्या `मुच्छे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना हो’ या प्रशंसेमुळे नथ्थुलाल म्हणून ख्यातकीर्त झाला. `अमर अकबर अॅन्थनी’मध्ये अापली मुलगी नीतू सिंगच्या हालचालींवर लक्ष ठेवणारा तय्यब अली हा थेरडा मुक्रीशिवाय दुसरा कोणी साकारु शकलाच नसता. `तय्यब अली प्यार का दुश्मन’ हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या. चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे.

हिंदी चित्रपटांमध्ये राजेंद्रनाथने काहीचा आचरटपणा सुरु केला. विनोदाच्या नावाखाली विचिक्ष अंगविक्षेप करण्याला त्याने प्राधान्य दिले. या वातावरणातही मेहमूद, देवेन वर्मांसारख्या अभिनेत्यांनी विनोदातील सात्विकता थोडीफार जपलेली होती. हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळात स्पेशलायझेशनचे युग होते. नायक, नायिका फक्त समरसून प्रेमच करायचे. हेलन अंग उघडे टाकत फक्त कॅब्रेच करायची. विनोदी नट फक्त हसविण्याचेच काम करायचे. खलनायक तरुण बायाबापड्यांवर वाकडी नजर ठेवायचा, शेवटी नायकाक़़डून धुलाई करुन घ्यायचा. पण नंतरच्या काळात सर्वच भेळ झाली. नायकच खलनायकीपासून काॅमेडियनपर्यंतच्या सर्व भूमिका करायला लागला. त्यामुळे काॅमेडियन हे `डिपार्टमेंट’ भंगारातच निघायची वेळ आली. आता तर शक्ती कपूर, कादरखान, जाॅनी लिव्हरचे हिणकस चाळे विनोदाच्या नावाखाली खपविले जातात. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी, मेहबूब खान, राज खोसला, प्रकाश मेहरा, मनमोहन देसाईंसारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकांबरोबर काम केलेल्या मुक्रीला विनोदावर सध्या होणारे हे घाव बहुधा सोसले नसावेत. त्यामुळेच किशोरकुमार या आपल्या सहकार्याच्या पावलावर पाऊल टाकून मुक्रीने ४ सप्टेंबर रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला असावा.

— संगीत या whatsapp ग्रुपवरुन

Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप 23 Articles
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…