नवीन लेखन...

कोलंबस (काल्पनिक कथा)

गेल्याच आठवड्यात माझा एकसष्ठीचा समारंभ पार पडला. नातेवाईक आणि बरीच मित्रमंडळीं त्या निमित्ताने एकत्र आलेली होती. निमंत्रणामध्ये भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, असं लिहूनही अनेकांनी बुके व प्रेझेंट्स आणलेली होती. प्रत्येकाला मी व्यक्तीशः भेटत होतोच, तरीदेखील काहीजण न भेटताही येऊन गेल्याची शक्यता होती.. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली..
दोन दिवसांनंतर त्या दिवशी आलेल्या प्रेझेंटच्या बाॅक्सेसवरची नावं मी वाचत होतो.. एका बाॅक्सवरचं इंग्रजी अक्षर मला ओळखीचं वाटलं.. “विथ बेस्ट काॅम्प्लिमेंटस् फ्राॅम … मेरी डिसूजा’ मी उत्सुकतेने बाॅक्स उघडलं तर आतमध्ये कृष्णाच्या पार्श्र्वभूमीवर मीराबाईचं एक सुंदर पेंटिंग होतं. त्याला सोनेरी फ्रेम होती..
..म्हणजे मेरी, माझ्या एकसष्ठीच्या समारंभाला आली होती.. मग मला न भेटता तशीच का निघून गेली? मी अस्वस्थ झालो… मला बेचाळीस वर्षांपूर्वीचे, काॅलेजमधील दिवस आठवले…
एसएससी नंतर मी काॅलेजला प्रवेश घेतला होता. नवीन मित्रांसोबत काॅलेजच्या नवख्या वातावरणात मी लवकरच रुळलो. काॅलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत मी उत्साहाने भाग घेत असे. दर महिन्याला विद्यार्थ्यांच्या निवडक कविता व लेख हस्तलिखित स्वरूपात शोकेसमध्ये लावल्या जात असत. त्यात माझ्या कविता असत. ज्यांना वाचनाची आवड आहे, असे कित्येकजण ते हस्तलिखित वाचून काढत असत..
‌माझ्या कविता अनेकांना आवडू लागल्या होत्या. काहीजण मला भेटून त्याबद्दल अभिप्रायही देत होते. एक दिवस आमच्याच वर्गातील एका मुलीने मला काॅरीडाॅरमध्ये थांबवले व विचारले, ‘हॅलो, बोर्डवर लावलेली कविता आपणच केलेली आहे ना? फारच छान लिहिली आहे.’ मी होकार दिला. मला आयुष्यात पहिल्यांदाच एका मुलीकडून कविता लिहिल्याबद्दलचा अभिप्राय मिळत होता..
या निमित्ताने माझी व मेरीची पहिली भेट झाली. ती एका अनाथाश्रमात रहात होती. तिचं अक्षर टपोरं व वळणदार होतं. माझ्यातल्या कवीला प्रेरणा मिळाल्याने, माझी वहीतली पानं एकापाठोपाठ एक कवितांनी भरु लागली.
मी कविता लिहून झाल्यावर, खाली माझं ‘किशोर’ असं नाव टाकत असे. एकदा तिनं मला कॅन्टीनमध्ये चहा घेत असताना हटकलं, ‘कवितेच्या शेवटी लिहिलेलं ‘किशोर’ हे नाव या कवीला काही शोभत नाहीये.. त्याऐवजी मी एक नाव सुचवू का?’ मी होकार दिल्यावर मेरी म्हणाली, ‘कोलंबस! हे टोपणनाव छान वाटेल.. नेहमी नाविन्याचा शोध घेणारा.. ‘कोलंबस’!’ मला तिची सूचना आवडली. तेव्हापासून मी ‘कोलंबस’ नावानेच कविता करु लागलो..
मेरी हुशार होती. दरवर्षी ती उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होत होती. पहाता पहाता शेवटचं वर्ष सुरु झालं. या कालावधीत मला ती आवडू लागली होती, मात्र तिला मी जीवनसाथी करुन घेण्याची इच्छा असूनही करु शकत नव्हतो.. कारण तिचा धर्म माझ्या घरच्यांना अमान्य होता आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन स्वतंत्र जगण्याचं माझ्यात धाडस नव्हतं..
या कालावधीत आम्ही एकमेकांना पत्र, चिठ्या लिहिलेल्या होत्या. माझं अक्षर छोटं असल्यानं एका पानातच भरपूर मजकूर सामावला जाई, याउलट तिच्या मोठ्या अक्षरानं, पत्रं दोन तीन पानांचं होत असे.. काॅलेज संपताना मला तिनं तिची सर्व पत्रं मागितली.. मी ती जड अंतःकरणाने तिला सुपूर्द केली..
मी नोकरीसाठी शहरात आलो. सुरुवातीला मराठीचा प्राध्यापक म्हणून एका महाविद्यालयात नोकरी केली. काही वर्षांनंतर एका सरकारी नोकरीची संधी मिळाली. ती नोकरी करताना मराठी शुद्धलेखन विषयावर माझा अभ्यास चालू होता.
माझ्या कविता मी ‘कोलंबस’ या टोपणनावाने पुस्तकरुपात प्रकाशित केल्या. मराठी व्याकरणावर पुस्तके केली. निवृत्तीनंतर काही वर्षांनी माझ्या मित्रमंडळी व घरच्यांनी एकसष्टीच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं..
कार्यक्रम पार पडला आणि आज मला समजलं की, मेरी आली होती मात्र मला न भेटताच निघून गेली.. मी त्या बाॅक्समध्ये ते पेंटींग पुन्हा ठेवताना, मला एक चिठ्ठी दिसली.. मी चिठ्ठी उघडली व वाचू लागलो…
May be an image of 1 person‘कोलंबस, तुला मी येऊन गेल्याचे आश्र्चर्य वाटले असेल.. बेचाळीस वर्षांपूर्वी आपण एका काॅलेजमध्ये होतो.. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या वाटा वेगळ्या झाल्या.. तू नोकरीसाठी शहरात गेलास.. मी एका अनाथालयातील अनाथ मुलगी होते.. मी त्याच अनाथालयाचं काम पहाता पहाता आज संचालिका झालेली आहे.. समाजाचं आपण काही देणं लागतो, या भावनेतून मी हे काम स्वीकारलं.. आज मी माझ्यासारख्या असंख्य मेरींचं शिक्षण आणि पालन पोषण करते आहे.. मी सुद्धा सर्वसामान्य स्त्रियांसारखी स्वप्नं पाहिली होती.. मात्र जेव्हा ती पूर्ण होणार नाहीत याची खात्री पटली, तेव्हापासून ती सोडून दिली.. तुझ्या विषयी मला वर्तमानपत्रातील बातम्यांमधून कळायचं.. नंतर अलीकडच्या काळातील फेसबुकवरुन मी तुझी प्रगती, यश, सन्मान पहात होते.. फेसबुकवर पाहिलेले निमंत्रण वाचूनच, मी कार्यक्रमाला आले..
– मेरी नव्हे ‘मीरा’….
मी भावुक होऊन ती चिठ्ठी माझ्या खिशात ठेवली. पुन्हा ती फ्रेम बाॅक्समधून बाहेर काढली व हाॅलमधील दर्शनी भिंतीवर लावली. जेणे करुन ती येता जाता या ‘कोलंबस’ला दिसत राहील…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
५-११-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..