नवीन लेखन...

छंद नाण्यांचा…

आजच्या धकाधकीच्या जीवनात छंद हेच आपल्या मनाला सुख, समाधान आणि आनंद मिळवून देतात. आपल्याला जगण्याचा अर्थ अनेक प्रकारच्या छंदांमधून मिळत असतो. एक हौस किंवा विरंगुळा म्हणून आपण जे काही करतो ते छंद म्हणूनच गणले जाते. छंदामुळेच आपल्या व्यक्तिमत्त्वाला नवीन पैलू आणि परिणाम प्राप्त होतात. ठराविक प्रकारच्या कामामुळे येणारी रूक्षता आणि मनाला येणारे मळभ हे दूर करण्यासाठी एखादा छंद जोपासणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे जीवनात आनंद मिळू शकतो. छंद हेच स्वतःचा शोध घेण्याची आणि व्यक्त करण्याची संधी देतात आणि जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवितात. नवनिर्मितीतून मिळणारा आनंद हाच छंदाची वाटचाल ठरवतो.

1978 साली मी जेव्हा बँकिंग क्षेत्रात ‘कॅश क्लार्क’ म्हणून पदार्पण केले, तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासूनच माझा आणि रुपये-पैशांचा प्रत्यक्ष संबंध आला. रोज रुपये आणि नाणी हाताळताना धातूच्या नाण्यांविषयी एक प्रकारची आत्मियता वाटू लागली आणि त्यातूनच वेगवेगळ्या प्रकारची मूल्ये असलेली ‘नाणी जमविणे’ या माझ्या छंदाची निर्मिती झाली.

मी सर्वप्रथम ‘नाण्यांचा इतिहास’ अभ्यासला आणि मला नाण्याविषयी मौलिक माहिती मिळत गेली. प्राचीन भारतीय साहित्यात बृह्दारण्यक, उपनिषद, अग्निपुराण, मस्यपुराण, मनुस्मृती इत्यादी प्राचीन ग्रंथात सुवर्ण, द्रम, कार्षापण, निष्क, कृष्णल, रूप्य ही नाणीवाचक नावे आढळतात. टाकसाळ प्रमुख याने रूप्यरूप आणि ताम्ररूप म्हणजे चांदीची व तांब्याची नाणी निर्माण करावीत असे कौटिलीय अर्थशास्त्रात सांगितले आहे.

नाण्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ‘नाणेशास्त्र’ असे म्हटले जाते. नाणेशास्त्र हे जुनी नाणी गोळा करण्याचा छंद म्हणून मानले जाते. या शास्त्रात कोणत्याही माध्यमाचा वापर लोकांद्वारे पैसा म्हणून केल्यास त्याचा अंतर्भाव होतो आणि विनिमय करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम म्हणून समाविष्ट आहे. या शास्त्राच्या आधारे एखाद्या प्रदेशाचा आर्थिक विकास आणि ऐतिहासिक समाजाचे आकलन या प्रमुख गोष्टी प्रकाशात येतात.

भारतीय नाण्यांचा जन्म इ.स. पूर्व सहाव्या शतकात झाला असे मानतात. भारतीय नाण्यांना 2600 वर्षांपेक्षा अधिक जुनी परंपरा आहे. काशी, मगध, गांधार, पांचाल आणि कलिंग या राजवटींनी प्रथम नाणी पाडली आणि ती चौकोनी, गोल, षटकोनी अशा विविध आकारात बनविली जात असत. मौर्य साम्राज्य, सम्राट अशोकाचा काळ,  गुप्त साम्राज्य, सातवाहन राजे यांनी सोने, चांदी आणि तांबे या धातूंचा नाण्यासाठी वापर केला.

शिवकाळात सोन्याचा ‘होन’, चांदीची ‘लारी’ व तांब्याची ‘शिवराई’ ही प्रमुख नाणी म्हणून उल्लेख आहे. शिवराईवर ‘श्री राजा शिव’ आणि दुसऱ्या बाजूला ‘छत्रपति’ अशी अक्षरे उमटविलेली दिसतात.

