नवीन लेखन...

“चतुरस्थ आचार्य अत्रे”

“आचार्य प्रल्हाद केशव अत्रे” हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो एक कणखर लढवय्या, ज्यांनी आपल्या धारदार शब्दांनी, ओजस्वी वाणीने महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पहाणार्‍या द्वेष्ट्यांना सळो की पळो करुन सोडलं. “आचार्य अत्रे म्हणजे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार….. नव्या महाराष्ट्राचे पुरोगामी पत्रकार…. लेखणीचा अविष्कार….. सुसंपन्न कलाकार…. आणि धाडसी व्यक्तीमत्वाचा साक्षात्कार आज ४४ व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या व्यक्तीमत्वाचा वेध घेताना, बहुआयामी पैलू एकापाठोपाठ एक उलगडत जातात.

मुळातच शिक्षण, कला, राष्ट्र यावर अतिशय मनापासुन प्रेम असणार्‍या अत्रेंनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात शिक्षक या पेशाने केली, शिक्षणाशी थेट संबंध असल्यानं त्यांच्याकडून अनेक नवनवीन वाङमयाची निर्मिती होत गेली. यामध्ये कथा, कविता, चित्रपट, नाटकं, आत्मचरित्र, ललित, मनोगतांचा समावेश होतो. शिवाय “मराठी” वृत्तपत्राची संपादकापदी धुरा सांभाळत असताना त्यांचे आग्रलेख हे हमखास गाजायचेच! त्यामुळे राज्यकर्ते ही अत्र्यांच्या कटुलेखनाला काहीसे टरकुनंच असायचे. शब्दात कसं पहडायचं हे आचार्य अत्रेंनीच महाराष्ट्राच्या पत्रकारांना बहुधा शिकवलं असावं असं वाटतं; कुठे, कधी, कसं, केव्हां, का ही “क” सूत्रे अत्रेंच्या आवडीची होती, असं त्यांचे जीवनानुभव ऐकल्यावर लक्षात येतं. पण यावरुन त्यांची अभ्यासू वृत्ती, प्रत्येक विषयाचं चिंतन, मनन, असे अनेक स्वभाव समोर येतात. कोणताही विषय किंवा पाठ हा अत्र्यांच्या दृष्टींनं कठीण असा नव्हताच; एका कार्यक्रमामध्ये आचार्य अत्रेंना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. पुस्तक प्रकाशनाचा तो कार्यक्रम होता. काही कारणांमुळे, अत्रेंना कार्यक्रमात यायला उशीर झाला, त्यामुळे पुस्तकाचे प्रकाशक, लेखक, आयोजक थोडेसे चिंतित झाले. पण ठरल्याप्रमाणे अत्रे आले. त्यांच्या भाषणाला सुरुवात झाली. पुस्तका विषयी सुद्धा ते भरभरुन बोलले. तिथे उपस्थित असलेल्या पुस्तक प्रेमींना त्यांच्या भाषणाविषयी इतकी अप्रुपता वाटली, की प्रकाशन सोहळा उरकल्यानंतर हातोहात त्या पुस्तकाची विक्री होऊन सर्व प्रती ही संपून गेल्या. कुतूहल म्हणून लेखकानी अत्रेंना विचारलं की “या पुस्तकात तुम्ही असं काय पाहिलेत ज्यामुळे माझं पुस्तक लोकांना विकत घ्यावसं वाटलं? यावर आचार्य अत्रे उत्तरले मी फक्त पुस्तकाचं मुखपृष्ठ, आतील काही मजकूर, प्रस्तावना वरुनच न्याहाळला त्यामुळे मला कल्पना आली की पुस्तक कशावर आधारित आहे, व मी विषय फक्त विस्तृत करुन सांगितला इतकच.”

अत्रेंचा हजरजबाबीपणा, वाकचातुर्य आणि लोकांना तासनतास एकाच जागेवर खिळवून ठेवण्याची हातोटी काय असेल आणि होती, या प्रसंगामुळे अधोरेखीत होतं.

