नवीन लेखन...

Cell नव्हे जेल

स्वातंत्र्यापूर्वी, वीर सावरकरांनी ‘काळया पाण्या’ची शिक्षा भोगली! ती ही अंदमान सारख्या त्याकाळातील निर्जन अशा बेटावर.. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली.. नेहरू, गांधी, वल्लभभाई पटेल अशा अनेकांनी भारत देश स्वतंत्र व्हावा, म्हणून कारावास भोगला..

आज स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षं झाल्यानंतरही गेली चोवीस वर्षे अगदी एक वर्षाच्या बाळापासून नव्वदीतल्या ज्येष्ठांपर्यंत आपण सर्वजण मोबाईल उर्फ सेलफोनच्या जेलमध्ये, स्वखुशीने बंदीवान आहोत…

त्याआधी टेलिफोन होता, मात्र त्याचं ‘वेड’ कुणालाही लागलेलं नव्हतं… अगदी ‘इमर्जन्सी’ असेल तरच फोन केला जात असे. काही काळानंतर फोनवर ‘फावल्या’ वेळात गप्पाही रंगू लागल्या..

जेव्हा मोबाईल हातात आला आणि तेव्हापासून प्रत्येकाचं बोलणं, व्यक्त होणं हे सार्वजनिक न राहता खाजगीत होऊ लागलं.. ॲ‍न्ड्राॅइडचे मोबाईल आल्यापासून तर प्रत्येकजण आपला ‘पासवर्ड’ टाकून ‘खाजगी’ गोष्टी लपवून ठेवू लागला..
लहान बाळालाही खेळण्यांपेक्षा मोबाईल हाताळण्याचं आकर्षण वाटू लागलं.. मोबाईल दाखवताच रडणं थांबवून ते त्या ‘यंत्रराक्षसा’शी खेळू लागतं.. खरं पाहता, मोबाईलची प्रकाशकिरणं लहान मुलांच्या डोळ्यांना अपायकारक आहे.. तरीदेखील कौतुकानं त्याला मोबाईलशी खेळू दिलं जातं..

लाॅकडाऊनमुळे शाळा ऑनलाईन झाल्याने विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मोबाईल हाच पर्याय उरला.. या मोबाईलने शाळेत जाऊन, बाकावर बसून शिकण्याचं ‘सौख्य’ही हिरावून घेतलं..

महाविद्यालयात मोबाईल ही अत्यावश्यक गोष्ट झाली. शंका समाधानासाठी ‘गुगल सर्च’ शिवाय दुसरा पर्याय राहिलाच नाही. वहीतील लिहिलेल्या नोट्सपेक्षा आयत्या पीडीएफ फाईल एकमेकांत फिरवणे सोपे जाऊ लागले..

नोकरी किंवा व्यवसायात संपर्कासाठी मोबाईलशिवाय पर्याय नाही. त्याचा उपयोग एखाद्या ‘असिस्टंट’सारखा होऊ लागला. आकडेमोडीसाठी स्वतंत्र ‘कॅल्सी’ बाळगण्याची गरज राहिली नाही. मिनी काॅम्प्युटर प्रमाणे इमेल करुन माहिती पाठविणे, घेणे सहजरीत्या होऊ लागले..

प्रवासात हा रस्ता कुठे जातो? हे ‘गुगल मॅप’ मुळे कुणालाही विचारण्याची गरजच पडत नाही.. सहाजिकच ‘संवाद’ कमी झाला..

बडबडणारी माणसं गप्प राहू लागली. हाॅटेलमध्ये खातानाही नजर पदार्थांकडे न जाता मोबाईलच्या स्क्रिनवर स्थिर असते.. ड्रायव्हिंग करताना देखील निम्मं लक्ष मोबाईलवर असतं.

गृहिणी पाककृतीचं पुस्तक वाचण्यापेक्षा, मोबाईलवरील ‘यु ट्युब’मधील पाककृती पाहून नवीन पदार्थ शिकतात..

पेन्शनरही मोबाईलवर व्हाॅटसअप व फेसबुकवर रमलेले असतात. पूर्वी देवळात भजन, कीर्तनाला जाऊन वाती वळत बसणाऱ्या, वृद्ध स्त्रिया मोबाईलवरील कीर्तनात, दंग होतात.

थोडक्यात, आपण सर्वांनी स्वतःला मोबाईलच्या तुरुंगात कैद करुन घेतले आहे.. जेव्हा त्याचा वापर नसतो, तेव्हा जणूकाही आपली ‘पॅरोल’वर सुटका झालेली असते..

कित्येकांचे मोबाईल हरवतात, चोरीला जातात.. तेव्हा खरंतर त्यांची या जेलमधून सुटका झालेली असते.. तरीदेखील व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्वरीत दुसरा नवीन मोबाईल खरेदी करुन, पुन्हा स्वतःला कोंडून घेतले जाते.. याचे दुष्परिणाम भयंकर होणार आहेत, हे आपल्याला माहीत असूनही आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही.. लहान मुलांच्या डोळ्यांवर व मेंदूवर परिणाम होऊ शकतो.. कित्येक विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी, मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या केलेल्या आहेत.. याचा गैरवापर करून स्त्रियांना ‘ब्लॅकमेल’ केले जाते. याच मोबाईलवर ‘हनीट्रॅप’ करुन पैसेवाल्यांना लुटले जाते. सायबर गुन्हेगारी होते. मोबाईलचा अतिवापर करणाऱ्यांना हा ‘मानसिक रुग्ण’ करु शकतो..
काहीजण व्हाॅटसअपवर, फेसबुकवर अतिरंजीत, अशक्य अशा चित्रफित समाजमाध्यमात पसरवतात.. ते कितपत खरेखोटे याची शहानिशा न करता एकमेकांना पाठवत रहातात.. राजकारणाविषयी वादग्रस्त भाष्य केलं जातं..
आता फोर जी मोबाईल आहेत, याच्या पुढची ‘फाईव्ह जी’ आवृत्ती आल्यानंतर, या आभासी जगात संपूर्ण मानवजात अडकणार आहे.. चक्रव्यूहाप्रमाणे त्यामध्ये प्रवेश सहज करता येईल, मात्र त्यातून बाहेर पडणं, ही अशक्य कोटीतील गोष्ट असेल..

आत्ताच्या जगातही माझे काही मित्र, या मोबाईल पासून, कोसों दूर आहेत.. त्यांचं मोबाईलशिवाय कधीही अडलं नाही.. ते या तुरुंगाच्या नादी कधीही लागले नाहीत.. म्हणूनच ते ‘परमसुखी’ आहेत!!

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

३०-११-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 406 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..