स्वातंत्र्यानंतर भारतात 1950 साली स्वतंत्र भारतीय नाण्यांची निर्मिती झाली.  एक पै, एक आणि दोन आणे तर पा, अर्धा आणि एक रुपया किंमतीच्या नाण्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय चनलाला रुपया आणि सुट्टे रुपये म्हणजे पैसे अशा संज्ञा देण्यात आल्या. ही नावे भारतभर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय चलन म्हणून वापरात येऊ लागली. भारतीय चलनाचा आंतरराष्ट्रीय कोड खछठ असा आहे. तसेच भारतीय चलनाचा खडज नंबर  4217 असा आहे. भारतीय रुपयासाठी ‘’ हे चिन्ह वापरात आहे.

एक नवा पैसा हे ब्राँझ या धातूमध्ये तयार केले गेले. त्यानंतर 2, 3, 5 आणि 10 नये पैशांची क्यू प्रोनिकल या मिश्र धातूंमध्ये नाणी काढण्यात आली. तसेच 25 पैसे, 50 पैसे आणि 1 रुपयांची नाणी  निकेल धातूचा वापर करून बनविली गेली. यातील काही नाणी नंतर बाद करण्यात आली.

माझ्या नाण्यांच्या संग्रहात 5 पैशांंची 8 नाणी, 10 पैशांची 12 नाणी,  20 पैशांची 5 नाणी, 25 पैशांची 8 नाणी, 50 पैशांची 5 नाणी, 1 रुपयाची 19 नाणी, 2 रुपयांची 35 नाणी, 5 रुपयांची 23 नाणी आणि 10 रुपयांची 6 नाणी अशी एकंदर  121 नाणी आहेत. त्या नाण्यांच्या पाठच्या बाजूस मस्य उद्योग, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, इंदिरा गांध, पंडित नेहरू, सेल्युलर जेल (अंदमान), लोकनायक जयप्रकाश नारायण, लुई ब्रेल (ब्रेल लिपीचे जनक), महाराणा प्रताप, महात्मा गांधी, दादाभाई नवरोजी, श्यामाप्रसाद मुखर्जी, स्वामी विवेकानंद, श्री माता वैष्णोदेवी, जगद्गुरू श्री नारायण गुरूदेव, छत्रपती शिवाजी महाराज, कामराज, डॉ. होमी भाभा, संत  तिरुवल्लवूर, गेंड्याचे चित्र, राजीव गांधी, आंतरराष्ट्रीय परिवार दिन, राष्ट्रमंडल संसदीय संमेलन 1991, नेताजी सुभाषचंद्र बोस, विश्व  खाद्य दिवस 1993, देशबंधू चित्तरंजन दास, श्री अरविंद, सरदार वल्लभभाई पटेल, सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया, श्रम जगत 1994, नवम एशियाई खेल 1982, दांडीयात्रा 75 वर्षपूर्ती 2005, भगवान महावीर  2500 वा जन्मकल्याण दिवस 2001, संत अल्फोंसा जन्मशताब्दी वर्ष 2007, प्रथम स्वतंत्रता संग्राम 1857,  खाद्य एवं कृषी संघटन 1995 या सर्व व्यक्ती व प्रसंग विशेष सर्वांच्या स्मृती जतन करणाऱ्या प्रतिमा आहेत.

ही सर्व नाणी अत्यंत दुर्मिळ असून मी ती जिवाभावाने व प्राणापलीकडे जपली आहेत.  या सर्व नाण्यांचा स्वतंत्र अल्बम तयार केला आहे. बँकिंग क्षेत्रातील 38 वर्षांच्या सेवेमधील कार्यकाळात तसेच सेवानिवृत्तीनंतरही माझा नाणेसंग्रहाचा छंद अजूनही कार्यरत आहे. नाण्यांचा इतिहास मोठा रंजक आहे. नाण्यांच्या शिस्तबद्ध अभ्यासाने आपला इतिहास कळू शकतो.

ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या एका कवितेतून ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असे जीवनाचे तत्त्वज्ञान सांगतात. तेव्हा आपले असे अनेक प्रकारचे छंद त्याला पूरक ठरतात.

–अनिल कालेकर

(व्यास क्रिएशन्स च्या पासबुक आनंदाचे  दिवाळी २०२२ ह्या अंकामधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..