अशा अनेक मैफिली अत्रेंनी गाजवल्या, त्यामुळे एकपात्री प्रयोग, विनोदी किस्से, नाटिकांना तुफान प्रतिसाद मिळू लागला. रंगभूमीवर विनोदी नाटकांना, एकांकीकांना लौकिकता प्राप्त झाली. ती अत्र्यांमुळे. मोरुची मावशी, लग्नाची बेडी, वस्त्रहरण सारख्या विनोदी नाटकांचा जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला आणि आजतागायत ही नाटकं टिकून आहेत, ती ही “हाऊसफुल्ल” च्या पाट्यांसह, तसेच प्रयोग आचार्य अत्रेंनी रुपेरी पडद्यावर ही साकारले. यामध्ये विषयांची वैविध्यता होती. चाकोरी बाहेरची कथा ब्रम्हचारी, ब्रॅण्डीची बाटली सारख्या “बोल्ड” व “विनोदी” पटांमुळे ३०-४० च्या दशकात त्यांच्यावर प्रचंड टिका ही झाली. पण अत्रे त्यास भुलले नाही. आपल्या विरोधकांना कधी प्रति टिकेतून तर कधी कृतीतून उत्तर दिलं; १९५४ साली पहिल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये त्यांच्या “श्यामची आई” या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं “राष्ट्रपती सुवर्ण कमळ” पारितोषिक मिळालं व भारतीय सिनेसृष्टीत इतिहास रचला गेला; त्यानंतरच्या वर्षांत “महात्मा ज्योतिराव फुले” ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. आदर्श आणि उत्कृष्ट चित्रपटाची मूल्य काय असतात हे सुद्धा “काही न बोलता पण बरच काही करता” अत्र्यांनीच स्पष्ट केलं.

त्यांच्या शब्दांचे फटकारे व विनोदी बाज हा मराठा या वृत्तपत्रातून काम राहिला तो संयुक्त महाराष्ट्रानंतर ही. पण विनोदात ही त्यांच्या गांभीर्य लपलेलं होतं. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीपूर्वी जेव्हा यशवंतराव चव्हाण, कॉंग्रेसी नेते व दिल्लीतील उच्च स्तरावर सुद्धा महाराष्ट्र राज्यासाठी अनुकूलता मिळाली त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी अत्रेंना एक प्रश्न विचारला की “संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हे मान्य आहे, आणि तो होईल सुद्धा. पण झालाच पाहिजे हा अट्टाहास का? झाला या शब्दापुढे “च” कशासाठी?” यावर अत्रे म्हणाले तुमच्या म्हणजे “चव्हाण” या आडनावापुढचा “च” हा शब्द काढून टाकला तर काय होईल? याचा विचार केला आहे कधी? अत्रेंनी अगदी शांतचित्ताने यशवंतरावांना प्रतिप्रश्न केला; यावर यशवंतरावांची काहीशी गोची झाली होती.

आचार्य अत्रेंच्या धडाडी व बंडखोर स्वभावामुळे त्यांच्यावर टीका झाली ती त्यांनी घेतलेल्या भूमिकांमुळे. कधी अत्रेंवर चारित्र्यहननाचे आरोप झाले, तर कधी आदर्शाची पायमल्ली करणारी व्यक्ती म्हणून, पण अत्रे यांचे निश्चय व निष्ठा हे पक्के होते. त्यापैकीच एक म्हणजे सामाजिक बांधिलकी. तळागळातील दुर्बल घटक, उपेक्षित जीवन जगणार्‍या व्यक्ती, गरीब लोकांच्या विषयी नेहमीच अत्र्यांनी नेहमीच आस्था प्रगट केली.

बहुढंगी अत्र्यांनी ह्या महाराष्ट्राला कलेचा आयाम प्राप्त करुन दिला, त्यांच्यामुळेच आज काही कला, साहित्य हे वृद्धिंगत होत गेल्या, अस्मितेची ज्योत तेवत ठेवण्यात तसंच मराठी माणसांनी उद्योग निर्मिती व उभारणी करण्याचा “प्रत्यक्ष वस्तुपाठ” घालून दिला.

“कलासक्त”, “धूर्तता”, “राजकारणी”, “शिक्षण तज्ज्ञ”, “उद्योगी”, आणि “सच्चा देशभक्त” यासारखे गुण एकत्रित आल्यानं आचार्य अत्रें सारखी व्यक्ती महाराष्ट्रानं नव्हे उभ्या देशानं पाहिली. चराचरात भिनणारी त्यांची किर्ती व लौकिकता अजरामर ठरली आहे ती चिरंतन.. व त्यांच्या स्मृती जपत.

— सागर मालाडकर

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..